श्री दत्त जयंती
॥ श्री दत्त जयंती ॥

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच श्री दत्त जयंती हा उत्सवाचा पवित्र आणि सात्त्विक दिवस आहे. सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य उपास्य दैवत असून तेच सद्गुरु आहेत. ते सिद्धीदाता आणि अष्टांग योगाचे मार्गदर्शक आहेत. श्री दत्तात्रेयांचा अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा प्रतिक आहे. त्याचप्रमाणे या अवतारामध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकवटलेले आहेत. सर्व प्रकारच्या ऐहिक प्रगतीसाठी आणि पारमार्थिक उन्नतीसाठी उपास्य दैवत म्हणून श्री दत्तात्रेयांच्या या अवताराला नितांत महत्त्व आहे. आत्म्याचे परमात्म्याशी असलेले एकरूप, तसेच अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
श्री दत्त भगवंतांचे स्वरूप :-
श्री भगवान दत्तगुरूंच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू, मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल आणि वरच्या दोन हातात शंख आणि सुदर्शन चक्र अशा प्रकारची आयुधे सहा हातांमध्यें धारण केलेली आहेत. पाठभेदाने या क्रमांत आणि आयुधांत थोडाबहुत फरक दिसून येतो.
उपासक सम्प्रदाय : -
बहुतेक सर्व संप्रदायांमध्ये आणि त्यांच्या शाखा-उप शाखांमध्ये श्री दत्त उपासना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तरीही प्रामुख्याने महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे पाच मुख्य दत्त उपासक संप्रदाय मानले जातात.
श्री दत्तभक्त साधक : -
अगदी पुराण काळातही कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, भार्गव परशुराम, अलर्क, यदू, आयु, प्रल्हाद हे श्री दत्त कृपा संपादन केलेले शिष्य होऊन गेलेत. उपनिषद काळात संस्कृती नावाचा शिष्य असल्याचा उल्लेख अवधूत उपनिषद आणि जाबाली उपनिषदात आढळून येतो. श्री दत्त कृपेच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या या महान भक्तांकडून झालेल्या थोर कार्याची दखल पुराणांनाही घ्यावी लागली.
या व्यतिरिक्त अर्वाचीन काळातही श्री दत्तगुरूंचे अनेक परमभक्त आणि महान उपासक होऊन गेलेत. त्यापैकी काही परमपूज्य नावे खालील प्रमाणे आहेत.
श्रीपाद श्रीवल्लभ : -
चौदाव्या शतकाच्या मध्ययुगीन काळात श्रीदत्त भगवंताचे प्रथम अवतार रूपाने हे अवतरले.आंध्र प्रदेशातल्या पिठापूर येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला महाराजांचा जन्म झाला. हे दत्त अवतारी संप्रदायातले पूर्ण ब्रह्मचारी होते. यांचा कार्यकाळ शके १३३० ते १३५० (इ.स.१३९८ ते १४२८) असा असून कुरवपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या अवताराची समाप्ती केली.
श्री नृसिंह सरस्वती : -
हे १४ व्या शतकात होऊन गेलेले श्री दत्तप्रभूंचे हे दुसरे अवतार म्हणून ओळखले जातात. यांचा जन्म इसवी सन १३७८ मध्ये कारंजा (लाड) येथे झाला. ते संन्यासी वेशधारी होते. कृष्ण सरस्वती असे त्यांच्या गुरुंचे नाव होते. त्यांच्याकडून यांना इसवी सन १३८८ मध्ये संन्यास दीक्षा मिळाली. त्यांचा एकूण कार्यकाळ इसवी सन १३७८ ते १४५८ असा आहे. त्यांच्या शिष्यवर्गांमध्ये माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, सिद्धसरस्वती इत्यादी महान दत्तभक्त होऊन गेलेत. इसवी सन १४५८ मध्ये यांनी आपले अवतार कार्य समाप्त केले.
श्री नृसिंह सरस्वती महाराज (आळंदी) : -
महाराजांचा कार्यकाळ त्यांच्या आळंदी येथील अवतरणापासून म्हणजे इ.स. १८७४ ते १८८६ एवढाच अवगत आहे. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांनी पौष शुद्ध पौर्णिमेला १८८६ मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.
श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) : -
श्री स्वामी महाराजांचा पूर्व काळ माहित नाही आश्विन कृष्ण पंचमी बुधवार १८५७ या दिवशी स्वामींचे अक्कलकोट येथे आगमन झाले. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची ही माहिती नाही. ते दिगंबर स्वरूपात म्हणजे अवधूत रूपात राहत असत. १८५६ ते १८७८ हा स्वामींचा कार्यकाळ असून अक्कलकोट येथेच चैत्र कृष्ण त्रयोदशी १८७८ मध्ये स्वामींनी समाधी घेतली. बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज, रामानंद बिडकर महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती महाराज हा त्यांचा शिष्यवर्ग होता. श्री स्वामी महाराजांना श्री दत्ताचे चौथे अवतार मानले जाते.
श्री आनंदभारती स्वामी महाराज : -
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील चेंदणी नावाच्या लहानशा गावी कोळीवाड्यात १८३१ मध्ये महाराजांचा जन्म झाला. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी १९०१ मध्ये महाराजांनी आपले अवतार कार्य संपविले. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथील श्रीदत्त मंदिर आणि शीतला देवीची १८७९ मध्ये त्यांनी स्थापना केली.
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी : -
हे स्वामी, टेंबे स्वामी या नावाने ही सर्वत्र परिचित आहेत. यांचा कार्यकाळ १८५४ ते १९१४ असा असून वयाच्या २१व्या वर्षी १८७५ मध्ये त्यांचा विवाह झाला. १८९१ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याच्या तेराव्या दिवशीच त्यांनी संन्यास स्वीकारला होता. श्री गोविंद स्वामी हे त्यांचे मंत्र गुरु असून श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे त्यांचे दीक्षा गुरु आहेत. त्यांनी १९१४ मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गरुडेश्वर येथे समाधी घेतली. श्रीरंग अवधूत स्वामी, श्री गुळवणी महाराज हे त्यांचे शिष्य होते.
श्री रंग अवधूत स्वामी महाराज : -
रत्नागिरीच्या एका दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात कार्तिक शुद्ध नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी या दिवशी १८९८ मध्ये महाराजांचा जन्म झाला. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी हे त्यांचे गुरु होते. महाराजांनी अनेक संस्कृत, मराठी , गुजराती ग्रंथांची रचना केली असून त्यातील श्रीदत्त बावनी सारखी गुजराती आणि काही मराठी स्तोत्रे खूप विख्यात आहेत. त्यांनी संपूर्ण गुजरात राज्यात दत्त संप्रदायाचा प्रसार केला. १९ नोव्हेंबर १९६८, कार्तिक कृष्ण अमावस्येच्या दिवशी हरिद्वार येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.
श्री शंकर महाराज : -
एका अंदाजानुसार इ.स. १८००मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातल्या अंतापुर नावाच्या एका छोटेखानी गावात उपासनी कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. २४ एप्रिल १९४७ या दिवशी पुण्यामधील धनकवडी येथे महाराजांनी देह ठेवला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे स्पर्श दीक्षा गुरु होते.
श्री गजानन महाराज (शेगाव) : -
२३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी महाराज शेगांवी प्रकटल्याची नोंद आहे. त्यांच्या पूर्वायुष्यातल्या गोष्टी माहीत नाहीत. १८७८ ते १९१० या काळात महाराजांनी आपल्या पवित्र वास्तव्याने शेगांवची भूमी पावन केली. ता. ८/९/१९१० रोजी भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांनी देह ठेवला. ते सदैव दिगंबर अवस्थेत असत.
श्री उपासनी बाबा (साकोरी)
श्री किसन गिरीजी महाराज (देवगड)
श्री गगनगिरी महाराज
श्री गजानन महाराज (अक्कलकोट)
श्री गुळवणी महाराज
श्री जनार्दन स्वामी
श्री दास गणू महाराज
श्री देव मामलेदार (सटाणा)
श्री धुनीवाले दादाजी (गिरनार)
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर
श्री माणिक प्रभू महाराज
श्री लोकनाथतीर्थ स्वामी
या व्यतिरिक्त काही परम उपासक स्त्रियाही होऊन गेल्यात.
अशाप्रकारे प्राचीन आणि अर्वाचीन काळात होऊन गेलेल्यांपैकी काही फारच थोड्या परम दत्तभक्त उपासकांची अल्पशी माहिती आपण पाहिली.
श्री दत्त नामाचा महिमा : -
श्रीमद् भागवत महापुराणात अनसूया अत्रिनंदन "दत्त" या नावाची आख्यायिका किंवा महात्म्य असे सांगितले आहे की, पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अत्री ऋषींनी केलेल्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री विष्णु भगवंतांनी स्वतःच स्वतःला अत्री ऋषींना पुत्ररूपाने दिले. ते स्वतः पुत्ररूप होऊन त्यांनी अत्री ऋषींची पुत्रकामना पूर्ण केली. अशा प्रकारे "मीच मला दिले" म्हणजे दिलेला म्हणून "दत्त" हे नाव प्रचलित झाले.
श्रीदत्तगुरूंचे अवतार : -
स्वतः श्रीदत्त गुरू हे श्री विष्णू भगवंताच्या २४ अवतारांपैकी सहावे अवतार आहेत. त्यांच्या आधी "कपिल" हा पाचवां अवतार असून त्यांच्या नंतर "नर-नारायण" हा सातवां अवतार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या अवतारां व्यतिरिक्त श्री दत्तगुरूंनी एकूण सोळा अवतार धारण केले होते.
१) श्री योगीराज
२) श्री अत्रिवरद
३) श्री दत्तात्रेय
४) श्री कालाग्निशमन
५) श्री योगीजनवल्लभ
६) लीलाविश्र्वंभर
७) श्री सिद्धराज
८) श्री ज्ञानसागर
इत्यादी सोळा अवतार धारण केले होते.
श्रीदत्त गुरूंचे २४ गुरू : -
द्वापार युगात महाभारत युद्धाची समाप्ती झाली. थोड्याच कालावधीत गांधारीच्या शापाने संपूर्ण यदु कुळाचा सर्वनाश झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी देखील आपले अवतार कार्य समाप्त करण्याचे ठरविले. आपले अवतार कार्य संपवताना त्यांनी त्यांचे परमभक्त उद्धवाला तशी कल्पना दिली. त्यावेळी उद्धव यांनी अत्यंत कळवळून भगवंतांना विनंती केली की मला ज्ञान सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, पूर्व काळी श्रीदत्त भगवंतांनी अवधूत रूपात २४ गुरुंपासून प्राप्त केलेले जे ज्ञान माझ्या यदू नावाच्या पूर्वजाला सांगितले होते तेच ज्ञान आता मी तुला सांगतो. त्यावेळी श्री दत्तगुरूंच्या त्या त्या गुरूंचे गुण आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा बोध श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवाला करून दिला. या सर्व बोधपर उपदेशाचा उल्लेख श्रीमद् भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधाच्या सात ते नऊ अध्यायांमध्ये आलेला आहे. तसेच श्री टेंबे स्वामी महाराजांनी रचलेल्या दत्त महात्म्यातही हा उल्लेख आढळून येतो. यामध्ये श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक वस्तू, प्राणी, पक्षी, पंचमहाभूते, व्यक्ती या सर्वांकडून त्यांच्यातील गुण प्राप्त केले आणि त्यांना आपले गुरु मानले असे स्पष्ट केलेले आहे. श्री दत्त प्रभूंच्या या सर्व गुरूंची संख्या २४ होती. त्यांच्या या गुरूपरंपरेतून आपणास हा बोध होतो की, ज्या ज्या घटकांपासून आपणास काही तरी ज्ञान मिळते, ते आपले गुरुच होत. याचाच अर्थ प्रत्येकाकडून काही तरी ज्ञान प्राप्त होते.
ज्या महिन्याच्या मृग नक्षत्रात पौर्णिमा होते त्या महिन्याला मृगशीर्ष किंवा मार्गशीर्ष असे म्हणतात. मासानां मासोऽहं म्हणजे सर्व बारा महिन्यातील सर्वात पवित्र असा मार्गशीर्ष महिना मीच आहे, असे श्रीकृष्ण भगवंताचे श्रीमद्भगवद्गीतेत वचन आहे. याच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी प्रदोष वेळी श्री दत्तप्रभूंचा जन्म झाला. म्हणून या दिवशी श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो.
श्री दत्त महात्म्य / वैशिष्ट्ये :-
केवळ स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून जातात म्हणून त्यांना "स्मर्तृगामी" असंही म्हणतात. आद्य शंकराचार्य यांनी श्री दत्त स्तुती करताना म्हटले आहे की, ब्रह्मज्ञान श्री दत्तगुरूंची मुद्रा असून आकाश आणि भूमी हीच त्यांची वस्त्रे आहेत आणि ते स्वतः प्रज्ञानघनस्वरूप आहेत. हे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांच्या अंशस्वरूप आहेत. श्री दत्तात्रेय हे सगुण रुपात असले तरी उपासनेत त्यांच्या पादुकांनाच मुख्यपणे महत्त्व असते.
श्रीदत्तात्रेय यांची तीर्थक्षेत्रे :-
यांच्या मुख्य तीर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूर, वाराणसी, काशी, प्रयाग, उडूपी, श्रीनगर, अबूपर्वत आहेत. गुजरातमध्ये गिरनार पर्वत हे सिद्धपीठ मानले जाते. या व्यतिरिक्त श्री नृसिंह वाडी, श्रीक्षेत्र औदुंबर, श्रीक्षेत्र कुरवपूर, श्रीक्षेत्र कारंजा, श्री क्षेत्र पिठापूर, श्रीक्षेत्र कर्दळीवन, माणगाव, आंबेजोगाई, अक्कलकोट, अमरकंटक, गाणगापूर वगैरे अनेक अनेक क्षेत्रे ही दत्त पीठे म्हणून नावारूपाला आलेली आहेत. प्रत्येक क्षेत्राचे आपापले वैशिष्ट्य आणि महात्म्य वेगवेगळे आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
स्मरा स्मरा हो स्मरा स्मरा, दत्तगुरुंचे नाम स्मरा ॥
लेखन, संकलन, संपादन - सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
मंगळवार, ता.२६/१२/२०२३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩