पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक – ३)
पं. गोपीनाथ कविराज :
महान दार्शनिक, विचारवंत, साधक

या लेखमालेतील प्रथम भाग – येथे पहा.
या लेखमालेतील द्वितीय भाग – येथे पहा.
पंडितजींना त्यांचे गुरु श्री विशुद्धानंद परमहंस (बाबा) यांचे अनन्य शिष्यत्व प्राप्त झालेले होते. संपूर्ण भारतीय दर्शन शास्त्रातील अत्यंत महान अभ्यासक म्हणून पंडितजींकडे पाहिले जाते. अगदी असं म्हणतात की ज्या कोणाला अध्यात्म आणि तत्त्वज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास करावयाचा असेल त्याने इतर कोणत्याही ग्रंथांच्या मागे न लागता फक्त पंडितजींची ग्रंथसंपदा अभ्यासली तरी पुरेसे होते. पंडितजी म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोशच म्हणावा लागेल. पंडितजी म्हणजे जणू काही एखादी चालती बोलती संस्थाच होते. षड्दर्शन शास्त्रांपैकी एकूण एक शास्त्रांवर त्यांचे अनन्यसाधारण प्रभुत्व होते. वेदांत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, बुद्धिझम, जैनीझम, शैवपंथ, शाक्तपंथ, वैष्णव, आगम आणि तंत्रशास्त्र या एकूण एक विषयांत त्यांनी प्रभुत्व संपादन केलेले होते. जयपुर येथील महाराजा कॉलेजमधील आपल्या वास्तव्यात तत्त्वज्ञानाच्या त्यांच्या गाढ व्यासंगाचा पाया रचला गेला.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी काशी येथील शासकीय संस्कृत विश्वविद्यालयात प्रवेश घेतलेल्या पंडितजींनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्कृत भाषेसंबंधी आणि संस्कृती संवर्धक आपल्या प्रतिभाशाली कार्यामुळे लौकिक मिळवला. १९१४ ते १९२० या सरस्वती भवन संस्थेतल्या आपल्या कार्यकाळात त्यांच्या उपजत अभ्यासू वृत्तीला घुमारे फुटले. शब्दशः अनेक विषयांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले. तत्त्वज्ञानाच्या प्रांतातील षड्दर्शन शास्त्रांव्यतिरिक्त इतरही नास्तिक आणि आस्तिक दर्शनशास्त्रे यांच्या अभ्यासासोबतच धर्मशास्त्रे, तंत्रशास्त्रे, भौतिकशास्त्रे, आगमशास्त्रे, पांचरात्र वगैरे अनेक विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास झाला. या सर्व प्रतिभाशाली अभ्यासाची प्रभा दूर दूरपर्यंत पसरली. त्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा महामहोपाध्याय या पदवीने ४ जून १९३५ रोजी गौरव केला.
१९३७ नंतरच्या आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्यात त्यांचा कल तत्त्वज्ञान आणि त्यातही विशेष करून योग, शैव आणि तंत्रशास्त्र या विषयांवर अधिक केंद्रीत झाले. तंत्रशास्त्रातील त्यांच्या अभ्यासाची खोली आणि व्याप्ती इतकी विशाल होती की त्यांनी याच तांत्रिक शाखेतील लिहिलेल्या तंत्रशास्त्र वाङ्ग्मयमें शाक्त दृष्टी या नावाच्या शोध प्रबंधाला १९६४ सालचा भारत सरकारच्या राष्ट्रीय साहित्य अकादमीचा सर्वोच्च राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराचा गौरव प्राप्त झाला.
मात्र या अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात १९१४ पासूनच झाली होती. नंतरच्या या काळातच त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती मिळविण्यासाठीच्या आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा एक अविभाज्य भाग म्हणून विविध प्रकारच्या साधना मार्गातील अनेकानेक सिद्ध साधू, संत, महात्मे, साधक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या उपासना पद्धती, त्यांच्या आचार पद्धती, त्यांचे त्यामागील तत्त्वज्ञान हे सर्व समजून घेतले. हे सर्व करतांना जात-पंथ-धर्म-लिंग-वय वगैरे भेदभावांच्या पलिकडे जाऊन फक्त आणि फक्त एक अत्यंत प्रामाणिक अभ्यासक एवढीच त्यांची ओळख होती. त्यांच्या या स्वच्छ आणि प्रामाणिक व विशाल दृष्टिकोनाच्या भूमिकेमुळेच भारतीय संस्कृती मधल्या अनेक उत्तुंग कोटीच्या अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांशी त्यांचा मुक्त संवाद होऊ शकला.
पंडितजींनी साधना मार्गातल्या ज्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, सिद्ध साधकांशी प्रत्यक्ष संबंध स्थापन करून संवाद साधला. काही साधकांशी त्यांची जीवनशैली -साधनाप्रणाली, त्यांच्या प्राप्त सिद्धी यांविषयी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या पश्चात जाणून घेऊन अभ्यास केला. त्यापैकी काही मोजक्या नावांचा उल्लेखही आश्र्चर्य वाटण्यासारखा आहे.
१) राम ठाकुर (केदार मालाकार) २) नागाबाबा ३) किशोरी भगवान ४) योगत्रयानन्द (स्वामी शिवराम किंकर) ५) सिद्धीमाता ६) रामदयाल मजूमदार ७) विशुद्धानंद परमहंस (गुरू) ८) मॉं आनंदमयी ९) सतीशचंद्र मुखोपाध्याय | १०) नवीनानंद |
१९०२ मधील आपल्या विद्यार्थी दशेपासून सुरू झालेली ही त्यांची सत्संग यात्रा जीवनाच्या उत्तरार्धापर्यंत अखंड चालूच होती. यामध्ये आश्र्चर्यजनक गोष्ट अशी की, १९०२ पासून जीवन उत्तरार्धापर्यंत झालेल्या साधूभेटींचा साद्यंत वृत्तांत, कोणाला कधी कोठे कसे भेटले, भेटीत झालेली प्रश्र्नोत्तरे, त्यांच्या साधना प्रणाली, साधनेतील त्यांची तयारी, त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन, प्राप्त केलेले ज्ञान वगैरे गोष्टी खडानखडा त्यांना संगतवार आठवत असत. अलौकिक स्मरणशक्तीची दैवजात देणगीच त्यांना लाभली होती.
त्यामुळेच त्यांची उत्तरोत्तर प्रगती एका प्रामाणिक संशोधकाकडून दैवी वरदानप्राप्त उपासकाकडे, तेथून एका सत्यान्वेषी द्रष्ट्याकडे आणि शेवटी एका महान अध्यात्मिक मार्गदर्शकाकडे होत गेली. पंडितजींच्या या प्रामाणिक आणि आर्त भावनेचे फळ म्हणूनच त्यांना अध्यात्माच्या जगातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या योगीराज विशुद्धानंद परमहंस यांचे शिष्यत्व मिळण्याचे भाग्य १९१८ साली प्राप्त झाले. २१ जानेवारी १९१८ या दिवशी परमहंस स्वामींनी पंडीतजींना दीक्षा देऊन कृतार्थ केले. इथून पुढे पंडितजींची वाटचाल अध्यात्म मार्गातील स्वानुभूतीच्या प्रांतात अत्यंत वेगाने होऊ लागली. शब्दशः अनेक शास्त्रांवर प्रभुत्व असणाऱ्या एका महान परंतु तितक्याच अभिमानशून्य साधकाची ही वाटचाल असल्याने आणि सोबत त्यांच्या विनम्रतेने आणि सेवाभावाने प्रसन्न झालेल्या गुरूंच्या आशीर्वादाने अध्यात्माच्या जगातील त्यांच्या प्रगतीची दिशा सदैव अखंड आणि उत्तुंगच राहिली. दैववशात १९३७ मध्ये त्यांच्या परम श्रद्धेय गुरु विशुद्धानंद परमहंस यांचे देहावसान झाले. त्याच वर्षी पंडितजींनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपले सर्व लक्ष आध्यात्मिक कार्याकडे केंद्रित केले. शासकीय नोकरीतून निवृती ही एक व्यवहारिक गोष्ट होती. प्रत्यक्षात पंडितजींनी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने स्वतःला आध्यात्मिक कार्यात झोकून दिले. खऱ्या अर्थाने हे त्यांचे निवृती जीवन नव्हतेच तर ते अध्यात्मप्रवण जीवन अत्यंत उभारीने जगत होते. गुरुजींच्या वाराणसीच्या आश्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्विकारली.
अध्यात्म, योग, तंत्रशास्त्र यांमध्ये कमालीचे यशस्वी झालेल्या पंडितजींच्या ज्ञान आणि अनुभवाचा लाभ समाजाला व्हावा म्हणून उत्तर प्रदेश राज्यपालांनी त्यांना व्यक्तिगत विनंती करून नुकत्याच स्थापन केलेल्या वाराणसी संस्कृत विश्र्व विद्यालयाच्या तंत्र-योग विभागाच्या तंत्र-योग संशोधन निदेशकाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी १९६४ मध्ये सोपविली. १९६४ ते १९६९ या पाच वर्षाच्या काळात कामाच्या अतिश्रमांनी त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. त्यामुळे १९६९ मध्ये त्यांना या जबाबदारीतून मुक्त व्हावे लागले. पुढे प्रकृती आणि मन:स्वास्थ्यासाठी व उर्वरित काळ पूर्णपणे साधनेला वाहून घेण्यासाठी ते भदैनी येथील मॉं आनंदमयी यांच्या आश्रमात जाऊन राहिले. थेट जीवनाच्या अखेरपर्यंत.
जन्माला येण्यापूर्वीच पितृछायेला वंचित झालेले हे बालक त्यानंतरच्या बाल वयात केवळ उदरभरण आणि प्राथमिक शिक्षण यासाठी अक्षरशः या घरून त्या घरी असे कधी वडिलांच्या मामांकडे तर कधी स्वतःच्या मामांकडे असे ऐन बाल वयात व विद्यार्थी दशेत वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत अस्थिर होते. दान्या, धामराई, कांठालिया या आपल्या पितृ – मातृभूमीत आता पुढे आपल्या चरितार्थासाठी काही संधी नाही आणि सोयही नाही हे लक्षात घेऊन आत्मविश्वास आणि दैवविश्र्वासावर जन्मभूमीपासून १५०० किमी दूर असलेल्या जयपूर कॉलेजमध्ये गेले. शब्दशः चारही बाजूंना कोणताही आधार आणि आशेचा किरण नसताना ते फक्त विद्येच्या ओढीने तिथे गेले. पण म्हणतात ना की, इच्छाशक्ती बलवान असेल तर नियतीसुद्धा मदत करते. त्याप्रमाणे कालक्रमाने त्यांना कधी त्यांच्या दिवंगत वडिलांचे मित्र, तर कधी बंगाल भूमीतील काही सज्जन मंडळी, कधी कोणी शिक्षक, तर कधी कोणी मित्र आश्रयदाता बनून पुढे येत राहिले. केवळ दोन वेळच्या अन्नावारी आणि मिळालेल्या दोन घासांच्या उपकारांची परतफेड करण्याच्या बुद्धीने त्यांना दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात हळूहळू पंडितजी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहिले. अक्षरशः भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी परिस्थिती असतानाच्या काळातही त्यांनी आपल्या नियमित शिक्षणाव्यतिरिक्त तत्त्वज्ञानाच्या प्रांतात नजरेत भरण्याएवढी मजल गाठली. त्यांच्यातला हा विद्येचा स्फुल्लिंग पाहून त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि आपलेपणाची भावना निर्माण होत गेली. तसतसे त्यांच्या उदरभरणाची आणि निवासाची हस्ते परहस्ते सोयही होत गेली. मात्र या व्यावहारिक अडचणींचा कधीही कसल्याच प्रकारचा बाऊ न करता ते केवळ ध्येयनिष्ठच राहिले. जयपूरच्या परीक्षेत प्रथम श्रेणीचे घवघवीत यश त्यांनी मिळवले.
पुढे स्नातकोत्तर पदवीच्या ओढीने १९१० मध्ये त्यांनी वाराणसीला क्वीन्स कॉलेजमध्ये जाणे केले. तेथेही त्यांची लोकविलक्षण प्रगती, बुद्धीची चमक, स्वतःच्या ध्येयाला वाहून घेण्याची तयारी या गुणांवर मोहित होऊन डॉक्टर वेनिस यांनी या आपल्या लाडक्या शिष्यावर मनापासून प्रेम केले. विश्र्वविद्यालयाच्या सर्वोच्च गुणप्राप्तीची नोंद त्यांच्या नावावर झाली. काशीमध्ये सुद्धा त्यांना अन्न आणि निवारा या गोष्टी भेडसावतच होत्या. उत्पन्नाचे काहीही साधन नव्हते. अशावेळी डॉक्टर वेनिस यांनी पंडितजींच्या अंगभूत गुणांवर आणि पात्रता निकषांवर मोहित होऊन त्यांना बनारस विश्वविद्यालयाच्या दोन शिष्यवृत्ती त्यांच्या अधिकारात मंजूर केल्या. त्यामुळे किंचित मात्र व्यवहारी गैरसोयी दूर झाल्या. पण सर्वार्थाने अडचणी संपलेल्या नव्हत्या. या दरम्यान त्यांनी विविध पुरातत्त्व शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. पाणिनीच्या व्याकरण शास्त्रात प्रभुत्व मिळवले आणि आपल्या वेनिस गुरूंनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. शैक्षणिक आयुष्याच्या सुरवातीपासून इथपर्यंतची त्यांची कारकीर्द ही अत्यंत दैदिप्यमान होती. यानंतरही ते विद्येच्या क्षेत्रात प्रतिभावान अभ्यासक – संशोधक म्हणून सतत नावारूपाला येत राहिले.
पंडीतजींची मातृभाषा बंगाली असल्याने त्यांचे बहुतांश बहुमोल साहित्य बंगाली भाषेत आहे. विद्यार्थी दशेत आणि नंतरच्या सेवा काळात इंग्रजी मुख्य भाषा असल्याने बंगालीनंतरचे विचार व्यक्त करण्याचे तेच मोठे साधन होते. बंगाली खालोखाल ग्रंथ रचना इंग्रजीत आहे. मात्र लेख संख्या हिंदी भाषेत अधिक आहे. संपादन केलेल्या साहित्यात संस्कृत ग्रंथ सर्वात जास्त आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील, विविध भाषांमधील ग्रंथ लिखाणाची, अनुवादित – संपादित – ग्रंथ, लेख, शोध निबंध, ग्रंथ प्रस्तावना, ग्रंथ भूमिका, वैचारिक निबंध यांची यादी फारच मोठी आहे. १४ मे १९६१ रोजी मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कॅन्सरची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरीर थकत चालले होते. अभ्यास – वाचन – लेखन कमी कमी होत गेले. त्यांच्या साधना जीवनातील अनेक रहस्यपूर्ण अनुभवांचे लिखाण फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या हस्तलिखित स्वरूपात अप्रकाशित पडून होते. त्यांच्या जीवनव्यापी साधनेइतकीच त्यांची साहित्य सेवा सुद्धा फार मोठी आहे. त्यांच्या साहित्य-सेवेची एक छोटीशी झलक मात्र देण्याचा प्रयत्न केला आहे.
या अशा महान दार्शनिक, थोर विचारवंत, स्थितप्रज्ञ साधक, प्रतिभावान प्राध्यापक, सत्यान्वेषी द्रष्टा, तंत्रशास्त्र आणि योगशास्त्रातील उच्च कोटीतील मार्गदर्शकाला त्यांच्या आज दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी १३६व्या जयंती दिनानिमित्त शतशः विनम्र वंदन !!
साभार : योगिराजजी साहित्य
लेखमाला समाप्त
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक – ३) Read More »