॥ श्री गणपतिर्जयती ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘श्रीगुरुचरित्र’ हा ग्रंथ होय.
या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
श्रीनृसिंहसरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे ‘गुरुचरित्र’ आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला.
सरस्वती गंगाधर हे कानडी ब्राह्मण असून त्यांची मातृभाषा कन्नड आहे. मूळ गुरुचरित्राची भाषा ही प्राकृत मराठी अशी आहे. श्री गुरुचरित्रातील बहुतेक सर्व पदे जरी समजण्यास सहजसुलभ असली तरी, कित्येक शब्द आजच्या काळात पूर्णत: विस्मृतीत गेल्याने त्यांचा योग्य तो अर्थ समजून घेण्यास वेळ लागतो. आणि योग्य अर्थाविना केवळ पारायण करायचे म्हणून वाचण्यात काय अर्थ? त्यातील तत्वज्ञान मूळ आशयासहित समजून घेतले तरच ती खरी गुरुभक्ती होईल. याच उद्देशाने शुद्ध मराठीत श्री गुरुचरित्र शोधायचा प्रयत्न केला असता, बरेच मराठी गद्य भाषांतरे मिळाली, पण ती फक्त सुटी सुटी भाषांतरे होती. त्यामुळे मूळ पदे/श्लोक आणि त्याचा योग्य तो अर्थ याची सांगड घालण्यात परत कष्ट होते.
मला स्वत:ला ही अडचण उद्भवली तेव्हा श्री गुरुचरित्रातील पदे/श्लोक आणि लगोलग त्याचा मराठी भावानुवाद असे करण्याचे प्रयोजन केले.
श्री गुरुचरित्रातील अध्याय आणि त्यांचा भावानुवाद पहाण्यासाठी पुढील अध्यायांच्या Link वर पहा.
- अध्याय ०१ - मंगलाचरण
- अध्याय ०२ - कलियुग वर्णन, गुरु महात्म्य, संदीपक आख्यान
- अध्याय ०३ - अंबरीष आख्यान
- अध्याय ०४ - अनसूया आख्यान, श्री दत्त जन्मकथा
- अध्याय ०५ - श्री नृसिंह सरस्वती आख्यान, श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा
- अध्याय ०६ - गोकर्ण महिमा – महाबळेश्वर लिंग स्थापना
- अध्याय ०७ - गोकर्ण महिमा - मित्रसह राजाची कथा, चांडाळ स्त्रीचा उद्धार
हा भावानुवादाचा प्रयत्न यथामती, यथाशक्ती केला आहे. त्यात काही न्यून राहिल्यास, चुकल्यास ती माझी उणीव, जबाबदारी. ही माझी छोटीशी सेवा श्री दत्तात्रेय चरणी अर्पण.
- श्री ज्ञानोपासना (श्रीरंग विभांडिक)
🙏🌹🙏
लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
खूपच स्तुत्य उपक्रम आहे,
मोठी सेवा दत्तगुरूंना अर्पण केली आहे
Pingback: श्री गुरुचरित्र - अध्याय ०१ » श्री ज्ञानोपासना