श्री रामरक्षा – मराठी अर्थासहित

श्री रामरक्षा - मराठी अर्थासहित

 

श्रीरामरक्षा स्तोत्र ही अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आपल्या भोवतीचे संरक्षण कवच आहे. असे म्हटले जाते की एक दिवस भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषिंना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा स्तोत्र सांगितले. आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी हे स्त्रोत्र लिहिले. बुधकौशिक ऋषिंनी अनुष्टुप छंदात या दैवी स्तोत्राची रचना केली आहे.
अश्विन महिन्यातील देवी नवरात्राप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी (म्हणजेच राम नवमी) पर्यन्त हे ९ दिवस चैत्र नवरात्र किंवा प्रभू श्रीरामांचे नवरात्र म्हणून मानले जातात आणि साजरे केले जातात. या चैत्र नवरात्र तसेच श्री रामनवमीच्या निमित्ताने श्री रामरक्षा खऱ्या अर्थाने समजून घेऊया. त्यासाठीच ही श्री रामरक्षा मराठी अर्थासहित.
मूळ रामरक्षा श्लोक आणि त्यांचा लगोलग मराठी अर्थ, आणि शब्दार्थ अशी रचना केली आहे.

 

श्रीगणेशाय नमः ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः । सीता शक्‍तिः ।
श्रीमत् हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥

या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त) अनुष्टुभ् आहे, सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत, सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे.
१. कीलकम् – आधारस्तंभ,कवच

अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् ।
बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
इति ध्यानम् ।

आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, हाती धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा केल्याप्रमाणे सुंदर असे नेत्र असलेल्या, ज्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, आणि तिच्या सुंदर मुखकमलाकडे ज्याची नजर लागलेली आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे (श्यामवर्णाची) ज्याची कांती आहे, ज्याचे शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे, आणि मोठ्या जटांमुळे ज्याचा चेहरा सुशोभीत झालेला आहे, त्या अशा प्रसन्न प्रभू श्रीरामांचे ध्यान करू या.
१. ध्यायेदाजानुबाहुं – ध्यायेत् + आजानुबाहुं - गुडघयापर्यंत लांब हात असणारे,
२. नीरदाभम् – नीरद म्हणजे मेघ - त्याच्यासारखी कांती असणारे श्रीराम,
३. दधतमुरुजटामण्डनं – दधतम् + उरू + जटामंडनं , दधतम् – धारण करणारा, उरू – विस्तृत, मोठ्या, जटामंडनं – जटांनी सुशोभित असलेला

 

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥

श्रीरघुनाथाचे (श्रीरामचंद्रांचे) चरित्र शंभर कोटी श्लोकाइतके विस्तृत आहे व त्यातील एकेक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे असे आहे. ॥१॥
१. शतकोटिप्रविस्तरम् – शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत,
२. पुंसां – पुरुषांची

 

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्‌त्रातुभाविर्भूतमजं विभुम् ॥३॥

नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या सन्निध सीता व लक्ष्मण आहे, जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे, ज्याच्या एका हाती खड्ग, पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे; खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरिता सहज लीलेने श्रीरामरूपाने अवतीर्ण झालेला आहे, अशा प्रभूचे ध्यान करून पातकांचा नाश करणाऱ्या व सर्व कामना पुरविणाऱ्या या रामरक्षास्तोत्राचे सुज्ञ माणसाने पठण करावे. ॥२,३॥
१. नीलोत्पलश्यामं – नील + उत्पल + श्यामं, उत्पल – कमळ,
२. राजीव – कमळ,
३. जानकीलक्ष्मणोपेतं – जानकी + लक्ष्मण + उपेतं, म्हणजे सीता आणि लक्ष्मण ज्याच्या जवळ आहेत असा
४. सासितूणधनुर्बाणपाणिं – स + असि + तूण + धनुर् + बाण + पाणिं, असि = तलवार, तूण = भाता, म्हणजे धनुष्यबाण आणि भात्याबरोबरच तलवारही हाती असणारे,
५. नक्तंचरान्तकम् – नक्तं + चर + अंतकम्, नक्तं – रात्र, नक्तंचर – निशाचर म्हणजे दानव, राक्षस, नक्तंचरांतकं – राक्षसांचा नाश करणारा,
६. जगत्त्रातुमाविर्भूतमजं – जगत्रातुम् + आविर्भूतम् + अजम्, जगत्रातुम् – जगत् + त्रातुम् , म्हणजे जगाच्या रक्षणासाठी , आविर्भूतम् – स्वतःला प्रकट केले आहे, अजम् म्हणजे जन्मरहित आणि म्हणूनच मृत्युरहित सुद्धा. विभुम्- व्यापून उरणारा. ह्या शेवटच्या दोन ओळींतील विशेषणे श्रीरारामाच्या रुपाने अवतार घेणाऱ्या परमात्म्याला श्रीविष्णूला लागू होतात.

 

रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे. रघूच्या कुळात उत्पन्न झालेला श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो. (दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते.) ॥४॥
१. प्राज्ञः – प्रज्ञावान, सूज्ञ पुरुष,
२. पापघ्नीं – पापाचा नाश करणारी (रामरक्षा)
३. सर्वकामदाम् – काम – इच्छा. सर्व इच्छा पूर्ण करणारी (रामरक्षा) असा अर्थ

 

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

कौसल्याराणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. (इथे विशेषणाची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का, कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले.) (विश्वामित्राच्या) यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. ॥५॥
१. मखत्राता – मख म्हणजे यज्ञ, त्राता म्हणजे रक्षण करणारा,
२. सौमित्र – सुमित्रेचा मुलगा (म्हणजेच लक्ष्मण)

 

जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

सर्व विद्या धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो (जीभ - कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात). भरताने ज्याला वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य अशी शस्त्रे ज्याच्यापाशी आहेत असा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो (खांद्यांचे कारण - काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागतो म्हणून). शिवधनुष्याचा (सीतास्वयंवरप्रसंगी) ज्याने भंग केला आहे असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो (ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हात).॥६॥
१. भग्नेशकार्मुकः – भग्न + ईश + कार्मुक:, ईश – शंकर, कार्मुक – धनुष्य, शिवधनुष्य भंग करणारे (श्रीराम)

 

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सीतेचा पती राम माझ्या हातांचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करो. जांबुवानाला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे - बेंबीचे रक्षण करो. ॥७॥
१. जामदग्न्यजित् – जमदग्निपुत्र परशुरामाला जिंकणारे श्रीराम

 

सुग्रीवेशः कटि: पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥

सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. ॥८॥

 

जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. ॥९॥

 

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

(इथे कवच संपून फलश्रुति सुरू होते) फ़लश्रुति - याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान् मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान्, सर्व कार्यात विजय मिळविणारा आणि विनयसंपन्न असा होईल. ॥१०॥

 

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥

या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याकडे पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक नजर वर करून पाहूही शकत नाहीत. ॥११॥
१. पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे,
२. छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

 

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥

राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनेक सुखोपभाग मिळून शेवटी मोक्ष मिळतो. ॥१२॥

 

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥

सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो), त्याला सर्व सिद्धी सहज साध्य होतात. ॥१३॥
१. जगज्जैत्रेकमन्त्रेण – जगज्जेत्रा + एकमन्त्रेण जग जिंकणाऱ्या एका मंत्राने,
२. रामनाम्नाभिरक्षितम् – रामनाम्ना + अभिरक्षितम् – रामनामाने सर्व बाजूंनी रक्षण होते

 

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमण्ङ्लम् ॥१४॥

इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक, तसे हे रामकवच - रामरक्षास्तोत्र असल्यामुळे याला वज्रपंजर असेही म्हणतात. याचे जो स्मरण करतो, त्याची आज्ञा अबाधित, सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याण होते. ॥१४॥
१. अव्याहताज्ञः – म्हणजे त्याची आज्ञा कधीही मोडली जात नाही असा

 

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥

अशी ही रामरक्षा भगवान् शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली, तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेविली. ॥१५॥

 

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥१६॥

रामस्तुति - श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे. सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यात मनोहर असा तो श्रीमान् राम आमचा प्रभू आहे. ॥१६॥
१. आरामः – बाग, वन,
२. विरामः – शेवट करणारा,
३. सकलापदाम् – सकल + आपदाम् – म्हणजे सर्व दु:खसंकटांचा,
४. अभिरामस्त्रिलोकानां – अभिराम: + त्रिलोकानां – तिन्ही लोकांना आवडणारा,
५. स नः प्रभुः – तो आमचा देव आहे

 

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥

यापुढील (२०व्या श्लोकापर्यंतचे) वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे.
वयाने तरुण, रूपवान्, सुकुमार, अतिशय बलवान्, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजिन हीच वस्त्रांप्रमाणे परिधान करणारे श्रीराम आणि लक्ष्मण. ॥१७॥
१. पुण्डरीक – कमळ,
२. विशालाक्षौ – (कमळाप्रमाणे) मोठे डोळे असलेला,
३. चीरकृष्णाजिनाम्बरौ – चीर + कृष्णाजिन + अंबरौ, चीर – वल्कले, कृष्णाजिन – काळवीटाचे कातडे, अंबरौ – वस्त्राप्रमाणे धारण करणारे.

 

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रम्हचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥

फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण. ॥१८॥
१. फलमूलाशिनौ – फल + मूल + अशिनौ, म्हणजे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे,
२. दान्तौ – इंद्रिये दमन करणारे, जितेंद्रिय

 

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥

सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर, म्हणजे राम व लक्ष्मण, आमचे संरक्षण करोत.
१. शरण्यौ सर्वसत्वानां – सत्त्व म्हणजे प्राणी. याचा अर्थ सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान

 

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

बाण लावून सुसज्ज असे धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले (श्रीराम व लक्ष्मण) माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझापुढे चालोत. ॥२०॥
१. आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – आत्तसज्जधनुषौ + ईषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ, पैकी आत्तसज्जधनुषौ – आत्त + सज्ज + धनुषौ + ईषुस्पृशौ यातील आत्त- धारण केलेले, ईषुस्पृशौ – ईषु म्हणजे बाण, बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले (रामलक्ष्मण) असा एकूण अर्थ आणि अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – अक्षय + आशुग + निषङ्ग + सङ्गिनौ, यातील अक्षय – म्हणजे कधीही न संपणारा, आशुग – पुढे जाणारा बाण, निषङ्ग – भाता, सङ्गिनौ – जवळ असलेले,
२. रामलक्ष्मणावग्रतः- रामलक्ष्मणौ + अग्रतः , अग्रतः= पुढे

 

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥

चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरूण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणी लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. ॥२१॥
१. संनद्धः – निरंतर सज्ज,
२. कवची – चिलखत घातलेला,

 

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥२२॥

दशरथपुत्र श्रीराम शूर आहे, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो असा (महान) आहे. ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे. ॥२२॥
१. काकुत्स्थः – ककुत्स्थ हे श्रीरामांच्या कुळाच्या मूळ पुरुषाचे नाव. त्याच्या कुळात जन्म झाला म्हणून श्रीराम काकुत्स्थ.

 

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥

वेदांतशास्त्राने ज्ञेय, यज्ञांचा स्वामी, पुराणपुरुषोत्तम, जानकीचा प्रिय, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी असा हा राम आहे. ॥२३॥
१. वेदान्तवेद्यो – वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचे साधन आहे असा,
२. पुराणपुरुषोत्तमः – सनातन पुरुष,
३. जानकीवल्लभः – सीतेचा पति,
४. श्रीमानप्रमेयपराक्रमः – श्रीमान् + अप्रमेय + पराक्रमः, अप्रमेय – ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा पराक्रमी

 

इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः ॥२४॥

ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही. ॥२४॥

 

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः ॥२५॥

दूर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या (अशा) श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या/ जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात. ॥२५॥

 

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥

लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुलश्रेष्ठ, सीतेचा सुंदर पती, ककुत्स्थकुलोत्पन्न, दयासागर, सद्गुणांचा मेरूमणी, ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, धार्मिक, राजांमध्ये सर्वश्रेष्ठ, सत्यव्रती, दशरथपुत्र, सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ति, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू राघव श्रीराम, अशा सर्व गुणांनी युक्त अशा श्रीरामाला मी वंदन करतो. ॥२६॥

 

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥२७॥

राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ, अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार असो.॥२७॥

 

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणांत कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा, रामा, तू आमचा रक्षणकर्ता हो, मी तुला शरण आलो आहे. ॥२८॥

 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मस्तकाने नमन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहे. ॥२९॥

 

माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं ।
जाने नैव जाने न जाने ॥३०॥

श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही; मुळीच जाणत नाही; अजिबात जाणत नाही. ॥३०॥

 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्या पुढे मारुती उभा आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. ॥३१॥

 

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥

लोकांना आनंद देणारा, रणांगणांत धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ती असा जो करुणासागर श्रीरामचंद्र त्याला मी शरण आलो आहे. ॥३२॥

 

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥

हनुमान स्तुती - मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा जितेंद्रिय, बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे. ॥३३॥

 

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥

वाल्मिकी वंदन - कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकीरूपी कोकिळ “राम राम” अशा मधुर अक्षरांचे कूजन करत आहे, त्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो. ॥३४॥

 

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥

रामवंदन - आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुनः पुनः वंदन करतो. ॥३५॥

 

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥३६॥

राम, राम, अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी (भाजून टाकणारी), सुखसंपत्तीचे अर्जन (प्राप्ती) करणारी, आणि यमाच्या दूतांचे तर्जन करणारी (दूतांना भीती दाखवणारी) अशी आहे. ॥३६॥

 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥

(या श्लोकात ‘राम’ शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत). राजश्रेष्ठ ‘राम’ नेहमी विजय पावतो. त्या रमापती (सीतापती) ‘रामास’ मी भजतो. ‘रामाने’ राक्षसांची सेना मारली, त्या ‘रामाला’ माझा नमस्कार असो. मला ‘रामाहून’ दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी ‘रामाचा’ दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी ‘रामाच्या’ ठायी होवो. ‘हे रामा’, माझा तू उद्धार कर! ॥३७॥

 

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥

शिव पार्वतीला सांगतात - हे सुवदने, राम, राम, राम, राम, अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे (विष्णूच्या) सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे. ॥३८॥

 

इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ।
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
॥ शुभम् भवतु ॥
याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचिलेले श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.
श्री रामचंद्र, सीता माई यांच्या चरणी अर्पण.
सर्वांचे कल्याण होवो.

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

5 thoughts on “श्री रामरक्षा – मराठी अर्थासहित”

  1. खुपच छान!
    अशी एकत्रित अर्थासहीत रामरक्षा ती पण मराठीत !
    वा: मस्तच!

  2. Pingback: भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार » श्री ज्ञानोपासना

  3. Ajay R. Ranalkar

    खूपच छान, मराठीत भावपूर्ण विश्लेक्षण आहे.

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

Scroll to Top

Discover more from श्री ज्ञानोपासना

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Scroll to Top
Enable Notifications OK No Thanks