मंत्र आणि यंत्र – थोडेसे प्रबोधन
(लेख थोडा मोठा पण उद्बोधक आणि उपयुक्त आहे.)
यंत्र मंत्र आणि तंत्र यांच्या संयुक्त शास्त्राला तंत्रशास्त्र म्हटले जाते. आज आपण तंत्रशास्त्राच्या या विषयांपैकी यंत्रशास्त्र या शाखेबद्दल थोडीशी चर्चा करू.
यंत्र : मंत्रशास्त्राची प्रतीक रूपामध्ये साधना करण्याचे आद्य स्वरूप म्हणजे यंत्रे असं म्हणता येईल. मंत्रशास्त्रामध्ये मंत्रांच्या बरोबरीने यंत्रांचेही महत्त्व आहे. मंत्रांप्रमाणेच यंत्रे सुद्धा स्वयंसिद्ध आणि अविनाशी असतात याचाच अर्थ यंत्रे ही सूक्ष्म शक्तीतून स्वामीत्व सिद्ध करून दाखवणारी साधने असतात. मंत्रांमध्ये गूढ रूपात असलेल्या चैतन्य शक्तींचे यंत्रांच्या सहाय्याने प्रगटीकरण करता येते. प्रत्येक देवतेच्या मंत्राने त्या देवतेची उपासना करण्यासाठी त्या त्या देवतेचे यंत्र संपादन करून त्या यंत्रामध्ये संबंधित देवतेचे आवाहन करून मंत्र जप केला असता तो मंत्र सिद्ध होतो. मंत्र व यंत्र हे विशेष तंत्रभान ठेवून वापरले तर परस्पर पूरक ठरतात.
यंत्र प्रकार : शास्त्राच्या म्हणण्यांनुसार हे प्रत्येक ग्रहाच्या देवतेचे यंत्र हे वेगवेगळ्या आकारांचे असते. उदाहरणार्थ गायत्रीचे यंत्र हे त्रिकोण व अष्टदलात्मक असते. सूर्यदेवतेचे यंत्र द्वादशकोणात्मक असते चंद्राचे षोडशकोणात्मक आणि मंगळाचे त्रिकोणात्मक असते. तसेच बुधाचे अष्टकोणात्मक व गुरुचे षट्कोणात्मक असते. शुक्र यंत्र पंचकोणात्मक आणि शनी यंत्र षट्कोणात्मक असते.
यंत्र धारण करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा :
प्राणप्रतिष्ठा पूर्वक यंत्र धारण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अचल म्हणजे स्थिर स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा केली असेल तर ते यंत्र एका ठराविक स्थानावरच ठेवावे लागते. चल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा केली असेल तर ते यंत्र आवश्यक अशा व्यवस्थेने पावित्र्यपूर्वक स्थानांतरित करता येते आणि अंगधारणेच्या दृष्टीने प्राणप्रतिष्ठा केलेल्या यंत्राला शरीरावरून योग्य प्रकारे विधीपूर्वक काढून ठेवणे किंवा धारण करणे आवश्यक असते.
रेखात्मक वर्णनात्मक अंकात्मक किंवा समन्वयात्मक पद्धतीने बनवल्या गेलेल्या धातूमय, वर्णमय किंवा लिखित यंत्रांमध्ये त्यांच्या देवतांची स्थापना केली जाते. त्यानंतर यथाविधी त्यांचे पूजन व धारण केले जाते. कोणत्याही यंत्राची प्राण प्रतिष्ठा पूर्वक सर्व समावेशक अशी पूजा करताना प्रत्येक यंत्रासाठी पुढील प्रमाणे अनेक गोष्टींची परिपूर्ण माहिती ठेवावी लागते. त्या यंत्राच्या स्वामी देवतेची दिशा, त्या देवतेचे मंडल, त्या यंत्राचे आकारमान, त्या यंत्रासाठी उपयुक्त भूमी, यंत्र स्वामीचे गोत्र, यंत्र स्वामींची राशी, यंत्र स्वामीचे वाहन, त्याच्या प्रिय समिधा, दान आणि जपसंख्या व त्या यंत्र स्वामीचे प्रभावी रत्न.
मंत्र जप : यंत्र सिद्ध होण्यासाठी संबंधित यंत्रदेवतेच्या मंत्रांचा विशिष्ट संख्येत जप करावा लागतो. या मंत्रांचे ऋषी, त्यांचा छंद, त्यांची देवता, त्यांचे बीज, त्यांची शक्ती आणि ते मंत्र कोणत्या कार्यासाठी उपयोगात आणावयाचे म्हणजेच त्याचा विनियोग हे सर्व माहीत असणे आवश्यक आहे. प्रत्येक मंत्र हा मुळातून निर्दोष असतोच असे नाही. अशा वेळेला त्या मंत्रांचा वापर करण्यापूर्वी मंत्र शोधन करून घ्यावे लागते. मंत्रशोधन करणे याचा अर्थ त्या मंत्रातील दोष काढून टाकण्यासाठी त्यावर दहा प्रकारचे संस्कार करणे. हे सर्व करतांना त्या त्या मंत्रांसाठीची षट्कर्मे, देवता, ऋतू, दिशा, दिवस, आसन, मंडल, मुद्रा, समिधा, जपमाला, लेखणीचे स्वरूप, लेखन स्वरूप वगैरे गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. त्या मंत्रांचा विनियोग काम्य कर्मांसाठी असेल तर बाळगावयाची सावधानता माहित हवी. अन्यथा ती कर्मे निष्फळ होतात. योग्य सावधानता नसेल तर विपरीत व त्रासदायकसुद्धा ठरू शकतात. या प्रक्रियेत विविध सात प्रकारचे ऋष्यादि न्यास, सहा प्रकारचे करन्यास, सहा प्रकारचे हृदयादि न्यास माहीत हवेत. तसेच इतरही अनेक प्रकारची माहिती हवी.
मंत्रांचे जसे १) पुराणोक्त २) वैदिक ३) तंत्रोक्त ४) संबंधित देवतांचे गायत्री मंत्र असे प्रकार असतात तसेच यंत्रांचे ही तंत्रोक्त यंत्र, सर्वतोभद्र यंत्र वगैरे प्रकार असतात. रविपासून थेट केतू पर्यंतच्या सर्वतोभद्र यंत्रांच्या रचनेत एक गूढ सूत्र असून त्यांच्या अनाठायी – अवेळी व चुकीच्या वापरामुळे धारणकर्त्याचे नुकसानच होऊ शकते.
वरील सर्व चर्चा यासाठी आहे की, आजकाल मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून या पवित्र शास्त्राचा उपयोग केला जात आहे. ही गोष्ट समाज हिताच्या दृष्टीने योग्य नाही. अगदी ग्रहांच्या नावाने अगरबत्ती, रंगीबेरंगी कपडे, रंगीबेरंगी लोलक, वगैरे दैनंदिन जीवनातील विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आता तर त्यावर कडी म्हणजे रक्षाबंधनासारख्या पवित्र संस्कारयुक्त सणांमध्ये सुद्धा ही बाजारू वृत्ती डोकावत आहे. सर्वतोभद्र यंत्र प्रकारच्या विविध ग्रहांच्या कोरीव ठशांच्या (एन्ग्रेवड्), वाटेल त्या पदार्थ/धातू (बेस मटेरियल) च्या तुकड्यांना मागेपुढे रंगीबेरंगी मण्यांसह धाग्यात गुंफून तयार झालेल्या राख्या विविध चित्ताकर्षक नावांनी विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. प्रेसमशिनमधून व्यापक प्रमाणात व्यापारी तत्त्वावर तयार केलेल्या या ठोकळेबाज वस्तू त्यांच्या वापरकर्त्यांचे हित साधणे दूरच उलट शास्त्रविहीत गोष्टींची ही अपभ्रंश आवृत्ती धारणकर्त्याचे नुकसानच करतील.
एकेक यंत्र फलदायी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या योग्य पूजा आणि सिद्ध विधींची अतीशय सखोल चर्चा अनेक शास्त्रग्रंथांमध्ये त्या क्षेत्रातील दिग्गज शास्त्री – पंडितांनी केली आहे. अनेकानेक विद्वत्तापूर्ण ग्रंथ मानवाच्या कल्याणासाठी हजर आहेत. मात्र,आजच्या घडीला सामान्य माणूस त्याच्या भोवती विणल्या गेलेल्या असंख्य अडचणी व समस्यांच्या जाळ्यात अडकला आहे. कुठूनतरी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तो आशेने शोध घेत असतो आणि नेमका अशा भ्रामक वृत्तींचा शिकार होतो. कारण…
ज्योतिष शास्त्राचे व संबंधित इतर शास्त्रांचे ज्ञान नसतांनाही स्वतःला मोठे अभ्यासक म्हणून समाजात मिरवून घेऊन समाजाचे/सामान्य जीवांचे अहित करणाऱ्या अशा लोकांना नक्षत्रसूचक म्हणावे असे बृहत् संहितेत म्हटलं आहे. तिथींची उत्पत्ती, ग्रहांच्या स्पष्ट साधनांचे ज्ञान नसतांनाही केवळ इतरांच्या भ्रष्ट अनुकरणाने व्यवहार करणाऱ्यास नक्षत्रसूचक म्हणावे असे मुहूर्त चिंतामणी ग्रंथाच्या पीयूषधारा टीका ग्रंथातही म्हटले आहे. पीयूषधारेतील महर्षी वसिष्ठ ऋषींच्या मतानुसार शास्त्रज्ञान नसतांनाही दांभिकपणाने स्वत:ला शास्त्रज्ञानी म्हणून मिरवून घेणारा हा सर्व उत्तम धार्मिक कार्यांमध्ये निंद्य (वर्ज्य) ठरवला आहे.
प्रत्येकाने आपापल्या विवेक बुद्धीला स्मरून आणि नीरक्षीरन्यायाने सार-असार विचार करून स्वतःसह आपल्या कुटुंबियांना या मोहजालापासून सांभाळणे योग्य होईल. वारंवार वेगवेगळ्या सण-व्रतवैकल्ये-धार्मिक पर्वांमध्ये अशा प्रवृत्ती समाजात वावरताना दिसतात. ग्रंथ हेच गुरु असल्याने फसव्या प्रवृत्ती आणि वस्तूंऐवजी ग्रंथशरण जाणे योग्य वाटते.
आपणां सर्वांचा हितचिंतक,
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩