श्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥
हे हनुमंता, आपण भीमरुप, महारुद्र, वज्रहनुमान, मारुती, वनांचे शत्रू, माता अंजनीचे पुत्र, प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन आहात.
१. भीमरूपी – भीम म्हणजे भव्य, विशाल. हनुमंत भव्य आणि विशाल आहेत म्हणून भीमरूपी.
२. महारुद्र – हनुमंत हा रुद्र म्हणजे महादेवाचा सर्वात महत्वाचा अवतार, म्हणून महारुद्र.
३. वज्रहनुमान – जन्मल्या जन्मल्या हनुमंताने सूर्याकडे फळ समजून झेप घेतली, तेव्हा हनुमंताला परावृत्त करून पुढील अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने हनुमंतावर वज्रप्रहार केला, जो हनुमंताच्या हनुवटीवर लागला. असा वज्राघात सहन करूनही अभेद्य म्हणून तो वज्रहनुमान.
४. मारुती – मरुत या वायू देवाचा मुलगा, म्हणून तो मारुती.
५. वनारी – लंकेत हनुमंताने वनेच्या वने जाळली, वनांचा शत्रू (विध्वंस केला म्हणून) म्हणून तो वनारी.
६. अंजनीसूत – अंजनीचा मुलगा तो अंजनीसूत
७. रामदूत – प्रभू रामचंद्रांचा दूत
८. प्रभंजन – बळाच्या जोरावर जो मोठे विनाश घडवून आणू शकतो तो प्रभंजन
ही आठ ही विशेषणे हनुमंताची असून, या विविध नावांनी हनुमंताला प्रार्थना करूया.
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी, धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥
हे हनुमंता, आपण महाबळी, प्राणदाता असून सर्वांना आपल्या बळाच्या जोरावर प्रभावित करतात. आपण सुख प्रदान करणारे असून दु:ख हरण करणारे आहात. आपण व्यवहारचतुर धूर्त असून वैष्णव गायक आहात.
१. महाबळी – ज्याच्या बळाची तुलना होऊ शकत नाही असा प्रचंड बलवान तो महाबळी.
२. प्राणदाता – प्राण देणारा. संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा, म्हणून प्राणदाता.
३. सकळां उठवी बळें – आपल्या बळाच्या जोरावर सर्वांना उठवतो, हादरवून सोडतो, प्रभावित करतो. (संकटकाळी युद्धसमयी हनुमंत सर्व वानर सेनेला जबरदस्तीने उठवून लढण्याची प्रेरणा देतो.)
४. सौख्यकारी – सुख प्रदान करणारा
५. दुःखहारी – दु:ख हरण करणारा
६. धूर्त – हनुमंताजवळ व्यवहार चातुर्य असल्याने त्याला कुणीही फसवू शकणार नाही, म्हणून तो धूर्त. आणि म्हणूनच हनुमंत प्रभू रामाचे दूत होते. दूत म्हणजे केवळ निरोप्या नाही – तर तो असतो सर्वाधिकारी प्रतिनिधी.
७. वैष्णव – वैष्णव म्हणजे विष्णुस्वरूप, विष्णुभक्त. प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार असल्याने त्यांचा भक्त हनुमंत हा वैष्णव.
८. गायका – हनुमंत निरंतर रामचरित्राचे गायन करतात म्हणून त्यांना ‘गायका’ अशी देखील साद घातली जाते.
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पाताळदेवताहंता, भव्य सिंदूरलेपना ॥ ३ ॥
हे हनुमंता, आपण दिनानाथ हरिरूप आहात. आपण अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात. पाताळातल्या दुष्ट शक्तींचा आपण संहार केला आहे, आणि सर्वांगावर शेंदूर लेपन केले आहे.
१. दिनानाथ – दीनानाथ हा मूळ शब्द, वृत्ताच्या सोयीसाठी दिनानाथ असा केला आहे. गोर गरिबांना, दीन भक्तांना, शरणागतांना हनुमंत आधार देतात म्हणून दिनानाथ.
२. हरिरूपा – हरी = विष्णू = राम, त्या रामाचेच जणू एक रूप हनुमंत आहे अशी कल्पना केली आहे म्हणून हरिरूपा.
३. सुंदरा – सुंदर, देखणा (हनुमंताचे शरीर, बळकट पिळदार होते, असे सांगायचे आहे).
४. जगदंतरा – हनुमंत श्वासोच्छावासाच्या (वायूरूप) रूपाने सगळ्या जगताच्या अंतर्यामी वास करून आहेत.
५. पाताळदेवताहंता – पाताळातल्या दुष्ट शक्तीचा (अही रावण, मही रावण कथेचा संदर्भ) संहार केलेला.
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ॥ ४ ॥
हे हनुमंता, आपण लोकनाथ आहात, जगन्नाथ आहात आणि प्राणनाथही आहात. आपण अत्यंत प्राचीन (चिरंजीव या अर्थाने) आहात. आपण पुण्यवान, पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना आनंदी, तृप्त करतात.
१. लोकनाथ – भू:, भुव:, स्व:, मह:, जन:, तप: आणि सत्यं हे सातही लोक वायूच्या सत्तेवर जगतात, म्हणून हनुमंत लोकनाथ आहेत.
२. जगन्नाथ – या जगातील साऱ्या जीवांना वायू तत्वाचाच आधार आहे, म्हणून हनुमंत जगन्नाथ आहेत.
३. प्राणनाथ – प्राणांचा म्हणजे जीवनाचा रक्षक. बलवान निरोगी शरीर दीर्घायू होते, आणि शरीर बलवान होण्यासाठी हनुमंताची उपासना करावी, हा इथे संदर्भ.
४. पुरातन – हनुमंत सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत, त्या अर्थाने हनुमंतांना पुरातन म्हटले आहे.
५. पावना – पवित्र
६. परितोषका – आनंददायक, आनंददायी
ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥ ५ ॥
रामचंद्रांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशात सर्व सैन्याच्या पुढे निघालात. आपले हे रौद्र रूप पाहून काळाग्नी आणि काळरुद्राग्नी देखील आपण मरणार या भीतीने थरथर कापू लागतात.
१. ध्वजांगे – ध्वजाचा एक भाग
२. उचली – उचलतो
३. आवेशें लोटिला पुढें – आवेशाने पुढे जातो
४. काळाग्नी – काळ रूपी अग्नी
५. काळरुद्राग्नी – काळाचा रौद्र म्हणजे भयंकर अग्नी
ब्रह्मांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥ ६ ॥
हे हनुमंता, युद्धप्रसंगी रागाच्या भरात जेव्हा आपण दात ओठ खातात तेव्हा सगळे ब्रम्हांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते. क्रोधाने आपण आपल्या भुवया ताणून धरता तेव्हा आपल्या संतप्त नेत्रांतून जणू तांबड्या ज्वाळा बाहेर पडत असतात.
१. माईली – मावले
२. नेणों – डोळ्यांमध्ये
३. भृकुटी त्राहिटिल्या बळें – मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने पाहत आहे
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटीकांसोटी, घंटा किंकिणी नागरा ॥ ७ ॥
आपण आपली शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आहे. या शेपटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडले शोभून दिसतात. आपल्या कमरेला सोन्याची कासोटी झळकते आहे, तर पायांतील पैजणाच्या घंटा चालतांना किणकिण वाजत असतात.
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥
हे हनुमंता, आपण मुळात सडपातळ असून आपले शरीरसौष्ठव प्रमाणबद्ध आहे. मात्र युद्धसमयी आपण जेव्हा विराटरूप धारण करतात तेव्हा एखादा पर्वतच समोर उभा ठाकला आहे असे वाटू लागते. एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे आपले शरीर चपळ आहे.
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आपल्या लीलाचरित्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत आणि नाना प्रकार आहेत. (युद्धप्रसंगी लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर) आपण उत्तरेकडे झेपावून रागाच्या भरात मंदार पर्वतासारखा प्रचंड असा द्रोण पर्वत मुळासकट उपटून काढला.
१. उत्पाटिला – उपटून काढला
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतिसी तुळणा नसे ॥ १० ॥
आपण लंकेत आणलेला द्रोण पर्वत परत उत्तरेकडे जागेवर नेऊन ठेवला. दोन वेळेला आपण उत्तरेचा प्रवास मनाच्या चपळाईने (वेगाने) केला. आपल्या उड्डाणाची गती मनाच्या वेगालाही मागे टाकणारी आहे, त्यामुळे आपल्या गतीशी तुलना करता येईल अशी कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही.
१. मनोगती – मनाच्या वेगाने
२. तुळणा – तुलना
अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ॥ ११ ॥
हे हनुमंता, आपण अणूपासून ब्रह्मांडाएवढे मोठे होत जातात. आपल्या या विशाल रूपाला तुलनाच नाही. मेरू आणि मंदार सारखे विशाल पर्वतदेखील आपल्यासमोर चिमुकले वाटतात.
१. हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त होत्या – त्यापैकी दोन – १) अणिमा (अणुएवढा लहान देह करणे), २) महिमा – (इच्छेनुसार मोठ्यात मोठा देह धारण करणे) – यांचा उल्लेख येथे आहे.
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करू शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२ ॥
हे हनुमंता, आपले वज्रपुच्छ एवढे लांब होऊ शकते की त्या द्वारे अवघ्या ब्रह्मांडाला गुंडाळता येईल. या ब्रह्मांडात आपल्या बरोबर कशाचीच तुलना होऊ शकत नाही.
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥
हे भगवंता आपण आपल्या जन्म समयी आरक्तवर्ण (लाल रंगाचे) सूर्यबिंब पहिले आणि फळ समजून ते पकडून खाण्याचा आपण प्रयत्न केला. हे प्रचंड सूर्यबिंब पकडण्यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागले, आणि हे मोठे मोठे होतांना संपूर्ण ब्रह्मांडाला आपण ग्रासून टाकले.
१. शून्यमंडळ – ब्रह्मांड
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४ ॥
हे देवा तुमचे स्तोत्र पठण करणाऱ्याच्या धन-धान्य, पशू धन, पुत्र-पौत्र यांत वृद्धी होईल. रूप, विद्या यांचा लाभ होईल.
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे हनुमंता, आपल्या भव्य दर्शनाचा लाभ असा विलक्षण आहे की, त्याद्वारे सर्व शारीरिक मानसिक आजार, सर्व प्रकारची काळजी, एवढेच नव्हे तर भूत, प्रेत, समंध यांच्याद्वारे होणार त्रास कायमचा नाहीसा होईल भक्ताला आनंद प्राप्ती होते.
१. भीम – हनुमंत
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ॥ १६ ॥
हे पंधरा श्लोकी स्तोत्र पठण करणाऱ्यास बळ लाभू दे. जो हे स्तोत्र म्हणेल त्याला निश्चितच शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत जाणारा, बलिष्ठ देह प्राप्त होईल.
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥
हे हनुमंता, समस्त राम भक्तांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात, आपल्यामुळे वानर कुळाला प्रतिष्ठा मिळाली. आपण रामस्वरूप असून सर्वांच्या अंतर्यामी आहात. आपल्या दर्शनाने समस्त दोषांचा परिहार होतो.
१. अग्रगण्यू – सर्वश्रेष्ठ
२. कपिकुळ – कपी म्हणजे वानर – वानर कुळ
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥
अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले, संकटाचे निवारण, निरसन करणारे मारुती स्तोत्र संपूर्ण झाले.
🙏🌹🙏
लेखन, संकलन, संपादन – श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩