पं. गोपीनाथ कविराज :
महान दार्शनिक, विचारवंत, साधक

या लेखमालेतील प्रथम भाग – येथे पहा.
भारतीय साधना ही संपूर्ण विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृती असल्याची कविराजजींची ठाम धारणा होती. कविराजांनी तंत्रशास्त्रातील अत्यंत गुह्य आणि लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असलेली अनेक तत्त्वे सहज सोपी करून आपल्याला त्यांचा लाभ मिळवून दिलेला आहे. या विषयांमध्ये त्यांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने लिहिलेली साहित्यरत्ने अत्यंत विद्वत्तापूर्ण, संशोधनात्मक लेख आणि ग्रंथांच्या रूपाने आज आपल्यासमोर आहेत.
१९२४ साली शासकीय संस्कृत कॉलेज, (संपूर्णानंद संस्कृत विश्र्वविद्यालय) बनारसच्या प्रिन्सिपॉल पदी त्यांची नियुक्ती झाली. या पदासोबतच त्यांनी विश्र्वविद्यालयाचे रजिस्ट्रार आणि परीक्षा-योजक पदांचा कार्यभार सांभाळला. १९३७ पर्यंत हा कामाचा ताण सोसला. त्यातच त्यांना १९३७ मध्ये बेरी-बेरी आजार झाला. मूळच्या त्यांच्या अंतर्मुख वृत्तीला ही व्यावहारिक जीवन पद्धती मानवत नव्हती. मन आध्यात्मिक साधनेकडे ओढ घेत होते. त्यांनी मुदतपूर्व सेवा -निवृत्ती घेऊ नये आणि पूर्णकाळ आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा विद्यापीठाला आणि विद्यार्थ्यांना लाभ द्यावा म्हणून सरकारने त्यांची मनधरणी केली. शेवटी या सर्व गोष्टींचा शेवट त्यांच्या १९३७ साली मुदतपूर्व सेवा -निवृत्तीत झाला.
त्यांच्या या कार्याची व्याप्ती आणि सखोलता ही कल्पनेपलीकडे आहे. अनेक नियतकालिके, शोधनिबंध, ग्रंथ यांमध्ये त्यांनी बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी भाषेत अक्षरशः शेकडो विषयांवर आपल्या विद्वत्ता व प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. स्वलिखित साहित्याशिवाय त्यांच्या या विद्वत्तेचा आणि प्रतिभेचा आविष्कार त्यांनी संपादित केलेल्या अनेक साहित्य कृतींमध्ये ठळकपणे दिसून येतो. या त्यांच्या लोकोत्तर प्रतिभेचा, साधना संपन्न पांडित्याचा आणि साहित्यिक सेवेचा यथायोग्य गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी ४ जून १९३५ मध्ये सन्मानपूर्वक प्रदान केली. पाठोपाठ त्यांना पुढीलप्रमाणे अनेक अत्युच्च सन्मान, पदव्या, फेलोशिप्स, डॉक्टरेट, वगैरे वेगवेगळ्या विद्यापीठे, सरकार, संस्था यांच्याकडून मिळाले.
१) कोरोनेशन मेडल : भारत सरकार, १ सप्टेंबर १९३७
२) डी.लिट. : अलाहाबाद विश्र्वविद्यालय, १९४७
३) डी.लिट. : काशी हिंदू विश्वविद्यालय, २१ डिसेंबर १९५६
४) सर्टिफिकेट ऑफ ऑनर : राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद, १९५९
५) फेलोशिप : रॉयल एशियाटिक सोसायटी, बंगाल, १९६४
६) पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान : भारत सरकार, २६ जान १९६४
७) फेलोशिप : बर्दवान विश्र्व विद्यालय, १९६४
८) मानद सदस्य : लोणावळा योगमीमांसा पत्रिका
९) तांत्रिक वाङ्मयाचा साहित्य पुरस्कार: साहित्य अकादमी, भारत सरकार, १९६४
१०) डी.लिट. : कलकत्ता विश्र्व विद्यालय, १९ जानेवारी १९६५
११) साहित्य वाचस्पती : यु.पी.सरकारचा हिंदी साहित्य संमेलन पुरस्कार, प्रयाग, १९६५
१२) अध्यक्ष पद : गंगानाथ झा संस्था, प्रयाग, १९६६
१३) सर्वतन्त्र सार्वभौम : गव्हर्नमेन्ट संस्कृत कॉलेज, कलकत्ता, ८ एप्रिल १९६७
१४) साहित्य अकादमी फेलोशिप : भारत सरकारच्या राष्ट्रीय साहित्य अकादमीचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान १९७१.
१५) टपाल तिकीट : भारत सरकार. १९८८.
उत्तर प्रदेश राज्यपालांच्या व्यक्तीश: विनंती वरून वाराणशी संस्कृत विश्र्वविद्यालयाच्या नव्याने स्थापन झालेल्या तंत्र-योग विभागाच्या तंत्र-योग संशोधन-निदेशक पदाचा सन्मानपूर्वक कार्यभार १९६४ मध्ये स्वीकारला. १९६९ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ते पद सोडावे लागले. तेथून पुढे ते त्यांच्या आवडीच्या योग-तंत्र साधनेसाठी भदैनी येथील मॉं आनंदमयी आश्रमात राहायला गेले. मॉं आनंदमयींशी त्यांची प्रथम भेट १९२८ मध्ये झाली होती.
पंडितजींची साहित्य संपदा :
१) भारतीय संस्कृती आणि साधना
२) तांत्रिक वाङ्मयात शाक्त दृष्टी : याच शोध ग्रंथासाठी १९६४ सालचा भारत सरकारच्या राष्ट्रीय साहित्य अकादमीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
३) तांत्रिक साधना आणि सिद्धांत
४) श्रीकृष्ण प्रसंग
५) काशीची सारस्वत साधना
६) पत्रावली
७) स्व-संवेदन
८) अखंड महायोगेर पाथे
९) विशुद्धानंद प्रसंग : आपल्या गुरूंचे यौगिक आणि आध्यात्मिक चरित्र. या ग्रंथात तंत्र आणि योग शास्त्रातील अनेक रहस्ये प्रकट केली आहेत.
१०) तांत्रिक साहित्य : हा पौर्वात्य संस्कृतीमधील मंत्र-तंत्र-योग विषयक साहित्य निर्मितीची ओळख करून देणारा पांच खंडातील ग्रंथराज म्हणावा लागेल.
११) साधुदर्शन आणि सत्प्रसंग : अनेक महान साधकांचा परिचय करून देणारा अप्रतिम ग्रंथ.
१२) त्रिपुरा रहस्यम् : देवी त्रिपुरसुंदरी विषयी माहितीपूर्ण ग्रंथ.
१४) सिद्धभूमि ज्ञानगंज : हिमालयाच्या उत्तरेला व तिबेटच्या दक्षिण भागातील एका अत्यंत गूढ साधना स्थळाचे रहस्य प्रथमच जगासमोर आणणारा ग्रंथ.
१५) गोरक्षसिद्धांत संग्रह
या लेखमालेतील तृतीय भाग – येथे पहा.
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
Pingback: पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक - ३) » श्री ज्ञानोपासना