पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक – १)

पं. गोपीनाथ कविराज :
महान दार्शनिक, विचारवंत, साधक

योगिराज विशुद्धानंद परमहंस
गुरु – योगिराज विशुद्धानंद परमहंस
शिष्य - पं. गोपीनाथ कविराज
शिष्य – पं. गोपीनाथ कविराज

ता. ७ सप्टेंबर २०२३ रोजी पं. गोपीनाथ कविराज यांची १३६ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने या अत्यंत महान तपस्वी, साधक वृत्तीच्या, ऋषीतुल्य गुरूंना आजच्या ५ सप्टेंबर २०२३ च्या शिक्षक दिनानिमित्त शतशः विनम्र वंदन करून त्यांची अल्पचरित्र-सेवा सादर करतो.

पंडित गोपीनाथ कविराज हे संपूर्ण विश्वातील या शतकातील उल्लेखनीय युगपुरुष आहेत. पंडितजींच्या अध्यात्मिक साधनेविषयी फारच थोड्या विद्वान व जिज्ञासू लोकांना माहिती आहे. विसाव्या शतकातील विराट व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख सांगता येईल. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर भाष्य करण्याचे अनेक महापुरुष टाळतात. पंडितजींचा स्वभावही स्वतःबद्दल न बोलण्याचाच होता.

पूर्व बंगाल (आत्ताचा बांगलादेश ) मधील ढाका जिल्ह्यातील धामराई नावाच्या एका छोट्याशा गावात आपल्या आजोळी ७ सप्टेंबर १८८७ रोजी पंडितजींचा जन्म झाला. मैमनसिंह जिल्ह्यातील दान्या नावाचे गाव हे परंपरेने त्यांचे पैतृक निवासस्थान होते. पंडितजींचे वडील पंडित वैकुंठनाथ कविराज हे स्वतः एक उत्तम दार्शनिक विद्वान होते. स्वामी विवेकानंद, श्री. गजेंद्रनाथ आणि भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे गुरु श्री. सतीश चंद्र यांसारख्या थोर व्यक्ती वैकुंठनाथजींचे मित्र आणि सहाध्यायी होते.

पं. वैकुंठनाथ यांचे अल्पशा आजाराने ता.३० एप्रिल १८८७ रोजी कलकत्त्याला निधन झाले. वडील वैकुंठनाथांच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी ता. ७ सप्टेंबर १८८७ रोजी पंडितजींचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडीलांच्या आजोळी कांटालिया गावी झाले. पुढील माध्यमिक शिक्षण स्वतःच्या आजोळी धामराईला झाले. परिस्थिती फारच प्रतिकूल झाल्यानंतर केवळ शिक्षणाच्या ओढीने ते १९०६ मध्ये ढाक्याहून राजस्थानमध्ये जयपूर येथील महाराजा जयपूर कॉलेजमध्ये गेले. तेथे १९०८ मध्ये ते प्रथम श्रेणीत इन्टरमीडिएट परीक्षा पास झाले. राजघराण्यातील नातवंडांच्या शिकवण्या करून १९१० मध्ये बी.ए. झाले. या अध्ययन काळात त्यांनी स्वतःच्या महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त भारतीय दर्शन शास्त्रे, धर्म, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, पुरातत्त्व-विज्ञानांचा अभ्यास केला. त्याशिवाय इंग्रजी साहित्यातील एकोणिसाव्या शतकातील अनेक प्रख्यात साहित्यिकांचे साहित्य अभ्यासले. त्यासोबतच फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, जर्मन आणि रशियन भाषेतील अनेक उच्च कोटींच्या साहित्यिकांच्या निवडक दर्जेदार साहित्याचा अभ्यास केला. विद्यार्थी दशेत त्यांनी रचलेल्या बंगाली आणि इंग्रजी कविता त्यांच्या भावुक कवी मनाचे दर्शन घडवितात.

१९१० मध्ये वाराणसी च्या क्वीन्स कॉलेज च्या प्रा.डॉ.वेनिस यांच्या मार्गदर्शनाखाली एम.ए. करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी इतिहास व संस्कृती, पुरालेख शास्त्र, मुद्रा विज्ञान आणि पुरालिपी या विषयात प्रा.वेनिस यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. त्याचवेळी या सर्व अभ्यासक्रमाला सुसंगत व पोषक अशा संस्कृत भाषेचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. अगदी पाणिनीच्या व्याकरण शास्त्रात पारंगत झाले. हे सर्व करतानाच एप्रिल १९१३ मध्ये त्यांनी अलाहाबाद विश्र्वविद्यालयाच्या एम.ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकाविला. अलाहाबाद विश्र्व विद्यालयात सर्वोच्च गुणांचा विक्रम स्थापित केला. त्यांच्यापूर्वी या विषयात गुणांचा एवढा विक्रम कोणाचाही नव्ह्ता. त्यांच्या या विषयातील तोंडी परीक्षेसाठी पुण्याहून डॉ. डी.आर.भांडारकर आले होते. जर्मन, फ्रेंच वगैरे भाषांमधील पुरातत्त्व विषयावर प्रकाशित नवनवीन शोधांबद्दलचे पंडीतजींचे ज्ञान पाहून डॉ.भांडारकर भारावून गेले होते. या यशानंतर अनेक ठिकाणी मिळालेल्या नियुक्तीच्या प्रस्तावांना निर्लोभपणे दूर सारून वाराणसीतच आपल्या पुढील शोधकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.

डॉ. वेनिस यांच्या प्रेमळ आग्रहाखातर १९१४ साली स्थापन झालेल्या सरस्वती भवन या संस्थेत अधिक्षक पद स्वीकारले. तेथील दुर्मिळ हस्तलिखिते आणि पुरातत्त्व साहित्य प्रकाशित करण्याच्या वेनिस यांच्या योजनेला पंडितजींनी साकार रूप दिले. सरस्वती भवन ग्रंथमाला पंडीतजींनी सुरू केली. त्या ग्रंथमालेत सुरूवातीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली
१) वैशेषिक दर्शन शास्त्रावरील किरणावलीभास्कर,
२) कुसुमाञ्जलिबोधिनी,
३) अद्वैत तत्त्वज्ञानावरील आणि मोक्ष विषयावरचा अप्रतिम ग्रंथ वेदान्तकल्पलतिका आणि
४) चौथा वेदान्त तत्त्वज्ञानाचा सुंदर ग्रंथ अद्वैतचिंतामणी
या चार अत्यंत मौल्यवान ग्रंथांचे संपादन व प्रकाशन करण्यात आले. हे सर्व करताना त्यांच्यातला अभ्यासक आणि संशोधक त्यांना स्वस्थ बसू देईना. या काळात त्यांनी न्यायशास्त्र, वेदांत, धर्मशास्त्र, तंत्रशास्त्र, भौतिकशास्त्र, मीमांसा, पांचरात्र, आगम आणि गणित वगैरे अनेक विषयांवर फार महत्त्वपूर्ण कार्य केले. या सर्व अफाट कर्तृत्त्वाच्या काळात त्यांचे वय फारच कमी होते.

पंडितजींचे हे प्रतिभाशाली विशाल कार्य पाहून कलकत्ता विश्र्वविद्यालयाचे उपकुलपति, पंडितजींनी आपल्या विश्र्वविद्यालयात कार्य करावे म्हणून त्यांना घेऊन जाण्यासाठी काशीला आले. अधिक उच्च वेतन व अधिक सुविधा देऊ केल्या. त्याच सुमारास लखनौ विश्र्वविद्यालयाचे उपकुलपतिसुद्धा असाच प्रस्ताव घेऊन आले. परंतु आपल्या गुरूंच्या सान्निध्यात काशीतच राहून गुरूसेवा करण्याचा त्यांचा विचार पक्का होता. केवढी ही गुरूपरायणता !

अशा या तैलबुद्धी अभ्यासकाची भविष्यात एका महान योग्याच्या रूपात साधनारत होऊन मानव कल्याणासाठी सर्वमुक्तिच्या दिशेने कार्य करण्यासाठी बहुतेक नियतीने निवड केली असावी. ता.२१ जानेवारी १९१८ रोजी योगिराज विशुद्धानंद परमहंस यांनी दीक्षा देऊन त्यांना अनुग्रहित केले. पौर्वात्य मंत्र-यंत्र-तंत्र शास्त्रातील महान पंडीत, महान साधक विशुद्धानंद परमहंस यांचे शिष्यत्व लाभणे ही परमभाग्याची गोष्ट आहे. विद्येच्या क्षेत्रात लिलया वावरणाऱ्या पंडीतजींना या दीक्षेनंतर पुढे भक्ती, दर्शन आणि आगम शास्त्रांमध्ये रस निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी भारतीय आस्तिकवाद, गोरक्षनाथ पंथ, वीरशैव मत, तांत्रिक दर्शन, मध्ययुगीन भक्ती संप्रदाय, गौडीय वैष्णव धर्म या विषयांवर सखोल अभ्यास-चिंतन केले. हेच पंडितजींच्या जीवन प्रवाहातील एक महत्त्वाचे वळण होते.

पंडीतजींचे जीवन म्हणजे एक अनुभवसंपन्न, समृद्ध ज्ञानाचे अक्षय भांडार होते. सुखकाळात हर्षित आणि दु:खकाळात पीडित असे त्यांचे व्यक्तिमत्व नव्हते. सदैव स्थिर चित्तवृत्ती हे त्यांचे विशेष होते. एकुलत्या एक तरूण मुलाचा निधन प्रसंगही त्यांना विचलित करू शकला नाही. त्यांच्या स्वतःच्या मुत्रकृच्छ आणि कॅन्सरच्या आजारातील जीवघेण्या वेदना आणि कठीण शस्त्रक्रियाही त्यांनी अविचल मनाने सहन केल्या. हे झाले दु:खावेगातील सहनशीलता दाखविणारे प्रसंग. हर्षातिरेकाच्या अत्यंत आनंददायी आणि सुखद प्रसंगीसुद्धा मनाची समतोल अवस्था कधी त्यांनी ढळू दिली नाही. केंद्रीय शासनाने आणि विश्र्वविद्यालयांनी वेळोवेळी त्यांना सन्मानपूर्वक दिलेल्या मानद पदवी आणि पुरस्कारांचा स्विकार करण्यासाठीही ते कधी स्वतः हजर राहिले नाहीत. केवढी मोठी ही प्रसिद्धी पराङ्मुखता आणि केवढा मोठा हा आत्मसंयम ! खरी थोर माणसे सर्वार्थाने थोर असतात, हेच खरे आहे.

या लेखमालेतील द्वितीय भागयेथे पहा.  

 

सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
दि. ०५ सप्टें. २०२३, शिक्षकदिन
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

2 thoughts on “पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक – १)”

  1. Pingback: पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक - २) » श्री ज्ञानोपासना

  2. Pingback: पं. गोपीनाथ कविराज : महान दार्शनिक, विचारवंत, साधक (लेखांक - ३) » श्री ज्ञानोपासना

आपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.

Scroll to Top

Discover more from श्री ज्ञानोपासना

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Scroll to Top
Enable Notifications OK No Thanks