श्री गुरुचरित्र – अध्याय ०७
अध्याय – ०७
गोकर्ण महिमा – मित्रसह राजाची कथा, चांडाळ स्त्रीचा उद्धार
॥ श्रीगणेशाय नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी ।
निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥
समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥
ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥
नामधारक सिद्धांना म्हणाला, “मला गोकर्णमहात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला? अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णक्षेत्री कोणत्या कारणासाठी गेले? या गोकर्णमहाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली? त्याविषयी एखादी पुराणकथा मला सांगा.” नामधारकाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले, “ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमाहात्म्य ऐकण्याची इच्छा होते. या विषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो. एकाग्रचित्ताने ऐक.”
पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी ।
प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥
पूर्वी इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. प्रतापवंत क्षत्रिय असा तो राजा सकलशास्त्रपारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी आणि विवेकी होता.
असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी ।
प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥
निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत ।
भेटला तेथे अद्भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥
राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥
होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी ।
पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥
प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर ।
जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥
ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥
रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे ।
सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥
सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी ।
कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥
समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि ।
राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥
एकदा मित्रसह राजा शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ-सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, "तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे." असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राजाच्या सेवक वर्गात प्रवेश मिळविला. तो अतिशय सेवा तत्परतेने वागून तेथेच सोबत राहू लागला. राजा बरेच दिवस वनात राहून शिकार पूर्ण, दृष्ट जीवांचा वध करून मग आपल्या नगरात परतला.
ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी ।
आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥
ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक ।
कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥
राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी ।
जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥
अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥
ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी ।
पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥
वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी ।
त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥
शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी ।
अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥
नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला ।
वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥
उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तव राजपत्नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥
पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी ।
वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥
मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥
शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी ।
कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥
राजासह त्या मनुष्यरूपी दैत्याने राजवाड्यात प्रवेश केला. तेथे त्याने आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचाऱ्याचे काम मिळवले.
एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचाऱ्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते. त्याने श्राद्धाच्या अन्नात कपट भावनेने गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले; ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, "राजा, तुझा धिक्कार असो! तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस? या तुझ्या पापकर्माबद्दल 'तू ब्रह्मराक्षस होशील' असा मी तुला शाप देतो."
ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण त्याला यातले काहीच माहित नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, "ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात, या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो." असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले, तेव्हा त्याच्या पत्नीने-मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, "नाथ, स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करून नका. आता त्यांचे पाय धरून उ:शाप मागा. यातच तुमचे भले आहे." मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव 'कल्माषपाद' असे झाले व तो ब्रम्हराक्षस झाला.
राजपत्नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥
मदयंतीराणी वसिष्ठांच्या पाया पडून विणवणीपूर्वक म्हणाली, "ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा.त्यांना उ:शाप द्या." यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, "राजा, हा शाप तू बारा वर्षे भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील." असा उ:शाप देऊन वसिष्ठ निघून गेले. ब्रम्हराक्षस झालेला राजा ही मग वनात निघून गेला.
निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात ।
भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥
ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी ।
ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥
येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥
अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी ।
राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥
न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति ।
मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥
पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी ।
पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥
पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी ।
याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥
कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥
ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा ।
बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥
वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. एके दिवशी तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. वाघ जशी आपली शिकार पकडतो, त्याप्रमाणे त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, "कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारून मला विधवा करू नकोस. माझ्या पतीला जीवनदान दे. माझ्या पतीचे भक्षण करू नकोस, माझे त्याच्यावर अतिशय प्रेम आहे. पतिविना स्त्रीचा जन्म म्हणजे दगडापरी होय. तू प्रथम माझे प्राण हरण कर, पण माझ्या पतीला जीवनदान दे. माझे पती वेदशास्त्रसंपन्न आहेत, तू जर त्यांना जीवनदान दिलेस तर तुलाच पुण्य मिळेल. आमच्यावर कृपया कर, आम्हाला सोड. आम्हाला पुढे संतती झाली तरी ती आम्ही तुझ्याच नावाने वाढवू." असे तिने अनेकवेळा विनविले. पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले.
पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी ।
म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥
तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥
परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे ।
अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥
शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी ।
काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥
राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, "अरे दुरात्म्या, तू राक्षस नाहीस. शापित आहेस. अरे, तू तर अयोध्येचा राजा आहेस, परंतु शापामुळे राक्षस झालास. तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू १२ वर्षानी शापमुक्त होऊन राजा बनून जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल." मग तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा करून, चिता पेटविली. स्वत: अग्निप्रवेश करून सती गेली.
ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका ।
पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥
विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण ।
म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥
मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी ।
वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥
होता होता बारा वर्षे संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. परंतु त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बैचेन झाला. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाने सगळी हकीगत तिला सांगितली. सर्व ऐकून दुखा:ने राणी म्हणाली – “तुम्ही आधीच १२ वर्षे वनात कष्टाने घालवली आहेत, आता तर तुमच्या वंशाला संतानही नाही. आपल्या कर्माची फळे चुकार नाहीत.”
ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन ।
अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी ।
ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥
मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात ।
तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥
करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार ।
सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥
ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥
ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत ।
अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥
पत्नीचे बोलणे ऐकून राजा अतिशय दु:खी झाला, डोळ्यात अश्रू दाटले, आता काय करावे या विचाराने अस्वस्थ झाला. राजाने व राणीने आपल्या अनुभवी मंत्री, पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या ब्रम्ह हत्येच्या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण पापक्षालन होईना, ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना. त्यामुळे राजा अधिकाधिक बैचेन व अस्वस्थ होऊ लागला.
कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी ।
हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥
नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी ।
चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥
ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥
राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी ।
नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥
आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज ।
चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥
प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक ।
सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥
शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष ।
व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥
आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी ।
महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥
अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. अतिशय दु:खी, कष्टी, चिंताग्रस्त असा तो राजा, अतिशय थकून एक वृक्षाखाली बसून विसावा घेत होता. तेवढ्यात तेथे गौतम ऋषींचे आगमन झाले. राजाने त्यांच्या पाया पडून भक्ती भावाने त्यांना वंदन केले. ऋषींनी त्याला आश्वस्त करून अत्यंत करुणेने “तुझे राज्य कोणते, तुझ्या या वनवासाचे प्रयोजन काय, तू इतका चिंतक्रांत का” असे त्याचे क्षेम कुशल विचारले.
राजाने स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, “मुनीवर्य, हे सगळे असे आहे. या पातकाच्या प्रायश्चितासाठी मी अनेक तीर्थक्षेत्री भेट दिली, अनेक यज्ञ याग, धर्म कर्मे केली, परंतु या महा दोषाचे अजून शमन झाले नाही. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा.”
राजाने अशी विनंती केली असती गौतमऋषी त्याला समजावीत म्हणाले, "राजा, घाबरू नकोस. कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.”
आणि गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगायला सुरवात केली.
स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥
जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर ।
निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥
जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि ।
चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥
तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे ।
सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥
सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी ।
प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥
रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥
भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि ।
फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥
जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥
जाणा तो साक्षात् ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्गण ॥७५॥
चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक ।
प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत ।
दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥
वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी ।
प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥
गोकर्ण महाक्षेत्र महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्णक्षेत्रात असलेल्या भगवान शंकराचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो. तेथे भगवान महादेव स्वत: निवास करतात. ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश असला तरी रात्रीच्या अंधाराचा सूर्याशिवाय नाश होत नाही त्याचप्रमाणे इतर कितीही तीर्थक्षेत्रे असली तरी गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापक्षय होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. यापेक्षा अजून वेगळे काय सांगावे? साक्षात भगवान विष्णूच्या सांगण्यावरून श्रीगणेशाने भगवान महादेवाच्या आत्मलिंगाची या क्षेत्री स्थापना केली आहे. या पुण्य क्षेत्री ब्रह्मा विष्णू इंद्रासहीत समस्त देव गण निकस करतात. चंद्र सूर्य पूर्व दिशेला निवास करतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, ११ रुद्र, पितृ दैवत दक्षिणेस निवास करतात. पश्चिम दिशेला वरुण देवसहित गंगा आहे. उत्तर दिशेला कुबेर, वायुदेव, भद्रकाली, मातृ देवता, चंडी यांचा निवास आहे.
चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी ।
पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥
कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥
मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी ।
सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥
त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥
नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी ।
सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥
स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥
जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥
चित्ररथ, चित्रसेन आदि गंधर्व येथे नित्य निवास करतात. रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी, आदि अप्सरा इथे सदैव नृत्य करतात. वशिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, जैमिनी, जबाल, आदी समस्त ऋषी गण इथे नित्य पूजा अर्चना करतात. मरीची, नारद, अत्री, दक्ष, ब्रह्म ऋषी, सनकादी महात्मे, अनेक सिद्ध साधू, मुनीगण, संन्यासी, ब्रह्मचारी, ई तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात. गंधर्व, पितर, अष्ट वसव, किन्नर, शेष, पिशाच्च, वेताळ, ई नियमितपणे गोकर्ण महाबळेश्वराची पूजा करतात. या तीर्थक्षेत्री सर्व मनोकामना त्वरीत पूर्ण होतात. या ब्रह्मांडात गोकर्ण महाबळेश्वरसारखे दुसरे स्थान नाही.
अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी ।
नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥
रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी ।
वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी ।
वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥
धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण ।
पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥
अगस्ती ऋषी, प्रियव्रत, अग्निदेव, दानव, आदी सर्व येथे असतात. शिशुमार, भद्रकाली येथे त्रिकाल पूजा करतात. महाबळेश्वर दर्शनाने गरुडसुद्धा नागाची शिकार करू शकत नाही. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, ई राक्षस गणही वर प्राप्त करण्यासाठी महाबळेश्वराची उपासना करतात. अशाप्रकारे समस्त देव, दानव, सिद्ध गण गोकर्ण क्षेत्री विविध प्रकारे महाबळेश्वराची आराधना करतात. ब्रह्मा, विष्णू, कार्तिकेय , श्री गणेश स्वत: येथे निवास करतात. असे हे गोकर्ण महाक्षेत्र एकमेकाद्वितीय अनुपम असे आहे.
सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥
कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित ।
द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥
सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥
पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी ।
ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥
ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट् पापे ।
दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती ।
अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥
तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥
एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी ।
पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥
आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी ।
स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥
शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित् करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥
व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी ।
महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥
काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा ।
ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥
असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी ।
बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥
ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता ।
शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥
उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥
स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥
गौतम ऋषी म्हणाले – “हे राजा, या ब्रह्माण्डात गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात हे शिवलिंग श्वेतवर्णी असते. त्रेतायुगात लोहवर्णी (तांबूस), द्वापारयुगात ते सुवर्णवर्णी आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते. या शिवलिंगाचा अधोभाग खूप गोल आहे, तो सप्तपाताळापर्यंत गेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्महत्या, पर-स्त्री, दु:शील, दुराचार आदी सर्व पापांचा नाश करते. तेथे शुभ दिवशी आराधना करणारे पुनीत होतात, समस्त कार्य साधून रुद्ररूप अंतिम सद्गतीला प्राप्त होतात. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमवास्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे होते. व्यतिपाद, संक्रांत, महा-प्रदोश, त्रयोदशी, या दिवाशीची आराधना अपर पुण्य देते. माघ महिन्यातील शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्णक्षेत्र हे श्रेष्ठ माहात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा मार्ग होय. अशा या तीर्थक्षेत्राची यात्रा करणाऱ्यांना चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.”
ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी ।
पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥
विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥
अशाप्रकारे गौतऋषींनी मित्रसह राजाला गोकर्णतीर्थक्षेत्राचे माहात्म्य सांगितले असता त्याने विचारले, “ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्णमाहात्म्य मला सांगितले, त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? किंवा आपण प्रत्यक्ष काही पहिले असेल तर, त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा.” राजाने असे विचारले असता गौतमऋषी म्हणाले, “हे राजा, गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री असे अनेक अनुभव पहिले आहेत, तेच मी आता सांगतो, एकचित्ताने ऐक.”
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥
माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी ।
कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥
कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा ।
दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥
चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥
विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी ।
क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥
प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी ।
शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्वांग धरूनिया ॥२८॥
टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी ।
किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥
विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥
ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन ।
पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥
गौतम ऋषी म्हणाले – “मी एकदा तीर्थ यात्रेसाठी म्हणून गोकर्णक्षेत्री गेलो होतो, तिथे अनेक भाविक आले होते. मध्यान्हवेळी आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी तिथे अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती, उपासमारीने शुष्क दिसत होती. तिच्या सर्वांगाला झालेल्या जखमांमध्ये कृमी पडलेले होते, जखमांतून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते. ती विधवा होती. तिने केशवपन केले होते. तहानभुकेने ती कासावीस झालेली होती, दंत वेदानांमुळे विव्हळत होती. तिला धड चालताही येत नव्हते. अतिशय मरणासन्न अशा अवस्थेत ती त्या वृक्षाच्या सावलीत येउन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला.
अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून चार शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान होते. त्यांच्या हातात त्रिशूळासारखी शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले," आपण येथे कशासाठी आला आहात?" ते म्हणाले, "आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत." ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. “हे राजा, हे एकचित्ताने ऐक.”
ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी ।
नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥
या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥
नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥
पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥
अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥
शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान ।
यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥
न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥
या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥
अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥
ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी ।
योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी ।
त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥
आम्ही त्या देवदूतांना विचारले, "अहो दूतांनो, तुम्ही या महापापी चांडाळणीला विमानातून शिवलोकाला कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का? या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दया-माया दाखविली नाही. हिने नेहमीच जीव हत्या केली आहे, हिचे भोजनच मुळी पशू मांस आहे, अशा दृष्ट पापीणीला तुम्ही शिवलोकाला कसे काय नेता? हिने आयुष्यात कधीही जपतप केलेले नाही. कधीही शिवस्मरण-पूजन केले नाही. हिने कधी शिवरात्रीचा उपवास केला नाही. कधी यज्ञ याग, दान धर्म, तीर्थयात्रा, व्रत केले नाही. तरी अशा पापी दुराचारिणी महारोगी चांडाळणीला तुम्ही शिवलोकांत नेने कदापि योग्य नाही. तुम्ही का असे करत आहात?" आम्ही असे विचारले असता शिवदूत तिचा पूर्व वृतान्त सांगितला.
म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार ।
सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण ।
सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥
अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी ।
न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥
न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥
वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख ।
पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता ।
पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥
अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी ।
चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥
गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी ।
प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥
आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी ।
विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥
ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥
तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी ।
त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥
तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥
देवदूत म्हणाले – “हे ऋषीवर, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो, ती ऐका. ही चांडाळीण पूर्वजन्मी सौदामिनी नावाची ऐतक्षे रूपवान ब्राह्मणकन्या होती. तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पतीच मिळेना. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना मोठी काळजी वाटू लागली.शेवटी गुह्य सूत्रात सांगितलेल्या विधिप्रमाणे एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, परंतु ती घरी जास्त काळ थांबत नसे. तिचे हे वर्तन पाहून तिचा पती अतिशय दु:खी झाला आणि त्यातच त्याला मरण आले. सौदामिनीला तिच्या आई-वडिलांनी घरी परत आणले. ती दिसावयास सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते, त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छापून जारकर्म करू लागली. तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आई-वडिलांनीही तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. मग ती सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शुद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिमा फासला.”
श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥
टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥
शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पु
त्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी ।
होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥
वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी ।
छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥
छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी ।
शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥
आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी ।
वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥
वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश ।
घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥
अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥
जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका ।
भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥
ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी ।
पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥
खरोखर, कामवासनेने स्त्रीचा अधःपात होतो, हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो, ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे.
सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली, दुराचारिणी झाली.
एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले. स्वतः ही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तर तिथे वासरू नव्हते. त्या ऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पहिले तो शिंक्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे, कातडी पुरून टाकली व 'वाघाने वासरू पळवून नेले' असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली. तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली.
काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले.
घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥
उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥
उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा ।
बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥
ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥
सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥
येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी ।
क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥
न मिळे तिसी वस्त्र अन्न ।
दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥
भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥
पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री-पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते. देशो देशीचे राजे हत्ती रथ आदी लवाजम्यासह गोकर्ण दर्शनाला आले होते. लोक नाचत होते. गात होते. शिवनामाची गर्जना करीत जात होते. ती चांडाळीणही इतर भिकाऱ्यांसोबत रडत, ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता.अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून 'धर्म करा, धर्म करा' असे दीनपणे म्हणत होती; पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीण गोकर्णक्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्यामुळे त्या चांडाळीणला कोणीही खायला काहीही देत नव्हते, त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. ती उपासमारीने गलीतगात्र होऊन रस्त्यातच पडली.
पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥
हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी ।
आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥
कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥
इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी ।
तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥
येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी ।
तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे ।
चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी ।
पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥
पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥
तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे ।
हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत ।
दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥
एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बेलपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बेलपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम-घोषाचे श्रवण व अजाणतेपणे रात्री एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळीणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले.
आधीच महारोगी, त्यात उपवासाने अशक्त, अशी ती अंध म्हातारी हळुवारपणे दुसऱ्या दिवशी उठली. सकाळचे सूर्यकिरण ही असह्य झाल्याने ती आश्रयासाठी या वृक्षाखाली आली, आणि त्वरीत प्राण निघून जावे म्हणून याचना करू लागली. भगवान शंकरांनीच तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे." इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृतसिंचन केले. त्यामुळे तिला दिव्यदेह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकांस घेऊन गेले.
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन ।
रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥
जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति ।
संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥
परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन ।
त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥
ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू ।
श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ ओवीसंख्या ॥२१०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
त्या चांडाळीणीची कथा सांगून गौतमऋषी मित्रसह राजाला म्हणाले, "राजा, तूसुद्धा गोकर्णक्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील." गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्णक्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला.
इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले.
हा सरस्वती गंगाधर संपूर्ण गुरुचरित्र सविस्तर सांगत आहे, सर्व श्रोत्यांनी एक चित्ताने श्रवण करा.
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गोकर्ण महिमा' नावाचा अध्याय सातवा समाप्त.
॥ ओवीसंख्या॥२१०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🌹🙏
लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩