धार्मिक-अध्यात्मिक

श्री दत्त जयंती

॥ श्री दत्त जयंती ॥

श्री गुरुदेव दत्त
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच श्री दत्त जयंती हा उत्सवाचा पवित्र आणि सात्त्विक दिवस आहे. सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य उपास्य दैवत असून तेच सद्गुरु आहेत. ते सिद्धीदाता आणि अष्टांग योगाचे मार्गदर्शक आहेत. श्री दत्तात्रेयांचा अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा प्रतिक आहे. त्याचप्रमाणे या अवतारामध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकवटलेले आहेत. सर्व प्रकारच्या ऐहिक प्रगतीसाठी आणि पारमार्थिक उन्नतीसाठी उपास्य दैवत म्हणून श्री दत्तात्रेयांच्या या अवताराला नितांत महत्त्व आहे. आत्म्याचे परमात्म्याशी असलेले एकरूप, तसेच अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

श्री दत्त भगवंतांचे स्वरूप :-
श्री भगवान दत्तगुरूंच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू, मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल आणि वरच्या दोन हातात शंख आणि सुदर्शन चक्र अशा प्रकारची आयुधे सहा हातांमध्यें धारण केलेली आहेत. पाठभेदाने या क्रमांत आणि आयुधांत थोडाबहुत फरक दिसून येतो.

उपासक सम्प्रदाय : -
बहुतेक सर्व संप्रदायांमध्ये आणि त्यांच्या शाखा-उप शाखांमध्ये श्री दत्त उपासना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तरीही प्रामुख्याने महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे पाच मुख्य दत्त उपासक संप्रदाय मानले जातात.

श्री दत्तभक्त साधक : -
अगदी पुराण काळातही कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, भार्गव परशुराम, अलर्क, यदू, आयु, प्रल्हाद हे श्री दत्त कृपा संपादन केलेले शिष्य होऊन गेलेत. उपनिषद काळात संस्कृती नावाचा शिष्य असल्याचा उल्लेख अवधूत उपनिषद आणि जाबाली उपनिषदात आढळून येतो. श्री दत्त कृपेच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या या महान भक्तांकडून झालेल्या थोर कार्याची दखल पुराणांनाही घ्यावी लागली.

या व्यतिरिक्त अर्वाचीन काळातही श्री दत्तगुरूंचे अनेक परमभक्त आणि महान उपासक होऊन गेलेत. त्यापैकी काही परमपूज्य नावे खालील प्रमाणे आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ : -
चौदाव्या शतकाच्या मध्ययुगीन काळात श्रीदत्त भगवंताचे प्रथम अवतार रूपाने हे अवतरले.आंध्र प्रदेशातल्या पिठापूर येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला महाराजांचा जन्म झाला. हे दत्त अवतारी संप्रदायातले पूर्ण ब्रह्मचारी होते. यांचा कार्यकाळ शके १३३० ते १३५० (इ.स.१३९८ ते १४२८) असा असून कुरवपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या अवताराची समाप्ती केली.

श्री नृसिंह सरस्वती : -
हे १४ व्या शतकात होऊन गेलेले श्री दत्तप्रभूंचे हे दुसरे अवतार म्हणून ओळखले जातात. यांचा जन्म इसवी सन १३७८ मध्ये कारंजा (लाड) येथे झाला. ते संन्यासी वेशधारी होते. कृष्ण सरस्वती असे त्यांच्या गुरुंचे नाव होते. त्यांच्याकडून यांना इसवी सन १३८८ मध्ये संन्यास दीक्षा मिळाली. त्यांचा एकूण कार्यकाळ इसवी सन १३७८ ते १४५८ असा आहे. त्यांच्या शिष्यवर्गांमध्ये माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, सिद्धसरस्वती इत्यादी महान दत्तभक्त होऊन गेलेत. इसवी सन १४५८ मध्ये यांनी आपले अवतार कार्य समाप्त केले.

श्री नृसिंह सरस्वती महाराज (आळंदी) : -
महाराजांचा कार्यकाळ त्यांच्या आळंदी येथील अवतरणापासून म्हणजे इ.स. १८७४ ते १८८६ एवढाच अवगत आहे. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांनी पौष शुद्ध पौर्णिमेला १८८६ मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.

श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) : -
श्री स्वामी महाराजांचा पूर्व काळ माहित नाही आश्विन कृष्ण पंचमी बुधवार १८५७ या दिवशी स्वामींचे अक्कलकोट येथे आगमन झाले. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची ही माहिती नाही. ते दिगंबर स्वरूपात म्हणजे अवधूत रूपात राहत असत. १८५६ ते १८७८ हा स्वामींचा कार्यकाळ असून अक्कलकोट येथेच चैत्र कृष्ण त्रयोदशी १८७८ मध्ये स्वामींनी समाधी घेतली. बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज, रामानंद बिडकर महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती महाराज हा त्यांचा शिष्यवर्ग होता. श्री स्वामी महाराजांना श्री दत्ताचे चौथे अवतार मानले जाते.

श्री आनंदभारती स्वामी महाराज : -
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील चेंदणी नावाच्या लहानशा गावी कोळीवाड्यात १८३१ मध्ये महाराजांचा जन्म झाला. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी १९०१ मध्ये महाराजांनी आपले अवतार कार्य संपविले. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथील श्रीदत्त मंदिर आणि शीतला देवीची १८७९ मध्ये त्यांनी स्थापना केली.

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी : -
हे स्वामी, टेंबे स्वामी या नावाने ही सर्वत्र परिचित आहेत. यांचा कार्यकाळ १८५४ ते १९१४ असा असून वयाच्या २१व्या वर्षी १८७५ मध्ये त्यांचा विवाह झाला. १८९१ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याच्या तेराव्या दिवशीच त्यांनी संन्यास स्वीकारला होता. श्री गोविंद स्वामी हे त्यांचे मंत्र गुरु असून श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे त्यांचे दीक्षा गुरु आहेत. त्यांनी १९१४ मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गरुडेश्वर येथे समाधी घेतली. श्रीरंग अवधूत स्वामी, श्री गुळवणी महाराज हे त्यांचे शिष्य होते.

श्री रंग अवधूत स्वामी महाराज : -
रत्नागिरीच्या एका दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात कार्तिक शुद्ध नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी या दिवशी १८९८ मध्ये महाराजांचा जन्म झाला. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी हे त्यांचे गुरु होते. महाराजांनी अनेक संस्कृत, मराठी , गुजराती ग्रंथांची रचना केली असून त्यातील श्रीदत्त बावनी सारखी गुजराती आणि काही मराठी स्तोत्रे खूप विख्यात आहेत. त्यांनी संपूर्ण गुजरात राज्यात दत्त संप्रदायाचा प्रसार केला. १९ नोव्हेंबर १९६८, कार्तिक कृष्ण अमावस्येच्या दिवशी हरिद्वार येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

श्री शंकर महाराज : -
एका अंदाजानुसार इ.स. १८००मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातल्या अंतापुर नावाच्या एका छोटेखानी गावात उपासनी कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. २४ एप्रिल १९४७ या दिवशी पुण्यामधील धनकवडी येथे महाराजांनी देह ठेवला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे स्पर्श दीक्षा गुरु होते.

श्री गजानन महाराज (शेगाव) : -
२३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी महाराज शेगांवी प्रकटल्याची नोंद आहे. त्यांच्या पूर्वायुष्यातल्या गोष्टी माहीत नाहीत. १८७८ ते १९१० या काळात महाराजांनी आपल्या पवित्र वास्तव्याने शेगांवची भूमी पावन केली. ता. ८/९/१९१० रोजी भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांनी देह ठेवला. ते सदैव दिगंबर अवस्थेत असत.

श्री उपासनी बाबा (साकोरी)
श्री किसन गिरीजी महाराज (देवगड)
श्री गगनगिरी महाराज
श्री गजानन महाराज (अक्कलकोट)
श्री गुळवणी महाराज
श्री जनार्दन स्वामी
श्री दास गणू महाराज
श्री देव मामलेदार (सटाणा)
श्री धुनीवाले दादाजी (गिरनार)
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर
श्री माणिक प्रभू महाराज
श्री लोकनाथतीर्थ स्वामी

या व्यतिरिक्त काही परम उपासक स्त्रियाही होऊन गेल्यात.

अशाप्रकारे प्राचीन आणि अर्वाचीन काळात होऊन गेलेल्यांपैकी काही फारच थोड्या परम दत्तभक्त उपासकांची अल्पशी माहिती आपण पाहिली.

श्री दत्त नामाचा महिमा : -
श्रीमद् भागवत महापुराणात अनसूया अत्रिनंदन "दत्त" या नावाची आख्यायिका किंवा महात्म्य असे सांगितले आहे की, पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अत्री ऋषींनी केलेल्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री विष्णु भगवंतांनी स्वतःच स्वतःला अत्री ऋषींना पुत्ररूपाने दिले. ते स्वतः पुत्ररूप होऊन त्यांनी अत्री ऋषींची पुत्रकामना पूर्ण केली. अशा प्रकारे "मीच मला दिले" म्हणजे दिलेला म्हणून "दत्त" हे नाव प्रचलित झाले.

श्रीदत्तगुरूंचे अवतार : -
स्वतः श्रीदत्त गुरू हे श्री विष्णू भगवंताच्या २४ अवतारांपैकी सहावे अवतार आहेत. त्यांच्या आधी "कपिल" हा पाचवां अवतार असून त्यांच्या नंतर "नर-नारायण" हा सातवां अवतार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या अवतारां व्यतिरिक्त श्री दत्तगुरूंनी एकूण सोळा अवतार धारण केले होते.

१) श्री योगीराज
२) श्री अत्रिवरद
३) श्री दत्तात्रेय
४) श्री कालाग्निशमन
५) श्री योगीजनवल्लभ
६) लीलाविश्र्वंभर
७) श्री सिद्धराज
८) श्री ज्ञानसागर
इत्यादी सोळा अवतार धारण केले होते.

श्रीदत्त गुरूंचे २४ गुरू : -
द्वापार युगात महाभारत युद्धाची समाप्ती झाली. थोड्याच कालावधीत गांधारीच्या शापाने संपूर्ण यदु कुळाचा सर्वनाश झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी देखील आपले अवतार कार्य समाप्त करण्याचे ठरविले. आपले अवतार कार्य संपवताना त्यांनी त्यांचे परमभक्त उद्धवाला तशी कल्पना दिली. त्यावेळी उद्धव यांनी अत्यंत कळवळून भगवंतांना विनंती केली की मला ज्ञान सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, पूर्व काळी श्रीदत्त भगवंतांनी अवधूत रूपात २४ गुरुंपासून प्राप्त केलेले जे ज्ञान माझ्या यदू नावाच्या पूर्वजाला सांगितले होते तेच ज्ञान आता मी तुला सांगतो. त्यावेळी श्री दत्तगुरूंच्या त्या त्या गुरूंचे गुण आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा बोध श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवाला करून दिला. या सर्व बोधपर उपदेशाचा उल्लेख श्रीमद् भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधाच्या सात ते नऊ अध्यायांमध्ये आलेला आहे. तसेच श्री टेंबे स्वामी महाराजांनी रचलेल्या दत्त महात्म्यातही हा उल्लेख आढळून येतो. यामध्ये श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक वस्तू, प्राणी, पक्षी, पंचमहाभूते, व्यक्ती या सर्वांकडून त्यांच्यातील गुण प्राप्त केले आणि त्यांना आपले गुरु मानले असे स्पष्ट केलेले आहे. श्री दत्त प्रभूंच्या या सर्व गुरूंची संख्या २४ होती. त्यांच्या या गुरूपरंपरेतून आपणास हा बोध होतो की, ज्या ज्या घटकांपासून आपणास काही तरी ज्ञान मिळते, ते आपले गुरुच होत. याचाच अर्थ प्रत्येकाकडून काही तरी ज्ञान प्राप्त होते.

ज्या महिन्याच्या मृग नक्षत्रात पौर्णिमा होते त्या महिन्याला मृगशीर्ष किंवा मार्गशीर्ष असे म्हणतात. मासानां मासोऽहं म्हणजे सर्व बारा महिन्यातील सर्वात पवित्र असा मार्गशीर्ष महिना मीच आहे, असे श्रीकृष्ण भगवंताचे श्रीमद्भगवद्गीतेत वचन आहे. याच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी प्रदोष वेळी श्री दत्तप्रभूंचा जन्म झाला. म्हणून या दिवशी श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो.

श्री दत्त महात्म्य / वैशिष्ट्ये :-
केवळ स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून जातात म्हणून त्यांना "स्मर्तृगामी" असंही म्हणतात. आद्य शंकराचार्य यांनी श्री दत्त स्तुती करताना म्हटले आहे की, ब्रह्मज्ञान श्री दत्तगुरूंची मुद्रा असून आकाश आणि भूमी हीच त्यांची वस्त्रे आहेत आणि ते स्वतः प्रज्ञानघनस्वरूप आहेत. हे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांच्या अंशस्वरूप आहेत. श्री दत्तात्रेय हे सगुण रुपात असले तरी उपासनेत त्यांच्या पादुकांनाच मुख्यपणे महत्त्व असते.

श्रीदत्तात्रेय यांची तीर्थक्षेत्रे :-
यांच्या मुख्य तीर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूर, वाराणसी, काशी, प्रयाग, उडूपी, श्रीनगर, अबूपर्वत आहेत. गुजरातमध्ये गिरनार पर्वत हे सिद्धपीठ मानले जाते. या व्यतिरिक्त श्री नृसिंह वाडी, श्रीक्षेत्र औदुंबर, श्रीक्षेत्र कुरवपूर, श्रीक्षेत्र कारंजा, श्री क्षेत्र पिठापूर, श्रीक्षेत्र कर्दळीवन, माणगाव, आंबेजोगाई, अक्कलकोट, अमरकंटक, गाणगापूर वगैरे अनेक अनेक क्षेत्रे ही दत्त पीठे म्हणून नावारूपाला आलेली आहेत. प्रत्येक क्षेत्राचे आपापले वैशिष्ट्य आणि महात्म्य वेगवेगळे आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
स्मरा स्मरा हो स्मरा स्मरा, दत्तगुरुंचे नाम स्मरा ॥

 

लेखन, संकलन, संपादन - सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिष शास्त्री
संपर्क – ९४२३९ ६४६७३
मंगळवार, ता.२६/१२/२०२३
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री दत्त जयंती Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री दत्त अथर्वशीर्ष

श्री दत्त अथर्वशीर्ष

श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त

॥ हरिः ॐ ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय
दिगंबरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥ १॥

त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी
त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥ २॥

त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः
विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः
त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥ ३॥

त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः
त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः
त्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः
ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥ ४॥

त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः
दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः
करुणाकरः भवभयहरः ॥ ५॥

त्वं भक्तकारणसंभूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः
त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी
श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः
त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती
त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥ ६॥

त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम्
दीने आर्ते मयि दयां कुरु
तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः
हे भगवन्, वरददत्तात्रेय,
मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ७॥

॥ ॐ दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री दत्त अथर्वशीर्ष Read More »

वेदवाङ्गमयाची थोरवी – ऋग्वेद (भाग-१)

एकूण चार वेदांपैकी ऋग्वेद हे सर्वात प्राचीन लिखित साहित्य असल्याचे मानले जाते. ऋग्वेदांचा रचना काळ विविध प्रकारच्या काल प्रमाणानुसार इसवीसन पूर्व ३५००० ते इसवी सन पूर्व दोन हजार असा मानला जातो. ऋग्वेदाच्या एकूण रचनांच्या पुढील प्रमाणे तीन पद्धती अस्तित्वात आहेत.

१) पहिली पद्धत ही ऋग्वेदाची एकूण दहा मंडले मानते. त्या सर्व दहा मंडळात मिळून १०२८ सूक्ते असून या सर्व सुक्तांत मिळून दहा हजार पाचशे बावन्न १०५५२ ऋचा आहेत. मतभिन्नतेनुसार काही अभ्यासक १०२७ इतकीच सूक्ते असल्याचे मानतात. एकापेक्षा अधिक ऋचांच्या समुहाला सूक्त असं म्हणतात. सोप्या शब्दांत ऋचा म्हणजे मंत्र होत.

२) दुसऱ्या पद्धतीमध्ये संपूर्ण ऋग्वेदाची आठ भागात विभागणी केली असून त्या प्रत्येक भागाला अष्टक असं म्हणतात. प्रत्येक अष्टकाचे पुन्हा आठ आठ उपविभाग केले असून त्या प्रत्येक उपविभागाला अध्याय असं म्हणतात. म्हणजेच आठ अष्टकांचे एकूण ६४ अध्याय होतात. या प्रत्येक अध्यायात १३० ते ३३० वर्ग असतात. असे आठ अष्टकांचे एकूण २००६ वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात अंदाजे चार-पाच ऋचा असतात. अशा प्रकारे आठ अष्टकांची मिळून एकूण दहा हजार पाचशे बावन्न १०५५२ ऋचा (मंत्र) संख्या पूर्ण होते. काही अभ्यासकांच्या मते ही संख्या १०४४० आहे. इतर अभ्यासकांच्या मते अजून वेगवेगळ्या ऋचासंख्या आहेत.

३) तिसऱ्या प्रकारच्या रचनेमध्ये एकूण दहा मंडले असून त्यांची ८५ उपविभागात मांडणी केली आहे. या प्रत्येक उपविभागाला अनुवाक असे म्हणतात प्रत्येक अनुवाकात ३० ते १८५ ऋचा असतात अशा सर्व दहा मंडलांच्या ८५ अनुवाकांमध्ये मिळून दहा हजार पाचशे बावन्न १०५५२ ऋचांची रचना केलेली आहे.

ऋग्वेदाच्या रचनेचा प्रकार कोणताही असला तरी प्रत्येक ऋचा ही एक ते तीन पद्यमय ओळींची असते. क्वचित् चार ओ‌ळींचीही असते. असे करण्याचे कारण असे होते की वेदांना श्रुती असेही म्हटले जाते. पिढ्या न् पिढ्या एका गुरु कडून दुसऱ्या गुरुकडे आणि एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे हे ज्ञान पाठांतराने आणि श्रवणाने पुढे पुढे जात राहावे. म्हणजेच श्रवणाने आणि शुद्ध उच्चारणपद्धतीच्या अचूक पणाने आत्मसात केलेले हे ज्ञान म्हणजेच श्रुती होय. पिढीमागून पिढी आणि प्रदीर्घ कालावधीनंतरही अचूकपणे ते ज्ञान हस्तांतरित होत राहण्याच्या दृष्टिकोनातून ओव्यांची रचना अगदी लहानशा एक ते तीन पद्यमय ओळींमध्ये म्हणजेच काव्यरूप पद्धतीने केली गेली होती.

या दहा मंडलांपैकी पहीले आणि दहावे मंडल इतर २ ते ९ मंडलांच्या तुलनेत अलिकडच्या काळातील असावेत असे काही पाश्र्चात्य विद्वानांचे मत आहे. परंतू या मताचे समर्थन योग्य प्रकारे होऊ शकत नाही. कारण वेदांचा रचना काळ आणि रचना कर्ता (ते अपौरुषेय असल्याचे मानल्यास) असिद्ध आहेत. म्हणून त्यांत प्राचीन आणि अर्वाचीन असा भेद करणे योग्य होणार नाही.

वेगवेगळ्या ऋचांचे रचनाकर्ते वेगवेगळे ऋषी-मूनी होते. या ऋचांच्या देवताही वेगवेगळ्या होत्या. या सर्वच ऋचांची पद्यमय रचना विविध प्रकारच्या छंदोबद्ध काव्याच्या स्वरूपात करण्यास आली आहे. उदाहरणार्थ ४४ अक्षरांची पद्य रचना असते तो त्रिष्टुप छंद. ४८ अक्षरांची रचना असलेल्या काव्य प्रकाराला जगती छंद म्हणतात.२४ अक्षरांची रचना असते त्याला गायत्री छंद असे म्हणतात. वेदांच्या सहा अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग आहे छंद शास्त्र. यामध्ये काव्याच्या विविध प्रकारच्या छंदोबद्ध रचनांची अत्यंत सखोल माहिती दिली आहे. वेदांसारख्या पुरातन वाङ्ग्मयाचा अभ्यास करण्यासाठी वेदांगातील या छंद शास्त्राप्रमाणेच दुसरे व्वाकरणशास्त्र हे अंगसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय वेद ऋचांचा नेमकेपणाने अर्थ लावता येत नाही. म्हणजेच वेदांचा यथायोग्य अर्थ लावण्यासाठी वेदाङ्गांपैकी छंदशास्त्र आणि व्याकरणशास्त्र ही दोन अङ्गे फार आवश्यक आहेत.

संपूर्ण वेदांची रचना/निर्मिती ही एकाचवेळी आणि एकाच ऋषींनी केलेली नाही, हे वरील विवेचनावरून लक्षात येते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सुमारे ३९० कवींनी/रचनाकारांनी हे सर्व साहित्य रचले आहे. या रचनाकाराचे नाव प्रत्येक सुक्ताच्या सुरूवातीला त्या सुक्ताचा कर्ताऋषी म्हणून दिलेले असते. या ३९० कर्त्यांमध्ये २१ स्त्री रचनाकार आहेत, हे विशेष आहे.

सोमनाथ शास्त्री विभांडिक, ठाणे
वास्तु-ज्योतिषशास्त्री.
संपर्क – ९४२३९ ६४६७३
ता. ७/७/२०२३.

वेदवाङ्गमयाची थोरवी – ऋग्वेद (भाग-१) Read More »

श्रीराम दरबार

भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार

भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार

श्रीराम दरबार

जीवन सुसंस्कृत, मर्यादा पूर्ण करण्यासाठी शास्त्रांमध्ये विविध संस्कारांचे महत्त्व दिले आहे. भारतीय संस्कृतीतील शास्त्रोक्त संस्कार हे आध्यात्मिक जीवनाचे मजबूत आधार स्तंभ आहेत. साक्षात ब्रह्म्याचे मानसपुत्र असलेले आणि मूर्तिमंत धर्माचरण, ज्ञान, वैराग्य, सहिष्णुता व सदाचाराचे प्रतीक असलेले ब्रह्मर्षि वसिष्ठ हेच ज्यांचे परमगुरू आणि कुलगुरू होते त्या प्रभू श्रीरामांचे जीवनही तसेच संस्कारसंपन्न आणि सदाचारयुक्त होते. संस्कारयुक्त जीवनाने स्वार्थ आणि परमार्थ दोन्हींमध्ये समतोल साधला जातो.
मानवी जीवनाच्या हितासाठीच केवळ जगणाऱ्या आदिकवी महर्षि वाल्मिकींनी त्रेतायुगातील तत्कालीन परिस्थितीमुळे व्यथित अंत:करणाने देवर्षि नारदांना विचारले की, “ हे प्रभो, गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी आणि दृढव्रती व सदाचारी असा कोण पुरुष या त्रेतायुगात सर्व जीवांचा हितकारक असेल ? ” त्यावर महर्षि नारदांनी सांगितले की, इक्ष्वाकु कुळात जन्माला आलेला, मनाला जिंकलेला, महाबलवान, कान्तिमान, धैर्यवान, बुद्धिमान, नीतिज्ञ व शत्रुसंहारक आणि जितेंद्रिय असा भगवान श्रीराम हाच तो पुरुष आहे.
नारदमुनी पुढे म्हणतात की, पुष्ट, सुडौल, धर्मज्ञ, वेदवेदाङ्गतत्त्वज्ञ आणि सर्वलोकप्रिय असा हा श्रीराम आहे. समुद्राला जसे सर्व नद्या येऊन मिळतात तसेच सर्व सद्गुण आणि साधुवृत्ती अशा या श्रीरामांना येऊन मिळतात. अशा शब्दांत वाल्मिकी महर्षिंच्या व्यथेचे निरसन देवर्षि नारदांनी केले.
गंभीरतेत समुद्राच्या आणि धैर्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंगतेचे श्रीरामांचे चरित्र आहे. श्रीराम व्यक्ति नाही तर समष्टिच आहे.

न हि तद् भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपति:।
तद् नवं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥

(वाल्मिकी रामायण २/३७/२९)

म्हणजे जेथे राम नाही ते राज्य राज्यच नाही आणि श्रीरामांचा निवास असेल त्या वनालाही स्वतंत्र राष्ट्राचा महिमा प्राप्त होईल.
अशा या संस्कारभूषित श्रीरामांची गाथा सम्पूर्ण विश्र्व-मानवतेची गाथा आहे. या उदात्त व महन्मङ्गल चरित्राचा स्विकारच सम्पूर्ण राष्ट्र आणि विश्र्वामध्ये शांती, सुरक्षा आणि सौहार्दाचे निर्माण करू शकतो.
अयोध्या नगरीतील राजमहालात मंथरा नांवाच्या दासीने आपल्या कुटील कारस्थान आणि विषाक्त विचारांचे बीज पेरले. कैकेयीच्या ईर्ष्याग्नीच्या ज्वालांनी संपूर्ण राजमहालातील सुखसंवाद आणि सौहार्दाचे वातावरण करपून गेले. महाराज दशरथ निश्चेष्ट होऊन पडले. केवळ पित्याने दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हेच सुपुत्राचे प्रथम कर्तव्य असते आणि ते पार पाडण्यातच पुत्राच्या जीवनाची इति-कर्तव्यता किंवा सार्थक असते असे अत्यंत विनम्र शब्दात दशरथ राजांना सांगून त्यांचे सांत्वन प्रभू श्रीरामांनी केले. अथर्ववेदांमध्ये यासंबंधी असे म्हटले आहे की,

अनुव्रत: पितु: पुत्रो मात्रा भवतु संमना: ।

म्हणजे पुत्र हा आपल्या पित्याच्या व्रताचे व मातेच्या आज्ञेचे पालन करणारा असावा. ही उक्ती श्रीरामांनी आपल्या आचरणातून सार्थ ठरवली. महाभारत या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे ज्याची मन:शुद्धी, क्रिया-शुद्धी, कुल-शुद्धी, शरीर-शुद्धी, आणि वाक्-शुद्धी अशा पाच प्रकारच्या शुद्धी झालेल्या असतात, तोच मनुष्य हृदयाने देखील अत्यंत शुद्ध झालेला असतो. हाच प्रत्यय वरील प्रसंगात दिसून येतो.
त्या अती संवेदनशील प्रसंगातही श्रीरामांची संस्कारपूर्ण मर्यादा सखोल जलाशयातल्या कमलपत्राप्रमाणे अबाधित राहीली. राज्यप्राप्तीच्या कल्पनेने हर्षित नाही आणि वनवास भोगाच्या दु:खाने म्लान नाही, असा चित्ताचा समतोल केवळ श्रीरामच साधू शकतात. वनवास भोगालाही आपले सौभाग्य मानून पित्याचे सांत्वन करण्याचे मनोधैर्य दाखवतात. याप्रसंगाचे वर्णन करताना गोस्वामी तुलसीदास श्रीरामचरितमानस मध्ये म्हणतात,

धरम धुरीन धरम गति जानी ।
कहेउ मातु सन अति मृदु बानी ॥
पिताँ दीन्ह मोहि कानन राजू ।
जहँ सब भाँतिमोर बड़़ काजू ॥

श्रीरामांचे हे धीरोदात्त उद्गार लक्षात आणून देतात की, सुख-साम्राज्याचा भोग घेण्यापेक्षा त्यागमय जीवन जगण्यासाठीच त्यांच्या सुसंस्कारित मनाची ओढ अधिक होती. केवळ या एका कृतीतून श्रीराम सामान्य स्तरावरून उत्तुंग पातळीवर विराजमान झालेत.
त्यांच्या उज्ज्वल चारित्र्यावर दृष्टीक्षेप टाकला तर किती प्रसंगांतून त्यांची संस्कारसम्पन्नता दिसून येते. एका नावाड्याला गळाभेट देणे, शबरीची उष्टी बोरे खाणे, जटायुच्या रूपातील गिधाड पक्षाची विकल अवस्था पाहून स्वतः रडणे आणि पित्यासमान त्याचे अन्तिम संस्कार करणे, वनवासी - तपस्वी - ॠषि - महर्षि - पशु - पक्षी - वानर इत्यादि अनेक जीव श्रीरामांच्या संस्कार गंगेत न्हाऊन धन्य झालेत.
श्रीराम मानव समाजातील संस्कारांचे मूर्त रूप आहेत. लोकजीवनाशी एकरूप होऊनसुद्धा त्यांचा जीवनस्तर फारच उच्च कोटीचा आहे. या अलौकिक संस्कार सामर्थ्यामुळेच अमर्याद सागरही त्यांच्यापुढे मर्यादित झाला, दगड तरंगायला लागले, किष्किधेचा अवघा वानर समुदाय राममय झाला आणि खर - दूषणांनी त्यांच्या अनुपम सौंदर्यावर आश्र्चर्येचकित होऊन उद्गार काढले, -

हम भरि जन्म सुनहुसब भाई ।
देखी नहिं असि सुंदरताई ॥

(रामचरितमानस ३/१९/४)

आपल्या सर्व भावांप्रति आदर्श बंधूप्रेम, सुग्रीवासोबतची आदर्श मैत्री, बिभीषणाला दिलेले परम आश्रयस्थान, आश्रित वानरांशी केलेला सद् व्यवहार, प्रजेसाठीचा प्रजावत्सल भाव, पूज्य ॠषि-मुनिंबद्दलचा विनम्र भाव हे सर्वच श्रीरामांच्या संस्कारांचे परम पवित्र द्योतक आहेत.
प्रत्यक्ष युद्धभूमीवर, युद्ध श्रमांनी तूं श्रांत-क्लांत झाला आहेस म्हणून मी तुझ्यावर बाण टाकून तुला यमसदनी धाडले नाही. लंकेत जाऊन विश्रांतीने पूर्ण होऊन ये, मग मी तुझा समाचार घेईन ! असे विशाल हृदयी, शौर्यपूर्ण उदारतेचे उद्गार फक्त श्रीरामच काढू शकतात. (वाल्मिकी रामायण : ६/५९/१४३-१४३)
या अशा उदार हृदयी धीरोदात्त व्यवहाराबद्दल विष्णू पुराणात असे म्हटले आहे की,

सदाचाररत: प्राज्ञो विद्याविनयशिक्षित: ।
पापेऽप्यपाप: परुषे ह्यभिधत्ते प्रियाणि य: ।
मैत्री द्रवान्त:करणस्तस्य मुक्ति: करे स्थिता ॥

म्हणजे बुद्धिमान गृहस्थ सदाचाराच्या पालनानेच संसार बंधनातून मुक्त होतो. विद्या आणि विनयाने परिपूर्ण व्यक्ति त्यांच्या सहवासात येणाऱ्या दुष्ट व पापी लोकांबद्दलही कठोर आणि पापमय व्यवहार करीत नसतात, ते सर्वांशी हितकारक, प्रिय आणि मैत्रीपूर्ण व्यवहारच करतात.
युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेल्या रावणाच्या अन्त्यसंस्काराला नकार देणाऱ्या बिभीषणाला श्रीरामांनी समजावून सांगितले की, मरणानंतर वैराचा नाश होतो, या नीतिला धरून आता मरणोत्तर रावण जसा तुझा भाऊ आहे तसाच तो इतरांचाही भाऊ आहे, आणि तू त्याचे अंतिम दाह-संस्कार कर.

मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम्।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येय यंदा तव ॥

(वाल्मिकी रामायण: ६/१११/१००-१०१)

अशा परम उदार उपदेशपर शब्दांत त्यांनी बिभीषणाला रावणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेरीत केले. केवढे हे शत्रूबद्दलही औदार्य ! हीच तर आहे श्रीरामांची संस्कारपूर्ण करूणा आणि क्षमाशील वृत्ती !
भक्त वत्सलता आणि शरणागतांच्या उद्धारासाठी अखंड तत्परता हे श्रीरामांचे अनुपम ऐश्र्वर्ये आहे. म्हणूनच आदिकवि वाल्मिकी म्हणतात की,-
एक तर आम्ही श्रीरामांचे दर्शन घेऊ शकावे किंवा श्रीरामांची दृष्टी आमच्यावर पडावी, यातच मनुष्य जीवनाची खरीखुरी सार्थकता आहे.

यश्र्च रामं न पश्येत्तु यं च रामो न पश्यति ।
निन्दित: सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हते ॥

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

साभार : कल्याण, गीताप्रेस
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे
संपर्क – ९४२३९ ६४६७३
चैत्र शु. नवमी, ता. ३०/०३/२०२३


श्रीरामरक्षा स्तोत्राचा मराठी भावानुवाद समजून घेण्यासाठी  -  येथे क्लिक करा.

भगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार Read More »

बृहस्पति पूजन

नारळी पौर्णिमा, बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र

नारळी पौर्णिमा

आज श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार असून श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आज रक्षाबंधनाचा सण आहे. आज सकाळी १०:३९ ते उद्या सकाळी ७:०६ पर्यंत सर्व बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून आनंदाची देवाणघेवाण करावी. सध्या समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या विष्टी (भद्रा) करणाच्या अशुभत्त्वाचा बाऊ करून दाखवणाऱ्या क्लिप्स सामान्य माणसाला भ्रमात टाकत आहेत. ज्योतिष शास्त्राच्या अत्यंत प्राथमिक गोष्टींचेही मूळीच ज्ञान नसलेले लोकही स्वतःला मोठे शास्त्री - पंडीत समजून आपल्या अर्धवट बुद्धीने समाजाचे मानसिक स्वास्थ्य घालवण्याचे व स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहून श्रेय घेण्यासाठी चुकीचे वागत आहेत.

तिथ्यर्धं करणम् या सूत्रानुसार प्रत्येक तिथीच्या दोन समान भागांपैकी एका भागाला करण म्हणतात.
शुक्ले पूर्वार्धेऽष्टमीपञ्चदश्यो: भद्रैकादश्यांं चतुर्थ्यां परार्धे या न्यायाने प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी आणि पौर्णिमा तिथीच्या पूर्वार्धात विष्टी (भद्रा) करण असतेच. थोडक्यात, पौर्णिमा ही तिथी विष्टी करणानेच सुरू होते. विष्टी करणाविषयी शास्त्र विवेचन फार विस्तृत आहे. येथे आपण थोडी माहिती पाहू.

सुर्वे वत्स या भद्रा सोमे सौम्ये सिते गुरौ । कल्याणी नाम सा प्रोक्ता सर्वकर्माणि साधयेत् ॥
याचा अर्थ सोम, बुध, गुरु किंवा शुक्रवारी देवगणीय नक्षत्र असतांना होणाऱ्या भद्रेला कल्याणी असे म्हणतात आणि या भद्रेमध्ये केलेली सर्व कार्ये सिद्धिस जातात. आज गुरुवार सह श्रवण हे देवगणी नक्षत्र आहे. म्हणून आजची भद्रा ही कल्याणी अर्थात कल्याणकारी आहे.

स्वर्गेऽजौक्षैणकर्केष्वध: स्त्रीयुग्मधनुस्तुले कुंभमीनालिसिंहेषु विष्टिर्मत्येषुखेलति
या सूत्रानुसार आजची भद्रा मकर राशीत असल्याने तिचा निवास स्वर्गात आहे म्हणून ती शुभकारक आहे.

राशीनुसार भद्रा निवास स्वर्गात असेल ती शुभकारक असते. पाताळनिवासी भद्रा ही धनलाभ देणारी असते. मृत्यू लोक (पृथ्वी) निवासी भद्रा ही सर्व कार्यांचा विनाश करणारी असते.

वरील विवेचनावरून आजच्या भद्रायुक्त पौर्णिमेतही आपण नि:शंक मनाने सणाचा आनंद घ्यावा, हेच लक्षात येते.

 

बृहस्पति पूजन
बृहस्पति पूजन

श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पति पूजन करावे. त्यानिमित्ताने विश्वसारतंत्र या नावाच्या पुराण ग्रंथातील गुरूस्तोत्र नावाचे हे दुर्मिळ स्तोत्र सर्व भाविक भक्तांच्या मनन आणि पठणासाठी सादर करीत आहे.

🙏 ॥ गुरुस्तोत्रम् ॥ 🙏
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
अनेकजन्म - संप्राप्तकर्मबंध विदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
मन्नाथ:श्रीजगन्नाथो मद्गुरु: श्रीजगद्गुरु: ।
ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

श्रावणमासस्य बृहस्पतिवासरस्य शुभाशय:
🙏🌹🙏

- सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
संपर्क - ९४२३९ ६४६७३
श्रावण शुद्ध पौर्णिमा, ता. ११/०८/२०२२.

नारळी पौर्णिमा, बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र Read More »

अश्र्वत्थमारुती

अश्र्वत्थमारुती पूजन – हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र

अश्र्वत्थमारुती

अश्र्वत्थमारुती

अश्र्वत्थमारुती पूजन – हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र

आज श्रावण शुद्ध नवमी म्हणजे अश्र्वत्थमारुती पूजन दिवस. श्रीमद् शंकराचार्य यांनी रचलेल्या प्राचीन आणि दुर्मिळ अशा स्तोत्र संग्रहातील "श्री हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र" हे स्तोत्र खास माझ्या मारुती उपासक मित्र आणि परिवारांसाठी सादर करीत आहे.

🙏 ॥ श्री हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र ॥ 🙏

वीताखिल-विषयेच्छं जातानन्दाश्र पुलकमत्यच्छम्।
सीतापति दूताद्यं वातात्मजमद्य भावये हृद्यम् ॥ १ ॥
तरुणारुण मुख-कमलं करुणा-रसपूर-पूरितापाङ्गम् ।
सञ्जीवनमाशासे मञ्जुल-महिमानमञ्जना-भाग्यम ॥ २ ॥
शम्बरवैरि-शरातिगमम्बुजदल-विपुल-लोचनोदारम्।
कम्बुगलमनिलदिष्टम् बिम्ब-ज्वलितोष्ठमेकमवलम्बे ॥ ३ ॥
दूरीकृत-सीतार्तिः प्रकटीकृत-रामवैभव-स्फूर्ति ।
दारित-दशमुख-कीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः ॥ ४ ॥
वानर-निकराध्यक्षं दानवकुल-कुमुद-रविकर-सदृशम् ।
दीन-जनावन-दीक्षं पवन तपः पाकपुञ्जमद्राक्षम् ॥ ५ ॥
एतत्-पवन-सुतस्य स्तोत्रं यः पठति पञ्चरत्नाख्यम् ।
चिरमिह-निखिलान् भोगान् भुङ्क्त्वा श्रीराम-भक्ति-भाग्-भवति ॥ ६ ॥
॥ इति श्रीमच्छंकर-भगवतः कृतौ श्री हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र संपूर्णम् ॥

श्रावणमासस्य मन्दवासरस्य शुभाशय:

🙏🌹🙏

- लेखन, संकलन, संपादन - सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
संपर्क - ९४२३९ ६४६७३
श्रावण शुद्ध नवमी, ता. ०५/०८/२०२२.

अश्र्वत्थमारुती पूजन – हनुमत पञ्चरत्नं स्तोत्र Read More »

बृहस्पति पूजन

बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र

बृहस्पति पूजन

बृहस्पति देव

बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र

आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार असून श्रावण शुद्ध सप्तमी म्हणजे सीतला सप्तमी आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पति पूजन करावे. त्यानिमित्ताने विश्वसारतंत्र या नावाच्या पुराण ग्रंथातील गुरूस्तोत्र नावाचे हे दुर्मिळ स्तोत्र सर्व भाविक भक्तांच्या मनन आणि पठणासाठी सादर करीत आहे.

🙏 ॥ गुरुस्तोत्रम् ॥ 🙏

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
अनेकजन्म - संप्राप्तकर्मबंध विदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
मन्नाथ:श्रीजगन्नाथो मद्गुरु: श्रीजगद्गुरु: ।
ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

श्रावणमासस्य बृहस्पतिवासरस्य शुभाशय:
🙏🌹🙏

- लेखन, संकलन, संपादन - सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
संपर्क - ९४२३९ ६४६७३
श्रावण शुद्ध सप्तमी, ता. ०४/०८/२०२२.

बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र Read More »

सापशिडी खेळाचे निर्माते – संत श्री ज्ञानेश्वर माऊली

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा.ल. मंजुळ यांनी उलगडणे
संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा खेळ म्हणजे – मोक्षपट…अर्थात ज्ञानेश्वर माऊली निर्मित सापशिडी…

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा ,यामागील उद्देश होता.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.
इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण करणे
‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत.’

(साभार : दैनिक ‘लोकमत’, १८ जुलै २०२१)

सापशिडी खेळाचे निर्माते – संत श्री ज्ञानेश्वर माऊली Read More »

कुळदेवी आरती – चैत्र शुद्ध अष्टमी

॥ कुलस्वामिनी बिजासिनी माता प्रसन्न ॥

कुळदेवी आरती – चैत्र शुद्ध अष्टमी

 

कुळदेवीची वर्षातील पहिली आरती – चैत्र शुद्ध अष्टमी.

सकाळी देवांची दैनंदिन स्नान पूजा करावी.

आरत्यांची पुढे दिल्याप्रमाणे तयारी करावी. साधारणत: मध्यान्ह समयी आरत्या लावाव्यात.

नैवेद्य – वरण भात, पुरण, कटाची (पुरणाची) आमटी, तांदळाची खीर, तळण (भजी, पापड, कुरडई, इ.), इ.

दिवे आणि देवीची खेळणी – कणकेपासून पुढे दिल्याप्रमाणे दिवे आणि देवीची खेळणी बनवावीत आणि वाफवून घ्यावीत जेणेकरून दुसऱ्या दिवसापर्यंत टिकतील.

दिवे आणि देवीची खेळणी

  • दिवे – ८
  • भंडारा – पुरण भरलेला
  • फणी
  • बांगड्या
  • वेणी
  • कुंकवाचा करंडा
  • टिकली
  • पोळपाट – लाटणे
  • पाटा – वरवंटा
  • दहयाचे भांडे - रवी
  • पान – सुपारी
  • भोवरा
  • गोट्या
  • विंचू
  • गोम

पूजेसाठी देवीचे टाक – देवीचे पुढे दिल्याप्रमाणे टाक आरतीसाठी वापरावेत.

श्री बिजासिनी देवी

श्री बिजासिनी देवी

श्री कानबाई - रानबाई देवी

श्री बिजासिनी देवी

आरतीचे ताट – काशाचे ताट असल्यास उत्तम. पुढे दिल्याप्रमाणे आरतीचे ताट मांडावे. दिव्यांमध्ये तुपाच्या वाती लावाव्यात. देवीच्या टाकांसाठी आंब्याच्या पानाचे / विड्याच्या पानाचे आसन करावे.

आरती – दुर्गासप्तशतीमधून यथाशक्ती पुढील स्तोत्र पठण करावे. गणपती आणि दुर्गा देवीची आरती करावी.

      •      अथ सप्तश्लोकी दुर्गा
      •      अथ देव्या: कवचम्
      •      अथ तंत्रोक्तं देवीसूक्तम्
      •      श्रीदेव्यथर्वशीर्षम्
      •      श्री सिद्धकुंजिका स्तोत्र
      •      अथ देव्यपराध्यक्षमापनस्तोत्रम्

 

घरात दुर्गासप्तशती उपलब्ध नसल्यास, पुढे दिलेल्या दुर्गासप्तशतीच्या चित्रावर क्लिक करून ग्रंथ डाउनलोड करून घ्यावा.

काजळी धरणे – आरती करून झाल्यावर, वाटीच्या बुडाशी तुपाचे बोट फिरवून आरतीच्या ताटातील आठही दिव्यांवरून वाटी फिरवून काजळी जमा करावी. ही काजळी घरातील प्रत्येक व्यक्तीने गंधाप्रमाणे कपाळी लावावी.

प्रसाद ग्रहण – आरती करून झाल्यावर नैवेद्य दाखवावा. आरतीच्या ताटातील दिवे, खेळणी आणि पुरणपोळी तशीच दुसऱ्या दिवसापर्यंत झाकून ठेवावी आणि उर्वरित पदार्थ (वरण भात, आमटी, तळण, इ.) घरातील सर्वानी जेवणात ग्रहण करावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन देवाची दैनंदिन स्नान पूजा करून दिवे, देवीची खेळणी आणि पुरणपोळी यांचा चुरमा करून तो प्रसाद आवडीनुसार दूध/दही सोबत ग्रहण करावा.

प्रसाद ग्रहण करून झाल्यावर उष्टे/खरकटे हात एका भांड्यात धुवावेत, हात बाथरूम/बेसिन मध्ये धुवू नयेत. आपले हात धुतलेले पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी, कुणाच्या पायदळी येणार नाही अशा पद्धतीने विसर्जित करावे. आपले उष्टे/खरकटे पाणी तुळशीला टाकू नये.

॥ शुभम् भवतु ॥

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

 

कुळदेवी आरती – चैत्र शुद्ध अष्टमी Read More »

कुळधर्म आणि कुळाचार

कुळधर्म आणि कुळाचार

कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे कुठल्याही परिस्थितीत चुकवू नये अशा या गोष्टी आहेत. या गोष्टी म्हणजे प्रत्येक घराण्यात वाड-वडीलांनी लावून दिलेले, वंश परंपरागत चालत आलेले घराण्याचे कुलदैवत, कुलदेवी यांचे नैमित्तिक/प्रासंगिक पूजा उपचार आहेत. त्यामुळे त्यात कधीही कुठल्याही कारणासाठी खंड नको. (अपवाद – कुळधर्म / कुळाचाराच्या दिवशी सुतक / वृद्धी लागू असणे.)

आपल्या अहिरराव कुळात पुढील कुळधर्म आणि कुळाचार आहेत जे प्रत्येकाने नियमितपणे करावेत. त्या प्रत्येकाबद्दल, सविस्तर पूजा माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर (निळ्या अक्षरांवर) क्लिक करा –

वार्षिक कुळधर्म कुळाचार कार्यक्रम –
वर्षाच्या सुरवातीलाच कॅलेंडरमध्ये / डायरीमध्ये महिना आणि तिथीनुसार नोंदी करून ठेवणे.

१. कुळदेवीच्या आरत्या – वर्षातून ३ वेळा

चैत्र शुद्ध अष्टमी
⇒ श्रावण शुद्ध अष्टमी
⇒ माघ शुद्ध अष्टमी

२. साखर चतुर्थीचे ताट –

⇒ फाल्गुन कृष्ण चतुर्थी

३. खंडेरायांची तळी – वर्षातून २ वेळा

⇒ चंपाषष्ठी – मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
⇒ दसरा – अश्विन शुद्ध दशमी

४. श्री कानुमाता उत्सव

⇒ श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी (काही ठिकाणी नागपंचमीच्या आधीच्या रविवारी हा उत्सव करतात. आपल्या कुळात नागपंचमीनंतरच्याच रविवारी करतात.)

५. श्री शीलनाथ महाराज उत्सव (चोपडेकर अहिरराव परिवारासाठी)

⇒ पुण्यतिथी – चैत्र शुद्ध शिवरात्र
⇒ गुरुपौर्णिमा – आषाढ शुद्ध पौर्णिमा
⇒ महाशिवरात्र – माघ शुद्ध चतुर्दशी

(निळ्या रंगात नसलेल्या उर्वरित सविस्तर पूजा विधीवर अजून काम सुरू आहे, सर्व माहिती लवकरच उपलब्ध होईल).

॥ शुभम् भवतु ॥

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

 

कुळधर्म आणि कुळाचार Read More »

सापशिडी खेळाचे निर्माते – संत श्री ज्ञानेश्वर माऊली

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा.ल. मंजुळ यांनी उलगडले. संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा खेळ म्हणजे – मोक्षपट…अर्थात ज्ञानेश्वर माऊली निर्मित सापशिडी…

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा ,यामागील उद्देश होता.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण केले.  ‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत.’

(साभार : दैनिक ‘लोकमत’, १८ जुलै २०२१)

सापशिडी खेळाचे निर्माते – संत श्री ज्ञानेश्वर माऊली Read More »

श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव

श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव

श्री कानबाईमाता (कानुमाता) उत्सव

        खान्देशच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात श्री कानुमातेच्या उत्सवास मोठे मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा आहे. श्री कानुमातेचा उत्सव दर वर्षी श्रावण महिन्यात शुद्ध पक्षात साजरा केला जातो. नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी श्री कानबाई मातेचा उत्सव केला जातो. नागपंचमी नंतरचा रविवार हाच दिवस निश्चित असल्याने पूजेसाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं, हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, पाटील, इ. समाजात आणि प्रामुख्याने खान्देशात साजरा होतो.

        परंपरेने चालत आलेल्या व कायमस्वरूपी जतन केलेल्या श्रीफळ रूपातल्या श्री कानबाई (कानुमाता) आणि श्री रानबाई (राणुमाता) अशा जोडीने या देवीची पूजा-अर्चना केली जाते. काही कुटुंबांमध्ये हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई-रानबाई अशा दोन्ही देवी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. काहींकडे देवीच्या चौरंगावर छोटा मांडव घालतात. परंतु या सर्व पद्धतीत देवीचे हे परंपरागत श्रीफळ/नारळ हा या उत्सवाचा महत्वाचा गाभा आहे. या श्रीफळांचा वर्षोनुवर्षे अतिशय काळजीपूर्वक सांभाळ केला जातो. हे श्रीफळ कालांतराने जीर्ण झाल्यास, हाताळणे कठीण झाल्यास त्यास नवरूप द्यावे/नूतनीकरण करावे (परणून आणणे असे या विधीचे नाव आहे, सविस्तर माहिती पुढील लेखात).

        या उत्सवाच्या आधीही दिवाळीसणाच्या आधी करतात तशी घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट करतात. घरातील सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, इ. सगळे स्वच्छ धुवून घेतात. देवघरातील सर्व देव घासून पुसून लख्ख स्वच्छ चकचकीत करतात, हार – फुले यांची सजावट करतात. एकूणच, सर्व घर, वातावरण  देवीच्या आगमनासाठी स्वच्छ पवित्र सुसज्ज करतात.

रोट

        कानबाईच्या उपासनेत ‘रोट’ या विधीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कानबाईचे रोट हा एक महत्त्वपूर्ण कुळाचार आहे. रोट म्हणजे देवीच्या पूजेसाठी घरातील सर्व भाऊबंदांच्या नावाने मोजून घेतले जाणारे गहू, आणि त्याचा प्रसाद. हा रोटांचा प्रसाद केवळ सुतकी भाऊबंदांनी ग्रहण करावा. यावेळी घरात उपस्थित असलेल्या लग्न झालेल्या मुली व इतर नातलग/मित्र-मंडळी यांना हा प्रसाद ग्रहण करता येत नाही (दुसर्‍या कुळातील असल्याने), त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाक करतात.

        रोट हे कुठल्याही परिस्थितीत श्रावण पौर्णिमेच्या आधी संपवायचे असतात. तसेच रोट संपण्यापूर्वी, ‘रोटाचा वाढवा’ म्हणून एक छोटा विधी करून मगच संपवले जातात. ‘रोटाचा वाढवा’ म्हणजे रोट थोडे शिल्लक असताना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून मग रोट संपवावे. रोटाचा वाढवा तिसर्‍या दिवशी (म्हणजेच लगेचच्या बुधवारी – कानबाई बसवण्याचा रविवार हा पहिला दिवस पकडून) करता येत नाही. रोट तिसर्‍या दिवशी संपत आहेत असे लक्षात आल्यास, रोट जाणीवपूर्वक उरवून/शिल्लक ठेवून मग चौथ्या दिवशी संपवावेत. रोट बाहेरगावी नेता येत नाही. रोट गायीला खाऊ घालता येत नाही. रोट केवळ सुतकी भाऊबंदांनीच खायचे असतात. घरी येणार्‍या पाहुण्यांसाठी, विवाहित मुलींसाठी, वेगळा स्वयंपाक करतात, त्यांना रोटाचे पदार्थ देत नाहीत.

        रोट संपेपर्यंत जेवून हात धुतलेलं पाणी, उष्ट्या खरकट्या ताटातील पाणी सुद्धा सांभाळून विसर्जित करतात. एखाद्या झाडाजवळ / कोपर्‍यामध्ये, कोणाच्या पायदळी येणार नाही अशा बेताने एक मोठा खड्डा करुन त्यात हे सर्व पाणी ओततात, त्यास ‘समुद्र’ असे म्हणतात. काहीही उष्टे, खरकटे गटारीत / मोरीत / बेसिन मध्ये किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. आपले उष्टे/खरकटे तुळशीला विसर्जित करू नये. रोट संपेपर्यंत हा नियम काळजीपूर्वक  पाळावा.

        काही कुटुंबांमध्ये देवीचे नारळ आणि त्यांची पूजा असा प्रकार नसतो, केवळ रोटांची पूजा असते. अशी मंडळी सामान्यप्रमाणेच रोट बनवून, जवळपास ज्या घरी कानबाईची पूजा असेल तिथे जावून देवीसमोर ते रोट पूजतात, रोटांचा नैवेद्य दाखवतात. बाकी रोटांचे नियम सारखेच असतात.

रोट मोजण्याची पद्धत –

  • कानबाईमाता पूजेच्या रविवारी सकाळी, घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा करावी. कुलदेवतेची पूजा करावी.
  • कुटुंबात वंश परंपरेने चालत आलेल्या मापाप्रमाणे गहू मोजून घ्यावे. हे माप सव्वा या प्रमाणात असते (सव्वा शेर, सव्वा पाव, इ). (आपल्या विभांडिक कुटुंबात सव्वा पाव मापाचा रोट असतो).
  • त्यानंतर देव, कानबाई, रानबाई, गाय-वासरू, गुरव यांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
  • कुटुंबात रोटांची ज्याप्रमाणे वाटणी झाली असेल त्या प्रमाणे कुटुंबातील सर्व लहान मोठ्या जीवित पुरुषांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
  • सर्वांच्या नावाने प्रत्येकी ५ मुठी गहू मोजून झाल्यावर, चुकीने एखादे नाव सुटल्याची शक्यता गृहीत धरून आणखी ५ मुठी गहू घ्यावेत.
  • मोजलेल्या गव्हामध्ये आंब्याच्या पानावर देवीचे टाक ठेवून पूजा करावी. गणपतीची, देवीची आरती करावी. नैवेद्य दाखवावा.
  • हे मोजलेले गहू चक्कीवरुन दळून आणावे.
  • हे गहू आणि त्याच्या पोळ्या / पुरणपोळया यांनाच पूर्ण पूजा संपेपर्यंत रोट असे म्हणतात.
  • रोटाचे गहू दळून आणल्यानंतर सर्व उपस्थित भाऊ-बंदांना पुरेशा होतील या प्रमाणात रोटाच्या पुरणपोळया कराव्यात.
  • या पुरणपोळ्यांची एक चळत नैवेद्य आणि पूजेसाठी बनवून ठेवावी.

पूजाविधी

साधारणत: सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी पूजा मांडण्यास सुरवात करावी. स्वच्छ धुतलेला चौरंग घ्यावा. त्यावर स्वच्छ खण अंथरावा. चौरंगाला केळीचे खांब बांधावे. कण्हेरीच्या डहाळ्या (छोट्या नाजूकशा पांनांसहित फांद्या) लावाव्यात. हार फुले समई धूप दीप इ. यांची सजावट करावी. सनई/इतर मंगलवाद्ये लावून वातावरण मंगलमय करावे. प्रवेशद्वारी सडा-रांगोळी, आंब्याचे तोरण, आंब्याच्या डहाळ्या, कण्हेरीच्या डहाळ्या, रोषणाई/लाईटिंग, पताका इ. यथाशक्ती करावे. वातावरण आनंदी, उल्हसित, मंगलमय करावे.

  • सर्वप्रथम पूजा मांडणी करणार्‍या व्यक्तीने शुचिर्भूत होऊन (व जमल्यास सोवळे नेसून) देवाला नमस्कार करावा, घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा आणि मग देवीची पूजा मांडण्यास सुरवात करावी.
  • चौरंगावर पूजा करणार्‍याच्या उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवावे, त्यावर कलश ठेवावा. कलशात स्वच्छ पाणी भरून, रुपया सुपारी टाकावी. कलशावर ५ विड्याची पाने मांडावीत. कलशाला लाल गंधाची पाच बोटे लावावीत.
  • परंपरागत कानबाईच्या नारळाला प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
  • नारळाला हळद कुंकवाचा टिळा लावून खण, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करून कलशावर कानबाईरूपी नारळाची स्थापना करावी.
  • कानबाईच्या उजव्या बाजूला म्हणजेच पूजा करणार्‍याच्या डाव्या बाजूला श्री रानबाई मातेची स्थापना वरील प्रमाणेच करावी.
  • रानबाई मातेची स्थापना कलशावर करत नाही. त्याऐवजी थोडे तांदूळ चौरंगावर ठेवून त्यावर रानबाईमातारूपी नारळाची स्थापना करावी. हळद कुंकवाचा टिळा लावून खणाचे वस्त्र, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करावा.
  • दोन्ही देवींच्या समोरील जागेत, चौरंगाच्या मध्यभागी विडयाची पाने ठेवावीत. त्यावर एका बाजूला (देवीचे टाक मध्यभागी ठेवता येतील अशा बेताने), रुपया आणि त्यावर सुपारी अशा स्वरुपात गणेशाची स्थापना करावी. देवीचे टाक ठेवण्यासाठी जागा मोकळी सोडावी.
  • देवीचे टाक ताम्हणात घेऊन त्यांना प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
  • देवीचे टाक पुसून विड्याच्या पानांवर ठेवावेत. हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप यांनी पूजा करावी.
  • देवीजवळ खोबर्‍याच्या वाटीत गुळाचा खडा ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा.
  • देवीजवळ काकडी, केळी, लिंबू हे देवीचे आवडते पदार्थ ठेवावेत.
  • काही ठिकाणी हौस म्हणून देवीला बाजारातील तयार मुखवटयांची सजावट केली जाते. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची मुखवटयांची सजावट करून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).
  • काही ठिकाणी देवीला खोबर्‍याच्या वाट्यांची माळ करायची पद्धत आहे. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची माळ लावून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).

  • वरीलप्रमाणे सर्व पूजा मांडणी झाल्यावर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील देवीची पुढील स्तोत्रे, पाठ, इ. यथाशक्ती पठण करावे.
            • श्रीदेव्यथर्वशीर्षम्
            • अथ देव्या: कवचम्
            • अथार्गलास्तोत्रम्
            • देवीसूक्तम्
            • सिद्धकुञ्जिकास्तोत्रम्

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घरात उपलब्ध नसल्यास पुढे दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात – श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ डाऊनलोड

  • रोटांच्या नैवेद्याचे ताट देवीपुढे मांडून ठेवावे. ताटातील दिवे प्रज्वलित करावेत. (नैवेद्याच्या ताटाच्या मांडणीची माहिती पुढे दिली आहे).
  • यानंतर गणपतीची आणि देवीची आरती करावी. कर्पूरारती, मंत्रपुष्पांजली करावी.
  • रोटांचा नैवेद्य दाखवावा. देवीचे आवडते पदार्थ – ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडी यांचाही नैवेद्य दाखवावा. देवीस श्रीफळ वाढवावे.
  • सर्व उपस्थितांनी देवीची मनोभावे पूजा करावी.
  • देवीसमोर फुगड्या, देवीची गाणी, स्तोत्र पठण, मंत्र जप, इ करून आनंदोत्सव साजरा करावा.
  • दर्शनासाठी आलेल्या सर्वांना ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडीचा प्रसाद द्यावा.

रोटांचा नैवेद्य

देवीची यथासांग पूजा, आरती झाल्यावर देवीला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो.

  • नैवेद्य दाखवण्यासाठी रोटांच्या पुरणपोळयांची चळत एका मोठ्या ताटात (काशाचे ताट असल्यास उत्तम) मध्यभागी ठेवतात.
  • त्यावर कणकेचे मोठे दिवे पुढील बाजूस ठेवून त्यात फुलवाती लावतात. तसेच खोबर्‍याच्या पसरट वाट्यांमध्ये फुलवाती ठेवून त्यांचेही दिवे बनवतात व कणकेच्या दिव्यांमागे ते ठेवतात. दिवे प्रज्वलनासाठी शुद्ध तूप वापरावे, तेल/डालडा वापरू नये.
  • देवीच्या नैवेद्यासाठी भात, कटाची आमटी, गंगाफळाची (लाल भोपळा) भाजी, हरभर्‍याच्या डाळीचे फुनके (याला या पूजेच्या दिवशी नारळ असे म्हणतात), तांदळाची खीर, तळण (भजी, पापड, कुरडाइ, इ) करतात.
  • लहान वाट्यांमध्ये केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ ठेवतात. सोबत तुपाची वाटी ठेवतात.
  • एकूण सर्व मांडणी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे असते.

  • पूजा झाल्यावर जेवणाचे वेळी नैवेद्याच्या ताटातील भात, आमटी, भाजी, तळण, फुनके (नारळ), इ सर्व पदार्थ वाढून घ्यावेत. नैवेद्याच्या ताटात काही रोट शिल्लक ठेवून बाकी रोट भाऊ-बंदांमध्ये वाढून द्यावे. जेवून झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
  • घरातील सर्वांची जेवणे होईपर्यंत कणकेचे दिवे आणि खोबर्‍याच्या वाटीचे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी दिव्यांमध्ये योग्य प्रमाणात तूप वापरावे. (बर्‍याचदा खोबर्‍याच्या वाट्या दिव्याच्या उष्णतेमुळे जळतात, पेट घेतात, त्यावेळी जाळलेल्या भागावर पुरणाचा गोळा ठेवून वाटीला लागणारी आच कमी करता येते.)
  • रोटांवरील चारही दिवे शांत झाल्यावर नैवेद्याच्या ताटात शिल्लक ठेवेलेले रोट आणि दिवे देवीजवळच व्यवस्थित झाकून ठेवावेत.
  • दुसर्‍या दिवशी घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा आटोपून झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.

विसर्जन

रविवारी संध्याकाळी देवीचे आपल्या घरी आगमन झाल्यावर दुसर्‍या दिवशी सोमवारी देवीचे विसर्जन असते. शक्यतो सकाळी मध्यान्हपूर्वीच देवीचे विसर्जन करतात.

  • घरातील कर्त्या जोडप्याने लवकर शुचिर्भूत होऊन दैनंदिन देवपूजा करावी.
  • वर सांगितल्याप्रमाणे, आदल्या दिवशी देवीजवळ झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
  • नैवेद्यासाठी थोडा भात शिजवून त्यावर दही ठेवून नैवेद्य तयार करावा.
  • विसर्जनासाठी देवीचा चौरंग स्थापना केल्या जागेपासून ५-१० पावले पुढे सरकवावा. देवीची आरती करावी, नारळ वाढवावा.
  • त्यानंतर विसर्जनाला निघण्यासाठी देवीचा चौरंग एका सुवासिनीच्या डोक्यावर ठेवावा. सुवासिनीची ओटी भरावी. देवीसमोरून लिंबू कापून ओवाळून टाकावे. विसर्जन मार्गात घागरीने पाणी टाकत विसर्जनासाठी निघावे.
  • देवीचे विसर्जन पूर्वीच्या काळी नदीवर केले जात असे, परंतु कालानुरूप काही व्यावहारिक अडचणींमुळे विसर्जन जवळपासच्या विहिरींवर, घरच्या अंगणात असे होऊ लागले. असो, कालाय तस्मै नम:
  • देवीचा गजर करत, फुगड्या खेळत, नाचत गात वाजत गाजत देवीला विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे. देवीचा चौरंग आळी पाळीने एकेका व्यक्तीने आपल्या डोक्यावर घेऊन चालत राहावे. देवीसमोरील रस्त्यात पाणी टाकत राहावे, अधून मधून लिंबू कापून देवीवरून ओवाळून टाकावे.
  • विसर्जन स्थळापूर्वी ‘विसावा’ घेण्याची पद्धत आहे. म्हणजेच एखादा चौक, तिठा अशा ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही अशा रीतीने बाजूला थांबून देवीचा चौरंग डोक्यावरुन खाली उतरवावा. देवीची आरती करावी, प्रसाद वाटावा. आणि परत विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे.
  • विसर्जनस्थळी पोहोचल्यावर चौरंगाला लावलेले केळीचे खांब, इतर पूजापत्री काढून बाजूला ठेवावी, आणि नंतर नदी/तलाव/निर्माल्य विसर्जन कलश, इ ठिकाणी सोडावीत.
  • देवीचे दागिने, साज-शृंगार काढून देवीच्या नारळांना, देवीसमोर ठेवलेल्या देवीच्या टाकांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
  • देवीच्या कलशातील पाणी पायदळी जाणार नाही अशा रीतीने एखाद्या झाडाजवळ विसर्जित करावे. कलश स्वच्छ धुवून परत नवीन पाण्याने भरून घ्यावा.
  • कलशाखालील तांदूळ, आणि रानबाई खाली ठेवलेले तांदूळ व्यवस्थित गोळा करून सांभाळून बाजूला काढून घ्यावे. या तांदळाची नंतर खीर करून सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावी.
  • चौरंगही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
  • परत पूर्वीप्रमाणे देवीची मांडणी करावी, देवीला साज-शृंगार करावा. देवीची आरती करावी.
  • आरती झाल्यावर देवीला डोक्यावर घेऊन घरी परत यावे. अशा प्रकारे देवीचे विसर्जन होते.
  • घरी परत आल्यावर देवीचे टाक नेहमीप्रमाणे देवघरात स्थानापन्न करावेत. कलशातील पाणी तुळशीस टाकावे. देवीचे नारळ स्वच्छ कोरडे करून, एका वस्त्रात थोड्या तांदुळासोबत गुंडाळून सुरक्षित जागी ठेवावेत. ते खराब होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. देवीचा साज-शृंगार सांभाळून ठेवावा.

अशा प्रकारे अत्यंत आनंदात, उत्साहात श्री कानुमातेचा दोन दिवसाचा उत्सव संपन्न होतो. विसर्जन झाल्यावर खरोखरीची एक पोकळी जाणवते. देवीच्या आगमनाने उल्हसित असलेले वातावरण विसर्जनानंतर अचानक रिक्त वाटू लागते. आणि राहतात मग फक्त आठवणी आणि परत पुढच्या वर्षी देवी लवकर परत यावी ही विनवणी देवी चरणी…

बोला… कानबाईमाता की…जय…. रानबाईमाता की…जय….  

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन – श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव Read More »

श्री शीलनाथ महाराज

नाथपंथीय साधना आणि साधनेची ओळख

नाथपंथीय साधना आणि साधनेची ओळख

(भाग ०१)

श्री शीलनाथ महाराज
श्री शीलनाथ महाराज

नाथपंथातील योग

नाथपंथ हा एक शुध्द साधना मार्ग असून याच जीवनात त्याचा अनुभव येणे हीच त्याची सार्थकता आहे. “परमात्मा कैवल्यस्वरूप आहे” हा नाथपंथाचा तात्विक सिध्दांत आहे. तो भाव आणि अभावाच्या पलिकडे असून त्याला न भाव (वस्ति) म्हणता येईल, न अभाव (शून्य) म्हणता येईल.

बस्ती न शून्यं शून्यं न बस्ती। अगम अगोचर ऐसा ॥
गगन सिखरमहि बालक बोलहि। बाका नाम धरहुगे कैसा ॥

— गोरख सबद

अश्या या कैवल्य स्वरूपाकडे पोहोचणे हाच जीवाचा मोक्ष आहे. सिध्दांतापेक्षा त्या सिध्दांताच्या अनुभूतीपर्यंत पोहोचविणाऱ्या मार्गालाच साधकाच्या दृष्टिने महत्त्व असते. सैध्दांतिक दृष्टीने आत्मा व परमात्म्याचा संबंध काहीही असो, व्यावहारीक दृष्ट्या त्या दोघांचा संयोग म्हणजेच मोक्ष मानला जाईल. म्हणूनच कैवल्य मोक्षालाही योगच म्हणतात. याच कैवल्य अनुभूतीपर्यंत पोहोचविणारा पंथ म्हणून नाथ पंथाकडे पाहिले जाते. योगाची युक्ती सांगतो तो नाथपंथ !

सप्तधातु का काया पिंजरा । तामाहि ‘जुगति ‘ बिना सूवा ॥
सद्रुरू मिले त ऊबरे । नहि तो परले हुवा ॥

— गोरक्षनाथ

जीवाच्या पराधीनतेचे मुख्य कारण असलेल्या शरीराकडे सर्वप्रथम लक्ष जाते. माणसाची परवशता प्रकट करणारी शरीराची नश्वरताच आहे. म्हणून शरीर विचारापासून योगाचा आरंभ होणे स्वाभाविक आहे.

आरम्भ जोगी कथीला एक सार ।
क्षण क्षण जोगी करे शरीर विचार ॥

बर्‍याचश्या अध्यात्म मार्गामध्ये शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. त्याला शत्रुवत कष्ट दिले जातात. परंतू शरीर हे आमचे शत्रू नसून आत्म्याने आपल्या अभिव्यक्तिसाठी ते धारण केलेले असते. म्हणून आपल्या मूळ उद्देशाला विसरून आपण साधनालाच साध्य समजण्याची चूक करीत असतो. आणि आपला अमूल्य वेळ निद्रालस्यामध्ये घालवित असतो.

यह तन सांच सांच का घरवा ।
रूधिर पलट अमीरस भरवा ॥

— गोरक्षनाथ

म्हणूनच शरीराचा सदूपयोग करायला पाहिजे. जे केवळ त्याचे इंद्रियजन्य लाड पुरवितात ते आणि जे त्याला केवळ ताडनच करतात ते दोघेही शरीरावर अन्यायच करतात. त्याचा यथार्थ उपयोग जाणत व करीत नाहीत.

कंदर्प रूप कायाका मंडन । अविर्था काइ उलींचौ ।
गोरख कहे सुणी रे भोंदू । अरंड अभीतक सींचौ ॥

आत्मारूपी राजाचा हा शरीररूपी गड त्याच्या दुरूपयोगामुळे शत्रूरुपी काळाच्या हाती पडतो. म्हणून शरीररूपी हा गड काळरूप शत्रूच्या हातून सोडवून त्याचा जो स्वामी आत्मा त्याच्या स्वाधीन केल्यास त्याचा सदुपयोग होईल. काळाचा प्रभाव शरीरावर जरा आणि मृत्यूच्या रूपाने होतो. जरा, रोग, मृत्यूरहित होऊन काया सदैव बालस्वरुपच होईल तेव्हा ती काळाच्या जोखडातून मुक्त होईल. नाथपंथी योगी अशाच बालस्वरूप कायेच्या प्राप्तीकरीता सदैव प्रयत्नशील असतात. त्याच दृष्ठिने नाथपंथी साधक रसयोगातल्या रस,पारा इ. गोष्टींचा स्विकार करतात. त्यांना माहित होते की, मानवी शरीरातील ज्या रासायनिक परिवर्तनांमुळे जरा-रोग होतात त्यांचा प्रतिकार व प्रतिबंध रसायनांनी करता येतो. अर्थात हे पूर्ण सत्य नाही. रसायनांचा प्रभाव चिरकाल टिकत नाही. आणि म्हणूनच नाथ योग्यांनी रसायन चिकित्सेला सिध्दिमार्गात अनुपयुक्त आणि असमर्थ म्हटले आहे.

सोनै, रुपै सीझे काज । तो तक राजा छांडे राज ॥
जडीबूटी भूलै मत कोई । पहिली रांड बैद की होई ॥
जडीबूटी अमर जै करैं । तो वेद धनंतर काहे मरैं ॥

— गोरक्षनाथ

सदासर्वकाळ भलेही नसे, परंतू रसायनांनी काही काळाकरीता शरीर रोग व वार्धक्यापासून दूर ठेवता येते हा रसायनांचा गुण नाथपंथीयांनी लक्षात ठेवला होता. म्हणून यम नियमादि प्रारंभिक साधनांसोबतच कायाकल्पासारख्या विधीही योगाभ्यासात सांगितल्या आहेत.

अवधूत आहार तोडौ निद्रा मोडौ। कब हूं न होईबो रोगी ॥
छटे छे मासै काया पलटिवा । नाग पन्नग वनस्पति जोगी ॥

हेच कार्य नेति, धौति, बस्ति, नौलि इ.षट्क्रियांनीसुध्दा होते. कायाशुद्धीचे लक्षण असे सांगितले आहे की,

बडे बडे कुलहे मोटे मोटे पेट । नही रे पूता गुरू से भेट ॥
खड खड काया निरमल नेत। भरे पूता गुरू से भेट ॥

काळावर विजय मिळविण्याच्या इर्षेने फार प्राचीन काळापासून योगाभ्यासी पुरूष मानवी शरीरासंबंधी विचार करीत आहेत. त्यातूनच एका अती सूक्ष्म व विलक्षण अशा शरीर विज्ञानाचा उगम झाला. त्यामुळेच आपल्याला समजले की, मानवी शरीरात नऊ नाड्या, बहात्तर कोष, चौसष्ठ संधी, षटचक्र, षोडशाधार, दशवायू, कुंडलिनी इ. विराजमान आहेत.
सहस्त्रार चक्रातल्या गगन मंडलात एक भरलेला अमृतकुंभ उपडा ठेवलेला असून त्यातून निरंतर अमृत झरत असते. या अमृताचे पान करणारा योगी शरीर आणि निसर्गाच्या अनेक बाह्य तत्त्वांवर विजय मिळवू शकतो. मात्र सामान्य माणसाला याच अमृतपानाची युक्ति माहित नसल्यामुळे त्याचे हे अमृत मूलाधारस्थित सूर्यतत्त्वाकडून शोषून घेतले जाते.

गगनमंडल में औंधा कुंवा। तहाँ अमृत का बासा ॥
सगुरा होई सो भर भर पीया। निगुरा जाय पियासा ॥

— गोरक्षनाथ

या अमृततत्त्वाचा आस्वाद मिळण्यासाटी योग्यांच्या अनेक युक्तिंचा रहस्यभेद येथे केला आहे. पुरूष शरीरस्थित रेतही याच सूक्ष्म तत्त्वाचे व्यक्त रूप आहे. ब्रह्मचर्यावस्थेत बिंदू रक्षणाला इतके महत्त्व आहे की, बिंदूरक्षण म्हणजेच ब्रह्मचर्य अशी व्याख्या झाली. बिंदूनाशामुळे शरीरावर काळाचा प्रभाव लवकर पडतो व जरावस्था येते. म्हणूनच शरीराच्या दृढतेकरता बिंदू रक्षण फार महत्त्वाचे आहे.

बुन्दहि जोग बुन्दहि भोग। बुन्दहि हरे जे चौसटी रोग ॥
या बुन्दका जो जाणे मेव। सो आपै करता आपै देव ॥

स्त्री राज्यात रममाण झालेल्या आपल्या गुरू श्री मच्छिंद्रनाथांना उद्देशून गोरक्षनाथांनी म्हटले की,….

गुरूजी ऐसा कर्मन कि जै । ताथे अमी महारस छीजे ॥
नदी तीरे बिरखा, नारी संगे पुरूखा । अल्प जीवन की आसा ॥
मन थै उपजे काम, ताथै कंद विनासा। अमी महारस वाघिणि सोख्या ॥
आणि म्हणूनच बिंदू पातामुळे योगी अत्यंत दु:खी होतात.
राज गये कु राजा रोवै। वैद गये कु रोगी ॥
गये कंतकु रोवै कामिनी। बुंद गये कु जोगी ॥

ज्या एका बिंदू पातासाठी / पतनासाठी संसारी जगातले नर आणि नारी जीवाला ओढ लावून घेतात, त्याच बिंदूपातावर नियंत्रण ठेवून योगी लोक आपली सिध्दि साधतात.

एक बुंद नरनारी रीधा। ताही में सिध साधिक सीधा ॥

थोडक्यात, ज्याला बिंदू रक्षण करता येत नाही, त्याला आत्मदर्शन करता येत नाही, त्याचे आत्मपतन होते.

ज्ञान का छोटा, काछका लोहडा ।
इंद्रि का लडबडा जिव्हा का फूहडा।
गोरख कहे ते पारतिख चूहडा ॥

म्हणूनच योग्याला शरीर आणि मनाच्या चंचलतेला आवर घालण्यासाठी खाली उतरणाऱ्या (अधोगामी) रेताला निश्वयपूर्वक वर (उर्ध्वगामी) चढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योग्याने उर्ध्वरेता असावे. त्याची परीक्षा फार अवघड असते.

भगि मुखि बिंदू ।
अग्नि मुखि पारा ।
जो राखे सो गुरू हमारा ॥

सहस्त्रारास्थित अमृताचा आस्वाद घेण्याच्या अनेक युक्त्यांचा योग मार्गात उल्लेख आलेला आहे. उदा. विपरीत करणी मुद्रा, जालंदर बंध, टाळु मूळाकडे जीभ उलटी वळविणे, कुंडलिनी जागरण हे सर्व याचसाठी केले जाते. प्राणायाम सुध्दा याचसाठी केला जातो.

वायू बंध्या सकल जग। वायू किनहुँ न बंध।
वायू बिहूणा ढहि पडे। जोरे कोइ न संध ॥

श्वसन क्रियेशिवाय जर आपण जीवित राहू शकलो तरच आपण कालविजयी होऊ शकतो. म्हणूनच प्राण विजयाचं उद्दिष्ट ठेऊनच योगीजन प्राणायाम करत असतात. केवळ कुंभकातच श्वसन क्रिया एकदम थांबवता येते. त्यात पुरक आणि रेचकाची गरज नसते. ह्यामध्ये प्राण सुषुम्नेत सामावला जाऊन सूर्य व चंद्र नाडींचा संयोग होऊ शकतो. प्राणायामामुळे केवळ प्राणवायूच नव्हे तर सर्व दहाही वायु साधकाला वशा होऊ शाकतात. मात्र त्यासाठी शरीरातील सर्व वायुमार्ग बंद केले पाहिजेत. शरीराच्या रोमरोमात शेवट होणाऱ्या सर्व नाडीमुखांद्वारे वायुचे आवागमन चालू असते म्हणून काही योग पंथांमध्ये भस्मधारण आवश्यक असते. मात्र वायुच्या येण्याजाण्याचे नऊ मार्ग शरीरात असतात. या सर्व नऊ मार्गांना बंद केल्यानेच वायुभक्षण होऊ शकते असे नाथपंथी मानतात.

अवधूत नव घाटी रोकिले बाट। वायू वइनजे चौसटि हाट ॥
काया पलटे अविचल विध । छाया विवरजित निपजे सिध ॥
सास उसास वायुको मछिबा । रोकि लेऊ नव द्वार ॥
छटै छमासे काया पलटिया । तब उनमनि जोग अपार ॥

अश्या प्रकारे जेव्हा वायु शरीरात शांत होतो तेव्हा बिंदु स्थिर होऊन अमृतपान सुलभ होते आणि अनाहत नाद ऐकायला येऊ लागतो. पुढे क्रमाक्रमाने स्वयंप्रकाश आणि आत्मज्योतिचे दर्शन होऊ लागते.

अवधूत सहस्त्रनाडी पवन चलेगा । कोटि झमका नाद ॥
बहत्तर चंदा बाई संख्या । किरण प्रगटी जब आद ॥

योगसाधना म्हणजे केवळ शारीरिक साधन नसते.बहिर्मुख राहून योगसिध्दि प्राप्त होत नाही.त्यासाठी अंतर्मुख होणे नितांत गरजेचे आहे.म्हणून मन:शुद्धि आणि मन:समाधिला योगात फार महत्त्व आहे.या शुद्धि आणि समाधि प्राप्तीकरीता ठारीरशोधन आवरयक आहे.केवळ ठारीराला वा करून भागत नाही तर मनाला वश करणे फार महत्त्वाचे आहे.मनाच्या चंचलतेमुळे शरीरही चंचल होते आणि इंद्रियांना विषयांची ओढ लागते.म्हणून इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवण्यासाटी मनाला बाह्य पसार्‍यापासून आवरून आत्मतत्त्वाकडे वळविणे गरजेचे आहे.

गोरख बोले सुणहुरे अवधु । पंचौं पसर निवारी ॥
अपणी आत्मा आप बिचारो । सोवो पांव पसारी ॥

आत्मचिंतनाला सर्वाधिक सहाय्य करतो “अजपाजप”! श्वासोच्छ्वासाच्या क्रियेवर मन एकाग्र केल्याने फार उत्तम प्रकारे मनाचा निग्रह होतो. नाथयोग्यांची अशी धारणा आहे की, दिवसरात्र मिळून २१६०० श्वास होतात. यातत्या प्रत्येक श्वासावर “सोऽहं, हंसः” ही अद्वैत भावना करणे यालाच “अजपाजप” असे म्हणतात. यामागचा उद्देश असा आहे की – ब्रह्मभावनेशिवाय एकही क्षण वाया जावू नये. यासंबंधात कबीरजी म्हणतात, –

कबिरा माला काट की । बहुत यतन का फेर ॥
माला फेरो स्वांस की । जामे गांटि न मेर ॥
स्वांस सुफल को जानिये । हरि सुमरन मे जाय ॥
और स्वांस योंही गयो । तीन लोक का मोल ॥

योग्य व पुरेश्या अभ्यासानंतर गुप्तपणे व विनासायासच मनोमन अज्ञी भावना व्हायला लागते. इतकी की पुढेपुढे तर ब्रह्मभावनाच त्याची चेतना बनून जाते.

ऐसा जप जपो मन लाई । सोऽहं सोऽहं अजपा गाई ॥
आसन दृढ करि धरो धियान । अहनिसी सिमिरो ब्रह्मगियान ॥
नासा अग्र बीज जो बाई । इडा पिंगला मधि समाई ॥
छे सै संहस इकीसो जाप । अनहद उपजे आपो आप ॥
बंक नालि में ऊगे सूर । रोम रोम धुनि बाजै तूर ॥
उलटे कमल सहसदल वास । भ्रमर गुफा में ज्योति प्रकाश ॥

कबीर साहेब म्हणतात,-

सहजेही धुनि लगि रही । कहे कबीर घट मांहि ॥
हृदये हरि हरि होत है । मुख की हाजत नाहि ॥
रग रग बोले रामजी । रोम रोम रंकार ॥
सहजे ही धुनि होत है । सोही सुमिरन सार ॥
माला जपुं न कर जपु । मुख से कहूं न राम ॥
मन मेरा सुमिरन करे । कर पाया विसराम ॥

आणि असं म्हटलं गेलं आहे की,

घटहि रहिबा मन न जाई दूर । अहनिसी पीवै जोगी वारूणी सूर ॥

अश्या प्रकारे जेव्हा मनाची बहिर्मुख वृत्ती नष्ट होऊन साधक आत्ममग्न होतो तेव्हा तो मनाच्या पातळीहून उंच वर पोचतो. त्याला उन्मनी दशा प्राप्त होते आणि योगसाधनेद्वारा त्याला अनेकानेक सिध्यि प्राप्त होतात. तो इच्छारूप धारण करू शकतो. त्याला आत्मदेवाचे दर्शनही घडते.

काया गढ भीतर देव देहुरा कासी । सहज सुभाइ मिले अविनाशी ॥
परिचय जोगी उन्मन खेला । अहनिसि ईक्षा करे देवतासु मेला ॥

ही असते केवळ आत्म्याची परमात्म्याशी परिचयाची अवस्था. सर्वात शेवटी निष्पत्ति अवस्था असते ज्यात योग्याला समदृष्टी प्राप्त होते. त्याच्याकरता सर्व भेद नाहिसे होतात आणि सर्व तत्त्वे त्याच्या आज्ञेवर चालतात. ही सर्व भेदरहित अवस्था म्हणजेच अद्वैत अवस्था होय.
“गोरख सबद” नामक ग्रंथात निष्पत्ति प्राप्त म्हणजेच अद्वैतावस्था प्राप्त योग्याचं लक्षण असं सांगितलं आहे,

निषपति जोगी जाणिबा कैसा । अग्रि पाणी लोहा जैसा ॥
बजा परजा समकरि देख । थब जानिबा जोगी निसपति का भेख ॥

कालाचे संपूर्ण त्र्यैलोल्याकर अधिशासन असून तो समग्र प्राणीमात्रांना ललकारतांना म्हणतो की,

उभा मारूं बैठा मारूं । मारुं जागत सूता ॥
तीन लोक मग जाल पसार्‍या । कहा जायगो पूता ॥

काळाच्या या प्रश्‍नावर निष्पत्तिप्राप्त योग्याचे निर्भय उत्तर असते की,

ऊभा खंडो बैठा खंडो । खंडो जागत सूता ॥
तिहूं लोक मे रहूं निरंतर । तौ गोरख अवधूता ॥

योगयुक्तिची प्रामुख्याने दोन अंगे आहेत, पहिले “करणी” आणि दुसरे “राहणी”, वर सांगितलेले सर्व काही “करणी” म्हणजे क्रिया असून ती “राहणी”च्या मार्गानेच शक्य होते. नाथपंथाची राहणी ही मध्यममार्गी म्हटली जाते. जसे इंद्रियांचा दास होऊन राहण्याने साधना करणे शक्य नाही तसेच एकदम भौतिक गरजांकडे पाठ फिरवूनही योगसिद्धि होणे शक्यच नाही. म्हणूनच गोरक्षनाथजींनी उपदेश केला की,

देवकला तो संजम रहिबा । भूतकला आहारं ॥
मन पवन ले उन्मन घटिया । ते जोगी ततसारं ॥

भौतिक आणि आध्यात्मिक गरजांचा सम्यक योग साधून राहाणे हेच नाथयोग्यांच्या “राहणी”चं मुख्य सूत्र आहे. त्याशिवाय योगसिद्धि अशक्य आहे. या सम्यक राहणीअभावीच मग साधकाच्या जीवनात वस्ती आणि जंगल दोन्ही ठिकाणी काही तरी समस्या निर्माण होतात.

अबदु वन खंड जाऊं तो श्रुधा व्यापे । नगरी जाऊ त माया ॥
भरि-भरि खाऊं तो बिंद बियापै । क्यू सीझत डाल व्यंककी काया ॥
म्हणूनच या सर्व समस्या सोडविण्यासाटी उपदेश केला गेला आहे की,
खाये भी मरिये अणखाये भी मरिये । गोरख कहे पूता संजमिही तरिये ॥
धाये न खाईबा, पडे भूखे न मरिबा । हटन करिबा,पडे न रहिबा ॥
यूँ बोल्या गोरखदेव

श्री गुरू महाराजांचेही सांगणे असेच होते की,धाप लागेतो खाऊ पिऊ नये आणि गाढ झोपेच्या आधिन होऊ इतके विश्रांतीसुख घेऊ नये. तसेच व्यर्थ बडबड ठरेल इतके बोलू नये.
कबीरजी म्हणतात की,

अति का भला न बोलना, अति की भली न चूप
अति का भला न बरसना, अति की भली न धूप

योगसाधनेत मनाच्या समतोल स्थितीला फार महत्त्व आहे. या योगेच साधक मध्यममार्गी राहून शरीराच्या किमान गरजाच फक्त पूर्ण करतो आणि मनाला वश करू शकतो. त्यामुळे संयम पालन होते आणि मनाच्या वशीकरणानेच योग साध्य होतो, मनाच्या आहारी जाऊन नाही. मनाचे सामर्थ्य अगाध आहे. जे मन माणसाला चौऱ्यांशीच्या फेर्‍यात टाकते तेच मन माणसाला वश झाले तर त्याच फेऱ्यातून कायमचे बाहेरही काढते.

यहू मन सकती यहू मन सीव, यहू मन पंचतत्वका जीव
यहू मन लै जो उन्मन रहे, तो तीन लोक की बाते कहे

॥ आदेश ॥

 

श्री शीलनाथ महाराजांचे चरित्र आणि त्यांची गुरु-शिष्य परंपरा – येथे पहा.

श्री शीलनाथ महाराजांची आरती – येथे पहा.

 

— लेखन, संकलन, संपादन – सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
                                                      संपर्क – ९४२३९ ६४६७३

 

 

नाथपंथीय साधना आणि साधनेची ओळख Read More »

श्री शीलनाथ महाराज

श्री शीलनाथ महाराज चरित्र आणि त्यांची गुरु-शिष्य परंपरा

॥ योगिराज श्री शीलनाथ महाराज ॥

 

श्री शीलनाथ महाराज
श्री शीलनाथ महाराज

सूरत तो जाती रही, कीरत कबहुं न जाय ।
कीरत को सुमिरण करे, रखिये हिरदे मांय ॥
नादानुसंधान ! नमोऽस्तु तुभ्यं, त्वां साधनं तत्व पदस्य जाने ।
भवत्प्रसादात् पवनेन साकं, विलीयते विष्णुपदे मनो मे ॥

अर्थ : हे नादानुसंधान ! आपणास नमस्कार असो. आपण परब्रम्ह प्राप्तीचे साधन आहात हे मी जाणतो. आपल्या कृपेने वाऱ्याच्या झुळुकेसरशी माझे मन विष्णुपदी लीन होवो.

अनाहते चेतसि सावधानैरभ्यासशूरैरनुभूयमाना ।
सास्तंभितश्वास मन: प्रचारा सा जृम्भते केवल कुंभक श्री: ॥

अर्थ : हृदयाकाशात निर्माण होणाऱ्या अनाहत नादाकडेच ज्या योग्यांचे लक्ष लागून राहिलेले असते त्या निष्णात योगाभ्यासी पुरुषांच्या असे लक्षात येते की, प्राणांचे श्वासोश्वास व मनाचे व्यापार बंद पडतात आणि केवळ कुंभकाची आत्म समाधीरूप संपत्तीच तेवढी साधकाजवळ शिल्लक राहते.

तत: साधन निर्मुक्त: सिद्धो भवति योगिराट ।
तत्स्वरूपं न चैकस्य विषयो मनसो गिराम अपरोक्षा अनुर्भूति ॥

अर्थ : त्यानंतर मग ते योगिराज सर्व साधनांपासून बंधमुक्त होऊन सिद्धच होऊन जातात. हेच त्यांचे ब्रम्ह स्वरूप आहे. ही स्थिती कोणाच्या मन वा वाणीचा विषय होऊच शकत नाही.

अगदी तंतोतंत याच प्रकारची साधना श्री शीलनाथ महाराजांची होती.

तस्य पुत्रो महायोगी सम दृङ् क निर्विकल्पक: ।
एकांतमतिरुन्निदो गूढो गूढो इवेयते ॥

स्वत: श्री महाराजांचे असे सांगणे होते की साधकाच्या जीवनात त्याची जातपात, लिंग, वय, इ, गोष्टी गौण असतात. ज्या प्रमाणे तलवारीचे मोल तिच्या म्यानावरून नव्हे तर तिच्या धारेवरून ठरते त्याचप्रमाणे साधूची योग्यता त्याच्या ज्ञानावरून ठरत असते, त्याच्या बाह्य रंग रुपावरून नाही. महाराजांना अगदी ८-९ वर्षांच्या बाल्यावस्थेपासूनच अरण्यातील एकांत सेवनाचा ध्यानाचा छंद लागला होता व अनाहत नाद श्रवणासारख्या इतर साधकांना अति परिश्रमाने व कठोर साधनेने सुद्धा क्वचितच प्राप्त होणाऱ्या सिद्धीचा लाभ होऊ लागला होता. त्या नादाच्या अलौकिक व रसमधूर श्रवणानंदात या बालयोग्याला तृषाक्षुधादि देहधर्मांचे देखील भान राहत नसे.
अनाहतनादाची रसमधुरता जसजशी वाढत गेली, तसतशी महाराजांची शरीरकांतीही बदलत गेली. डोळ्यांमध्ये दैवी झाक उमटू लागली आणि सगळे शरीर उत्साहीत होऊ लागले.

तदा तदहमीशस्य भक्तानां शममीप्सित: ।
अनुग्रहं मन्यमान: प्रातिष्ठं दिशमुत्तराम् ॥

ज्याप्रमाणे नारद मुनींनी आपल्या आईच्या स्वर्गवासानंतर स्वत:ची या संसार पाशातून मुक्तता झाल्याचे समजून मोक्षाच्या मार्गाकडे प्रस्थान केले. श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी मातेच्या अंतिम संस्कारानंतर संसारी जगाकडे पाठ फिरवून मोक्ष साधनेकडे लक्ष केंद्रित केले, त्याचप्रमाणे श्री नाथजींनीसुद्धा मातेच्या कैलासगमनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी खंडेली गावातून गृहत्याग करून झाशीजवळील सुलतानपूर नामक गावातील “रामके जोगीयोंका आखाडा” या स्थानी येऊन तेथील तत्कालीन महंत श्री इलायचीनाथजींकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली व कर्णच्छेद करून घेऊन साधू झालेत. म्हणून येथे श्री गुरु घराण्याचा परंपरेसह इतिहास थोडक्यात देत आहे.
उज्जैनच्या माधव कॉलेजमध्ये शिकत असतांना श्री नाथजींच्या दर्शनास अधूनमधून येणाऱ्या गुरुबंधू बाबू रामलाल पंजाबी यांना एकदा ते घरच्यांच्या अपरोक्ष आले असता श्री नाथजींनी सदर हकीकत सांगितली व म्हणाले की अशा प्रकारे साधूसंतांच्या दर्शनाला जाण्याने आपली मुलंसुद्धा साधूच बनून जाण्याची भिती वाटत असते. परंतु त्यांना माहित नसते साधू होणे इतके सोपे नसते. खरी साधूता प्राप्त करणे व ती शेवटपर्यन्त निभावता येणे हे फार क्वचित कोणाला साधते. साधूता म्हणजे श्वासागणिक मनाशी संघर्ष करणे व ही गोष्ट क्षणाक्षणाला मरण्याइतकीच कठीण आहे. संसारात कठीणातील कठीण कामही सुगम होऊ शकते पण मनाचा स्वभाव बदलणे अती अवघड आहे. मनाने सत्संग स्विकारलेल्यास संसार व स्वर्ग दोन्ही तुच्छ असतात. तो पूर्ण निर्भय होतो. तो शरीराबद्दलही निरपेक्ष होतो. संसारी जीवांचे वा घरच्यांचे ऐकून चालणारास साधूत्वात प्रवेश करणेच शक्य नसते.

श्री गुरु घराण्याचा इतिहास

श्री गुरु घराण्याचा इतिहास सतराव्या शतकापासून सुरू होतो. या गुरु घराण्यात मोठे मोठे त्यागी, तपस्वी आणि परम निस्पृह असे सिद्ध पुरुष, त्यांचे शिष्य – प्रशिष्य व त्यांच्या शाखा – प्रशाखा काश्मीर, पंजाब, सिंध, राजपुताना व संयुक्त प्रांत आणि इतकेच नव्हे तर सीमा प्रांत, अफगाणिस्तान, क्वेटा येथपर्यंत फैलावल्या होत्या. जेथे जेथे गुरु घराण्याचे सिद्ध पुरुष होऊन गेले तेथे तेथे त्यांनी सनातन धर्माचा झेंडा सन्मानपूर्वक फडकावला. केवळ सामान्य जनच नाही तर स्थानिक राजे महाराजे सुद्धा त्यांच्या त्याग, तपस्या, आणि निस्पृहतेने प्रभावित होऊन त्यांच्याकडे आकर्षित झाले व त्यांचे भक्त म्हणवून घेण्यात स्वत:ला धन्य मानू लागले.

श्री अक्षरनाथजी महाराज

सुलतानपूर आखाड्याचे मूळ गुरुस्थान बिकानेर राज्यांतर्गत नोहर तालुक्यात नोहर येथे आहे. येथे नाथ संप्रदायाचा योगाश्रम राजा अनुपसिंगजी यांच्या काळापासून इ. स. १६८४ पासून आहे.
इ. स. १७४६ ते १७८६ असा जीवनकाळ असलेल्या राजा गजसिंगजी या बिकानेर नरेशाच्या काळात श्री अक्षरनाथजी महाराज हे नोहर योगाश्रमाचे अधिपती होते. हे महासिद्ध पुरुष संवत १८४४ म्हणजे इ. स. १७८७ मध्ये समाधिस्थ झाले. त्यांचे दोन शिष्य श्री देवीनाथजी महाराज आणि श्री धुनीनाथजी महाराज हे होते.

श्री देवीनाथजी महाराज

१७८६ साली राजा गजसिंगाच्या मृत्यूनंतर झालेल्या राज्यक्रांतीनंतर श्री देवीनाथजी महाराज नोहर योगाश्रमाचा त्याग करून पचोपा येथे जाऊन राहिले. नोहर योगाश्रमाच्या लाखो रुपयांच्या संपत्तीकडे देवीनाथजींनी पाठ न फिरवण्याबद्दल पचोपा येथे त्यांच्या सेवेत असणार्‍या १८ शिष्यांकडून विनंती करण्यात आली तेव्हा निस्पृह वृत्तीच्या महाराजांनी शिष्यांना उपदेश केला की –

गुरु के दरबार मे। कमी काहु की नाहि॥
बंदा मौज न पावहि। चूक चाकरी नाहि॥

जेव्हा तुम्ही परमात्मारूपी सूर्याकडे पाहून चालाल (परमात्म्याला सन्मुख जाल) तेव्हा लक्ष्मी तुमच्या मागे मागे येईल (लक्ष्मी सदैव तुमच्या पाठीशी राहील) आणि तुम्ही आत्मसूर्याकडे पाठ फिरवाल तेव्हा लक्ष्मीने तुमच्याकडे पाठ फिरवलेली असेल. म्हणून एका परमात्म्याशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. एका झाडाखाली दुसरे झाड कधीच वाढू शकत नाही म्हणून तुम्ही सर्व आता माझ्यापासून दूर जा. गुरूंच्या या उपदेशाने पश्चातापदग्ध झालेले ते सर्व शिष्य देवीनाथजींचा आशीर्वाद घेऊन तीव्र तपस्येला निघून गेले. पुढे या सर्व सिद्ध साधकांच्या शिष्य शाखा-प्रशाखा काश्मिर, पंजाब, सिंध, राजपूताना, सीमा प्रांत, अफगाणिस्तान, क्वेटा, चमन इ. पर्यन्त फैलावल्या. गुरुबंधू लेहेरनाथजी महाराज या शाखांपैकी दिल्ली, आग्रा, लाहोर, हनुमानगढ, शिरसा, सिसा, मायापूर, शहापूर, वमेठा, आदि स्थानांना जाऊन आलेत. श्री देवीनाथजी महाराज संवत १८६६ (इ. स. १८०९) मध्ये आषाढ (गुरु) पौर्णिमेला समाधिस्थ झाले.

श्री अमृतनाथजी महाराज

श्री गुरू देवीनाथजींच्या १८ शिष्यांपैकी श्री अमृतनाथजी हे गुरूंच्या आज्ञेनुसारइ.स. १८०३ मध्ये जोधपूर येथे राजा भीमसिंह याच्या राज्यात गेले. सन १८०४ मध्ये राजा भीमसिंहाच्या मृत्यूनंतर राजा मानसिंहने सन १८०७ मध्ये पाच गावांची सनद ‘महा-मंदिर’ आखाड्याला दिली. तेथील एका निपुत्रिक जाठ भक्ताला महाराजांच्या कृपेने ७ पुत्र झालेत म्हणून त्याने श्री देवीनाथजी महाराजांना विनंती केली की अमृतनाथजी महाराज त्याच्या कुवांरी गावाजवळ राहावे. त्यानुसार श्री देवीनाथजींच्या आदेशाप्रमाणे श्री अमृतनाथजी महाराज कुवांरी गावासमीप त्यावेळच्या निबीड जंगलात व आताच्या सुलतानपूर गावात धुनी रमवित राहिले. जाटाच्या ७ पुत्रांपैकी थोरल्या पराक्रमी ‘सुलतान’ नामक पुत्राच्या नावावरून सुलतानपूर नाव पडलेले हे गाव दिल्लीपासून सुमारे २० मैल लांब आहे. राजा मानसिंह सन १८०४ ते १८४३ पर्यंत राज्यावर होता. आपल्या अंतिम दिवसात या गुरूसेवानुरागी राजाने राज्यत्याग करून मडोर येथे योगसाधनेत काळ घालविला,त्या काळात ‘नाथ चरित्र’ आणि ‘विद्वज्जन मनोरंजिनी’ हे संस्कृत ग्रंथ प्रसिध्द केले. श्री अमृतनाथजी महाराज संवत १८७७ (सन १८२०) मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी समाधिस्थ झाले.

श्री चतरनाथजी महाराज

श्री अमृतनाथजींच्या श्री चेतनाथजी नामक संवत १८८० मध्ये समाधिस्थ झालेल्या शिष्यांचे २ शिष्य होते. यापैकी एक श्री चतरनाथजी आणि दुसरे श्री ग्याननाथजी. या २ शिष्यांपैकी श्री ग्याननाथजी सुलतानपूर योगाश्रमाची व्यवस्था पाहात असत. श्री चतरनाथजी हे अत्यंत सरल स्वभावी, एकांर्ताप्रेय व योगाभ्यासी होते. सं. १८८५ मध्ये बनारसहून संस्कृतविद्या प्राप्त केलेला एक युवक जोधपूरला आपल्या घरी परत जातांना वाटेत श्री चतरनाथजींच्या तपोबल व योगबलाने प्रभावित होऊन नाथ संप्रदायाची दीक्षा त्याला देण्याविषयी विनंती करू लागला. संपूर्ण १ वर्षभर त्याच्या वैराग्यभावनेची कसोटी पाहिल्यानंतर सं. १८८६ मध्ये महाराजांनी त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन त्याचे नांव ठेवले इलायचीनाथ. श्री इलायचीनाथजींची गुरूसेवेसह योगसाधना सुरू असतांना सं. १८९१ मध्ये श्री ग्याननाथजी महाराज समाधिस्थ झाले. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात सं. १८९३ मध्ये श्री चतरनाथजी महाराजांनीही देहत्याग केला. जेव्हा श्री शीलनाथ महाराज खंडेली गावाहून सुलतानपूरला आले त्यावेळी श्री इलायचीनाथजी सुलतानपूर योगाश्रमाचे महंत होते.
श्री चतरनाथजींचे दोन शिष्य होते- श्री इलायचीनाथजी आणि श्री मौजनाथजी. श्री मौजनाथजींच्या शिष्योपशिष्यांचा अनुकम असा :- १. श्री हरनाथजी, २. श्री गिरधारीनाथजी, ३. श्री द्वारकानाथजी, ४. श्री शांतीनाथजी, ५. श्री योगी शंकरनाथजी.
श्री इलायचीनाथजींचे शिष्य श्री योगेंद्र शीलनाथ महाराज, तपोनिधी, श्री मल्हार धूनी, देवास हे असून त्यांचे शिष्य – १. श्री बालकनाथजी, २. श्री अमरनाथजी, ३. श्री अडबंगनाथजी, ४. श्री ज्ञाननाथजी. पुढे श्री बालकनाथजींचे
आकाशनाथजी, सुरजनाथजी आणि अमरनाथजींचे शिष्य लेहरनाथजी हे झालेत.

योगेंद्र श्री शीलनाथजी महाराज

दीक्षा ग्रहण

गुरू को कीजे दंडवत। कोटि कोटि परनाम।
कीट नजाने भृंग को। यों गुरू करि आप समान ॥ १॥
गर्भयोश्वर गुरू बिना। लागे हरि की सेव।
कहे कबीर वैकुंटते। फेर दिया शुक देव ॥ २॥

— कबीर साहेब

जीवनात सामान्य कामे करतांनादेखील अनुभवी व जाणकार मार्गदर्शकाची गरज भासते. कार्य कठीण असेल तर त्यातील जाणकाराजवळ राहून, त्यांची विनयपूर्वक सेवा करून व प्रसन्नता संपादन करून ईप्सित साध्य करून घ्यावे लागते. अध्यात्मात तर पावलोपावली जिथे पथभ्रष्ट होण्याचा धोका आहे तिथे गुरुची आवश्यकता अनिवार्य आहे. म्हणूनच प्रत्येक साधकाला अनुभवी गुरूला शरण जाऊन त्यांच्या संप्रदायाची दिक्षा घेणे नितांत गरजेचे असते. बाल शीलनाथजी खंडेली गावाहून सुलतानपूरच्या ‘रामाच्या जोगीयांच्या” आखाड्यात येण्याचे कारणही हेच होते की तेथे त्यांना अनुभवी गुरूंकडून नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त व्हावी.
संवत १८९३ (इ.स. १८६३) मध्ये श्री इलायचीनाथ महाराज सुलतानपूर योगाश्रमाच्या गुरूणादीवर विराजमान होते. बनारसच्या विद्यापीटांमधून त्यांनी अनेक दर्शन शास्त्रांचा अभ्यास करून ते पंडीत झालेले होतेच. शिवाय प्रापंचिक व्यवहारांपासून अलिप्त राहाण्याच्या हेतूने त्यानी तारूण्यावस्थेतच योगदीक्षा घेतलेली होती. स्वभावाने कांत, वृत्तीने उदार व निरभिमानी असे हे महाराज दिसायला गोरेपान होते. सातत्याने चालत असलेल्या त्यांच्या विद्याध्ययन आणि लेखन कार्यामुळे लोक त्यांना पंडीत योगी असेही म्हणत. त्या योगाश्रमात आजसुद्धा महाराजांचा फार मोठा संस्कृत व भाषा ग्रंथ संग्रह सुरक्षित आहे. साधु संत व महात्मे जसे महाराजांशी सत्संग करण्यासाटी सदैव येत असत त्याचप्रमाणे जयपूर, जोधपूर, उदयपूर, बिकानेर, नाभा, अलवर इ. ठिकाणांहून महाराजांशी शास्त्रचर्चा करण्यासाटी गाढे शास्त्री पंडीतही येत असत. अगदी अहंकार भावनेने प्रेरीत होऊन महाराजांशी वादविवाद करण्यासाठी आलेले लोकदेखील महाराजांच प्रेमपूर्ण आदरसत्कार व मधूर विनयशील व्यवहार अनुभवून निरभिमान होऊन महाराजांच्या चरणांशी श्रध्देने नतमस्तक होत असत. राजा आणि रंक दोघे महाराजांना सारखेच होते. वृध्दावस्था व इतर कठिण परिस्थितीतही महाराज नियमपालनात अती तत्पर व सावध असत.
श्री इलायचीनाथजी महाराजांच्या वेळी सुलतानपूर योगाश्रम संपन्न अवस्थेत होता. आश्रमाची व्यवस्था व देखभाल करण्यात विद्यार्थीवर्ग तत्पर होता.
संवत १८५९६ (इ.स. १८३६) मध्ये एके दिवशी एक शामवर्ण व अजानुबाहू क्षत्रिय बालक आश्रमात महाराजांसमोर येऊन दीक्षा देण्याविषयी त्यांना विनंती करू लागला. “बाळा, तू कोठून आलास?” या महाराजांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्या बालकाने दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. “या प्रश्‍नाच्या उत्तरासाठीच तर मी सारखा भटकत आहे. या जगात आम्ही कोठून आलोत आणि पुढे कोठे जावयाचे आहे हेच तर मला कळत नाही. त्यासाठीच तर मी जेथे होतो, तेथून तुमच्याजवळ आलो आहे. आपण मला दीक्षा देऊन उपकृत करा.” यावर श्री इलायचीनाथजींनी त्यांना समजाविले की – “दीक्षा देण्यायोग्य वयातच दीक्षा देता येईल. त्याकरता १-२ वर्षे येथे राहून साधुसेवा करा. त्यात तुमचे आचरण योग्य सिध्द झाले तर दीक्षा देण्याचा विचार करू.” परंतू चित्तात एकीकडे वैराग्याचा बहर आणि दुसरीकडे मनात घरच्यांकहून परत घरी बोलावले जाण्याची भिती यामुळे बाल शीलनाथांना दीक्षा घेण्याचे तीव्र वेध लागले होते. केवळ त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी म्हणून महाराज म्हणाले की – “सध्या आमच्या आश्रमात कोणी कान फाडून देणारे नाही. येथून जवळच एका गावात एक कान फाडून देणारे आहेत, त्यांच्याकडे जा आणि आमच्या नावाने कान फाडून घ्या.”
असीम त्याग आणि वैराग्य भावनेने प्रेरीत झालेल्या बाल शीलनाथांनी तत्काळ त्या गावाकडे कूच केली आणि अखेर शेवटी कान फाडून देणार्‍या त्या नाथांना भेटून सगळा वृत्तांत सांगितला. त्या नाथांनाही अशी काही प्रेरणा झाले की, त्यांनी तत्क्षणी महाराजांच्या कानांना चिरा लावून दिल्यात. रक्तबंबाळ कानांनी महाराज उलट्यापावली त्याच सायंकाळी सुलतानपूरला श्री इलायचीनाथजींसमोर येऊन हजर झाले. त्यांना अश्या अवस्थेत पाहून महाराज स्तिमितच झाले. ते म्हणाले – “बाळा, मी केवळ तुला निरुत्साहीत करून या गोष्टीपासून दूर करण्याच्या हेतूने तसे म्हणालो. कान फाडून घेण्याच्या कल्पनेने तू घाबरून मागे हटावास आणि दीक्षा ग्रहणाचा विचार सोडून द्यावास याकरता तसे म्हणालो होतो. परंतू आता तुला कान फाडून घेतलेल्या अवस्थेत समोर पाहून माझी खात्रीच झाली आहे की, एक दिवस तूसुध्दा प्रात:स्मरणीय गोरक्षनाथजींसारखाच महान योगी होशील!”, त्यानंतर श्री इलायचीनाथजींनी त्यांना यथाविधी दीक्षा देऊन कर्णकुंडलं दिलीत आणि त्यांचे नामकरणही केले – श्री शीलनाथ !
नाथ संप्रदायात कान फाडून घेण्याला गूढ महत्त्व आहे. सुश्रुत संहितेच्या चिकित्सास्थानातील अध्याय १९ मधील श्लोक क्र २१ नुसार कर्णछेदनाने अंत्रवृध्दि व अंडवृध्दिचे विकार होत नाहीत. शिवाय यामुळे योगसाधनेतही सहाय्य होते असा काही साधकांचा विश्वास आहे. या फाडलेल्या कानात शिंगांची मोठमोठी कुंडले असतात आणि ती नाथ संप्रदायाची एक खूण आहे. त्याचप्रमाणे नाथसंप्रदायात गळ्यात एक लोकरीचा वळलेला दोरा घालतात, त्याला सैली असे म्हणतात. या सैलीत शिंगापासून तयार केलेली एक छोटीशी शिट्टी असते, तिला “नाद” किंवा “शृंगीनाद” असे म्हणतात. नादानुसंधान किंवा प्रणवाभ्यासाचे ते प्रतीक असते.
नव्याने कान फाडून घेतलेल्या योग्याला “नवनाथ” असे म्हणतात आणि त्यांची सेवा करणे अतिशय पवित्र कार्य मानतात. नवनाथाच्या शरीरात रक्ताची पूर्तता व वाढ व्हावी म्हणून त्याला शिरा, जिलेबी इ. पौष्टिक आहार देतात. रक्ताने माखलेल्या कानांसह आलेल्या बाल शिलनाथांना पाहून आश्रमातल्या एका वृध्द योग्याला त्यांची करूणा आली. त्यांनी स्वतः त्या बालयोग्याला आपल्या जागेवर नेऊन त्यांना स्नान घातले, मीठाच्या गरम पाण्याने त्यांचे अंग शेकले. त्यांच्याकरता हलवा करण्याची तयारी केली. मात्र बालयोग्यांनी कोणत्याही परिस्थितीत हलवा खाणार नाही, सुकी भाकरीच खाईन असा आपला निग्रह सांगितला व तसेच केलेसुध्दा. कोरड्या शुष्क आहाराने कानांना इजा होऊन ते खराब होण्याची भिती ही त्यांच्या निग्रहापुढे टिकू शकली नाही. केवळ सात-आठ दिवसातच त्यांचे कान सुकून स्वच्छ व निर्मळ झालेले पाहून आश्रमातील सर्वच साधूंना फार विस्मय वाटले व त्या वृध्द योग्याने म्हटले की, या बालयोग्याची गोष्टच काही वेगळी आहे.

देशोदेशी भ्रमण

इथे आश्रमाच्या नियमानुसार दुसर्‍या एका शिष्याने महाराजांना गोसेवेचे आणि गोठा सफाईचे काम करण्यास सांगितले. पण महाराजांनी त्या गोष्टीला ठाम नकार दिला. ते म्हणाले की, आत्तापर्यंत संसारशेणाचे टोपले डोक्यावर होते ते भिरकाऊन सत्याच्या शोधासाठी इथे आलो. इथेही शेणपाट्या उचलणे मला मंजूर नाही. शिष्याने सांगितले की, इथे राहावयाचे तर ही कामे करावीच लागतील. त्यावर श्री शीलनाथजी आपल्या गुरू श्री इलायचीनाथजींकडे गेले व त्यांना प्रार्थनापूर्वक म्हणाले की, मी देश-विदेश भ्रमंती करू इच्छितो. कृपया मला परवानगी व आपले आशीर्वाद द्यावे. आणि संवत १८९६ (इ.स. १८३६) मध्ये आपल्या गुरू महाराजांची अनुमती घेऊन महाराज सुलतानपूर सोडून देशपर्यटनाला बाहेर पडले.

महापुरूष प्राप्ती

कबिरा वन वन मे फिरा। कारण अपने राम।
राम सरीखा जिन मिले। तिन सारे सब काम॥ १॥
शूरा सोई सराहिये। अंग न पहिरे लोह।
जूँझै सब बंद खोलिके। छांडे तन का मोह ॥ २॥
चित चोखा मन निर्मला। बुध्दि उत्तम मतिधीर।
सो धोखा नहि विरहि ही। सदुरू मिले कबीर ॥ ३॥

— कबीर साहेब

केवळ एक लंगोटी लेवून महाराज गुरुगृहातून निघाले मात्र अजूनही कच्चेच असलेले त्यांचे कान त्यांच्या मनात अनेक शंकांचे काहूर उठवित होते. क्षत्रिय असल्यामुळे भूक लागल्यास कोणाकडे भिक्षा मागण्याचा संकोच. शिवाय ऊन-वारा-पाऊस- थंडी या सर्वांना कसे तोंड देणार ही चिंता. घनदाट अरण्यात विहार करतांना कोणा हिंस्त्र श्वापदाचे आपण भक्ष तर होणार नाही ना ही काळजी मन पोखरते असे. गुरूकडून आपण पूर्ण योगसिध्दी प्राप्त न करताच योगमार्गावर वाटचाल सुरू केली ही गोष्ट महाराजांच्या मनाला टोचत असे. गोरक्षनाथादि महात्मे जे काही करून गेले ते केवळ प्रत्यक्ष शंकराचे अवतार असल्यानेच. आजच्या सामान्य माणसाचे हे काम नाही व योगमार्ग वाटतो तितका सोपा नाही ही गोष्ट महाराजांच्या मनाला खिन्न व निरुत्साही करीत असे. एकिकडे हा मनोव्यापार चालू असतांना दुसरीकडे पूर्वजन्म संस्कारांचे बळ त्यांच्या मनाला प्रकाश दाखवून धैर्य देत असे की,अश्या प्रकारे उद्विग्नमनस्क होण्याचे कारण नाही…..

हंसा सोता क्या करे । क्यों नहीं देखे जाग ॥
जाके संगती बीछुडा । ताहि के संग लाग ॥

या वचनानुसार स्वयंप्राप्त साधनावर दृढ निष्टापूर्वक चालत राहिल्यास उत्तरोत्तर ज्ञानवृध्दि होईलच असा विश्वास त्यांच्या मनात जागृत होत असे.

लेना हो सो लेय ले । कही सुनी मत मान ॥
कही सुनी जुग जुग चली । आवागमन बंधान ॥

या पवित्र वचनानुसार लोकोक्तिवर विचार करता कामा नये. पुरूषार्थ केल्यास एक सामान्य मनुष्यसुध्दा तपस्या व परिश्रमाने आपल्या स्वरूपात लीन होऊ शकतो. परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात शरीराचा मोह न ठेवता फक्त एका परमात्म्याचेच चिंतन करीत राहीले पाहिजे. श्री गुरू गोरक्षनाथ अजर-अमर असूनही शरीराची नश्वरता टाळू शकले नाहीत मग मी तरी या देहाची चिंता का वहावी? अवतारी पुरूषांनादेखील शरीर सोडावे लागले. म्हणून चुकूनही या शरीराची चिंता न करता शांतिपूर्वक मन:संयम राखावा, हेच उत्तम! मनःसंयमानेच सर्व मार्ग सुलभ होतील अशा मानसिक दंद्वावस्थेत फिरत असतांनासुध्दा महाराजांनी स्वतःशी निश्चय केला की, कधीच कोणाजवळ भिक्षा मागायची नाही. कोणत्याही संसारी वस्तूचा मोह धरायचा नाही. याकरताच महाराज सदैव मनुष्य वस्तीपासून दूर जंगलात निवास करीत असत. दैववशात एकदा त्याच जंगलात दुसरे एक नाथसंप्रदायी साधु आले. ते वस्त्रधारी होते. दोघात परस्परांना पाहाता येईल इतके अंतर होते. थंडीचा कडाका तीव्र होता. रात्री त्या साधुंनी आपल्या सेवकामार्फत पूर्णपणे उघड्याने झोपलेल्या महाराजांच्या अंगावर हलकेच एक कांबळे पांघरून दिले, मात्र झोप मोडताच महाराजांच्या लक्षात आले की आपल्या अंगावर कोणी पांघरूण घातले आहे. तत्काळ महाराजांनी ते अंगावरून दूर केले आणि प्रातःकाळ होताच ते कांबळ दुसऱ्या कोणाला देऊन टाकले.
सकाळी ही गोष्ट त्या साधुपुरूषास कळली तेव्हा महाराजांच्या या निस्पृहता व दृढनिश्वयावर ते अत्यंत प्रसन्न झाले व म्हणाले की, “साधुने कधीच कोणाकडून कसली अपेक्षा करू नये व आपल्या स्वतःला असे घडवले पाहिजे की जगाने त्याच्याकडे याचना करावी. तुमच्यासारखी वैराग्यवृत्ती, त्याग व तितिक्षा मी क्वचितच कोणामध्ये पाहिली. रात्री सर्वत्र निर्मनुष्य झाल्यावर तुम्ही माझ्याकडे येत जा. मी तुम्हाला योगशिक्षेच्या सर्वथा पात्र समजतो. मी तुम्हाला योगसाधनेत मार्गदर्शन करेन.”
योगसाधनेच्या मार्गदर्शनासाटी शिष्याची पात्रता पुढील वचनानुसार पाहिली जाते.

हलके पतले को नहि दीजे । कहे शकदेव गुसाई ॥
चरणदास, रागी, बैरागी । ताही देहुँ गहि बाई ॥

त्या दिवसापासून महाराज रोज मध्यरात्री त्या साधुपुरूषाजवळ जाऊ लागले, ते आपल्याला सदाचार, सद्वचन, आणि योगसाधनेत मार्गदर्शन करू लागले. जेव्हा त्यांच्याकडून महाराजांना सर्व काही सांगून झाले तेव्हा ते म्हणाले की, “मी केलेल्या मार्गदर्शनावर सतत दृढतापूर्वक स्थिर राहिल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या योग सिद्धी प्राप्त होतील. पण, कधीही त्यात गुरफटून घेऊ नका. आपल्या मनालाच आपला शत्रू व मित्र समजून क्षणोक्षणी त्यावर लक्ष ठेवा. मन क्षीण झाल्यावरच योगसिद्धीचा खरा आनंद मिळेल. योगानंदासारखा आनंद त्रैलोक्यात दुसरा कोणताही नाही. साधनामार्गात नाना प्रकारची विघ्नेही येतील. पण माझ्या वचनांवर दृढ राहिलात तर तीही दूर होतील. माणसाला सुधारणारे वा बिघडविणारे या जगात केवळ एक त्याचे मनच आहे. तुम्ही स्वतः चतुर आहात. ही अमुल्य योगसिध्दी उत्तम प्रकारे प्राप्त करा. या गुह्य विद्येला कधीही कलंकित होऊ देऊ नका. महापुरूषांच्या वचनांपासून कधीही दूर जाऊ नका. भलेही शरीर त्याग करा पण कधीही संसारी जीवनाची आसक्ती ठेवू नका.”
असे अनेक दिवस महाराज त्या साधुपुरूषांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्यापासून अलग होण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्या महात्म्याने महाराजांना धुनी तपविण्याचे रहस्य व महात्म्य विधीपूर्वक समजाविले. धुनीमध्ये अखंड अग्री ठेवण्याची पध्दत आणि अंतिम सिध्दीसुध्दा त्यांनी महाराजांना दाखविली आणि सांगितले की, “तपोबलच सर्व सृष्टिचा आधार आहे.”

तपबल रचहि प्रपंच विधाता । तपबल विष्णू सकल जग त्राता ॥
तपबल शंभु करहिं संहारा। तपबल शेष धरहिं महिभारा ॥

नाथ संप्रदायात धुनी रमविण्याला फार महत्त्व आहे. तुम्ही धुनीला जगत्पूज्य बनवा. व्यसनपूर्तीचे ठिकाण तिला होऊ देऊ नका. सतत धूनीचे रक्षण करा. धुनीमुळे होणारे लाभ संत लोक असे सांगतात.

अकेला आप रहे धूनी पर। दूजा और न कोई ॥
कहे कबीर अलमस्त फकीरी। आप निरंजन होई ॥

या संवादानंतर ते साधुमहाराज मौन झाले आणि महाराज त्यांच्या चरणी आदेश म्हणून तेथून मार्गस्थ झाले.

 

श्री शीलनाथ महाराज यांची गुरु – शिष्य परंपरा

श्री शीलनाथ महाराज गुरु शिष्य परंपरा
श्री शीलनाथ महाराज –  गुरु-शिष्य परंपरा

श्री शीलनाथ महाराजांची आरती – येथे पहा.

॥ आदेश ॥

 

— लेखन, संकलन, संपादन – सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
                                               संपर्क – ९४२३९ ६४६७३

श्री शीलनाथ महाराज चरित्र आणि त्यांची गुरु-शिष्य परंपरा Read More »

श्री हनुमान

श्री हनुमान वडवानल स्तोत्र

श्री हनुमान वडवानल स्तोत्र

विनियोग

ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिः,
श्रीहनुमान् वडवानल देवता, ह्रां बीजम्, ह्रीं शक्तिं, सौं कीलकं,
मम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थे, सर्व-शत्रुक्षयार्थे
सकल-राज-कुल-संमोहनार्थे, मम समस्त-रोग-प्रशमनार्थम्
आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं
श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।

ध्यान
मनोजवं मारुत-तुल्य-वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानर-यूथ-मुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ॥

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम
सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय
वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र
उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र
अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार
सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद
सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख
निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन
भूत-ज्वर-एकाहिक-ज्वर, द्वयाहिक-ज्वर, त्र्याहिक-ज्वर
चातुर्थिक-ज्वर, संताप-ज्वर, विषम-ज्वर, ताप-ज्वर,
माहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस
भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां
ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं
ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां
शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर
आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय
शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय
प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।

ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन
परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु
शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय
नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान्
यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते
राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र
पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय
नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।
॥ इति बिभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं संपूर्णम् ॥

श्री हनुमान वडवानल स्तोत्र Read More »

वसंत पंचमी

वसंत पंचमी

वसंत पंचमी

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतात. हा उत्सव देवी सरस्वतीच्या उपासकांमध्ये फार प्रसिद्ध आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीदेवीची पूजा केली जाते. तीदेखील गणरायाप्रमाणे ज्ञान व बुद्धीची देवता आहे.

धर्मशास्त्रानुसार या दिवसापासूनच वसंत उत्सवाला आरंभ होतो. हा उत्सव शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. आयुष्यात ज्ञानाशिवाय कोणत्याही विषयात यश प्राप्त करणे अवघड आहे. वेद आणि शास्त्रातही ज्ञानार्जनाला पर्याय नाही, असे म्हटले आहे. ज्ञानामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची क्षमता असते. सध्याचे स्पर्धात्मक युग पाहता ज्ञानी माणूसच त्या चढाओढीत टिकाव धरू शकेल.वसंत पंचमीचा उत्सव ज्ञान-विज्ञानाचा पुरस्कार करणारा उत्सव आहे. पूर्वी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शिक्षणाचा श्रीगणेशा केला जात असे. आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांना वसंत पंचमी आणि या दिवसाचे महत्व माहीत नाही. भारतीय परंपरेनुसार याच दिवशी देवी सरस्वतीचा अवतार अवतीर्ण झाला. तसेच हा दिवस अन्य शुभ कार्यांसाठीदेखील अनुकूल मानला जातो.

दसऱ्याच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे वह्या पुस्तकांची, वाद्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे वसंत पंचमीलादेखील ही पूजा केली जाते. ही पूजा करत असताना पुढील श्लोक व मंत्रांचे पठण करावे.

देवी शारदेचा वरदहस्त ज्याला लाभला, त्याच्यावर आपोआपच लक्ष्मी मातेचीही कृपा होते. म्हणून केवळ लक्ष्मीमागे न धावता, सरस्वतीची उपासना करूया आणि सरस्वतीच्या पूजनाने वसंत पंचमी साजरी करूया.

 

---  शारदा-मंत्र  ---

ॐ शारदे वरदे शुभ्रे ललितादिभिरन्विते।

वीणा-पुस्तक-हस्ताब्जे जिह्वाग्रे मम तिष्ठतु ॥

 

-- वैदिक मंत्र ---

ॐ पावका न: सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती।

    यज्ञम् वष्टु धिया वसु: ॥    ऋग्वेद १/३/१०

ॐ चोदयित्री सुनृतानां चेतन्ती सुमतीनाम्।

     यज्ञम् दधे  सरस्वती॥  ऋग्वेद १/३/११

ॐ अम्बितमे नदीतमे देवीतमे सरस्वती।

    अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि॥ १/४१/१६

महर्षि आश्वलायन कृत स्तोत्र

ॐ चतुर्मुख-मुखाम्भोज-वनहंस-वधूर्मम।

     मानसे रमतां नित्यं सर्वशुक्ला सरस्वती॥

ॐ नमस्ते शारदे देवि काश्मीर-पुर- वासिनी।

     त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे॥

ॐ अक्षसूत्र-धरा पाश- पुस्तक- धारिणी।

     मुक्ताहार-समायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा।

ॐ कम्बुकण्ठी सुताम्रोष्ठी सर्वाभरणभूषिता।

     महासरस्वती देवी जिह्वाग्रे संनिविश्यताम्।

ॐ या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा।

    भक्तजिह्वाग्र-सदना शमादि-गुणदायिनी॥

ॐ नमामि यामिनीनाथ लेखालंकृत - कुन्तलाम्।

     भवानीं भव- संताप -निर्वापण -सुधानदीम्॥

 

--- सरस्वती - स्तोत्र ---

या कुन्देन्दु-तुषार-हार-धवला या शुभ्रवस्त्रावृता

        या वीणा वर दण्ड मंडित करा या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता

       सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥

शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनी

       वीणा पुस्तक धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्।

हस्ते स्फाटिक मालिकां च दधतीम् पद्मासने संस्थितां

       वन्दे  तां  परमेश्वरीं  भगवतीं  बुद्धिप्रदां  शारदाम्॥

सरस्वति  महाभागे  विद्ये  कमल-लोचने।

विद्यारूपे विशालाक्षि विद्यां देहि नमोस्तुते॥

🙏🌹🙏

लेखन, संकलन, संपादन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

वसंत पंचमी Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०७

अध्याय – ०७

गोकर्ण महिमा – मित्रसह राजाची कथा, चांडाळ स्त्रीचा उद्धार

॥ श्रीगणेशाय नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी ।
निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥
समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥
ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥

नामधारक सिद्धांना म्हणाला, “मला गोकर्णमहात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला? अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णक्षेत्री कोणत्या कारणासाठी गेले? या गोकर्णमहाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली? त्याविषयी एखादी पुराणकथा मला सांगा.” नामधारकाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले, “ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमाहात्म्य ऐकण्याची इच्छा होते. या विषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो. एकाग्रचित्ताने ऐक.”

 

पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी ।
प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥

पूर्वी इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. प्रतापवंत क्षत्रिय असा तो राजा सकलशास्त्रपारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी आणि विवेकी होता.

 

असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी ।
प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥
निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत ।
भेटला तेथे अद्‌भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥
राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥
होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी ।
पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥
प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर ।
जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥
ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥
रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे ।
सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥
सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी ।
कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥
समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि ।
राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥

एकदा मित्रसह राजा शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ-सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, "तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे." असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राजाच्या सेवक वर्गात प्रवेश मिळविला. तो अतिशय सेवा तत्परतेने वागून तेथेच सोबत राहू लागला. राजा बरेच दिवस वनात राहून शिकार पूर्ण, दृष्ट जीवांचा वध करून मग आपल्या नगरात परतला.

 

ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी ।
आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥
ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक ।
कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥
राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी ।
जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥
अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥
ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी ।
पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥
वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी ।
त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥
शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी ।
अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥
नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला ।
वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥
उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तव राजपत्‍नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥
पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी ।
वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥
मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥
शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी ।
कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥

राजासह त्या मनुष्यरूपी दैत्याने राजवाड्यात प्रवेश केला. तेथे त्याने आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचाऱ्याचे काम मिळवले.
एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचाऱ्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते. त्याने श्राद्धाच्या अन्नात कपट भावनेने गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले; ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, "राजा, तुझा धिक्कार असो! तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस? या तुझ्या पापकर्माबद्दल 'तू ब्रह्मराक्षस होशील' असा मी तुला शाप देतो."
ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण त्याला यातले काहीच माहित नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, "ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात, या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो." असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले, तेव्हा त्याच्या पत्नीने-मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, "नाथ, स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करून नका. आता त्यांचे पाय धरून उ:शाप मागा. यातच तुमचे भले आहे." मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव 'कल्माषपाद' असे झाले व तो ब्रम्हराक्षस झाला.

 

राजपत्‍नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥

मदयंतीराणी वसिष्ठांच्या पाया पडून विणवणीपूर्वक म्हणाली, "ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा.त्यांना उ:शाप द्या." यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, "राजा, हा शाप तू बारा वर्षे भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील." असा उ:शाप देऊन वसिष्ठ निघून गेले. ब्रम्हराक्षस झालेला राजा ही मग वनात निघून गेला.

 

निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात ।
भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥
ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी ।
ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥
येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥
अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी ।
राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥
न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति ।
मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥
पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी ।
पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥
पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी ।
याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥
कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥
ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा ।
बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥

वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. एके दिवशी तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. वाघ जशी आपली शिकार पकडतो, त्याप्रमाणे त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, "कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारून मला विधवा करू नकोस. माझ्या पतीला जीवनदान दे. माझ्या पतीचे भक्षण करू नकोस, माझे त्याच्यावर अतिशय प्रेम आहे. पतिविना स्त्रीचा जन्म म्हणजे दगडापरी होय. तू प्रथम माझे प्राण हरण कर, पण माझ्या पतीला जीवनदान दे. माझे पती वेदशास्त्रसंपन्न आहेत, तू जर त्यांना जीवनदान दिलेस तर तुलाच पुण्य मिळेल. आमच्यावर कृपया कर, आम्हाला सोड. आम्हाला पुढे संतती झाली तरी ती आम्ही तुझ्याच नावाने वाढवू." असे तिने अनेकवेळा विनविले. पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले.

 

पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी ।
म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥
तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥
परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे ।
अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥
शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी ।
काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥

राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, "अरे दुरात्म्या, तू राक्षस नाहीस. शापित आहेस. अरे, तू तर अयोध्येचा राजा आहेस, परंतु शापामुळे राक्षस झालास. तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू १२ वर्षानी शापमुक्त होऊन राजा बनून जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल." मग तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा करून, चिता पेटविली. स्वत: अग्निप्रवेश करून सती गेली.

 

ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका ।
पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥
विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण ।
म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥
मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी ।
वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥

होता होता बारा वर्षे संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. परंतु त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बैचेन झाला. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाने सगळी हकीगत तिला सांगितली. सर्व ऐकून दुखा:ने राणी म्हणाली – “तुम्ही आधीच १२ वर्षे वनात कष्टाने घालवली आहेत, आता तर तुमच्या वंशाला संतानही नाही. आपल्या कर्माची फळे चुकार नाहीत.”

 

ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन ।
अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी ।
ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥
मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात ।
तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥
करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार ।
सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥
ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥
ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत ।
अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥

पत्नीचे बोलणे ऐकून राजा अतिशय दु:खी झाला, डोळ्यात अश्रू दाटले, आता काय करावे या विचाराने अस्वस्थ झाला. राजाने व राणीने आपल्या अनुभवी मंत्री, पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या ब्रम्ह हत्येच्या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण पापक्षालन होईना, ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना. त्यामुळे राजा अधिकाधिक बैचेन व अस्वस्थ होऊ लागला.

 

कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी ।
हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥
नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी ।
चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥
ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥
राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी ।
नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥
आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज ।
चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥
प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक ।
सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥
शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष ।
व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥
आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी ।
महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥

अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. अतिशय दु:खी, कष्टी, चिंताग्रस्त असा तो राजा, अतिशय थकून एक वृक्षाखाली बसून विसावा घेत होता. तेवढ्यात तेथे गौतम ऋषींचे आगमन झाले. राजाने त्यांच्या पाया पडून भक्ती भावाने त्यांना वंदन केले. ऋषींनी त्याला आश्वस्त करून अत्यंत करुणेने “तुझे राज्य कोणते, तुझ्या या वनवासाचे प्रयोजन काय, तू इतका चिंतक्रांत का” असे त्याचे क्षेम कुशल विचारले.
राजाने स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, “मुनीवर्य, हे सगळे असे आहे. या पातकाच्या प्रायश्चितासाठी मी अनेक तीर्थक्षेत्री भेट दिली, अनेक यज्ञ याग, धर्म कर्मे केली, परंतु या महा दोषाचे अजून शमन झाले नाही. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा.”
राजाने अशी विनंती केली असती गौतमऋषी त्याला समजावीत म्हणाले, "राजा, घाबरू नकोस. कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.”
आणि गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगायला सुरवात केली.

 

स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥
जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर ।
निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥
जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि ।
चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥
तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे ।
सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥
सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी ।
प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥
रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥
भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि ।
फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥
जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥
जाणा तो साक्षात्‌ ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्‍गण ॥७५॥
चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक ।
प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत ।
दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥
वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी ।
प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥

गोकर्ण महाक्षेत्र महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्णक्षेत्रात असलेल्या भगवान शंकराचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो. तेथे भगवान महादेव स्वत: निवास करतात. ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश असला तरी रात्रीच्या अंधाराचा सूर्याशिवाय नाश होत नाही त्याचप्रमाणे इतर कितीही तीर्थक्षेत्रे असली तरी गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापक्षय होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. यापेक्षा अजून वेगळे काय सांगावे? साक्षात भगवान विष्णूच्या सांगण्यावरून श्रीगणेशाने भगवान महादेवाच्या आत्मलिंगाची या क्षेत्री स्थापना केली आहे. या पुण्य क्षेत्री ब्रह्मा विष्णू इंद्रासहीत समस्त देव गण निकस करतात. चंद्र सूर्य पूर्व दिशेला निवास करतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, ११ रुद्र, पितृ दैवत दक्षिणेस निवास करतात. पश्चिम दिशेला वरुण देवसहित गंगा आहे. उत्तर दिशेला कुबेर, वायुदेव, भद्रकाली, मातृ देवता, चंडी यांचा निवास आहे.

 

चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी ।
पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥
कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥
मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी ।
सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥
त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥
नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी ।
सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥
स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥
जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥

चित्ररथ, चित्रसेन आदि गंधर्व येथे नित्य निवास करतात. रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी, आदि अप्सरा इथे सदैव नृत्य करतात. वशिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, जैमिनी, जबाल, आदी समस्त ऋषी गण इथे नित्य पूजा अर्चना करतात. मरीची, नारद, अत्री, दक्ष, ब्रह्म ऋषी, सनकादी महात्मे, अनेक सिद्ध साधू, मुनीगण, संन्यासी, ब्रह्मचारी, ई तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात. गंधर्व, पितर, अष्ट वसव, किन्नर, शेष, पिशाच्च, वेताळ, ई नियमितपणे गोकर्ण महाबळेश्वराची पूजा करतात. या तीर्थक्षेत्री सर्व मनोकामना त्वरीत पूर्ण होतात. या ब्रह्मांडात गोकर्ण महाबळेश्वरसारखे दुसरे स्थान नाही.

 

अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी ।
नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥
रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी ।
वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी ।
वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥
धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण ।
पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥

अगस्ती ऋषी, प्रियव्रत, अग्निदेव, दानव, आदी सर्व येथे असतात. शिशुमार, भद्रकाली येथे त्रिकाल पूजा करतात. महाबळेश्वर दर्शनाने गरुडसुद्धा नागाची शिकार करू शकत नाही. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, ई राक्षस गणही वर प्राप्त करण्यासाठी महाबळेश्वराची उपासना करतात. अशाप्रकारे समस्त देव, दानव, सिद्ध गण गोकर्ण क्षेत्री विविध प्रकारे महाबळेश्वराची आराधना करतात. ब्रह्मा, विष्णू, कार्तिकेय , श्री गणेश स्वत: येथे निवास करतात. असे हे गोकर्ण महाक्षेत्र एकमेकाद्वितीय अनुपम असे आहे.

 

सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥
कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित ।
द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥
सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥
पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी ।
ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥
ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट्‍ पापे ।
दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती ।
अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥
तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥
एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी ।
पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥
आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी ।
स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥
शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित्‍ करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥
व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी ।
महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥
काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा ।
ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥
असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी ।
बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥
ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता ।
शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥
उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥
स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥

गौतम ऋषी म्हणाले – “हे राजा, या ब्रह्माण्डात गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात हे शिवलिंग श्वेतवर्णी असते. त्रेतायुगात लोहवर्णी (तांबूस), द्वापारयुगात ते सुवर्णवर्णी आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते. या शिवलिंगाचा अधोभाग खूप गोल आहे, तो सप्तपाताळापर्यंत गेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्महत्या, पर-स्त्री, दु:शील, दुराचार आदी सर्व पापांचा नाश करते. तेथे शुभ दिवशी आराधना करणारे पुनीत होतात, समस्त कार्य साधून रुद्ररूप अंतिम सद्गतीला प्राप्त होतात. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमवास्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे होते. व्यतिपाद, संक्रांत, महा-प्रदोश, त्रयोदशी, या दिवाशीची आराधना अपर पुण्य देते. माघ महिन्यातील शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्णक्षेत्र हे श्रेष्ठ माहात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा मार्ग होय. अशा या तीर्थक्षेत्राची यात्रा करणाऱ्यांना चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.”

 

ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी ।
पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥
विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥

अशाप्रकारे गौतऋषींनी मित्रसह राजाला गोकर्णतीर्थक्षेत्राचे माहात्म्य सांगितले असता त्याने विचारले, “ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्णमाहात्म्य मला सांगितले, त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? किंवा आपण प्रत्यक्ष काही पहिले असेल तर, त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा.” राजाने असे विचारले असता गौतमऋषी म्हणाले, “हे राजा, गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री असे अनेक अनुभव पहिले आहेत, तेच मी आता सांगतो, एकचित्ताने ऐक.”

 

गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥
माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी ।
कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥
कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा ।
दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥
चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥
विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी ।
क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥
प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी ।
शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्‍वांग धरूनिया ॥२८॥
टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी ।
किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥
विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥
ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन ।
पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥

गौतम ऋषी म्हणाले – “मी एकदा तीर्थ यात्रेसाठी म्हणून गोकर्णक्षेत्री गेलो होतो, तिथे अनेक भाविक आले होते. मध्यान्हवेळी आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी तिथे अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती, उपासमारीने शुष्क दिसत होती. तिच्या सर्वांगाला झालेल्या जखमांमध्ये कृमी पडलेले होते, जखमांतून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते. ती विधवा होती. तिने केशवपन केले होते. तहानभुकेने ती कासावीस झालेली होती, दंत वेदानांमुळे विव्हळत होती. तिला धड चालताही येत नव्हते. अतिशय मरणासन्न अशा अवस्थेत ती त्या वृक्षाच्या सावलीत येउन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला.
अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून चार शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान होते. त्यांच्या हातात त्रिशूळासारखी शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले," आपण येथे कशासाठी आला आहात?" ते म्हणाले, "आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत." ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. “हे राजा, हे एकचित्ताने ऐक.”

 

ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी ।
नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥
या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥
नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥
पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥
अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥
शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान ।
यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥
न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥
या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥
अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥
ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी ।
योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी ।
त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥

आम्ही त्या देवदूतांना विचारले, "अहो दूतांनो, तुम्ही या महापापी चांडाळणीला विमानातून शिवलोकाला कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का? या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दया-माया दाखविली नाही. हिने नेहमीच जीव हत्या केली आहे, हिचे भोजनच मुळी पशू मांस आहे, अशा दृष्ट पापीणीला तुम्ही शिवलोकाला कसे काय नेता? हिने आयुष्यात कधीही जपतप केलेले नाही. कधीही शिवस्मरण-पूजन केले नाही. हिने कधी शिवरात्रीचा उपवास केला नाही. कधी यज्ञ याग, दान धर्म, तीर्थयात्रा, व्रत केले नाही. तरी अशा पापी दुराचारिणी महारोगी चांडाळणीला तुम्ही शिवलोकांत नेने कदापि योग्य नाही. तुम्ही का असे करत आहात?" आम्ही असे विचारले असता शिवदूत तिचा पूर्व वृतान्त सांगितला.

 

म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार ।
सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण ।
सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥
अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी ।
न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥
न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥
वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख ।
पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता ।
पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥
अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी ।
चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥
गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी ।
प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥
आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी ।
विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥
ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥
तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी ।
त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥
तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥

देवदूत म्हणाले – “हे ऋषीवर, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो, ती ऐका. ही चांडाळीण पूर्वजन्मी सौदामिनी नावाची ऐतक्षे रूपवान ब्राह्मणकन्या होती. तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पतीच मिळेना. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना मोठी काळजी वाटू लागली.शेवटी गुह्य सूत्रात सांगितलेल्या विधिप्रमाणे एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, परंतु ती घरी जास्त काळ थांबत नसे. तिचे हे वर्तन पाहून तिचा पती अतिशय दु:खी झाला आणि त्यातच त्याला मरण आले. सौदामिनीला तिच्या आई-वडिलांनी घरी परत आणले. ती दिसावयास सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते, त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छापून जारकर्म करू लागली. तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आई-वडिलांनीही तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. मग ती सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शुद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिमा फासला.”

 

श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥
टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥
शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पु
त्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी ।
होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥
वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी ।
छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥
छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी ।
शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥
आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी ।
वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥
वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश ।
घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥
अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥
जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका ।
भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥
ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी ।
पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥

खरोखर, कामवासनेने स्त्रीचा अधःपात होतो, हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो, ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे.
सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली, दुराचारिणी झाली.
एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले. स्वतः ही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तर तिथे वासरू नव्हते. त्या ऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पहिले तो शिंक्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे, कातडी पुरून टाकली व 'वाघाने वासरू पळवून नेले' असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली. तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली.
काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले.

 

घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥
उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥
उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा ।
बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥
ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥
सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥
येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी ।
क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥
न मिळे तिसी वस्त्र अन्न ।
दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥
भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥

पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री-पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते. देशो देशीचे राजे हत्ती रथ आदी लवाजम्यासह गोकर्ण दर्शनाला आले होते. लोक नाचत होते. गात होते. शिवनामाची गर्जना करीत जात होते. ती चांडाळीणही इतर भिकाऱ्यांसोबत रडत, ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता.अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून 'धर्म करा, धर्म करा' असे दीनपणे म्हणत होती; पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीण गोकर्णक्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्यामुळे त्या चांडाळीणला कोणीही खायला काहीही देत नव्हते, त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. ती उपासमारीने गलीतगात्र होऊन रस्त्यातच पडली.

 

पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥
हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी ।
आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥
कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥
इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी ।
तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥
येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी ।
तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे ।
चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी ।
पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥
पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥
तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे ।
हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत ।
दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥

एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बेलपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बेलपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम-घोषाचे श्रवण व अजाणतेपणे रात्री एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळीणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले.
आधीच महारोगी, त्यात उपवासाने अशक्त, अशी ती अंध म्हातारी हळुवारपणे दुसऱ्या दिवशी उठली. सकाळचे सूर्यकिरण ही असह्य झाल्याने ती आश्रयासाठी या वृक्षाखाली आली, आणि त्वरीत प्राण निघून जावे म्हणून याचना करू लागली. भगवान शंकरांनीच तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे." इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृतसिंचन केले. त्यामुळे तिला दिव्यदेह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकांस घेऊन गेले.

 

ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन ।
रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥
जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति ।
संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥
परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन ।
त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥
ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू ।
श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ ओवीसंख्या ॥२१०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

त्या चांडाळीणीची कथा सांगून गौतमऋषी मित्रसह राजाला म्हणाले, "राजा, तूसुद्धा गोकर्णक्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील." गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्णक्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला.
इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले.
हा सरस्वती गंगाधर संपूर्ण गुरुचरित्र सविस्तर सांगत आहे, सर्व श्रोत्यांनी एक चित्ताने श्रवण करा.
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गोकर्ण महिमा' नावाचा अध्याय सातवा समाप्त.
॥ ओवीसंख्या॥२१०॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

 

श्री गुरुचरित्र – अध्याय ०७ Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०६

अध्याय – ०६

गोकर्ण महिमा – महाबळेश्वर लिंग स्थापना

 

॥ श्री गणेशाय नमः॥
नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी ।
प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥
त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण ।
विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥
तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि प्रीति करी ।
कैसा पावला दत्तात्री । अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ॥३॥

नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, “स्वामी, अज्ञानरुपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात. तुम्ही मला गुरुपीठही साद्यंत सांगितलेत. आता मला सांगा, श्रीदत्तप्रभूंनी श्रीपादश्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला.ते तीर्थयात्रेला का गेले ? इतर अनेक तीर्थक्षेत्रे असतांना ते गोकर्णालाच का गेले?”

 

ऐक शिष्या शिखामणी । तुवा पुशिले जे का प्रश्नी ।
संतोष जाला अंतःकरणी । सांगेन चरित्र श्रीगुरूंचे ॥४॥
विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । नामधारक प्रीतिकारे ॥५॥
ऐकोनि नामधारकाचे वचन । संतोषले सिद्धाचे मन ।
सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥६॥
तुजकरिता आम्हासी । लाभ झाला असे मानसी ।
गुरुचरित्र सांगावयासी । उत्कंठा मानसी होय ते ॥७॥

नामधारकाने असे विणवणीपूर्वक निवेदन ऐकून सिद्धयोगी म्हणाले, "तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगतो.”

 

म्हणे त्रैमूर्ति अवतरोन । तीर्थे हिंडे केवी आपण ।
विशेष पावला गोकर्ण । म्हणोनि पुससी आम्हाते ॥८॥
दत्तात्रेय आप्ण । तीर्थे हिंडे तयाचे कारण ।
भक्तजनाहितार्थ दीक्षेस्तव जाण । उपदेश करावया ॥९॥
विशेष तीर्थ आपुले स्थान । गोकर्णी शंकर असे जाण ।
याच कारणे निर्गुण । त्रैंमूर्ति वसती तया ठाया ॥१०॥
गोकर्णीचे माहात्म्य । सांगतसे अनुपम्य ।
एकचित्त करूनि नेम । ऐक शिष्या नामधारका ॥११॥

नामधरकाने विचारले – “दत्तात्रेयांनी अवताररूपात कुठल्या उद्देशाने तीर्थयात्रा केल्या? ते गोकर्णालाच का गेले?” सिद्ध मुनींनी सांगितले – “दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून, त्यांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य थोर आहे. ते भगवान शंकरांचे जागृत स्थान आहे. मी आता ते महात्म्य सांगतो, एक चित्ताने ऐक.”

 

त्या तीर्थाचे आदि अंती । सांगेन तुम्हां विस्तृती ।
जे पूर्वी वर लाधले असती । अपूर्व असे ऐकता ॥१२॥
महाबळेश्वरलिंग देखा । स्वयंभू शिव असे ऐका ।
आख्यान त्याचे ऐका । लंबोदरे प्रतिष्ठले ते ॥१३॥
शिष्य म्हणे सिद्धासी । तीर्थमहिमा वानिसी ।
विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी । विस्तारोनि सांग मज ॥१४॥
ऐसे शिष्य विनवीत । ऐकोनि बहु संतोषत ।
निरोपित आद्यंत । महाबळेश्वरचरित्र ॥१५॥

“गोकर्ण क्षेत्री 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली. ती कथा मोठी अद्भुत आहे.” सिद्धमुनींनी असे सांगितले असता, “ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा.” अशी नामधारकाने विनंती केली. प्रसन्न झालेल्या सिद्धांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली.

 

पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या । नाम तियेचे कैकया ।
ईश्वरभक्ति अतिप्रिया । शिवपूजा सर्वकाळ ॥१६॥
नित्य करी शिवपूजन । पूजेवीण न घे अन्न ।
ऐसे करिता एक दिन । न मिळे लिंग पूजेसी ॥१७॥
व्रतभंग होईल म्हणोनि । मृत्तिकालिंग करूनि ।
पूजी अति संतोषोनि । भक्तिपुर्वक अवधारा ॥१८॥
तिचा पुत्र अतिक्रूर । नाम तया दशशिर ।
आला तेथे वेगवत्तर । मातृदर्शन करावया ॥१९॥
नमिता झाला मातेसी । पुसे पूजा काय करिसी ।
माता सांगे विस्तारेसी । लिंग पूजिले मृत्तिकेचे ॥२०॥
रावण म्हणे जननीसी । माझी माता तू म्हणविसी ।
मृतिकेचे लिंग पूजेसी । अभाग्य आपुले म्हणतसे ॥२१॥
मागुती म्हणे तियेसी । पूजिता फळ काय यासी ।
कैकया सांगे पुत्रासी । कैलासपद पाविजे ॥२२॥
रावण म्हणे मातेसी । कैलास आणुनी तुजपासी ।
देईन हे निश्चयेसी । सायास का वो करित्येसी ॥२३॥
ऐसे बोले तो रावण । मातेसवे करी पण ।
आणीन त्वरित उमारमण । कैलासासहित लंकेसी ॥२४॥
पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी । मृत्तिकालिंग का करिसी ।
म्हणोनि निघाला त्वरितेसी । मनोवेगे निशाचर ॥२५॥

पुलस्त्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते.त्यांच्या पत्नीचे नाव, कैससी. ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्नसेवन करत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिकाशिवलिंग करून तिने त्याची भक्तीभावाने पूजा सुरु केली. याचवेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिकाशिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका-शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे?" कैससी म्हणाली, "या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते." हे ऐकताच रावण म्हणाला, "मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल." असे वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला.

 

पावला त्वरे शिवपुरासी । शुभ्र रम्य पर्वतासी ।
धरोनि हालवीक्रोधेसी । वीस बाहु भुजाबळे ॥२६॥
आंदोळले कैलासभुवन । उपटीतसे तो रावण ।
दाही शिरे टेकून । उचलीन म्हणे उल्हासे ॥२७॥
शिर लावून पर्वतासी । कर टेकून मांडीसी ।
उचलिता झाला प्राणेसी । सप्तपाताळ आंदोळले ॥२८॥
फणा चुकवी शेष आपण । कूर्म भ्याला कांपोन ।
भयचकित देवगण । अमरपुर कांपतसे ॥२९॥
कंप झाला स्वर्गभुवन । सत्यलोक विष्णुभुवन ।
येरू पडतसे गडबडोन । म्हणती प्रळय मांडला ॥३०॥

कैलासाला पोहोचताच, शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागले. रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्तपाताळे डळमळू लागली. सप्तस्वर्गात हल्लाकल्लोळ मजला. शेषनाग फणा चुकवू लागला. कूर्म भीतीने थरथरू लागला. स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक, वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले.

 

कैलासपुरीचे देवगण । भयाभीत झाले कंपायमान ।
भयाभीत गिरिजा आप । होऊनि गेली शिवापासी ॥३१॥
पार्वती विनवी शिवासी । काय झाले कैलासासी ।
आंदोळतसे सभेसी । पडो पहात निर्धारे ॥३२॥
नगरात झाला आकान्त । बैसलेती तुम्ही स्वस्थ ।
करा प्रतिकार त्वरित । म्हणोनि चरणां लागली ॥३३॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । न करी चिंता मानसी ।
रावण माझा भक्त परियेसी । खेळतसे भक्तीने ॥३४॥
ऐसे वचन ऐकोनि । विनवी गिरिजा नमोनि ।
रक्ष रक्ष शूलपाणी । समस्त देवगणाते ॥३५॥

कैलास लोकातले समस्त देवगण भयभीत झाले. घाबरलेली पार्वती शंकराची विनवणी करत म्हणाली. “स्वामी, आपल्या कैलासाचे काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सगळे शिवगण घाबरले आहेत. आता स्वस्थ बसू नका.काहीतरी इलाज करा.” भगवान शंकर म्हणाले, “तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे.” शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही, आणि पार्वतीने रक्षणाची विनंती केली.

 

ऐकोनि उमेची विनंती । शंकरे चेपिला वामहस्ती ।
दाही शिरे भुजांसहिती । दडपलासे गिरीच्या तळी ॥३६॥
चिंता करी मनी बहुत । शिव शिव ऐसे उच्चारित ।
ध्यातसे स्तोत्र करीत । शरणागता रक्ष म्हणोनि ॥३७॥
त्राहि त्राहि पिनाकपाणी । जगद्रक्षकशिरोमणी ।
शरण आलो तुझे चरणी । मरण कैचे भक्तासी ॥३८॥
शंकर भोळा चक्रवर्ती । ऐकोनि त्याची विनंती ।
चेपिले होते वामहस्ती । काढिले त्वरित कृपेने ॥३९॥
सुटला तेथूनि लंकेश्वर । स्तोत्र करीतसे अपार ।
स्वशिरे छदोनि परिकरे । तंतु लाविले निज अंत्रे ॥४०॥
वेद सहस्त्र एकवचनी । वर्णक्रमादि विस्तारोनि ।
सामवेद अतिगायनी । समस्त रागे गातसे ॥४१॥
गण रसस्वरयुक्त । गायन करि लंकानाथ ।
तयांची नामे विख्यात । सांगेन ऐका एकचित्ते ॥४२॥

पार्वतीची विनवणी ऐकून मग भगवान शंकरांनी आपल्या डाव्या हाताने कैलास शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण कैलास पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात आपल्या दहाही मस्तकांसह दाबला गेला. त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो की मरतो असे त्याला झाले. त्याने शिवनामाचा घोष सुरु केला. रावणाने अत्यंत भक्तीनें शिवस्तवन करीत, "हे जगत् रक्षणकर्ता पिनाकपाणि महादेवा, मला वाचवा! वाचवा! मी आपणास शरण आलो आहे!" अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भार त्वरीत काढून घेतला. रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने आता शंकरांचे स्तवन सुरु केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे बनवून मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले. त्याने सर्व-प्रथम सामवेदगायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले.
इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धमुनींनी नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले.

 

आठही गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ ।
मगण ब्राह्मण प्रख्यात । नगण क्षत्री विशेष ॥४३॥
भगण वैश्य ध्यानेसी । तगण शूद्रवर्णेसी ।
जगण दैत्य परियेसी । रगण प्रत्यक्ष च्यूतगुणे ॥४४॥
सगण तुरंगरूपेसी । यगण शुद्ध परियेसी ।
विस्तारित गायनेसी । लंकापति रावण ॥४५॥
गायन करीत नवरसेसी । नांवे सांगेन परियेसी ।
शांत भयानक अद्‌भुतेसी । शृंगार हास्य करुणरसे ॥४६॥
रौद्र वीर बीभत्सेसी । गायन करी अति उल्हासी ।
वेणू वाजवी सप्तस्वरेसी । ध्यानपूर्वक विधीने ॥४७॥
जंबुद्वीप वास ज्यासी । षड्‌जस्वर नाम परियेसी ।
कंठीहूनि उपज ज्यासी । मयूरस्वर आलापित ॥४८॥
उत्तमवंशी उपज ज्यासी । गीर्वाणकुळी ब्रह्मवंशी ।
पद्मपत्र वर्ण परियेसी । वन्हि देवता शृंगार रसे ॥४९॥
द्वितीय स्वर ऋषभासी । जन्म प्लक्ष द्वीपासी ।
उपज ह्रदयस्थानेसी । चाषस्वर आलापित ॥५०॥
प्रख्यात जन्म क्षत्रवंशी । विराजवर्ण यमदेवतेसी ।
क्रीडा अद्‌भुत रस ऐसी । वीणा वाजवी रावण ॥५१॥
तृतीय स्वर गांधारेसी । गायन करी रावण परियेसी ।
कुशद्वीप वास ज्यासी । नासिकस्थान अवधारा ॥५२॥
अजस्वर आलापत्यासी । गीर्वाण कुल वैश्यवंशी ।
सुवर्णवर्ण कांतीसी । चंद्रदेवता अद्‌भुत रसे ॥५३॥
मध्यम स्वर चातुर्थक । क्रौचद्वीप वास ऐक ।
उरस्थान उक्त उच्चारी मुखे । क्रौचस्वरे आलापित ॥५४॥
गीर्वाणकुळ ब्रह्मवंश । कुंदवर्ण रूप सुरस ।
ध्यान करी लंकाधीश । लक्ष्मी देवता करुणा रस ॥५५॥
शाल्मली द्वीप भूमीसी । जन्म पंचमस्वरासी ।
कंठी उपजोनि नादासी । कोकिळास्वरे गातसे ॥५६॥
ध्यान करी तया स्वरासी । उपज झाला पितृवंशी ।
कृष्णवर्ण रूप त्यासी । गणनाथ देव हास्यरसे ॥५७॥
श्‍वेतद्वीप जन्म ख्यात । स्वर असे नाम धैवत ।
ललाट स्थान नाद व्यक्त । दर्दुरस्वरे आलापी देखा ॥५८॥
ऐसा धैवत स्वरासी । बीभत्स रस अतिउल्हासी ।
गाय रावण परियेसी । ईश्वराप्रती भक्तीने ॥५९॥
पुष्कर द्वीप उपजे त्यासी । निषाद स्वर नाम परियेसी ।
उत्पत्ति तालव्य संधीसी । हस्तिस्वरे गातसे ॥६०॥
असुरवंश वैश्यकुळी । कल्प शुद्ध वर्ण पाटली ।
तुंबर मुनि देवता जवळी । सूर्य देवता अवधारी ॥६१॥
भयानक रस देखा । चर्ची व्याकुळ असे निका ।
येणेपरी सप्त स्वरिका । गायन करी लंकानाथ ॥६२॥
रागसहितरागिणीसी । गायन करी सामवेदासी ।
श्रीरागादि वसंतासी । आलाप करी दशशिर ॥६३॥
भैरवादि पंचमरागी । नटनारायण मेघरागी ।
गायन करी अभ्यासयोगी । लंकानाथ शिवाप्रति ॥६४॥
गौडी कोल्हाळ आंधळी । द्राविडरागी कौशिकमाळी ।
देवगांधार आनंदलिळी । गायन करी लंकानाथ ॥६५॥
धनाश्रिया वराडीसी । रामकलि मंजिरेंसी ।
गौडकी दशाक्षी हारिसी । गायन करी लंकेश्वर ॥६६॥
भैरवी गुर्जरीसहित । वेळावली राग ललित ।
कर्नाटकी हंसयुक्त । गायन करी दशशिर ॥६७॥
त्राटकी मोटकि देखा । टंकाक्षी सुधा नाटका ।
सैधवा माळाकी ऐका । गायन करी लंकानाथ ॥६८॥
बंगाली राग सोरटीसी । कामबोध मधुमाधवीसी ।
देवाक्रिया भूपाळीसी । गायन करी दशानन ॥६९॥
रागवल्लभ माधुरीसी । राव्हेरी राग हर्षी ।
विहंगदात्री चंडीसी । वसवीजादि रागाने ॥७०॥
शिर कापून आपुले देखा । यंत्र केले करकमळिका ।
शिरा काढून तंतुका । रावणेश्वर गातसे ॥७१॥
समयासमयी आलापन । करी दशशिर आपण ।
प्रातःकाळी करी गायन । अष्टराग परियेसा ॥७२॥
मध्यमराग वेळोवेळी । दशांकभैरव करी भूपाळी ।
मल्हार धनाश्री बंगाली । प्रातःकाळी गातसे ॥७३॥
बराडी ललिता गुर्जरासी । गौडक्री आहिरी कौशिकेसी ।
माध्याह्नसमयी गायनासी । रावण करी परियेसा ॥७४॥
कुरंजी तोडी मालश्रियेसी । दशांक पंचम परियेसी ।
अपराह्न वेळ अतिहर्षी । ईश्वराप्रती गातसे ॥७५॥
चारी प्रकार गौडियेसी । रामकली श्रीरागासी ।
देवकीपट मंजिरेसी । वसंतुरागे ऋतुकाळी ॥७६॥

दशानन रावणाची कथा सांगून झाल्यावर सिद्धमुनींनी नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले.
संगीतात आठ गण वर्णीले आहेत. ‘म’ गण – ब्राह्मण, ‘न’ गण – क्षत्रिय, ‘भ’ गण – वैश्य, ‘त’ गण – शूद्र, ‘ज’ गण – दैत्य, ‘य’ गण – शुद्ध स्वरूप, इ. संगीतात नवरस आहेत, ते असे – शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, बीभत्स, वीर.
सप्तस्वरांचे वर्णन असे – प्रथम स्वर षडज् कंठातून उत्पन्न होतो, द्वितीय स्वर ऋषभ हृदयातून उत्पन्न होतो.
षडज्, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, आणि निषाद असे सप्त स्वर असून त्याची उत्पत्तीस्थाने अनुक्रमे – कंठ, हृदय, नासिका , उर, कंठ, ललाट, टाळू असे होत.

 

ऐसे छत्तीस रागेसी । गायन करी सामवेदासी ।
निर्वाणरूप भक्तीसी । चंद्रमौळी सांबाचिये ॥७७॥
रावणाचे भक्तीसी । प्रसन्न ईश्वर त्वरितेसी ।
निजरूप अतिहर्षी । उभा राहिला सन्मुख ॥७८॥
पंचवक्त्र त्रिनेत्रेसी । उभा राहोनि संतोषी ।
काय इच्छा तुझे मानसी । माग वर म्हणतसे ॥७९॥
म्हणे रावण शिवासी । काय मागावे तुजपासी ।
लक्ष्मी माझे घरची दासी । आठ निधि माझे घरी ॥८०॥
चतुरानन माझा जाशी । तेहेतीस कोटी देव हर्षी ।
सेवा करिती अहर्निशी । सूर्य चंद्र वरुण वायु ॥८१॥
अग्नि सारिखा सेवा करी । वस्त्रे धूत अतिकुसरी ।
यम माझा आज्ञाधारी । निरोपावेगळा न मारी कवणा ॥८२॥
इंद्रजितासारिखा पुत्र । कुंभकर्णाऐसा भ्रात्र ।
स्थान समुद्रामाजी पवित्र । कामधेनु माझे घरी ॥८३॥
सहस्त्र कोटी आयुष्य मज । हे सांगणे नलगे तुज ।
आलो असे जे काज । कैलास नेईन लंकेसी ॥८४॥
व्रत असे जननीसी । नित्य पुजन तुम्हांसी ।
मनोरथ पुरवावे भक्तीसी । कृपासिंधु दातारा ॥८५॥

अशाप्रकारे रावणाने छत्तीस प्रकारच्या रागांमध्ये भगवान शंकरांचे स्तुतीगायन केले. रावणाच्या या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान शंकर त्वरित रावणासमोर प्रकट होऊन म्हणाले – “रावणा, तुझी काय इच्छा असेल तो वर माग.” रावण म्हणाला – “ हे देवा महादेवा, मला काहीही कमी माही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते आहे.ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे. तेहतीस कोटी देव सूर्य, चंद्र, वरूण, वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारीत नाही. इंद्रजीत माझा पुत्र आहे.अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला सहा कोटी वर्षे आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको आहे.पण माझी आई तुझी भक्त आहे. ती नित्यनेमाने लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्यासकट कैलासपर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण करा.”

 

ईश्वर म्हणे रावणासी । जरी चाड असे पूजेसी ।
काय करिसी कैलासासी । आत्मलिंग तुज देतो आता ॥८६॥
जे जे मनीची वासना । पुरेल त्वरित ऐक जाणा ।
लिंग असे प्राण आपणा । म्हणोनि दिधले रावणासी ॥८७॥
पूजा करी वेळ तिन्ही । अष्टोत्तर शत जप करोनि ।
रुद्राभिषेके अभिषेकोनि । पूजा करावी एकचित्ते ॥८८॥
वर्षे तीन जे पूजिती । तेचि माझे स्वरूप ओती ।
जे जे मनी इच्छिती । ते ते पावती अवधारा ॥८९॥
हे लिंग असे जयापासी । मृत्यु नाही गा परियेसी ।
दर्शनमात्रे महादोषी । उद्धरतील अवधारा ॥९०॥
ठेवू नको भूमीवरी । जोवरी पावे तुझी नगरी ।
वर्षे तीन पूजा करी । तूचि ईश्वर होशील ॥९१॥
वर लाधोनि लंकेश्वर । निरोप देत कर्पूरगौर ।
करूनि साष्टांग नमस्कार । निघाला त्वरित लंकेसी ॥९२॥

महादेव म्हणाले, “तुला कैलास नेण्याची काय गरज? मी माझे आत्मलिंग तुला देतो. हे लिंग माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे.” असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आणि ते म्हणाले, “या लिंगाची तू तीन वर्षे १०८ जप आणि रुद्राभिषेकाने पूजा केलीस तर तू माझ्यासामान होशील. हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या लंका नगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील.” अशाप्रकारे रावणाला आत्मलिंगाचे माहात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले. भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला. तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला.

 

इतुका होता अवसर । नारद होता ऋषीश्वर ।
निघोनि गेला वेगे सत्वर । अमरपुरा इंद्रभुवना ॥९३॥
नारद म्हणे इंद्रासी । काय स्वस्थ चित्ते बैसलासी ।
अमरत्व दिधले रावणासी । लक्ष्मी गेली आजि तुमची ॥९४॥
चिरायु झाला लंकेश्वर । प्राणलिंग देत कर्पूरगौर ।
आणिक दिधला असे वर । तूचि ईश्वर होशील ॥९५॥
वर्षे तीन पूजिलियासी । तूचि माझे स्वरूप होसी ।
तुझे नगर कैलासी । मृत्यु नाही कदा तुज ॥९६॥
ऐसा वर लाधोनि । गेला रावण संतोषोनि ।
तेहेतीस कोटी देव कोठूनि । सुटती आता तुम्हासी ॥९७॥
जावे त्वरित तुम्ही आता । सेवा करावी लंकानाथ ।
उर्वशी रंभा मेनका । त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ॥९८॥

थोडाच वेळात, नारदमुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले, “आपण असे अस्वस्थ काय बसले आहात? अहो, भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे. “या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधीही मृत्यू येणार नाही.” असा वरही त्या रावणास दिला आहे. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यांदी अप्सरांसह तुम्हालापण लंकेला जावे लागेल. त्या रावणाची सेवा-चाकरी करावी लागेल.”

 

ऐसे वचन ऐकोनि । इंद्र भयभीत मनी ।
नारदा विनवी कर जोडूनि । काय करावे म्हणतसे ॥९९॥
नारद म्हणे इंद्रासी । उपाय काय त्वरितेसी ।
जावे तुम्ही ब्रह्मयासी । तयासी उपाय करील ॥१००॥
इंद्र नारदासमवेत । गेले ब्रह्मलोका त्वरित ।
विस्तारोनिया वृत्तान्त । सांगे इंद्र ब्रह्मयासी ॥१०१॥
ब्रह्मा म्हणे इंद्रासी । जावे त्वरित वैकुंठासी ।
दैत्येवरी ह्रषीकेशी । उपाय करील निर्धारे ॥२॥
म्हणोनि निघाले तिघेजण । पावले त्वरित वैकुंठभुवन ।
भेटला तत्काळ नारायण । सांगती वृत्तान्त रावणाचा ॥३॥

नारद मुनींचे हे कथन ऐकून इंद्रदेव मनातून भयभीत होऊन म्हणाले - आता काय करावे? नारद मुनी म्हणाले – “त्वरा करा. काहीतरी उपाय करा. तुम्ही आता ब्रम्हदेवाकडे जा. तेच आता काहीतरी उपाय करतील.” इन्द्र नारद मुनींसह ब्रम्ह लोकात गेले, ब्रम्हदेवाला सर्व वृतान्त कथन केले. ब्रम्हदेव त्वरीत वैकुंठलोकी श्री भगवान विष्णूकडे गेले, आणि त्यांना रावणाचा समस्त वृतान्त सांगितला.

 

विरिंचि म्हणे विष्णूसी । प्रतिकार करावा वेगेसी ।
कारण असे तुम्हांसी । राम-अवतारी परियेसा ॥४॥
तेहतीस कोटी देवांसी । घातले असे बंदीसी ।
याचि कारणे तुम्हांसी । करणे असे अवधारा ॥५॥
ईश्वराचे प्राणलिंग । घेऊनि गेला राक्षस चांग ।
आता रावणा नाही भंग । तोचि होईल ईश्वर ॥६॥
त्वरित उपाय करावा यासी । पुढे जड होईल तुम्हांसी ।
निर्दाळावया राक्षसांसी । अवतरोनि तुम्हीच यावे ॥७॥
ऐसे विनवी चतुरानन । मग कोपोन नारायण ।
कार्य नासेल म्हणोन । निघाला झडकर कैलासा ॥८॥
विष्णु आला ईश्वरापाशी । म्हणे शंकरा परियेसी ।
प्राणलिंग रावणासी । द्यावया कारण तुम्हां काय ॥९॥
रावण क्रूर महादैत्य । सुरवर सकळ त्याचे भृत्य ।
कारागृही असती समस्त । केवी सुटती सांग आम्हा ॥११०॥
ऐसे दुराचारियासी । वर देता उल्हासी ।
देवत्व गेले त्याचे घरासी । घेईल स्वर्ग निर्धारे तो ॥११॥

ब्रम्हदेव श्री विष्णूला म्हणाले – “ हे श्रीहरी, रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच. परंतु तोपर्यंत, आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल.मग सगळेच कठीण होऊन बसेल.तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे.”
ब्रह्मदेवांनी असे सांगताच भगवान विष्णू त्वरित कैलास पर्वतावर निघाले. तिथे श्री शंकरांची भेट घेऊन त्यांस विचारले, “महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले? अहो तो क्रूर, दुष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. त्यांची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्याच्याकडे गेले. तो आता स्वर्गाचा निर्धार करेल.”

 

ईश्वर म्हणे विष्णुसी । तुष्टलो तयाचे भक्तीसी ।
विसर पडला आम्हांसी । संतोषे दिधले प्राणलिंग ॥१२॥
आपले शिर छेदोनि देखा । वीणा केला स्वहस्तका ।
सप्तस्वर वेदादिका । गायन केले संतोषे ॥१३॥
जरी मागता पार्वतीसी । देतो सत्य परियेसी ।
भुली पडली भक्तीसी । लिंग नेले प्राण माझा ॥१४॥
विष्णु म्हणे उमाकांता । तुम्ही ऐसा वर देतां ।
आम्हां सायास होय तत्त्वतां । दैत्य उन्मत्त होताती ॥१५॥
देवद्विज लोकांसी । पीडा करिती बहुवशी ।
कारणे आम्हांसी । अवतार धरणे घडते देखा ॥१६॥
कधी दिले लिंग त्यासी । नेले असेल लंकेसी ।
शंकर म्हणे विष्णुसी । पांच घटी झाल्या आता ॥१७॥

महादेव म्हणाले – “श्रीहरी, मी तरी काय करू ? मी आहे साधा-भोळा. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसरच पडला. त्यानें स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले. त्याची ती दृढ भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले. त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती.”
विष्णू म्हणाले, “महादेवा, तुम्ही असले वर देता, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात.मग त्यांचा नाश करण्यासाठी, संतसज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात. आता झाले ते झाले, आता सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती वेळ झाला?" शंकर म्हणाले, "फार तर पाच घटका झाल्या असतील.”

 

ऐकताच शिववचन । उपाय करी नारायण ।
धाडिले चक्र सुदर्शन । सूर्याआड व्हावया ॥१८॥
बोलावूनि नारदासी । सांगतसे ह्रषीकेशी ।
तुम्ही जावे त्वरितेसी । रावण जातो लंकेसी देखा ॥१९॥
मार्गी जाऊनि तयासी । विलंब करावा परियेसी ।
जाऊ न द्यावे लंकेसी । त्वरित जावे म्हणतसे ॥१२०॥
चक्र झाले सूर्याआड । स्नानसंध्या रावणा चाड ।
तुम्ही जाऊनिया दृढ । विलंब करावा तयासी ॥२१॥
ऐकोनिया श्रीविष्णूच्या बोला । नारद त्वरित निघोन गेला ।
मनोवेगे पावला । जेथे होता लंकानाथ ॥२२॥

शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले. मग ते नारदमुनींना म्हणाले, "मुनीवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रोखून धरा. माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण होईल. रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो, हे तुम्हाला माहित आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा.” विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगे निघाले.

 

नारदाते पाठवूनि । विष्णू विचारी आपुल्या मनी ।
गणेशासी बोलावूनि । पाठवू म्हणे विघ्नासी ॥२३॥
बोलावूनि गणेशासी । सांगे विष्णु परियेसी ।
कैसा रावण तुजसी । सदा उपेक्षितो ॥२४॥
सकळ देव तुज वंदिती । त्याचे मनोरथ पुरती ।
तुज जे का उपेक्षिती । विघ्ने बाधती तयांसी ॥२५॥
तुज नेणतां रावण देखा । घेऊनि गेला निधान ऐका ।
प्राण लिंगा अतिविशेखा । नेले शिवाजवळूनि ॥२६॥
आता त्वा करावे एक । रावणापाशी जाऊनि देख ।
कपटरुपे कुब्जक । बाळवेष धरोनिया ॥२७॥
वाटेसि होईल अस्तमान । रावण करील संध्यावंदन ।
नारद गेला याचि कारण । विलंब करावया दैत्यासी ॥२८॥
आज्ञा शिवाची रावणासी । न ठेवी लिंग भूमीसी ।
शौचाचमनसमयासी । आपणाजवळी न ठेविजे ॥२९॥
बाळवेषे तुवा जावे । शिष्यरूप करुणाभावे ।
सूक्ष्मरूप दाखवावे । लिंग घ्यावे विश्वासुनी ॥३०॥
संध्यासमयी तुझे हाती । लिंग देईल विश्वासरीती ।
तुवा ठेवावे तत्काळ क्षिती । लिंग राहील तेथेची ॥३१॥
येणेपरी गणेशासी । शिकवी विष्णु परियेसी।
संतोषोनि हर्षी । भातुके मागे तये वेळी ॥३२॥
लाडू तिळव पंचखाद्य । इक्षु खोबरे दालिम आद्य ।
शर्करा घृत क्षीर सद्य । द्यावे त्वरित आपणासी ॥३३॥
चणे भिजवून आपणासी । तांदूळ लाह्या साखएसी ।
त्वरित भक्षण करावयासी । द्यावे स्वामी म्हणतसे ॥३४॥

नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले, “गणेशा, तू विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेस, म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात; परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात; पण रावण तुला मुळीच जुमानत नाही.तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे. आता त्या आत्मलिंग पूजनामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करील. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे श्रीशंकरांनी त्यांस बजाविले आहे.त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा. जेणेकरून रावण लवकर लंकेस जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठविले आहे. आता तू बाल-ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव. असे केल्यास ते लिंग तिथेच कायम राहील.” अशाप्रकारे विष्णूंनी गणेशाला साहाय्य करण्यास सांगितले. श्रीगणेशाने ते आनंदाने मान्य केले आणि क्षुधा शांतीसाठी शिदोरी मागितली. शिदोरीमध्ये गूळ, खोबरे, तिल लाडू, भिजवलेल्या लाहया, चणे इ मागितले.

 

जे जे मागितले विघ्नेश्वरे । त्वरित दिधले शार्ङ्गधरे ।
भक्षित निघाला वेगवक्त्रे । ब्रह्मचारीवेष धरूनि ॥३५॥
गेला होता नारद पुढे । ब्रह्मऋषि महात्म्य गाढे ।
उभा ठाकला रावणापुढे । कवण कोठूनि आलासी ॥३६॥
रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी ।
केले उत्कृष्ट तपासी । तोषविले तया शिवा ॥३७॥
तेणे प्रसन्न होऊनि आम्हांसी । लिंग दिधले परियेसी ।
आणिक सांगितले संतोषी । लिंग महिमा अपार ॥३८॥
नारद म्हणे लंकानाथा । दैव थोर तुझे आता ।
लिंग लाधलासी अद्‌भुता । जाणो आम्ही आद्यंत ॥३९॥
दाखवी लिंग आम्हांसी । खुणे ओळखू परियेसी ।
लिंगलक्षण विस्तारेसी । सांगू आम्ही तुजलागी ॥१४०॥
नारदाचिया वचनासी । न करी विश्वास परियेसी ।
दाखवीतसे दुरोनि लिंगासी । व्यक्त करोनि त्या समयी ॥४१॥
नारद म्हणे लंकेशा । लिंग महिमेचा प्रकार ऐसा ।
सांगेन तुज बहु सुरसा । बैसोनि ऐके स्वस्थ चित्ते ॥४२॥
लिंग उपजले कवणे दिवशी । पूर्वी जाणिले तयासी ।
एकचित्ते परियेसी । कथा असे अतिपूर्व ॥४३॥

मग गणराज ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला. नारदमुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारले. "रावणा, कोठून आलास ?" रावण म्हणाला, "मी कैलासावर गेलो होतो. तेथे मी कठोर तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाचे माहात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले." नारदमुनी म्हणाले, "रावणा, तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग मिळाले. मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे. मला ते दाखव, म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल." नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखविले. ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले, “लंकेशा, हेच ते आत्मलिंग! मला त्याचे माहात्म्य चांगले माहित आहे. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो.”

 

गिळूनि सकळ सौरभासी । मृग एक काळाग्निसमेसी ।
ब्रह्मांडखंड परियेसी । पडिला होता तो मृग ॥४४॥
ब्रह्माविष्णु महेश्वरांसी । गेले होते पारधियेसी ।
मृग मारिले परियेसी । भक्षिले मेद तये वेळी ॥४५॥
तयासी होती तीन शृंगे । खाली असती तीन लिंगे ।
तिघी घेतली तीन भागे । प्राणलिंगे परियेसा ॥४६॥
लिंगमहिमा ऐक कानी । जे पूजिती वर्षे तिनी ।
तेचि ईश्वर होती निर्गुणी । वेदमूर्ति तेचि होय ॥४७॥
लिंग असे जये स्थानी । तोचि कैलास जाण मनी ।
महत्त्व असे याच गुणी । ब्रह्माविष्णुमहेश्वरांसी ॥४८॥
असे आणिक एक बरवे । सांगेन ऐक एकभावे ।
रावण म्हणे आम्हा जाणे । असे त्वरित लंकेसी ॥४९॥
म्हणोनि निघाला महाबळी । नारद म्हणे तये वेळी ।
सूर्यास्त आहे जवळी । संध्याकाळ ब्राह्मणासी ॥१५०॥
सहस्त्रवेद आचरसी । संध्याकाळी मार्ग क्रमिसी ।
वाटेस होईल तुज निशी । संध्यालोप होईल ॥५१॥
आम्ही जाऊ संध्यावंदनासी । म्हणोनि नारद विनयेसी ।
पुसोनिया रावणासी । गेला नदीतीरा ॥५२॥

“कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती. एकदा ब्रह्मा-विष्णू-महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. तू हे जे आत्मलिंग दाखविलेस तेच शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल. हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचे आणखीही मोठे माहात्म्य आहे.” नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगावयास सुरुवात केली, तेव्हा रावण म्हणाला, "पुरे पुरे. मला लवकर लंकेत गेले पाहिजे." असे बोलून तो जाऊ लागला. तेव्हा नारद म्हणाले, "सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे. तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस. ब्राह्मणाने सायं-संध्यावंदन केलेच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवत कामा नये. कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये. आता माझीही संध्येची वेळ झाली आहे. मी जातो" असे बोलून नारदमुनी निघून गेले.

 

इतुकिया अवसरी । पातला गणेश ब्रह्मचारी ।
रावणापुढे चाचरी । समिधा तोडी कौतुके ॥५३॥
रावण चिंती मानसी । व्रतभंग होईल आपणासी ।
संध्या करावी त्रिकाळेसी । संदेह घडला म्हणतसे ॥५४॥
ईश्वरे सांगितले आम्हांसी । लिंग न ठेवावे भुमीसी ।
संध्यासमयो झाली निशी । काय करू म्हणतसे ॥५५॥
तव देखिला ब्रह्मचारी । अति सुंदर बाळकापरी ।
हिंडतसे नदीतीरी । देखिला रावणे तये वेळी ॥५६॥
मनी विचारी लंकानाथ । ब्रह्मचारी कुमार दिसत ।
न करी आमुचा विश्वासघात । लिंग देऊ तया हाती ॥५७॥
संध्या करू स्वस्थचित्तेसी । लिंग असेल तयापाशी ।
बाळक असे हे निश्चयेसी । म्हणोनि गेला तया जवळी ॥५८॥
देखोनिया दशशिर । पळतसे लंबोदर ।
रावण झाला द्विजवर । अभय देऊनि गेला जवळी ॥५९॥
रावण म्हणे तयासी । तू कवण बा सांग आम्हांसी ।
मातापिता कवण तुजसी । कवण कुळी जन्म तुझा ॥१६०॥
ब्रह्मचारी म्हणे रावणा । इतुके पुससी कवण्या कारणा ।
आमुच्या बापे तुझ्या ऋणा । काय द्यावे सांग मज ॥६१॥
हासोनिया लंकेश्वर । लोभे धरिला त्याचा कर ।
सांग बाळका कवणाचा कुमर । प्रीतीभावे पुसतो मी ॥६२॥
ब्रह्मचारी म्हणे रावणासी । आमुचा पिता काय पुससी ।
जटाधारी भस्मांगासी । रुद्राक्ष माळा असती देखा ॥६३॥
शंकर म्हणती तयाशी । भिक्षा मागणे अहर्निशी ।
वृषारूढ उमा सरसी । जननी ते जगन्माता ॥६४॥
इतुके आम्हांसी पुसतोसी । तुज देखता भय मानसी ।
बहुत वाटे परियेसी । सोड हात जाऊ दे ॥६५॥

इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड आल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचे? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे ? काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे. आता काय करावे? अशा काळजीत तो पडला होता. त्यावेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला. तो फुले, समिधा गोळा करीत होता.रावणाने विचार केला, "बालब्रह्मचारी अगदी साधा-भोळा दिसतो आहे. हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे." असा विचार करून रावणाने त्याबाळ ब्रह्मचारीरूपी गणेशाला हाक मारली. पण रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने अरे विचारले," अरे बटू, घाबरू नकोस.तू कोण रे बाळा ? तुझे आई वडील कोण? तू कोठे राहतोस ? तू कोणत्या कुळातला ? मला सगळे काही सांग."
रावणाने अशी विचारपूस सुरु केली असता ब्रह्मचारीरूपी गणेश म्हणाला, "अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे काय ? माझा पिता जटाधारी आहे. तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतात.तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो. त्यांचे नाव शंकर. माझी माता प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ दे, मला तुझी फार भीती वाटते."

 

रावण म्हणे ब्रह्मचारी । तव पिता असे दरिद्री ।
भिक्षा मागे घरोघरी । सौख्य तुज काही नसे ॥६६॥
आमुचे नगर लंकापूर । रत्‍नखचित असे सुंदर ।
आम्हांसवे चाल सत्वर । देवपूजा करीत जाई ॥६७॥
जे जे मागसी आम्हांसी । सकळ देईन परियेसी ।
सुखे रहावे मजपाशी । म्हणे रावण तये वेळी ॥६८॥
ब्रह्मचारी म्हणे त्यासी । लंकेसी बहुत राक्षसी ।
आम्ही बाळक अरण्यवासी । खातील तेथे जातांची ॥६९॥
न येऊ तुझिया नगरासी । सोड जाऊं दे घरासी ।
क्षुधे पीडतो बहुवसी । म्हणोनि भक्षितो भातुके ॥१७०॥
इतुके ऐकोनि लंकानाथ । त्या बाळका संबोधित ।
लिंग धरी ऐसे म्हणत । मी संध्या करीन तोवरी ॥७१॥
बाळक विनवी तयासी । न धरी लिंग परियेसी ।
मी ब्रह्मचारी अरण्यवासी । उपद्रवू नको म्हणतसे ॥७२॥
तव लिंग असे जड । मी पण बाळ असे वेड ।
न घे लिंग जाऊ दे सोड । धर्म घडेल तुजलागी ॥७३॥
नानापरी संबोधित । लिंग देत लंकानाथ ।
संध्या करावया आपण त्वरित । समुद्रतीरी बैसला ॥७४॥
ब्रह्मचारी तयासी । उभा विनवीतसे रावणासी ।
जड झालिया आपणासी । ठेवीन त्वरित भूमीवरी ॥७५॥
वेळ तीन परियेसी । बोलवीन तुम्हांसी ।
वेळ लागलिया परियेसी । आपण ठेवीन भूमीवरी ॥७६॥

रावण म्हणाला, "अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात,घरोघरी भिक्षा मागतात, मग ते तुला कुठले सुख देणार? माझे लंका नगर रत्नखचित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी देईन," त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, "नको, नको. तुझ्या लंकेत राक्षस आहेत. मला ते मारून टाकतील. मला सोड मी आपला माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे." रावण म्हणाला, "ठीक आहे. तू खुशाल आपल्या घरी जा, पण थोडा वेळ थांब. मी समुद्रतीरावर संध्या करून येतो, तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव; पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस." त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, "अहो, मला हा त्रास का देत आहात ? मी लहान आहे, तुमचे लिंग जड असेल. मला कसे धरत येईल ?" रावणाने त्याला परोपरीने समजाविले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले. रावण त्या ब्रह्मचारीरूपी गणेशाच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्येला बसला. तेव्हा तो बाळ ब्रह्मचारी म्हणाला, "ठीक आहे. मी तुम्हाला तीन हाका मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन." रावणाने ते मान्य केले.

 

ऐसा निर्धार करोनि । उभा गणेश लिंग घेऊनि ।
समस्त देव विमानी । बैसोनि पाहती कौतुके ॥७७॥
अर्घ्यसमयी रावणासी । बोलवी गणेश परियेसी ।
जड झाले लिंग आम्हांसी । सत्वर घे गा म्हणतसे ॥७८॥
न्यासपूर्वक अर्घ्य देखा । रावण करी अति विवेका ।
हाता दाखवी बाळका । येतो राहे म्हणोनि ॥७९॥
आणिक क्षणभर राहोनि । गणेश बोले वेळ दोनी ।
जड झाले म्हणोनि । शीघ्र यावे म्हणतसे ॥८०॥
न ये रावण ध्यानस्थ । गणेश असे विचारीत ।
समस्त देवांते साक्षी करीत । लिंग ठेवीत भूमीवरी ॥८१॥
श्रीविष्णूते स्मरोनि । लिंग ठेविले स्थापोनि ।
संतोष जाहला गगनी । पुष्पे वर्षती सुरवर ॥८२॥

तो बालब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहीला. रावण संध्येला बसला. सर्व देव विमानांत बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्ध्य देऊ लागला, तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला, "लवकर या. माझ्या हाताला हे लिंग पेलवत नव्हती. माझा हात दुखावला आहे. "रावणाने हाताने खूण करून त्यास थोडा वेळ थांबण्यास सांगितले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाक मारल्या; पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती.मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशावर पृष्पवृष्टी केली.

 

अर्घ्य देवोनी लंकेश्वर । निघोनि आला सत्वर ।
लिंग देखिले भूमीवर । मनी विकळ जाहला ॥८३॥
आवेशोनि रावण देखा । ठोसे मारी गणनायका ।
हास्यवदन रडे तो ऐका । भूमीवरी लोळतसे ॥८४॥
म्हणे माझिया पित्यासी । सांगेन आता त्वरितेसी ।
का मारिले मज बाळकासी । म्हणोनि रडत निघाला देखा ॥८५॥
मग रावण काय करी । लिंग धरोनिया दृढ करी ।
उचलू गेला नानापरी । भूमीसहित हालतसे ॥८६॥
कापे धरणि तये वेळी । रावण उचली महाबळी ।
न ये लिंग शिर आफळी । महाबळी राहिला ॥८७॥
नाम पाविला याचि कारणे । महाबळेश्वर लिंग जाणे ।
मुरडोनि ओढिता रावणे । गोकर्णाकार जाहले ॥८८॥
ऐसे करिता लंकानाथ । मागुती गेला तपार्थ ।
ख्याती झाली गोकर्णांत । समस्त देव तेथे आले ॥८९॥
आणिक असे अपार महिमा । सांगतसे अनुपमा ।
स्कंदपुराण वर्णिली सीमा । प्रख्याद असे परियेसा ॥१९०॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक संतोषोन ।
पुनरपि चरणा लागे जाण । म्हणे सरस्वती गंगाधरू ॥१९१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा वर्णनं नाम षष्ठोऽध्यायः॥६॥
॥ ओवीसंख्या ॥१९१॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

अर्ध्य देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्याने रागाच्या भरात गणेशाला ठोसे मारले. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला, "मला विनाकारण का मारता? मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो." असे बोलून तो रडत रडत निघून गेला.
मग रावणाने सारी शक्ती एकटवून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला. ते गो-कर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले; पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश, निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवानसदाशिवांनी वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "या गोकर्ण महाबळेश्वराचे माहात्म्य स्कंद पुराणांत अधिक विस्ताराने सांगितले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले.
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गोकर्ण महिमा - महाबळेश्वरलिंग स्थापना' नावाचा अध्याय सहावा समाप्त.
॥ ओवीसंख्या ॥१९१॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री गुरुचरित्र – अध्याय ०६ Read More »

GeetaJayanti

गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी

GeetaJayanti

श्रीमद भगवद् गीता उपदेश

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद् गीता जयंती म्हणजेच गीता जयंती साजरी केली जाते. संपूर्ण जगातील हा एकमेव ग्रंथ असेल ज्याची जयंती साजरी केली जाते. ब्रह्मपुराणानुसार, द्वापार युगातील मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवसापासून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश देण्यास सुरवात केली. गीतेची शिकवण म्हणजे ज्ञान मिळवून मोहाचा नाश करणे, मोक्षाचा मार्ग सुकर करणे, आणि म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदयिनी एकादशी असेही म्हणतात.

गीतेत भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनाच्या मनात उद्भवलेला गोंधळ दूर करून जीवनाचे ध्येय आणि ज्ञान सांगण्यासाठी अर्जुनाला उपदेश केला. भगवान कृष्णाचे हे प्रवचन धर्म आणि कर्माचे महत्त्व सांगून गीतेत साठवले गेले. भगवद‌्गीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भले संदर्भ बदलले असतील. परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत जसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे.

खरेतर गीता म्हणजे भगवंताने अखिल मानवजातीला संदेश दिला आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करताना गीता सांगणे ही मोठी घटना असली तरी अर्जुन हा त्या घडीचा केवळ निमित्त आहे. अर्जुनाला तर कुरुक्षेत्रावर फक्त कर्मयोग सांगण्याची गरज होती. परंतु, भगवंताने त्यासोबतच इतरही योग सांगून त्याचे उदात्तीकरण करण्याचे आणि ते विस्ताराने सांगण्याचे कारणच मुळात समस्त ज्ञान मानवापर्यंत ते पोहोचवणे हे आहे.

मूळ संस्कृत भाषेत असलेली हीच भगवद् गीता पुढे संत ज्ञानेश्वर माऊलींनी  ‘ज्ञानेशवरी’ म्हणून प्राकृत भाषेत आणली.

गीता फक्त तत्त्वज्ञान सांगत असली तरी त्यात कर्मयोग (प्रॅक्टिकल) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो, असे सुरेख संतुलन सांगणारे तत्त्वज्ञान गीतेत दिसते.

श्रीमद् भगवत गीतेचे १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, गीतेला उपनिषदांचा दर्जा आहे, म्हणूनच भगवत गीतेला गीतोपनिषद असेही म्हणतात.

भगवद् गीतेतील अध्याय –

अध्याय १ – अर्जुनविषादयोग

  • अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
  • अध्याय ३ – कर्मयोग
  • अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
  • अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
  • अध्याय ६ – ध्यानयोग
  • अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
  • अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
  • अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
  • अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
  • अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
  • अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
  • अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
  • अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
  • अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
  • अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
  • अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
  • अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष)

 

अठरा श्लोकी गीता मराठी –

मराठीमध्ये अठरा श्लोकी गीता म्हणून एक अतिशय सुंदर रचना आहे. यात गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार सोप्या मराठीत सांगितले आहे. प्रत्येक अध्यायासाठी एक श्लोक अशी रचना आहे.

गेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय ।
ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय ।
पाहे पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी ।
युद्धापासुनी होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ॥१॥

झाला अर्जुन शोकमय बघुनी वेदांत सांगे हरी ।
आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे अोळखी अंतरी ।
घेई बाणधनु करी समर तू कर्तव्य ते आचरी ।
वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी ॥२॥

अगा कर्माहूनी अधिक बरवे ज्ञान कथिसी ।
तरी कां तू येथे मजकडूनी हिंसा करविसी ।
वदे तै पार्थाते यदुपती करी कर्म नियते ।
फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म घडते ॥३॥

हराया भूभारा अमित अवतारासी धरितो ।
विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो ।
नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी ।
समर्पी तूं कर्मी मग तिळभरी बद्ध नससी ॥४॥

करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी ।
त्यजी प्रेमद्वेषा धरी न ममता जो निशीदिनी ।
जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनीं ।
खरा तो संन्यासी स्थिरमतीही संकल्प सुटुनी ॥५॥

चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा ।
हा मी हा पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या नरा ।
जो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम ।
ठेवी मद् गत चित्त त्याहूनी दुजा योगी नसे उत्तम ॥६॥

माझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सृष्टी सारी असे ।
पृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे ।
सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त मायाबळे ।
जे चित्ती मज चिंतीती सतत ते तापत्रया वेगळे ॥७॥

सदाध्याती माते हृदयकमळी जे स्थिरमन ।
तया देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे ।
म्हणोनी पार्था तूं निशिदिनीं करी ध्यानभजन ।
मिळोनी मद् रूपी मग चुकविसी जन्ममरण ॥८॥

भक्तीने जल पत्र पुष्प फल की कांही दुजे अर्पिले ।
ते माते प्रिय तेवी जे जर सदा मद् कीर्तनी रंगले ।
पार्था ते नर धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन ।
विष्णो, कृष्ण, मुकुंद, माधव हरे गोविंद नारायण ॥९॥

कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती ।
संक्षेपे अर्जुन मी तुज गुज कथितो मी असे सर्वभूती ।
मी धाता विष्णू मी श्री शिव रवी मी निगमी साम मी विश्वरूप ।
माझी सर्वत्र सत्ता जगी असूनी असे दिव्य माझे स्वरूप ॥१०॥

पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा ।
म्हणोनिया हरी धरी विकटरूप तेथवा ।
मांडिला अनर्थ थोर पंडुकुमार घाबरे ।
म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे ॥११॥

बरी सगुण भक्ती ती भजन निर्गुणाचे बरे ।
पुसे विजय तै तदा हरी वदे तया आदरे ।
असोत बहु योग ते तरीही भक्तियोगाहुनी ।
नसेची दुसरा असा सुलभ तो श्रमावाचुनी ॥१२॥

क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे ।
ज्ञानी त्याते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे ।
तैसा ज्या भेदबाणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व ।
कर्माची त्यांस बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व ॥१३॥

पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत् संतती ।
जीवा सत्व रज: तम: स्रीगुण हे स्वाभाविक व्यापिती ।
जो सेवी परि भक्तिने मज तया हे बाधती ना गुण ।
झाला मत् सम तो प्रियाप्रिय नसे त्याते नुरे मीपण ॥१४॥

ऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वस्थ संसार हा ।
छेदाया दृढ शस्त्र एकची तया नि:संगता भूरु हा ।
ऐसे अोळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता ।
ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पावोनी सर्वज्ञता ॥१५॥

दैवी प्रकृती लक्षणे मनी धरी धैर्य क्षमा प्रोढता ।
चित:स्थास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता ।
आता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी परा बोलणे ।
काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे ॥१६॥

सत्व रज: तम तीन गुणापरी श्रद्धा तप मख दान असे ।
त्रिविध अन्न ही निज बीजापरी आवडी त्यावरी दृढ बैसे ।
उत्तम मध्यम अधम जाणही क्रमे तयातुनी सत्व धरी ।
मग अोम तस्तत् वदूनी धनंजय ब्रम्हसमर्पण कर्म करी ॥१७॥

त्यजू पाहसी युद्ध परि ते प्रकृती करविल तुजकडूनी ।
तरी वद पार्था परिसूनी गीता रूचते ममता का अजूनी ।
मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी ।
कृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी ॥१८॥

॥श्री कृष्णार्पणमस्तु॥

 

श्रीमद् भगवद् गीता आरती मराठी
जय भगवद् गीते, जय भगवद् गीते ।
हरि-हिय-कमल-विहारिणि सुन्दर सुपुनीते ॥

कर्म-सुमर्म-प्रकाशिनि कामासक्तिहरा ।
तत्त्वज्ञान-विकाशिनि विद्या ब्रह्म परा ॥ जय ॥

निश्चल-भक्ति-विधायिनि निर्मल मलहारी ।
शरण-सहस्य-प्रदायिनि सब विधि सुखकारी ॥ जय ॥

राग-द्वेष-विदारिणि कारिणि मोद सदा ।
भव-भय-हारिणि तारिणि परमानन्दप्रदा ॥ जय॥

आसुर-भाव-विनाशिनि नाशिनि तम रजनी ।
दैवी सद् गुणदायिनि हरि-रसिका सजनी ॥ जय ॥

समता, त्याग सिखावनि, हरि-मुख की बानी ।
सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ॥ जय ॥

दया-सुधा बरसावनि, मातु ! कृपा कीजै ।
हरिपद-प्रेम दान कर अपनो कर लीजै ॥ जय ॥

।।श्री कृष्णार्पणमस्तु।।

 

गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०५

अध्याय - ०५

श्री नृसिंह सरस्वती आख्यान
श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा

॥ श्री गणेशाय नमः॥
नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी ।
अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥
ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा ।
अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥
मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख ।
वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥
दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम ।
राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥
वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण ।
होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥
नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश ।
तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥
द्वापारांती झाला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळी ।
आचारहीन होऊनि प्रबळी । वर्तती महिमा कलियुगी ॥७॥
भक्तजनतारणार्थ । अवतार धरी श्रीगुरुनाथ ।
सगराकारणे भगीरथ । आणी गंगा भूमंडळी ॥८॥

सिद्धयोगी नामधारकाला श्रीदत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्रीविष्णूचे दहा अवतार आहेत. त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रीदत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. संतसज्जनांचे रक्षण व दुष्ट -दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नानारूपांनी अवतार घेतो. द्वापारयुग संपल्यावर कलियुग सुरु झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरुपात अवतार घेतो.

 

तैसे एक विप्रवनिता । आराधी श्रीविष्णु दत्ता ।
तिचे उदरी अवतार धरिता । आश्चर्य झाले परियेसा ॥९॥
पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥
तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥
ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥
न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥
त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६॥

पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यागतांची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती आणि तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करुन त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता, त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा त्रिमूर्ति स्वरुपात तिला दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने भक्तीपूर्वक श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार केला. प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले, "माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग."

 

ऐकोनि स्वामींचे वचन । विप्रवनिता करी चिंतन ।
विनवीतसे करद्वय जोडून । नानापरी स्तवोनिया ॥१७॥
म्हणे जय जय जगन्नाथा । तू तारक भवासी तत्त्वता ।
माझे मनी असे जे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥
तू कृपाळु सर्वा भूती । वेदपुराणे वाखाणिती ।
केवी वर्णावी तुझी कीर्ती । भक्तवत्सला कृपानिधि ॥१९॥
मिथ्या नोहे तुझा बोल । जे का ध्रुवासी दिधले पद अढळ ।
बिभीषणासी लंकास्थळ । देऊनि राज्य समर्पिले ॥२०॥
भक्तजना तू आधार । तयालागी धरिसी अवतार ।
ब्रीद असे चराचर । चौदा भुवनामाझारी ॥२१॥
आता माते वर देसी । वासना असे माझे मानसी ।
न व्हावे अन्यथा बोलासी । कृपानिधि देवराया ॥२२॥
माझे मनीची वासना । पुरवावी जगज्जीवना ।
अनाथरक्षका नारायणा । म्हणोनि चरणा लागतसे ॥२३॥

त्रिमूर्तिचे बोलणे ऐकून सुमतीने विनवणी केली – “हे प्रभू, आपण सर्वांभूती कृपाळू आहात, तारक आहात, भक्त वत्सल आहात. आपली किर्ती अनादी अनंत आहे. माझी मनोकामना पूर्ण करा. आपले वचन असत्य काय? आपण ध्रुवास अढळपद दिले, बीभिषणास लंकेचे राज्य दिले. भक्त जनांना तुमचाच आधार म्हणून अवतार धरण करतात. तुम्ही आता तर मला माता संबोधतात, मग माझी मनोकामना पूर्ण करा.”

 

ऐकोनि तियेचे करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण ।
कर धरिला आश्वासोन । सांग जननी म्हणतसे ॥२४॥
तव बोलिली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता ।
जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ॥२५॥
मज पुत्र झाले बहुत । नव्हेत स्थिर उपजतमृत ।
जे वाचले आता असत । अक्षहीन पादहीन ॥२६॥
योग्य झाले नाही कोणी । काय करावे मूर्ख प्राणी ।
असोनि नसती येणे गुणी । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥
व्हावा पुत्र मज ऐसा । ज्ञानवंत पुराणपुरुषा ।
जगद्वंद्य वेदसदृशा । तुम्हांसारिका दातारा ॥२८॥
ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला दत्त आपण ।
पुढे असे कार्यकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥
तापसी म्हणे तियेसी । पुत्र होईल परियेसी ।
उद्धरिल तुझे वंशासी । ख्यातिवंत कलियुगी ॥३०॥
असावे तुम्ही त्याचे बोली । येर्‍हवी न राहे तुम्हांजवळी ।
ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचे दैन्य हरील ॥३१॥
इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसी ।
विस्मय करितसे मानसी । विप्रवनिता तयेवेळी ॥३२॥
विस्मय करोनि मनात । पतीसी सांगे वृत्तान्त ।
दोघे हर्षे निर्भर होत । म्हणती दत्तात्रेय होईल ॥३३॥

श्रीदत्तात्रेयांनी “अवश्य सांग” असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा.मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा."
सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्तप्रभू, पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही तो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदृष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.
काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीगत सांगितली असता दोघेही “श्री दत्तात्रेय येणार” म्हणून अतिशय आनंदीत झाले.

 

माध्यान्हसमयी अतिथिकाळी । दत्त येताती तये वेळी ।
विमुख न होता तये काळी । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥
दत्तात्रेयाचे स्थान । माहूर करवीर क्षेत्र खूण ।
तयाचा वास सदा जाण । पांचाळेश्वर नगरात ॥३५॥
नाना वेष भिक्षुकरूप । दत्तात्रेय येती साक्षेप ।
न पुसतां मज निरोप । भिक्षा घाली म्हणतसे ॥३६॥
विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली तुम्हांसी ।
ब्राह्मण न जेवता आपण त्यासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥
ऐकोनी सतीच्या बोला । विप्र मनी संतोषला ।
म्हणे पतिव्रते लाभ झाला । पितर माझे तृप्त झाले ॥३८॥
करावे कर्म पितरांच्या नामी । सर्मपावे विष्णुसी आम्ही ।
साक्षात्कारे येऊनि स्वामी । भिक्षा केली आम्हा घरी ॥३९॥
कृतार्थ झाले पितृगण समस्त । निर्धारे झाले स्वर्गस्थ ।
साक्षात् विष्णु भेटले दत्त । त्रैमूर्तिअवतार ॥४०॥
धन्य तुझी मातापिता । जे वर लाधलीस मुख्य आता ।
पुत्र होईल निभ्रांता । न धरी चिंता मानसी ॥४१॥

मध्यान्ह समयी श्री दत्तगुरु स्वत: अतिथी वेषात येतात, त्यावेळी कुणाही अतिथीला विन्मुख न पाठवता भिक्षा दिली पाहिजे. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल, त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते.
सुमतीने पतीजवळ शंका उपस्थित केली – “आज श्राद्धसमयी आपण ब्राह्मण भोजन होण्याआधीच भिक्षा वाढली, चुकले तर नाही ना?” सुमतीचे बोलणे ऐकून आपळराजा प्रसन्नपणे सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. सर्व कर्म पितरांच्या नवे करून शेवटी ती भगवान विष्णू चरणी समर्पित करायची असतात. आज तर आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. माझे सर्व पितर कृतार्थ होऊन स्वर्गस्थ झालेत. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. आता कुठलीही चिंता करू नकोस."

 

हर्षे निर्भर होवोनि । राहिली दोघे निश्चित मनी ।
होती जाहली गर्भिणी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥
ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनी ।
विप्रे स्नान करूनि । केले जातककर्म तये वेळी ॥४३॥
मिळोनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी ।
म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्‍गुरू ॥४४॥
ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता ।
आम्हा वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव ॥४५॥
श्रीपाद म्हणोनि या कारण । नाम ठेवी तो ब्राह्मण ।
अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥

पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानांत घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले.

 

वर्तत असता त्याचे घरी । झाली सात वर्षे पुरी ।
मौजीबधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥
बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी ।
मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ॥४८॥
ऐकोनि समस्त नगरलोक। विस्मय करिती सकळिक ।
होईल अवतार कारणिक । म्हणोन बोलती आपणात ॥४९॥
आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत ।
वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥५०॥

अत्यंत आनंदाने सुमती-आपळ राजा श्रीपादाचे संगोपन करीत होते. यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौंजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले.

 

वर्तता ऐसे तयासी । झाली वर्षे षोडशी ।
विवाह करू म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥
विचार करिती पुत्रासवे । बा रे लग्न तुवा करावे ।
श्रीपाद म्हणे ऐका भावे । माझी वांछा सांगेन ॥५२॥
कराल विवाह माझा तुम्ही । सांगो ऐका विचार आम्ही ।
वैराग्यस्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तियेजवळी ॥५३॥
ते स्त्रियेवाचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी ।
जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ॥५४॥
आपण तापसी ब्रह्मचारी । योगस्त्रियेवांचोनि नारी ।
बोल धरा निर्धारी । श्रीवल्लभ नाम माझे ॥५५॥
श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे । झाले त्रिमूर्ति कैसे ।
पितयाते म्हणतसे । जाउ उत्तरपंथासी ॥५६॥

यथावकाश श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, "मी विवाह करणार नाही. मी वैराग्य या स्त्रीशी विवाह केला आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी तापसी ब्रह्मचारी आहे. योगश्री हीच माझी पत्नी होय. माझे नाव श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे."

 

ऐकोनि पुत्राचे वचन । आठविले पूर्वसूचन ।
भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे ॥५७॥
आताच या बोलासी । मोडा घालिता परियेसी ।
विघ्न होईल त्वरितेसी । म्हणोनि विचारिती तये वेळी ॥५८॥
न म्हणावे पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी ।
जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे ॥५९॥
निश्चय करूनि आपुले मनी । पुत्राभिमुख जनकजननी ।
होती आशा आम्हांलागुनी । प्रतिपाळिसी म्हणोनिया ॥६०॥
ऐशी मनी व्याकुळित । डोळा निघती अश्रुपात ।
माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहे करोनिया ॥६१॥
देखोनि मातेचे दुःख । संबोखित परमपुरुष ।
उठवूनि स्वहस्ते देख । अश्रुपात पुशितसे ॥६२॥
न करी चिंता अहो माते । जे मागसी ते देईन तूते ।
दृढ करूनि चित्ताते । रहा सुके म्हणतसे ॥६३॥
बा रे तुजकरिता आपण । दुःख विसरले संपूर्ण ।
रक्षिसी आम्हा वृद्धांलागून । दैन्यावेगळे करोनि ॥६४॥
पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन ।
त्याते पोशील आता कोण । आम्हा कवण रक्षील ॥६५॥

पुत्राचे हे बोलणे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले, परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल. तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. हा केवळ आपला पुत्र नसून एक अवतार पुरुष आहे, असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, "बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली, आणि व्याकुल होऊन मूर्च्छित होऊ लागली. मातेचे दु:ख पाहून श्रीपाद मातेला उठवून, तिचे अश्रू पुसून तिला समजावीत म्हणाले, "माते, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. आता दु:ख करू नका." तेव्हा सुमती म्हणाली “अरे बाळा, आम्हाला दोन पुत्र आहेत. परंतु एक पानगळ आहे आणि एक अंध आहे. आम्ही तुझ्याकरीता सर्व दु:ख विसरलो. आता आमच्या वृद्धापकाळात या मुलांकडे कोण पहिल, आमचा कोण सांभाळ करील?”

 

ऐकोनि जननीचे वचन । अवलोकी अमृतदृष्टीकरून ।
पुत्र दोघेही झाले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥
वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण ।
दोघे येऊनि धरिती चरण । कृतार्थ झालो म्हणोनिया ॥६७॥
आश्वासून तया वेळी । दिधला वर तत्काळी ।
पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रियायुक्त सनातन ॥६९॥
सेवा करा जनकजननी । पावा सुख महाज्ञानी ।
इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चये ॥७०॥
ऐसे बोलोनि तयांसी । संबोधितसे मातेसी ।
पाहोनिया दोघा पुत्रांसी । राहता सुख पावाल ॥७१॥
पुत्र दोघे शतायुषी । निश्चय धरी वो मानसी ।
कन्या पुत्र होतील यांसी । तुम्ही नेत्री देखाल ॥७२॥
अखंड लक्ष्मी यांचे घरी । यांचे वंशपरंपरी ।
कीर्तिवंत सचराचरी । संपन्न होती वेदशास्त्रे ॥७३॥
आमची अवज्ञा न करिता । निरोप द्यावा आम्हा त्वरिता ।
जाणे असे उत्तरपंथा । दीक्षा द्यावया साधुजना ॥७४॥

मग श्रीपादांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले. आणि त्याचक्षणी त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. "तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. त्यांना पुत्र पौत्र होतील. ते कीर्तिवंत, वेदशास्त्र संपन्न होतील. आता मला निरोप द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुजनांना मी दीक्षा देणार आहे."

 

सांगोनि मातापित्यासी । अदृश्य झाला परियेसी ।
पावला त्वरित पूरी काशी । गुप्तरूपे होता तेथे ॥७५॥
निघाला तेथूनि बदरीविना । भेटी घेऊनि नारायणा ।
अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ॥७६॥
दीक्षा करावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा ।
मनोवेगे मार्गक्रमणा । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥
ऐकोनि सिद्ध मुनींचे वचन । विनवी नामधारक आपण ।
ते परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥७८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमेऽध्यायः ॥५॥
॥ श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ ओवीसंख्या ॥७८॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

श्रीपाद श्रीवल्लभ माता पित्याचा निरोप घेऊन निघाले अन एकाएकी गुप्त झाले. ते मग गुप्तपणे काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात गेले. तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन “आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे” असे म्हणाले. मग भक्तांना दीक्षा देत, तीर्थ क्षेत्री भेट देत वेगाने मार्गक्रमण करत ते गोकर्णक्षेत्रात आले.
श्रोते हो! सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदीत झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढें काय विचारले व सिद्धमुनींनी काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका.
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा' नावाचा अध्याय पाचवा समाप्त.
॥ ओवीसंख्या ॥७८॥

॥ श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री गुरुचरित्र – अध्याय ०५ Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०४

अध्याय – ०४

अनसूया आख्यान
श्री दत्त जन्म कथा

॥ श्रीगणेशाय नमः॥
ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती ।
साधु-साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणीं ॥१ ॥
ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
आठवतसे तुझिया प्रश्नीं । आदि-मध्य-अवसानक ॥ २ ॥
प्रश्न केला बरवा निका । सांगेन तुज विवेका ।
अत्रिऋषीच्या पूर्वका । सृष्टीउत्पत्तीपासोनि ॥ ३ ॥

श्रीदत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे शिष्याने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम, मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो."

 

पूर्वी सृष्टि नव्हती कांही । जलमय होतें सर्वांठायीं ।
'आपोनारायण' म्हणोनि पाहीं । वेद बोलती याचिकारणें ॥ ४ ॥
आपोनारायण आपण । सर्वां ठायीं वास पूर्ण ।
बुद्धि संभवे प्रपंचगुण । अंड निर्मिलें हिरण्यवर्ण ॥ ५ ॥
तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें । रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें ।
'हिरण्यगर्भ' नाम पावलें । देवतावर्ष एक होतें ॥ ६ ॥
तेंचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकलें झालीं द्वैका ।
एक आकाश एक भूमिका । होऊनि ठेलीं शकलें दोनी ॥ ७ ॥
ब्रह्मा तेथें उपजोन । रचिलीं चवदाही भुवनें ।
दाही दिशा मनस वचन । काळकामक्रोधादि सकळ ॥ ८ ॥
पुढें सृष्टि रचावयासी । सप्त पुत्र उपजवी मानसीं ।
नामें सांगेन परियेसीं । सातै जण ब्रह्मपुत्र ॥ ९ ॥
मरीचि अत्रि आंगिरस । पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ ।
सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ । सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण ॥ १० ॥

सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. ह्या जल-नारायण रूपालाच “आपोनारायण” असेही म्हणतात. आणि याचा विस्तार सर्वव्यापी होता. त्यातच हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रम्हरूप. त्यालाच ब्रम्हांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे होऊन वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रम्हदेवाने तेथे चौदा भुवने निर्माण केली. दहा दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले.

 

सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि । तेथूनि पीठ गुरुसंतति ।
सांगेन ऐका एकचित्ती । सभाग्य नामधारका ॥११॥
ऋषि अत्रीची भार्या । नाम तिचे अनसूया ।
पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥१२॥
तिचे सौंदर्यलक्षण । वर्णू शके ऐसा कोण ।
जिचा पुत्र चंद्र आपण । तिचे रूप काय सांगो ॥१३॥
पतिसेवा करी बहुत । समस्त सुरवर भयाभीत ।
स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित । म्हणोनि चिंतिती मानसी ॥१४॥

त्या सप्तर्षीपैकी एक अत्रीं ऋषी होय. त्यांची पत्नी अनसूया. ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या सौंदर्याचे, रूपाचे वर्णन करता येईल असा कोणीही नव्हता. जिचा पुत्र प्रत्यक्ष चंद्र, तिचे रूप के वर्णावे. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल कि काय अशी सर्व देवांना भिती वाटू लागली.

 

इंद्रादि सुरवर मिळुनि । त्रयमूर्तिपासी जाउनी ।
विनविताती प्रकाशोनी । आचार अत्रि ऋषीचा ॥१५॥
इंद्र म्हणे स्वामिया । पतिव्रता स्त्री अनसूया ।
आचार तिचा सांगो काया । तुम्हाप्रती विस्तारोनि ॥१६॥
पतिसेवा करी भक्तीसी । मनोवाक्कायमानसी ।
अतिथिपूजा महाहर्षी । विमुख नव्हे कवणे काळी ॥१७॥
तिचा आचार देखोनि । सूर्य भीतसे गगनी ।
उष्ण तिजला होईल म्हणोनि । मंद मंद तपतसे ॥१८॥
अग्नि झाला भयाभीत । शीतळ असे वर्तत ।
वायु झाला भयचकित । मंद मंद वर्ततसे ॥१९॥
भूमि आपण भिऊनि देखा । नम्र जाहली पादुका ।
शाप देईल म्हणोनि ऐका । समस्त आम्ही भीतसो ॥२०॥
नेणो घेईल कवण स्थान । कोण्या देवाचे हिरोन ।
एखाद्याते वर देता जाण । तोही आमुते मारू शके ॥२१॥
यासि करावा उपाय । तू जगदात्मा देवराय ।
जाईल आमुचा स्वर्गठाय । म्हणोनि आलो तुम्हा सांगो ॥२२॥
न कराल जरी उपाय यासी । सेवा करू आम्ही तिसी ।
तिचे द्वारी अहर्निशी । राहू चित्त धरोनिया ॥२३॥

मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री-अनसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्रदेव म्हणाले, "महातपस्वी अत्रींची पत्नी अनसूया असामान्य पतिव्रता आहे. ती काया-वाचा-मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तळपतो. तिच्यासाठी अग्नीसुद्धा थंड, शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल."

 

ऐसे ऐकोनि त्रयमूर्ति । महाक्रोधे कापती ।
चला जाऊ पाहू कैसी सती । म्हणती आहे पतिव्रता ॥२४॥
वतभंग करूनी तिसी । ठेवूनि येऊ भूमीसी ।
अथवा वैवस्वतालयासी । पाठवू म्हणोनि निघाले ॥२५॥
सत्त्व पहावया सतीचे । त्रयमूर्ती वेष भिक्षुकाचे ।
आश्रमा आले अत्रीचे । अभ्यागत होऊनिया ॥२६॥
ऋषि करू गेला अनुष्ठान । मागे आले त्रयमूर्ति आपण ।
अनसूयेसी आश्वासून । अतिथि आपण आलो म्हणती ॥२७॥
क्षुधे बहु पीडोन । आम्ही आलो ब्राह्मण ।
त्वरित द्यावे सती अन्न । अथवा जाऊ आणिका ठाया ॥२८॥
सदा तुमचे आश्रमांत । संतर्पण अभ्यागत ।
ऐको आली कीर्ति विख्यात । म्हणोनि आलो अनसूये ॥२९॥
इच्छाभोजनदान तुम्ही । देता म्हणोनि ऐकिले आम्ही ।
ठाकोनि आलो याचि कामी । इच्छाभोजन मागावाया ॥३०॥

देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा-विष्णू-महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, "चला, आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू. नाहीतर यमलोकाला पाठवू." असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला. मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनसूया आश्रमात एकटीच होती. ते अनसुयेला हाक मारून म्हणाले, "माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते. अतिथी-अभ्यागतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने जाणीवपूर्वक आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो."

 

इतुके ऐकोनि अनसूया । नमन केले तत्क्षणिया ।
बैसकार करूनिया । क्षालन केले चरण त्यांचे ॥३१॥
अर्ध्य पाद्य देऊनि त्यांसी ।
गंधाक्षतापुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी । आरोगण सारिजे ॥३२॥
अतिथी म्हणे तये वेळी । करोनि आलो आंघोळी ।
ऋषि येती बहुता वेळी । त्वरित आम्हा भोजन द्यावे ॥३३॥
वासना पाहोनि अतिथीते । काय केले पतिव्रते ।
ठाय घातले त्वरिते । बैसकार केला देखा ॥३४॥
बैसवोनिया पाटावरी । घृतेसी पात्र अभिधारी ।
घेवोनी आली आपण क्षीरी । शाक पाक तये वेळी ॥३५॥
तिसी म्हणती अहो नारी । आम्ही अतिथी आलो दुरी ।
देखोनि तुझे स्वरूप सुंदरी । अभीष्ट मानसी आणिक वसे ॥३६॥
नग्न होवोनि आम्हांसी । अन्न वाढावे परियेसी ।
अथवा काय निरोप देशी । आम्ही जाऊ नाही तरी ॥३७॥

तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसुयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले. बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली,"आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढते." तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "आम्ही स्नान करूनच आलो आहोत. अत्री ऋषीना परत येण्यास वेळ लागेल, तेव्हा आम्हाला लवकर भोजन दे." "ठीक आहे." असे म्हणून अनसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ. नाहीतर आम्ही परत जातो."

 

ऐकोनि द्विजांचे वचन । अनसूया करी चिंतन ।
आले विप्र पहावया मन । कारणिक पुरुष होतील ॥३८॥
पतिव्रता शिरोमणी । विचार करी अंतःकरणी ।
अतिथी विमुख तरी हानि । निरोप केवी उल्लंघू ॥३९॥
माझे मन असे निर्मळ । काय करील मन्मथ खळ ।
पतीचे असे तपफळ । तारील मज म्हणतसे ॥४०॥
ऐसे विचारोनि मानसी । तथास्तु म्हणे तयांसी ।
भोजन करावे स्वस्थ चित्तेसी । नग्न वाढीन म्हणतसे ॥४१॥
पाकस्थाना जाऊनि आपण । चिंतन करी पतीचे चरण ।
वस्त्र फेडोनि नग्न । म्हणे अतिथी बाळे माझी ॥४२॥
नग्न होवोनी सती देखा । घेऊनि आली अन्नोदका।
तव तेचि झाले बाळका । ठायांपुढे लोळती ॥४३॥
बाळे देखोनि अनसूया । भयचकित होवोनिया ।
पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली तया बाळकांजवळी ॥४४॥
रुदन करिती तिन्ही बाळे । अनसूया रहावी वेळोवेळ ।
क्षुधार्त झाली केवळ । म्हणोनि कडिये घेतसे ॥४५॥
कडिये घेवोनि बाळकांसी । स्तनपान करवी अतिहर्षी ।
एका सांडोनि एकाशी । क्षुधा निवारण करितसे ॥४६॥

त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिनें ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील?
“आता हे अतिथी परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होइल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारुन नेईल.” असा विचार करून अनसूया त्या भिक्षुंना 'तथास्तु' असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले. पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य ! त्याचक्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली. ती बाळें भुकेने व्याकूळ होउन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले.

 

पाहे पा नवल काय घडले । त्रयमूर्तीची झाली बाळे ।
स्तनपान मात्रे तोषले । तपफळ ऐसे पतिव्रतेचे ॥४७॥
ज्याचे उदरी चौदा भुवन । सप्त समुद्र वडवाग्नि जाण ।
त्याची क्षुधा निवारण । पतिव्रतास्तनपानी ॥४८॥
चतुर्मुख ब्रह्मयासी । सृष्टि करणे अहर्निशी ।
त्याची क्षुधा स्तनपानेसी । केवी झाली निवारण ॥४९॥
भाळाक्ष कर्पूर गौर । पंचवक्त्र काळाग्निरुद्र ।
स्तनपान करवी अनसूया सुंदर । तपस्वी अत्री ऐसा ॥५०॥
अनसूया अत्रिरमणी । नव्हती ऐशी कोणी ।
त्रयमूर्तीची झाली जननी । ख्याति झाली त्रिभुवनांत ॥५१॥
कडिये घेवोनि बाळकांसी । खेळवीतसे तिघांसी ।
घालोनिया पाळण्यासी । पर्यंदे गाई तये वेळी ॥५२॥
पर्यंदे गाय नानापरी । उपनिषदार्थ अतिकुसरी ।
अतिउल्हासे सप्त स्वरी । संबोखितसे त्रिमूर्तीसी ॥५३॥

पहा, काय नवल घडले. त्या त्रय मूर्तीची लहान बाळे झाली, इतकी त्या पतीव्रतेच्या तपाची थोरवी होती. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले, त्यांच्यासाठी अंगाई गीते गाईली. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. अशी ती तपस्विनी अनसूया त्रयमूर्तीची माता झाली आणि त्रिभुवनात ख्यातनाम झाली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली.

 

इतुके होता तये वेळी । माध्यान्हवेळ अतिथिकाळी ।
अत्रि ऋषि अतिनिर्मळी । आला आपुले आश्रमा ॥५४॥
घरामाजी अवलोकिता । तव देखिली अनसूया गाता ।
कैची बाळे ऐसे म्हणता । पुसतसे स्त्रियेसी ॥५५॥
तिणे सांगितला वृत्तान्त । ऋषि ज्ञानी असे पाहात ।
त्रयमूर्ति हेचि म्हणत । नमस्कार करितसे ॥५६॥
नमस्कारिता अत्रि देखा । संतोष विष्णुवृषनायका ।
आनंद झाला चतुर्मुखा । प्रसन्न झाले तये वेळी ॥५७॥
बाळ राहिले पाळणेसी । निजमूर्ति ठाकले सन्मुखेसी ।
साधु साधु अत्रि ऋषि । अनसूया सत्य पतिव्रता ॥५८॥
तुष्टलो तुझे भक्तीसी । माग मनी वर इच्छिसी ।
अत्रि म्हणे सतीसी । जे वांछिसी माग आता ॥५९॥

इतके होईतो, मध्यान्हवेळ झाली आणि अत्रिऋषी आपले अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. घरात पहिले असता, पाळण्यातील तीन बालके आणि गात असलेली अनसूया पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनसूयेने त्यानं सगळी हकीकत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिमुर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले, व त्यांना नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले, आणि 'वर माग' असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा अत्रि ऋषी अनसुयेला म्हणाले, "त्रिमुर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे."

 

अनसूया म्हणे ऋषीसी । प्राणेश्वरा तूचि होसी ।
देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता ॥६०॥
तिघे बाळक माझे घरी । रहावे माझे पुत्रापरी ।
हेचि मागतो निर्धारी । त्रयमूर्ति आपणां एकरूपा ॥६१॥
ऐसे वचन ऐकोनि । वर दिधला मूर्ती तिन्ही ।
राहती बाळके म्हणोनि । आपण गेले निजालयासी ॥६२॥
त्रिमूर्ति राहिले त्यांचे घरी । अनसूया पोशी बाळकापरी ।
नामे ठेविली प्रीतिकरी । त्रिवर्गांची परियेसा ॥६३॥
ब्रह्मामूर्ति चंद्र झाला । विष्णुमूर्ति दत्त केवळा ।
ईश्वर तो दुर्वास नाम पावला । तिघे पुत्र अनसूयेचे ॥६४॥
दुर्वास आणि चंद्र देखा । उभे राहूनि मातेसन्मुखा ।
निरोप मागती कौतुका । जाऊ तपा निजस्थाना ॥६५॥
दुर्वास म्हणे जननी । आम्ही ऋषि अनुष्ठानी ।
जाऊ तीर्थे आचरोनि । म्हणोनि निरोप घेतला ॥६६॥
चंद्र म्हणे अहो माते । निरोप द्यावा आम्हा त्वरिते ।
चंद्रमंडळी वास माते । नित्य दर्शन तुमचे चरणी ॥६७॥
तिसरा दत्त विष्णुमूर्ति । असेल तुमचे धरोनि चित्ती ।
त्रयमूर्ति तोचि निश्चिती । म्हणोनि सांगती तियेसी ॥६८॥
त्रयमूर्ति जाण तोचि दत्त । सर्व विष्णुमय जगत ।
राहील तुमचे धरोनि चित्त । विष्णुमूर्ति दत्तात्रेय ॥६९॥
त्रयमूर्ति ऐक्य होऊन । दत्तात्रेय राहिला आपण ।
दुर्वास चंद्र निरोप घेऊन । गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ॥७०॥
अनसूयेचे घरी देखा । त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका ।
नाम दत्तात्रेय एका । मूळपीठ श्रीगुरूचे ॥७१॥

तेव्हा अनसूया हात जोडून म्हणाली, "हे नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या." अत्री म्हणाले, "हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर आपण एकतत्व होऊन पुत्ररूपाने येथेच राहावे." तेव्हा 'तथास्तु' म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले.
तिन्ही बालके तेथेच आश्रमातच राहिली. मग ब्रह्मदेव 'चंद्र' झाले, श्रीविष्णू 'दत्त' झाले आणि महेश 'दुर्वास' झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'. ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे.

 

ऐशापरी सिद्ध देखा । कथा सांगे नामधारका ।
संतोषे प्रश्न करी अनेका । पुसतसे सिद्धासी ॥७२॥
जय सिद्ध योगीश्वरा । भक्तजनमनोहरा ।
तारक संसारसागरा । ज्ञानमूर्ति कृपासिंधो ॥७३॥
तुझेनि प्रसादे मज । ज्ञान उपजले सहज ।
तारक आमुचा योगिराज । विनंती माझी परियेसा ॥७४॥
दत्तात्रेयाचा अवतारू । सांगितला पूर्वापारू ।
पुढे अवतार जाहले गुरु । कवणेपरी निरोपिजे ॥७५॥
म्हणे सरस्वतीगंगाधरू । पुढील कथेचा विस्तारू ।
ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥७६॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
॥ ओवीसंख्या ॥७७॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

अशाप्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला दत्तजन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धमुनींना म्हणाला, "श्रीगुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा". सिद्ध योगींनी तथास्तु म्हटले.
(दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष शुद्ध पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्तजयंती असते.)
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा' नावाचा अध्याय चौथा समाप्त.
॥ ओवीसंख्या ॥७७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री गुरुचरित्र – अध्याय ०४ Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०३

अध्याय - ०३

अंबरीष आख्यान

॥ श्रीगणेशाय नमः॥

येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि ।
संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥
जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी ।
संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥
तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो ।
परम तत्त्व जोडलो । आजिचेनि दातारा ॥३॥
ऐसे श्रीगुरुमहिमान । मज निरोपिले त्वां ज्ञान ।
आनंदमय माझे मन । तुझेनि धर्मे स्वामिया ॥४॥
कवणे ठायी तुमचा वास । नित्य तुम्हा कोठे ग्रास ।
होईन तुझा आतां दास । म्हणोनि चरणी लागला ॥५॥

सिद्धमुनींनी सांगितलेले गुरुमाहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जयजयकार करीत म्हणाला - “अहो सिद्ध मुनीवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमाहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता? भोजन कोठे करता? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो.”

कृपानिधी सिद्ध मुनी । तया शिष्या आलिंगोनि ।
आशीर्वचन देऊनि । सांगे आपुला वृत्तान्त ॥६॥
जे जे स्थानी होते गुरु । तेथे असतो चमत्कारू ।
पुससी जरी आम्हां आहारू । गुरुस्मरणी नित्य जाणा ॥७॥
श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्हा अमृतपान ।
सदा सेवितो याचे गुण । म्हणोनि पुस्तक दाविले ॥८॥
भुक्ति मुक्ति परमार्थ । जे जे वांछिजे मनांत ।
ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥९॥
धनार्थी यासी अक्षय धन । पुत्रपौत्रादि गोधन ।
कथा ऐकता होय जाण । ज्ञानसिद्धी तात्काळ ॥१०॥
जे भक्तीने सप्तक एक । पढती ऐकती भक्तलोक ।
काम्य होय तात्कालिक । निपुत्रिका पुत्र होती ॥११॥
ग्रहरोगादिपीडन । न होती व्याधि कधी जाण ।
जरी मनुष्यास असेल बंधन । त्वरित सुटे ऐकता ॥१२॥
ज्ञातवंत शतायुषी । ऐकता होय भरवसी ।
ब्रह्महत्यापापे नाशी । एकचित्ते ऐकता ॥१३॥

नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले, “ज्या ज्या ठिकाणी श्रीगुरू राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्रीगुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो.” असे सांगून त्यांनी नामधारकाला श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखविला. ते म्हणाले, या श्रीगुरुचरित्राचे नित्य श्रवण-पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धन, धन्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतत. बंधनातून सुटका होते. ब्रह्म हत्यादी पापांतून मुक्ती होते. या ग्रंथांचे श्रवण-पठण करणारा ज्ञानसंपन्न, शतायुषी होतो."

इतुके ऐकोनि त्या अवसरी । नामधारक नमस्कारी ।
स्वामी माते तारी तारी । कृपानिधि सिद्ध मुनी ॥१४॥
साक्षात्कारे गुरुमूर्ति । भेटलासी तू जगज्योती ।
होती वासना माझे चित्ती । गुरुचरित्र ऐकावे ॥१५॥
एखादा तृषेने पीडित । जात असता मार्गस्थ ।
त्या आणूनि देती अमृत । तयापरी तू मज भेटलासी ॥१६॥
गुरूचा महिमा ऐको कानी । सांगिजे स्वामी विस्तारोनि ।
अंधकार असतां रजनी । सूर्योदयापरी करी ॥१७॥

सिद्धमुनींनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला, “आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरूच भेटले आहेत. श्रीगुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकूळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहत. सुर्योदयामुळे ज्याप्रमाणे रात्रीचा अंध:कार दूर होतो, त्याप्रमाणे मला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगा.”

इतुकिया अवसरी । सिद्ध योगी अभय करी ।
धरोनिया सव्य करी । घेवोनि गेला स्वस्थाना ॥१८॥
असे ठाव ज्ञानपंथी । कल्पवृक्ष अश्वत्थी ।
बैसोनि सांगे ज्ञानज्योती । ऐक शिष्या नामधारका ॥१९॥
नेणती सोय गुरुदास्यका । याचि कारणे उपबाधका ।
होती तुज अनेका । चिंता क्लेश घडती तुज ॥२०॥
ओळखावया गुरुमूर्तीसी । आपुला आचार परियेसी ।
दृढ भक्ति धरोनि मानसी । ओळखिजे मग श्रीगुरु ॥२१॥

सिद्धमुनीं त्याला अभय देऊन स्वस्थानी घेऊन गेले आणि म्हणाले, “हे शिष्या, तुला अनेक चिंता क्लेश झाले, गुरु सेवा हाच त्यावरील उपाय होय. श्री गुरूंना ओळखण्यासाठी आपले आचरण त्याप्रमाणेच असावे लागते. श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव.”

ऐकोनि सिद्धांचे वचन । संतोषे नामधारक सगुण ।
क्षणक्षणा करी नमन । करुणावचने करोनिया ॥२२॥
तापत्रयाग्नीत पोळलो । मी संसारसागरी बुडालो ।
क्रोधादि जलचरी वेष्टिलो । अज्ञानजाळे वेष्टूनिया ॥२३॥
ज्ञाननौकी बसवूनि । कृपेचा वायू पालाणुनि ।
देहा तारक करूनि । तारावे माते स्वामिया ॥२४॥
ऐशिया करुणावचनी । विनवितसे नामकरणी ।
मस्तक सिद्धाचिया चरणी । ठेविता झाला पुनः पुनः ॥२५॥

सिद्धांचे बोलणे ऐकून संतोषी मनाने नामधारकाने क्षणोक्षणी नमन करून करूणा भाकली. “मी संसार सागरात बुडालो, तापाग्नी पोळलो. क्रोध, अज्ञान यात गुरफटलो. मला या ज्ञान नौकेत बसवून कृपादृष्टी करून या देह-सागरातून तरुन न्या.”, असे म्हणून सिद्धांच्या चरणी नतमस्तक झाला.

तव बोलिला सिद्ध मुनि । न धरी चिंता अंतःकरणी ।
उठवीतसे आश्वासोनि । सांकडे फेडीन तुझे आता ॥२६॥
ज्यांसी नाही दृढ भक्ति । सदा दैन्ये कष्टती ।
श्रीगुरूवरी बोल ठेविती । अविद्यामाया वेष्टूनि ॥२७॥
संशय धरोनि मानसी । श्रीगुरु काय देईल म्हणसी ।
तेणे गुणे हा भोग भोगिसी । नाना कष्टे व्याकुळित ॥२८॥
सांडोनि संशय निर्धार । गुरुमूर्ति देईल अपार ।
ऐसा देव कृपासागर । तुज नुपेक्षी सर्वथा ॥२९॥
गुरुमूर्ति कृपासिंधु । प्रख्यात असे वेदा बोधु ।
तुझे अंतःकरणी वेधु । असे तया चरणांवरी ॥३०॥
तो दातार अखिल मही । जैसा मेघाचा गुण पाही ।
पर्जन्य पडतो सर्वां ठायी । कृपासिंधु ऐसा असे ॥३१॥
त्यांतचि पात्रानुसार । सांगेन साक्षी एक थोर ।
सखोल भूमि उदक स्थिर । उन्नती उदक नाही जाण ॥३२॥
दृढ भक्ति जाणा सखोल भूमि । दांभिक ओळखा उन्नत तुम्ही ।
याचिया कारणे मनोकर्मी । निश्चयावे श्रीगुरूसी ॥३३॥
म्हणोनि श्रीगुरुउपमा । ऐसा कणव असे महिमा ।
प्रपंच होय परब्रह्मा । हस्त मस्तकी ठेवोनिया ॥३४॥
कल्पतरूची द्यावी उपमा । कल्पिले लाभे त्याचा महिमा ।
न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरु ॥३५॥
ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ति । ख्याति असे श्रुतिस्मृती ।
संदेह सांडूनि एकचित्ती । ध्याय पदांबुज श्रीगुरूचे ॥३६॥

सिद्धमुनीं त्याला आश्वासन देऊन म्हणाले, “आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही, ते श्रीगुरुला बोल लावतात. श्रीगुरू काय देणार? असा विचार करतात, त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात, म्हणून तूसुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव. श्रीगुरू कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत. श्रीगुरु मेघदूतासारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढभक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते; पण श्रीगुरू कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणून तू निःसंदेह होऊन एकाग्रचित्ताने, परमश्रद्धेने गुरुभक्ती कर.”

इतके परिसोनि नामधारक । नमन करोनि क्षणैक ।
करसंपुट जोडोनि ऐक । विनवितसे सिद्धासी ॥३७॥
श्रीगुरू सिद्ध योगेश्वरा । कामधेनु कृपासागरा ।
विनवितसे अवधारा । सेवक तुमचा स्वामिया ॥३८॥
स्वामींनी निरोपिले सकळ । झाले माझे मन निर्मळ ।
वेध लागला असे केवळ । चरित्र श्रीगुरूचे ऐकावया ॥३९॥
गुरु त्रयमूर्ति ऐको कानी । का अवतरले मनुष्ययोनी ।
सर्व सांगावे विस्तारोनि । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥

नामधारकाने नमन करून विनवणी केली – “हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात. कृपासागर आहत. माझे मन आता स्वछ झाले आहे. आता श्रीगुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रैमूर्ती श्रीगुरू मनुष्ययोनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे.”

मग काय बोले योगींद्र । बा रे शिष्या तू पूर्णचंद्र ।
माझा बोधसमुद्र । कैसा तुवा उत्साहविला ॥४१॥
तूते महासुख लाधले । गुरुदास्यत्व फळले ।
परब्रह्म अनुभवले । आजिचेनि तुज आता ॥४२॥
हिंडत आलो सकळ क्षिति । कवणा नव्हे ऐशी मति ।
गुरुचरित्र न पुसती । तूते देखिले आजि आम्ही ॥४३॥
ज्यासी इहपरत्रींची चाड । त्यासी ही कथा असे गोड ।
त्रिकरणे करोनिया दृढ । एकचित्ते ऐकिजे ॥४४॥
तू भक्त केवळ श्रीगुरुचा । म्हणोनि भक्ति झाली उंचा ।
निश्चयो मानी माझिया वाचा । लाधसी चारी पुरुषार्थ ॥४५॥
धनधान्यादि संपत्ति । पुत्रपौत्र श्रुतिस्मृति ।
इह सौख्य आयुष्यगति । अंती गति असे जाणा ॥४६॥
गुरुचरित्र कामेधेनु । वेदशास्त्रसंमत जाणु ।
अवतरला त्रयमूर्ति आपणु । धरोनि नरवेष कलियुगी ॥४७॥
कार्याकारण अवतार । होऊनि येती हरिहर ।
उतरावया भूमिभार । भक्तजनाते तारावया ॥४८॥

नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, “वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्रीगुरुचरित्राविषयी  -“आम्हाला श्रीगुरुचरित्र सांगा” असे कोणीही म्हटले नाही. तूच पहिला मला भेटलास. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला हि सदबुद्धी झाली. आता तू काय-वाचा-मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी, संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगात ब्रह्मा-विष्णू-महेश मनुष्यरूपानें पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तेच श्रीगुरुदत्तात्रेय होय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात.”

ऐकोनि सिद्धाच वचना । प्रश्न करी शिष्यराणा ।
त्रयमूर्ति अवतार किंकारणा । देह धरोनि मानुषी ॥४९॥
विस्तारोनि ते आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागला चरणासी । करुणावचने करोनिया ॥५०॥

नामधारकाने विनविले – “ब्रह्मा विष्णू महेश यांनी मनुष्य देह का धारण केला, ते मला विस्तारपूर्वक सांगावे.”

सिद्ध म्हणे नामधारका । त्रयमूर्ति तीन गुण ऐका ।
आदिवस्तु आपण एका । प्रपंच वस्तु तीन जाणा ॥५१॥
ब्रह्मयाचा रजोगुण । सत्त्वगुन विष्णु जाण।
तमोगुण उमारमण । मूर्ति एकचि अवधारा ॥५२॥
ब्रह्मा सृष्टिरचनेसी । पोषक विष्णु परियेसी ।
रुद्रमूर्ति प्रळयासी । त्रयमूर्तीचे तीन गुण ॥५३॥
एका वेगळे एक न होती । कार्याकारण अवतार होती ।
भूमीचा भार फेडिती । प्रख्यात असे पुराणी ॥५४॥

सिद्ध म्हणाले – “प्रथम आदीवस्तु एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना (सत्व-रज-तम) अनुसरून तीन मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी आहेत. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात, विष्णू त्याचे पालन-पोषण करतात आणि शिवशंकर तिचा संहार करतात. हे तीन गुण अभिन्न आहेत. हि सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य. या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे तीच मी तुला सांगतो.”

सांगेन साक्ष आता तुज । अंबरीष म्हणिजे द्विज ।
एकादशीव्रताचिया काज । विष्णूसी अवतार करविले ॥५५॥
अवतार व्हावया कारण । सांगेन तुज विस्तारून ।
मन करोनि सावधान । एकचित्ते परियेसा ॥५६॥
द्विज करी एकादशीव्रत । पूजा करी अभ्यागत ।
निश्चयो करी दृढचित्त । हरिचिंतन सर्वकाळ ॥५७॥
असो त्याचिया व्रतासी । भंग करावया आला ऋषि ।
अतिथि होऊनि हठेसी । पावला मुनि दुर्वास ॥५८॥
ते दिवशी साधनद्वादशी घडी एक । आला अतिथि कारणिक ।
अंबरीषास पडला धाक । केवी घडे म्हणोनिया ॥५९॥
ऋषि आले देखोनि । अंबरीषाने अभिवंदोनि ।
अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली उपचारे ॥६०॥
विनवितसे ऋषीश्वरासी । शीघ्र जावे स्नानासी ।
साधन आहे घटिका द्वादशी । यावे अनुष्ठान सारोनिया ॥१॥
ऋषि जाऊनि जाऊनि नदीसी । अनुष्ठान करती विधींसी ।
विलंब लागता तयासी । आली साधन घटिका ॥६२॥
व्रत भंग होईल म्हणोनि । पारणे केले तीर्थ घेऊनि ।
नाना प्रकार पक्वानी । पाक केला ऋषीते ॥६३॥
तव आले दुर्वास देखा । पाहूनि अंबरीषाच्या मुखा ।
म्हणे भोजन केलेसि का । अतिथीविण दुरात्मया ॥६४॥
शाप देता ऋषीश्वर । राजे स्मरला शार्ङ्गधर ।
करावया भक्ताचा कैवार । टाकून आला वैकुंठा ॥६५॥
भक्तवत्सल नारायण । शरणागताचे रक्षण ।
बिरूद बोलती पुराणे जाण । धावे धेनु वत्सासि जैसी ॥६६॥
शापिले ऋषीने द्विजासी । जन्मावे गा अखिल योनीसी ।
तव पावला ह्रषीकेशी । येऊनि जवळी उभा ठेला ॥६७॥

अंब ऋषींनी (त्यांना अंबरीष असेही म्हणतात.)" द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. ती कथा ऐक, अंबरीष ऋषींनी द्वादशी व्रत सुरु केले होते. ते नित्य अतिथी-अभ्यंगताची पूजा करून सर्वकाळ हरीचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञा आहे. अंबरीषांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहित होती. त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीषाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे; पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीषांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होत. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परीस्थितीत अंबरीषांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नानसंध्यादि करण्यासाठी नदीवर गेले." सत्वर परत या" असे अंबरीषांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासांचा पत्ताच नव्हता. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीषांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीषांकडे रागाने पाहून म्हणाले,"अरे दुरात्म्या, अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस ? थांब मी तुला शाप देतो." हे शब्द ऐकताच अंबरीष घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली,"अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनींत जन्म घ्यावा लागेल." ही शापवाणी ऐकताच अंबरीष दुःखाने रडू लागले आणि भगवान विष्णूच्या धावा करू लागले.

मिथ्या नव्हे ऋषीचे वचन । द्विजे धरिले श्रीविष्णुचे चरण ।
भक्तवत्सल ब्रीद जाण । तया महाविष्णूचे ॥६८॥
विष्णु म्हणे दुर्वासासी । तुवा शापिले अंबरीषासी ।
राखीन आपुल्या दासासी । शाप आम्हासी तुम्ही द्यावा ॥६९॥
दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर । केवळ ईश्वर अवतार ।
फेडावयास भूमिभार । कारण असे पुढे म्हणतसे ॥७०॥
जाणोनि ज्ञानीशिरोमणी । म्हणे तप करितां युगे क्षोणी ।
भेटी नव्हे हरिचरणी । भूमीवरी दुर्लभ ॥७१॥
शापसंबंधे अवतरोनि । येईल लक्ष्मी घेऊनि ।
तारावयालागोनी । भक्तजना समस्ता ॥७२॥
परोपकारसंबंधेसी । शाप द्यावा विष्णुसी ।
भूमिभार फेडावयासी । कारण असे म्हणोनिया ॥७३॥
ऐसे विचारोनि मानसी । दुर्वास म्हणे विष्णूसी ।
अवतरोनी भूमीसी । नाना स्थानी जन्मावे ॥७४॥
प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्ण दहा ।
सहज तू विश्वात्मा महा । स्थूळसूक्ष्मी वससी तू ॥७५॥
ऐसा कार्यकारण शाप । अंगिकारी जगाचा बाप ।
दुष्टांवरी असे कोप । सृष्टिप्रतिपाळ करावया ॥७६॥
ऐसे दहा अवतार झाले । असे तुवा कर्णी ऐकिले ।
महाभागवती विस्तारिले । अनंतरूपी नारायण ॥७७॥
कार्यकारण अवतार होती । क्वचित्प्रकट क्वचित्‍ गुप्ती ।
ते ब्रह्मज्ञानी जाणती । मूढमति काय जाणे ॥७८॥

त्याचक्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, “मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन.” दुर्वास हे परमज्ञानी होते, ते ईश्वराचा अवतार होते, क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला. या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरीचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेइल. दुष्ट-दुर्जनांचा नाश करून संतसज्जनांचे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले, “हे श्रीहरी, तुम्ही पूर्णब्रह्म, विश्वात्मा आहात. तुम्ही परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानीं, विविध वेळी, विविध योनींत असे दहा अवतार घ्या.” भगवान विष्णुंनी ते मान्य केले.

त्यानुसार भगवान विष्णूनी मत्स्य, कूर्म, वरहादि दहा अवतार घेतले. हे अवतार कार्यकारणपरत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना हे समजते.

आणीक सांगेन तुज । विनोद झालासे सहज ।
अनुसया अत्रिऋषीची भाज । पतिव्रताशिरोमणी ॥७९॥
तिचे गृही जन्म जाहले । त्रयमूर्ति अवतरले ।
कपटवेष धरोनि आले । पुत्र जाहले तियेचे ॥८०॥
नामधारक पुसे सिद्धासी । विनोदकथा निरोपिलीसी ।
देव अतिप्रकट वेषी । पुत्र जाहले कवणे परी ॥८१॥
अत्रि ऋषि पूर्वी कवण । कवणापासूनि उत्पन्न ।
मूळ पुरुष होता कवण । विस्तारोनि मज सांगावे ॥८२॥
म्हणे सरस्वती गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकता होय मनोहर । सकलांभीष्टे साधती ॥८३॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अंबरीषव्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥८३॥

॥ ओवीसंख्या ॥८३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

 

ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, “आता मी तुला एक गंमतीची कथा म्हणजे श्रीदत्तजन्माची कथा सांगतो. अनसूया ही अत्रीऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव कपटवेष धारण करून आले, परंतु अनसूयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले.” हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, “ते त्रिदेव कपटवेष धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते ? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रीऋषी पूर्वी कोण होते ? त्यांचा मूळ पुरुष कोण ? हे सगळे मला सविस्तर सांगा.”

अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'अंबरीष आख्यान' नावाचा अध्याय तिसरा समाप्त.

॥ ओवीसंख्या ॥८३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री गुरुचरित्र – अध्याय ०३ Read More »

श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुचरित्र – अध्याय ०२

अध्याय – ०२

कलियुग वर्णन - गुरुमहात्म्य संदीपक आख्यान

 

॥ श्री गणेशाय नमः॥
त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा ।
सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥
ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित ।
अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥
क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित ।
कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥
रूप दिसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मांकित ।
व्याघ्रचर्म परिधानित । पीतांबर कासे देखा ॥४॥
येऊनि योगीश्वर जवळी । भस्म लाविले कपाळी ।
आश्वासूनि तया वेळी । अभयकर देतसे ॥५॥
इतुके देखोनि सुषुप्तीत । चेतन झाला नामांकित ।
चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तया वेळी ॥६॥
मूर्ति देखिली सुषुप्तीत । तेचि ध्यातसे मनात ।
पुढे निघाला मार्ग क्रमित । प्रत्यक्ष देखे तैसाचि ॥७॥

"हे त्रैमुर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णानदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते." असे श्रीगुरुंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरू दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडेतिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले.

 

देखोनिया योगीशाते । करिता झाला दंडवते ।
कृपा भाकी करुणवक्त्रे । माता पिता तू म्हणतसे ॥८॥
जय जयाजी योगाधीशा । अज्ञानतमविनाशा ।
तू ज्योतिःप्रकाशा । कृपानिधि सिद्धमुनी ॥९॥
तुझे दर्शने निःशेष । गेले माझे दुरितदोष ।
तू तारक आम्हास । म्हणोनि आलासि स्वामिया ॥१०॥
कृपेने भक्तालागुनी । येणे झाले कोठोनि ।
तुमचे नाम कवण मुनि । कवणे स्थानी वास तुम्हा ॥११॥
सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडो तीर्थ भूमीस्वर्गी ।
प्रसिद्ध आमुचा गुरु जनी । नृसिंहसरस्वती विख्यात ॥१२॥
त्यांचे स्थान गाणगापूर । अमरजासंगम भीमातीर ।
त्रयमूर्तीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती ॥१३॥
भक्त तारावयालागी । अवतार त्रयमूर्ति जगी ।
सदा ध्याती अभ्यासयोगी । भवसागर तरावया ॥१४॥
ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजना सदा वरदु ।
अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥१५॥
त्याचे भक्ता कैचे दैन्य । अखंड लक्ष्मी परिपूर्ण ।
धनधान्यादि गोधन । अष्टैश्वर्ये नांदती ॥१६॥

नामधरकाने धावत जाऊन त्या योगी पुरुषाला दंडवत घातला आणि म्हणाला, “हे कृपासागर, आपला जयजयकार असो! आज आपल्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. आपण तर अज्ञानरूपी अंधार नाहीसे करणारे साक्षात सूर्यच आहात. माझा उद्धार करण्यासाठीच आपण येथे आले आहात. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता?”
नामधारकाने असे विचारले असता, ते सिद्धयोगी म्हणाले, “मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु श्रीनृसिंहसरस्वती भीमा-अमरजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापुर येथे असतात. ते त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो, त्यांचे घर धन,धान्यांनी, गोधनादी अष्टैश्वर्याने भरलेले असते.”

 

ऐसे म्हणे सिद्ध मुनि । ऐकोनि विनवी नामकरणी ।
आम्ही असती सदा ध्यानी । तया श्रीगुरुयतीचे ॥१७॥
ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति । सांगतसे सिद्ध यति ।
वंशोवंशी करितो भक्ति । कष्ट आम्हा केवी पाहे ॥१८॥
तू तारक आम्हांसी । म्हणोनि माते भेटलासी ।
संहार करोनि संशयासी । निरोपावे स्वामिया ॥१९॥

सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, “मी सुद्धा त्या श्रीगुरुंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती-उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे? माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहत. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा.”

 

सिद्ध म्हणे तये वेळी । ऐक शिष्या स्तोममौळी ।
गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी । भक्तवत्सल परियेसा ॥२०॥
गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य दिसे कैचे त्यासी ।
समस्त देव त्याचे वंशी । कळिकाळासी जिंके नर ॥२१॥
ऐसी वस्तु पूजूनी । दैन्यवृत्ति सांगसी झणी ।
नसेल तुजे निश्चय मनी । म्हणोनि कष्ट भोगितोसी ॥२२॥
त्रयमूर्ति श्रीगुरु । म्हणोनि जाणिजे निर्धारू ।
देऊ शकेल अखिल वरू । एका भावे भजावे ॥२३॥
एखादे समयी श्रीहरि । अथवा कोपे त्रिपुरारि ।
रक्षील श्रीगुरु निर्धारी । आपुले भक्तजनांसी ॥२४॥
आपण कोपे एखाद्यासी । रक्षू न शके व्योमकेशी ।
अथवा विष्णु परियेसी । रक्षू न शके अवधारी ॥२५॥

नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "अरे जटाधारी शिष्या, श्रीगुरू भक्तवत्सल आहेत, त्यांची कृपा लहान-मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दु:ख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्रीगुरुची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीन-दु:खी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की, तुझी त्यांच्यावर दृढभक्ती नाही, श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नानाप्रकारची दु:खे भोगावी लागत आहेत. श्रीगुरुदत्तात्रेय ब्रह्म-विष्णू-महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी एक लक्षात ठेव, जर हरी-हरांचा कोप झाला तर श्रीगुरू आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्रीगुरूच जर कोपले तर हरी-हरसुद्धा रक्षण करू शकत नाही."

 

ऐसे ऐकोनि नामकरणी । लागे सिद्धाचिया चरणी ।
विनवीतसे कर जोडुनी । भक्तिभावे करोनिया ॥२६॥
स्वामी ऐसा निरोप देती । संदेह होता माझे चित्ती ।
गुरु केवी झाले त्रिमूर्ति । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥२७॥
आणीक तुम्ही निरोपिलेती । विष्णु रुद्र जरी कोपती ।
राखो शके गुरु निश्चिती । गुरु कोपलिया न रक्षी कोणी ॥२८॥
हा बोल असे कवणाचा । कवण शास्त्रपुराणींचा ।
संदेह फेडी गा मनाचा । जेणे मन दृढ होय ॥२९॥
येणेपरी नामकरणी । सिद्धांसी पुसे वंदोनि ।
कृपानिधि संतोषोनि । सांगतसे परियेसा ॥३०॥

सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला, “स्वामी, आपण सांगता त्या विषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरुदत्तात्रेय हे ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय? आपण असेही सांगितले की, हरि-हर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरूच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? हे वचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा.”

 

सिद्ध म्हणे शिष्यासी ।
तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥३१॥
वेद चारी उत्पन्न । झाले ब्रह्मयाचे मुखेकरून ।
त्यापासाव पुराण । अष्टादश विख्यात ॥३२॥
तया अष्टादशांत । ब्रह्मवाक्य असे ख्यात ।
पुराण ब्रह्मवैवर्त । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥३३॥
नारायण विष्णुमूर्ति । व्यास झाला द्वापारांती ।
प्रकाश केला या क्षिती । ब्रह्मवाक्यविस्तारे ॥३४॥
तया व्यासापासुनी । ऐकिले समस्त ऋषिजनी ।
तेचि कथा विस्तारोनि । सांगेन ऐका एकचित्ती ॥३५॥

सिद्ध म्हणाले, “नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद-रचनेच्या साक्षीने देतो, ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाले. त्या अठरा पुराणांत ‘ब्रह्मवैवर्त’ नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापारयुगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्रचित्ताने श्रवण कर.”

 

चतुर्मुख ब्रह्मयासी । कलियुग पुसे हर्षी ।
गुरुमहिमा विनवीतसे करद्वय जोडोनि । भावभक्ति करोनिया ॥३७॥
म्हणे सिद्धा योगीश्वरा । अज्ञानतिमिरभास्करा ।
तू तारक भवसागरा । भेटलासी कृपासिंधु ॥३८॥
ब्रह्मदेवे कलियुगासी । सांगितले केवी कार्यासी ।
आद्यंत विस्तारेसी । निरोपिजे स्वामिया ॥३९॥

कलीयुगाने नमनपूर्वक विनवणी केली असता ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, “गुरुदेव, तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले? ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगा.”

 

ऐक शिष्या एकचित्ता । जधी प्रळय झाला होता ।
आदिमूति निश्चिता । होते वटपत्रशयनी ॥४०॥
अव्यक्तमूर्ति नारायण । होते वटपत्री शयन ।
बुद्धि संभवे चेतन । आणिक सृष्टि रचावया ॥४१॥
प्रपंच म्हणजे सृष्टिरचना । करणे म्हणोनि आले मना ।
जागृत होय या कारणा । आदिपुरुष तये वेळी ॥४२॥
जागृत होवोनि नारायण । बुद्धि संभवे चेतन ।
कमळ उपजवी नाभीहून । त्रैलोक्याचे रचनाघर ॥४३॥
तया कमळामधून । उदय झाला ब्रह्मा आपण ।
चारी दिशा पाहोन । चतुर्मुख झाला देखा ॥४४॥
म्हणे ब्रह्मा तये वेळी । समस्ताहुनी आपण बळी ।
मजहून आणिक बळी । कवण नाही म्हणतसे ॥४५॥
हासोनिया नारायणु । बोले वाचे शब्दवचनु ।
आपण असे महाविष्णु । भजा म्हणे तया वेळी ॥४६॥
देखोनिया श्रीविष्णुसी । नमस्कारी ब्रह्मा हर्षी ।
स्तुति केली बहुवसी । अनेक काळ परियेसा ॥४७॥
संतोषोनि नारायण । निरोप दिधला अतिगहन ।
सृष्टि रची गा म्हणून । आज्ञा दिधली तये वेळी ॥४८॥
ब्रह्मा म्हणे विष्णुसी । नेणे सृष्टि रचावयासी ।
देखिली नाही कैसी । केवी रचू म्हणतसे ॥४९॥

नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर - जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदीमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरुपात वडाच्या पानावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झालें. त्यांनी चारी दिशांना पाहिले आणि ते चतुर्मुख झालें. ते स्वत:शीच म्हणाले, “मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही.” त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले. “मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर.”
हे ऐकताच ब्रम्हदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णुंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, “हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही. मग मी काय करू?”

 

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । निरोपि त्यासी महाविष्णु आपण ।
वेद असती हे घे म्हणोन । देता झाला तये वेळी ॥५०॥
सृष्टि रचावयाचा विचार । असे वेदांत सविस्तार ।
तेणेचि परी रचुनी स्थिर । प्रकाश करी म्हणितले ॥५१॥
अनादि वेद असती जाण । असे सृष्टीचे लक्षण ।
जैसा आरसा असे खूण । सृष्टि रचावी तयापरी ॥५२॥
या वेदमार्गे सृष्टीसी । रची गा ब्रह्मया अहर्निशी ।
म्हणोनि सांगे ह्रषीकेशी । ब्रह्मा रची सृष्टिते ॥५३॥

ब्रम्हदेवाचा प्रश्न ऐकून भगवान विष्णुंनी आपण महाविष्णू असल्याचे सांगितले आणि ब्रम्हदेवाला चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णुंनी अशी आज्ञा केली असता, ब्रह्मदेवांनी दिवस रात्र सृष्टी निर्माण केली.

 

सृजी प्रजा अनुक्रमे । विविध स्थावरजंगमे ।
स्वेदज अंडज नामे । जारज उद्‍भिजे उपजविले ॥५४॥
श्रीविष्णुचे निरोपाने । त्रिजग रचिले ब्रह्मयाने ।
ज्यापरी सृष्टिक्रमणे । व्यासे ऐसी कथियेली ॥५५॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । नारायण वेदव्यास ऋषि ।
विस्तार केला पुराणांसी । अष्टादश विख्यात ॥५६॥
तया अष्टादशांत । पुराण ब्रह्मवैवर्त ।
ऋषेश्वरासी सांगे सूत । तेचि परी सांगतसे ॥५७॥
सनकादिकांते उपजवोनि । ब्रह्मनिष्ठ निर्गुणी ।
मरीचादि ब्रह्म सगुणी । उपजवी ब्रह्मा तये वेळी ॥५८॥
तेथोनि देवदैत्यांसी । उपजवी ब्रह्मा परियेसी ।
सांगतो कथा विस्तारेसी । ऐक आता शिष्योत्तमा ॥५९॥

भगवान विष्णुंनी अशी आज्ञा केली असता, ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यांत स्वेदज (घामापासून उत्पन्न होणारे), अंडज (अंड्यातून उत्पन्न होणारे), जारज (वीर्यातून उत्पन्न होणारे) व उद्भिज (उगवणारे वृक्ष) अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली. महर्षी वेद व्यासांनी पुराणांचा विस्तार करून ब्रम्हवैवर्त पुराणाची रचना केली. मग त्यांने सनकादिक मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले.

 

कृत त्रेता द्वापार युग । उपजवी मग कलियुग ।
एकेकाते निरोपी मग । भूमीवरी प्रवर्तावया ॥६०॥
बोलावूनि कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी ।
तुवा जावोनि भूमीसी । प्रकाश करी आपणाते ॥६१॥
ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कृतयुग आले संतोषोन ।
सांगेन त्याचे लक्षण । ऐका श्रोते एकचित्ते ॥६२॥
असत्य नेणे कधी वाचे । वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे ।
यज्ञोपवीत आरंभण त्याचे । रुद्राक्षमाळा करी कंकणे ॥६३॥
येणे रूपे युग कृत । ब्रह्मयासी असे विनवित ।
माते तुम्ही निरोप देत । केवी जाऊ भूमीवरी ॥६४॥

मग ब्रह्मदेवांनी कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली. ही चार युगे ब्रम्हदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होत. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठविले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्यसंपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्रवस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येउन लोकांना सत्वगुणी, सत्प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला.

 

भूमीवरी मनुष्य लोक । असत्य निंदा अपवादक ।
माते न साहवे ते ऐक । कवणे परी वर्तावे ॥६५॥
ऐकोनि सत्ययुगाचे वचन । निरोपीतो ब्रह्मा आपण ।
तुवा वर्तावे सत्त्वगुण । क्वचित्त्‌काळ येणेपरी ॥६६॥
न करी जड तूते जाण । आणिक युग पाठवीन ।
तुवा रहावे सावध होऊन । म्हणूनि पाठवी भूमीवरी ॥६७॥
वर्तता येणेपरी ऐका । झाली अवधि सत्याधिका ।
बोलावूनि त्रेतायुगा देखा । निरोपी ब्रह्मा परियेसा ॥६८॥
पृथ्वीवरील लोक सत्वगुणी होते. असत्य, निंदनीय गोष्टी अपवादात्मक होत्या. सत्ययुगाचा अवधी पूर्ण झाला असता ब्रह्मदेवाने त्रेतायुगाला पृथ्वीवर अवतरण्याची आज्ञा केली.

 

त्रेतायुगाचे लक्षण । ऐक शिष्या सांगेन ।
असे त्याची स्थूल तन । हाती असे यज्ञसामग्री ॥६९॥
त्रेतायुगाचे कारण । यज्ञ करिती सकळ जन ।
धर्मशास्त्रप्रवर्तन । कर्ममार्ग ब्राह्मणांसी ॥७०॥
हाती असे कुश समिधा ऐसे । धर्मप्रवर्तक सदा वसे ।
ऐसे युग गेले हर्षे । निरोप घेऊनि भूमिवरी ॥७१॥

त्रेतायुगाची लक्षणे सांगतो ती ऐक - त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होत. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्यानें पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले.

 

बोलावूनि ब्रह्मा हर्षी । निरोप देत द्वापारासी ।
सांगेन तयाचे रूपासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥७२॥
खड्गे खट्वांग धरोनि हाती । धनुष्य बाण एके हाती ।
लक्षण उग्र असे शांति । निष्ठुर दया दोनी असे ॥७३॥
पुण्य पाप समान देखा । स्वरूपे द्वापार असे निका ।
निरोप घेऊनि कौतुका । आला आपण भूमीवरी ॥७४॥

मग ब्रह्मदेवांनी द्वापारयुगाला पृथ्वीवर पाठविले. द्वापार युगाची लक्षणे सांगतो ती ऐक - त्याच्या हातात खट्वांग व धनुष्यबाण हि शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान असे दोन्ही होते. त्या युगात पाप-पुण्य समान होते, असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले.

 

त्याचे दिवस पुरल्यावरी । कलियुगाते पाचारी ।
जावे त्वरित भूमीवरी । म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा ॥७५॥
ऐसे कलियुग देखा । सांगेन लक्षणे ऐका ।
ब्रह्मयाचे सन्मुखा । केवी गेले परियेसा ॥७६॥
विचारहीन अंतःकरण । पिशाचासारखे वदन ।
तोंड खालते करुन । ठायी ठायी पडतसे ॥७७॥
वृद्ध आपण विरागहीन । कलह द्वेष संगे घेऊन ।
वाम हाती धरोनि शिश्न । येत ब्रह्मयासन्मुख ॥७८॥
जिव्हा धरोनि उजवे हाती । नाचे केली अतिप्रीती ।
दोषोत्तरे करी स्तुति । पुण्यपापसंमिश्र ॥७९॥
हासे रडे वाकुल्या दावी । वाकुडे तोंड मुखी शिवी ।
ब्रह्मयापुढे उभा राही । काय निरोप म्हणोनिया ॥८०॥
देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन ।
पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥
कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी ।
लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥
याकारणे लिंग जिव्हा । धरोनि नाचे ब्रह्मदेवा ।
जेथे मी जाईन स्वभावा । आपण न भिये कवणाते ॥८३॥
ऐकोनि कलीचे वचन । निरोप देत ब्रह्मा आपण ।
भूमीवरी जाऊन । प्रकाश करी आपुले गुणे ॥८४॥

द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. विचारहीन अंत:करण, पिशाच्चाप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरुपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झालें. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरले होते. ते कलियुग रडत, हसत, शिव्या देत, नाचत-नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे रहिले आणि बोलावण्याचे कारण विचारले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले, “तू लिंग आणि जीभ का धरली आहेस?” असे विचारले असता कलियुग म्हणाले, “मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी, रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही.”

 

कलि म्हणे ब्रह्मयासी । मज पाठविता भूमीसी ।
आपुले गुण तुम्हांसी । सांगेन ऐका स्वामिया ॥८५॥
उच्छेद करीन धर्मासी । आपण असे निरंकुशी ।
निरानंद परियेसी । निंदा कलह माझेनी ॥८६॥
परद्रव्यहारक परस्त्रीरत । हे दोघे माझे भ्रात ।
प्रपंच मत्सर दंभक । प्राणसखे माझे असती ॥८७॥
बकासारिखे संन्यासी । तेचि माझे प्राण परियेसी ।
छळण करोनि उदरासी । मिळविती पोषणार्थ ॥८८॥
तेचि माझे सखे जाण । आणीक असतील पुण्यजन ।
तेचि माझे वैरी जाण । म्हणोनि विनवी ब्रह्मयासी ॥८९॥

ब्रह्मदेवांनी कलियुगाला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा कलियुग ब्रह्मदेवाला म्हणाले – “मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणांस माहित आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्यासी कपटकारस्थान करून आपले पोट भरणारे, माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू, वैरी होत.”

 

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । सांगे तुज उपदेशी ।
कलियुगी आयुष्य नरासी । स्वल्प असे एक शत ॥९०॥
पूर्व युगांतरी देखा । आयुष्य बहु मनुष्यलोका ।
तप अनुष्ठान ऐका । करिती अनेक दिवसवरी ॥९१॥
मग होय तयांसी गती । आयुष्य असे अखंडिती ।
याकारणे क्षिती कष्टती । बहु दिवसपर्यंत ॥९२॥
तैसे नव्हेचि कलियुग जाण । स्वल्प आयुष्य मनुष्यपण ।
करिती तप अनुष्ठान । शीघ्र पावती परमार्था ॥९३॥
जे जन असती ब्रह्मज्ञानि । पुण्य करितील जाणोनि ।
त्यास तुवा साह्य होऊनि । वर्तत असे म्हणे ब्रह्मा ॥९४॥

कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, “पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घकाळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार तर शंभर वर्षे आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थप्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस.”

 

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कली म्हणतसे नमोन ।
स्वामींनी निरोपिले जे जन । तेचि माझे वैरी असती ॥९५॥
ऐसे वैरी जेथे असती । केवी जाऊ तया क्षिती ।
ऐकता होय मज भीति । केवी पाहू तयासी ॥९६॥
पंचशत भूमंडळात । भरतखंडी पुण्य बहुत ।
मज मारितील देखत । कैसा जाऊ म्हणतसे ॥९७॥

ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, “आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत. असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ”?

 

ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा निरोपी हासोन ।
काळात्म्याते मिळोन । तुवा जावे भूमीसी ॥९८॥
काळात्म्याचे ऐसे गुण । धर्मवासना करिल छेदन ।
पुण्यात्म्याचे अंतःकरण । उपजेल बुद्धि पापाविषयी ॥९९॥
कली म्हणे ब्रह्मयासी । वैरी माझे परियेसी ।
वसतात भूमंडळासी । सांगेन स्वामी ऐकावे ॥१००॥

ब्रह्मदेव म्हणाले, “तू कलीकाळाच्या संगतीने भूलोकावर गेलास की धर्म भावनेला छेद जाईल. पुण्यात्म्यांचे अंत:करण पापाकडे आकृष्ट होईल.”

 

उपद्रविती माते बहुत । कृपा न ये मज देखत ।
जे जन शिवहरी ध्यात । धर्मरत मनुष्य देखा ॥१॥
आणिक असती माझे वैरी । वास करिती गंगातीरी ।
आणिक वाराणशीपुरी । जाऊनि धर्म करिती देखा ॥२॥
तीर्थे हिंडती जे चरणे । आणिक ऐकती पुराणे ।
जे जन करिती सदा दाने । तेचि माझे वैरी जाण ॥३॥
ज्यांचे मनी वसे शांति । तेचि माझे वैरी ख्याति ।
अदांभिकपणे पुण्य करिती । त्यांसी देखता भीतसे ॥४॥
नासाग्री दृष्टि ठेवुनी । जप करिती अनुष्ठानी ।
त्यासि देखताचि नयनी । प्राण माझा जातसे ॥५॥
स्त्रियांपुत्रांवरी प्रीति । मायबापा अव्हेरिती ।
त्यावरी माझी बहु प्रीति । परम इष्ट माझे जाणा ॥६॥
वेदशास्त्रांते निंदिती । हरिहरांते भेद पाहती ।
अथवा शिव विष्णु दूषिती । ते परम आप्त माझे जाणा ॥७॥
जितेंद्रिय जे असती नर । सदा भजती हरिहर ।
रागद्वेषविवर्जित धीर । देखोनि मज भय ॥८॥
ब्रह्मा म्हणे कलियुगासी । तुझा प्रकाश बहुवसी ।
तुवा जाताचि भूमीसी । तुझे इच्छे रहाटतील ॥९॥
एखादा विरळागत । होईल नर पुण्यवंत ।
त्याते तुवा साह्य होत । वर्तावे म्हणे ब्रह्मा ॥११०॥
ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कलियुग करीतसे नमन ।
करसंपुट जोडोन । विनवितसे परियेसा ॥११॥
माझ्या दुष्ट स्वभावासी । केवी साह्य व्हावे धर्मासी ।
सांगा स्वामी उपायासी । कवणेपरी रहाटावे ॥१२॥

कलियुग म्हणाले – “परमात्मा भक्तीत लीन असा धर्माचरणी मनुष्य पाहिल्यास मला वेदना होतात. जे लोक गंगातीरी काशी, वाराणशी येथे धर्म करतात ते माझे वैरी होत. जे सदा दानधर्म करून पुराण श्रवण करतात ते मला वैरी वाटतात. जे जप-तप करतात त्यांना पाहून मला प्राणभय वाटते. जे आपल्या स्त्री-पुत्रांवर प्रेम करून आई-बापास अव्हेरतात ते माझे परमस्नेही आहेत. जे वेदशास्त्रांची निंदा करून, हरी हरांना दूषणे देतात, ते माझे आप्त होय. जे हरीहर भक्तीत लीन आहेत, जितेंद्रिय आहेत त्यांना पाहून मला भय वाटते.”
कलियुगाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले – “तू पृथ्वीवर जाताच तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. एखादाच मनुष्य पुण्यवंत होईल. त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही, त्याला तू सहाय्य कर. बाकी सगळेच तुला वश होतील”.
कलियुग म्हणाले, “मी दुष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील, पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार?”

 

कलीचे वचन ऐकोनि । ब्रह्मा हसे अतिगहनि ।
सांगतसे विस्तारोनि । उपाय कलीसी रहाटावया ॥१३॥
काळ वेळ असती दोनी । तुज साह्य होउनी ।
येत असती निर्गुणी । तेचि दाविती तुज मार्ग ॥१४॥
निर्मळ असती जे जन । तेचि तुझे वैरी जाण ।
मळमूत्रे जयासी वेष्टन । ते तुझे इष्ट परियेसी ॥१५॥
याचि कारणे पापपुण्यासी । विरोध असे परियेसी ।
जे अधिक पुण्यराशी । तेचि जिंकिती तुज ॥१६॥
या कारणे विरळागत । होतील नर पुण्यवंत ।
तेचि जिंकिती निश्चित । बहुतेक तुज वश्य होती ॥१७॥
एखादा विवेकी जाण । राहे तुझे उपद्रव साहोन ।
जे न साहती तुझे दारुण । तेचि होती वश्य तुज ॥१८॥
या कारणे कलियुगाभीतरी । जन्म होतील येणेपरी ।
जे जन तुझेचि परी । न होय त्या ईश्वरप्राप्ति ॥१९॥

कलियुगाचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेवांनी त्यास सविस्तर उपाय सांगितला तो असा – काळ आणि वेळ दोन्ही तुला सहाय्यभूत होऊन मार्ग दाखवतील. निर्मळ मनाचे लोक तुझे वैरी समज, तर कपटी कुटील मनाचे लोक तुझे आप्त समज. याचमुळे पाप आणि पुण्य यात संघर्ष असेल. ज्यांच्या जवळ अधिक पुण्य धन असेल ते तुझ्यावर मात करतील. यामुळे पुण्यवंत मनुष्य दुर्लभ होतील आणि तेच तुला जिंकतील, बाकी सर्व तुला वश होतील. जे विवेकी लोक असतील तेच तुझा उपद्रव सहन करू शकतील, बाकी तुला वश होतील. यामुळे कलियुगात जन्म घेणारी व्यक्ती तुझीच होऊन ईश्वरप्राप्ती दुर्लभ होईल.

 

ऐकोनि ब्रह्मदेवाचे वचन । कलियुग करितसे प्रश्न ।
कैसे साधूचे अंतःकरण । कवण असे निरोपावे ॥१२०॥
ब्रह्मा म्हणे तये वेळी । एकचित्ते ऐक कली ।
सांगेन ऐका श्रोते सकळी । सिद्ध म्हणे शिष्यासी ॥२१॥
धैर्य धरोनि अंतःकरण । शुद्ध बुद्ध वर्तती जन ।
दोष न लागती कधी जाण । लोभवर्जित नरांसी ॥२२॥
जे नर भजनी हरिहरांसी । अथवा असती काशीनिवासी ।
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लगे दोष ॥२३॥
मातापिता सेवकासी । अथवा सेवी ब्राह्मणासी ।
गायत्री कपिला धेनूसी । भजणारांसी न लगे दोष ॥२४॥
वैष्णव अथवा शैवासी । जे सेविती नित्य तुळसीसी ।
आज्ञा माझी आहे ऐसी । तयासी बाधू नको ॥२५॥
गुरुसेवक असती नर । पुराण श्रवण करणार ।
सर्वसाधनधर्मपर । त्याते तुवा न बाधावे ॥२६॥
सुकृती शास्त्रपरायणासी । गुरूते सेवित वंशोवंशी ।
विवेके धर्म करणारासी । त्याते तुवा न बाधावे ॥२७॥

ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकल्यावर कलीयुगाने विचारले – मग मी सज्जनांशी कसे वर्तावे? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले – “मग एकचित्ताने ऐक तर – जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, धैर्यशील असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरुंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री व कपिलाधेनु यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरुंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे, सद्विवेक जपणारे असे जे लोक असतील, त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे.”

 

कलि म्हणे ब्रह्मयासी । गुरुमहिमा आहे कैशी ।
कवण गुरुस्वरूपे कैसी । विस्तारावे मजप्रति ॥२८॥
ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा सांगतसे आपण ।
गकार म्हणजे सिद्ध जाण । रेफः पापस्य दाहकः ॥२९॥
उकार विष्णुरव्यक्त । त्रितयात्मा श्रीगुरु सत्य ।
परब्रह्म गुरु निश्चित । म्हणोनि सांगे कलीसी ॥१३०॥

कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले “गुरु, या शब्दाचा अर्थ काय? त्याचे स्वरूप कसे असते? गुरुचे माहात्म्य कोणते?" ब्रह्मदेव म्हणाले – “'ग +उ' व 'र + ऊ' मिळून 'गुरु' शब्द होतो. यातील गकार म्हणजे 'ग्' हे अक्षर गणेशवाचक आहे, 'उ' हे विष्णूवाचक व 'र' हे अग्निवाचक आहे. हे आहे परब्रह्म गुरूचे रूप.”

 

श्लोक ॥ गणेशो वाऽग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः ॥३१॥
टीका ॥ गणेशाते म्हणती गुरु । तैसाचि असे वैश्वानरू ।
ऐसाचि जाण शार्ङ्गधरू । गुरुशब्द वर्ते इतुके ठायी ॥३२॥
श्लोक ॥ गुरुः पिता गुरुर्माता । गुरुरेव परः शिवः ।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन ॥३३॥
टीका ॥ गुरु आपला मातापिता । गुरु शंकरु निश्चिता ।
ईश्वरु होय जरि कोपता । गुरु रक्षील परियेसा ॥३३॥
गुरु कोपेल एखाद्यासी । ईश्वर न राखे परियेसी ।
ईश्वरू कोपेल ज्या नरासी । श्रीगुरु रक्षी निश्चये ॥३५॥
श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेकः परं ब्रह्म तस्मातगुरुमुपाश्रयेत ॥३६॥
टीका ॥ गुरु ब्रह्मा सत्य जाण । तोचि रुद्र नारायण ।
गुरुचि ब्रह्म कारण । म्हणोनि गुरु आश्रावा ॥३७॥
श्लोक ॥ हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुअक्तिमव्ययाम्‍ ।
गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः ॥३८॥
टीका ॥ ईश्वर जरी प्रसन्न होता । त्यासी गुरु होय ओळखविता ।
गुरु आपण प्रसन्न होता । ईश्वर होय आधीन आपुल्या ॥३९॥
श्लोक ॥ गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्ति तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् ।
आचारवर्णादिविवेकयज्ञान् ज्ञानं परं भक्तिविवेकयुक्तम् ॥१४०॥
टीका ॥ गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनि । तीर्थव्रतयोगतपादि मुनी ।
आचारवर्णादि ज्ञानी । ज्ञान परम भक्तिविवेकयुक्त ॥४१॥
या कारणे श्रीगुरुसी । भजावे शास्त्रमार्गेसी ।
तीर्थव्रतयागतपासी । ज्योतिःस्वरूप असे जाणा ॥४२॥
आचारधर्मावर्णाश्रमांसी । विवेकधर्ममार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी ।
गुरुचि मार्ग दाविणार ॥४३॥

गुरु शब्द धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे. गुरु हेच माता पिता आहेत, शिव आहेत. शिव शंकर कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रह्मा-विष्णू-महेश आहे. गुरु हेच साक्षात परब्रम्ह आहे. म्हणून सदैव गुरूची-सद्गुरूची सेवा करावी. वैष्णवजन 'गुरुभक्ती अखंड राहो!' अशी प्रार्थना करतात. गुरूंमूळेच ईश्वर प्रसन्न होतो, मात्र गुरु प्रसन्न झाले तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचारधर्म, वर्णाश्रमधर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरूचीच सेवा करावी. त्याचेच भजन-पूजन करवे. गुरूच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे.
याचमुळे तीर्थ, व्रत, याग, तप, ज्योती स्वरूप अशा गुरूंची शास्त्रशुद्ध भक्ती करावी. आचार, धर्म, वर्ण, भक्ती, वैराग्य या सर्वांसाठी गुरु हेच मार्गदर्शक आहेत.

 

इतुके ऐकोनि कलि आपण । विनवीतसे कर जोडून ।
गुरु सर्व देवासमान । केवी झाला सांगा मज ॥४४॥
ब्रह्मा म्हणे कलीसी । सांगेन तुज विस्तारेसी ।
एकचित्ते परियेसी । गुरुवीण पार नाही ॥४५॥

अशाप्रकारे ब्रह्मदेवांनी गुरुमाहात्म्य सांगितले असता, कलीने विचारले, “गुरु हेच सर्व देवांसमान आहे असे म्हणता हे कसे काय?” ब्रम्हदेव कलीला म्हणाले, “तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुशिवाय तरणोपाय नाही.”

 

श्लोक ॥ गुरु विना न श्रवेण भवेत् कस्यापि कस्यचित् ।
विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् ॥४६॥
टीका । गुरुवीण समस्तांसी । श्रवण कैचे परियेसी ।
श्रवण होता मनुष्यांसी । समस्त शास्त्रे ऐकती ॥
शास्त्र ऐकता परियेसी । तरतील संसारासी ।
या कारणे गुरुचि प्रकाशी । ज्योतःस्वरूप जाणावा ॥४८॥
गुरु सेविता सर्व सिद्धि । होती परियेसा त्रिशुद्धि ।
कथा वर्तली अनादि । अपूर्व तुज सांगेन ॥४९॥

“शास्त्रश्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिस्वरुप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐक.” असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला.

 

पूर्वी गोदावरीचे तीरी । अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी ।
वृक्ष असती नानापरी । पुण्यनामे मृग वसती ॥५०॥
ब्रह्मऋषि आदिकरोनि । तप करिती तया स्थानी ।
तयांत वेदधर्म म्हणोनि । पैलपुत्र होता द्विज ॥५१॥
तया शिष्य बहु असती । वेदशास्त्र अभ्यासिती ।
त्यात दीपक म्हणोनि ख्याति । शिष्य होता परियेसा ॥५२॥
होता शिष्य गुरुपरायण । केला अभ्यास शास्त्रपुराण ।
झाला असे अतिनिपुण । सेवा करिता श्रीगुरुची ॥५३॥

खूप वर्षापूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होत. त्या आश्रमात पैलऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करीत असत. त्यांत संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. आपल्या गुरुंची अगदी मनापासून सेवा करून तो शास्त्र-पुराणांमध्ये पारंगत झाला.

 

वेदधर्म एके दिनी । समस्त शिष्यांसी बोलावूनी ।
पुसतसे संतोषोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५४॥
बोलावुनि शिष्यांसी । बोले गुरु परियेसी ।
प्रीति असेल आम्हांसी । तरी माझे वाक्य परियेसा ॥५५॥
शिष्य म्हणती गुरूसी । जे जे स्वामी निरोपिसी ।
तू तारक आम्हांसी । अंगिकारू हा भरवसा ॥५६॥
गुरूचे वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव घोरी ।
अविद्या मायासागरी । बुडोन जाय तो नर ॥५७॥
मग तया कैची गति । नरकी पडे तो सतती ।
गुरु तारक हे ख्याति । वेदपुराणे बोलती ॥५८॥

एकदा वेदधर्मानी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले व ते शिष्यांना म्हणाले, “तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका.” शिष्य म्हणाले, “गुरुदेव तुम्हीच आमचे तारणहार आहात. जो गुरूंचे आज्ञापालन करत नाही, तो तर या अज्ञानाच्या मायसागरातच बुडून जाणार. गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण. आपण काय ते सांगा.”

 

ऐकोनि शिष्यांची वाणी । तोषला वेदधर्म मुनी ।
संदीपकाते बोलावुनी । सांगतसे परियेसा ॥५९॥
ऐका शिष्य सकळीक । आमचे पूर्वार्जित असे एक ।
जन्मांतरी सहस्त्राधिक । केली होती महापातके ॥१६०॥
आमचे अनुष्ठान करिता । बहुत गेले प्रक्षाळिता ।
काही शेष असे आता । भोगिल्यावाचून न सुटे जाणा ॥६१॥
तप सामर्थ्ये उपेक्षा करितो । पापमोक्षा आड रिघतो ।
याचि कारणे निष्कृति करितो । तया पाप घोरासी ॥६२॥
न भोगिता आपुले देही । आपले पापा निष्कृति नाही ।
हा निश्चय जाणोनि पाही । भोगावे आम्ही परियेसा ॥६३॥
या पापाचे निष्कृतीसी । जावे आम्ही वाराणशीसी ।
जाईल पाप शीघ्रेसी । प्रख्यात असे अखिल शास्त्री ॥६४॥
या कारणे आम्हांसी । न्यावे पुरी वाराणशीसी ।
पाप भोगीन स्वदेहासी । माते तुम्ही सांभाळावे ॥६५॥
या समस्त शिष्यांत । कवण असे सामर्थ्यवंत ।
अंगिकारावे त्वरित । म्हणोनि पुसे शिष्यांसी ॥६६॥

शिष्यांचे हे बोलणे ऐकून वेदधर्म प्रसन्न चित्ताने म्हणाले, “पूर्वजन्मार्जीत, पूर्वसंचित अशी काही माझी पातके होती. या पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशीक्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरविले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एकजण जरी माझ्याबरोबर येउन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होइन.”

 

तया शिष्यांमध्ये एक । नाम असे संदीपक ।
बोलतसे अतिविवेक । तया गुरूप्रति देखा ॥६७॥
दीपक म्हणे गुरुस । पाप करितां देहनाश ।
न करावा संग्रहो दुःखास । शीघ्र करा प्रतिकारू ॥६८॥
वेदधर्म म्हणे तयासी । दृढ देह असता मनुष्यासी ।
क्षालन करावे पापासी । पुढती वाढे विषापरी ॥६९॥
अथवा तीर्थे प्रायश्चित्ते । आपुले देही भोगोनि त्वरिते ।
पापावेगळे न होता निरुते । मुक्ति नव्हे आपणांसी ॥१७०॥
देव अथवा ऋषेश्वरांसी । मनुष्यादि ज्ञानवंतासी ।
क्षालन न होय पापासी । आपुले आपण न भोगिता ॥७१॥
दीपक म्हणे गुरूसी । स्वामी निरोपावे आपणासी ।
सेवा करीन स्वशक्तीसी । न करिता अनुमान सांगिजे ॥७२॥

वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लगले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, “गुरुदेव,जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावं लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो. आपण आज्ञा करावी.”

 

ऐकोनि दीपकाचे वचन । वेदधर्म म्हणे आपण ।
कुष्ठे होईल अंग हीन । अंधक पांगूळ परियेसा ॥७३॥
संवत्सर एकविशंत । माते सांभाळावे बहुत ।
जरी असेल दृढ व्रत । अंगिकारावी तुम्ही सेवा ॥७४॥
दीपक म्हणे गुरूसी । कुष्ठी होईन आपण हर्षी ।
अंध होईन एकवीस वर्षी । पापनिष्कृति करीन ॥७५॥
तुमचे पापाचे निष्कृति । मी करीन निश्चिती ।
स्वामी निरोपावे त्वरिती । म्हणोनि चरणांसी लागला ॥७६॥

संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले. ते म्हणाले, “भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन. अंगहीन होईन. मी पांगळा होईन. अंध होईन. तुला माझा एकवीस वर्षे सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का ?” संदीपक म्हणाला – “मी आपणासाठी आनंदाने कुष्ठरोगी होईन, एकवीस वर्षे अंध होईन, आणि आपल्याला पापमुक्ती मिळेल हे निश्चित करीन.” असे म्हणून संदीपकाने गुरूंना चरणस्पर्श केला.

 

ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषला वेदधर्म मुनी ।
सांगतसे विस्तारोनि । तया पाप-लक्षणे ॥७७॥
आपुले पाप आपणासी । ग्राह्य नव्हे पुत्रशिष्यांसी ।
न भोगितां स्वदेहासी । न वेचे पाप परियेसा ॥७८॥
याकारणे आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा ।
सांभाळी मज तू संदीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥७९॥
जे पीडिती रोगे देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका ।
मजहूनि संदीपका । तूते कष्ट अधिक जाण ॥१८०॥
या कारणे आपुले देही । भोगीन पाप निश्चयी ।
तुवा प्रतिपाळावे पाही । काशीपूरा नेऊनिया ॥८१॥
तया काशीपुरी जाण । पापावेगळा होईन ।
आपण शाश्वतपद पावेन । तुजकरिता शिष्योत्तमा ॥८२॥
दीपक म्हणे गुरूसी । अवश्य नेईन पुरी काशी।
सेवा करीन एकवीस वर्षी । विश्वनाथासम तुमची ॥८३॥

संदीपकचे बोलणे ऐकून प्रसन्न झालेले वेदधर्म ऋषी पाप लक्षणे विस्ताराने सांगू लागले – “आपले पातक हे आपल्याच देहास भोगणे प्राप्त आहे, त्यात शिष्यगण कुठलेही सहाय्य करू शकत नाही. त्यामुळे हे संदीपका मला हे पातक भोगण्यास, तुला माझा एकवीस वर्षे सांभाळ करावा लागेल. पीडित, रोगी यांना होणाऱ्या त्रासापेक्षा त्यांचा सांभाळ करणाऱ्याना अधिक कष्ट होतात. त्यामुळे तुला सर्वाधिक कष्ट होतील. याचमुळे काशीक्षेत्री नेऊन मला पातकमुक्त होण्यास सहाय्य करण्याने तु शाश्वत शिष्योत्तम होशील.”
तेव्हा संदीपक म्हणाला – “मी आपणास अवश्य काशीक्षेत्री नेईन. आपली काशीविश्वनाथासम सेवा करीन.”

 

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । कैसा होता शिष्य त्यासी ।
कुष्ठ होतांची गुरूसी । नेले काशीपुरा ॥८४॥
मणिकर्णिका उत्तरदेशी । कंबळेश्वर सन्निधेसी ।
राहिले तेथे परियेसी । गुरू शिष्य दोघेजण ॥८५॥
स्नान करूनि मणिकर्णिकेसी । पूजा करिती विश्वनाथासी ।
प्रारब्धभोग त्या गुरूसी । भोगीत होता तया स्थानी ॥८६॥
कुष्ठरोग झाला बहुत । अक्षहीन अतिदुःखित ।
संदीपक सेवा करित । अतिभक्ती करूनिया ॥८७॥
व्यापिला देह कुष्ठे बहुत । पू कृमि पडे रक्त ।
दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥८८॥
भिक्षा मागोनि संदीपक । गुरूसी आणोनि देत नित्यक ।
करी पूजा भावे एक । विश्वनाथस्वरूप म्हणतसे ॥८९॥
रोगे करूनि पीडितां नरू । साधुजन होती क्रूरू ।
तोचि देखा द्विजवरू । होय क्रूर एखादे वेळी ॥१९०॥
भिक्षा आणितां एखादे दिवशी । न जेवे श्रीगुरु कोपेसी ।
स्वल्प आणिले म्हणोनि क्लेशी । सांडोनि देत भूमीवरी ॥९१॥
येरे दिवशि जाऊनि शिष्य । आणि अन्ने बहुवस ।
मिष्टान्ने न आणी म्हणोनि क्लेश । करिता झाल परियेसा ॥९२॥
परोपरीचे पक्वान्न । का नाणिशी म्हणे जाण ।
कोपे मारू येत आपण । शाका परोपरी मागतसे ॥९३॥
जितुके आणि मागोनिया । सर्वस्वे करीतसे वाया ।
कोपे देत शिविया । परोपरी परियेसा ॥९४॥
एखादे समयि शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।
मजनिमित्त कष्टलासी । शिष्यराया शिखामणी ॥९५॥
सवेचि म्हणत वचने क्रूर । माते गांजिले अपार ।
तू आमुचे विष्ठामूत्र । क्षणाक्षणा धूत नाही ॥९६॥
खाताती मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका ।
सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिशी म्हणतसे ॥९७॥
या कारणे पापगुण । ऐसेची असती जाण ।
वोखट वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावे ॥९८॥
पाप असे जेथे बहुत । दैन्य मत्सर वसे तेथ ।
शुभाशुभ नेणे क्वचित । पापरूपे जाणावे ॥९९॥
एखादे दैन्यकासी । दुःखे प्राप्त होती कैसी ।
अपस्मार होय जयासी । पाअरूप तोचि जाणा ॥२००॥
समस्त रोग असती देखा ।
कुष्ठ सोळा भाग नव्हे निका । वेदधर्म द्विज ऐका कष्टतसे येणेपरी ॥१॥

मग ब्रह्मदेव कलीयुगास म्हणाले – “पहा, तो कसा शिष्योत्तम होता. कुष्ठ झालेल्या आपल्या गुरूंना संदीपकाने काशी क्षेत्री नेले. तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते निवास करू लागले. तेथे मनकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले, त्यांची दृष्टी गेली, सगळे अवयव विद्रूप दिसू लागले, शरीरात पू-कृमी पडू लागली, अपस्मार होऊ लागला, त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे. विश्वनाथस्वरूप समजून तो त्यांची मनोभावे भक्ती करत असे. त्या दोघांसाठी नित्य भिक्षा मागून आणत असे.
परंतु महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु क्रोधीत होत, क्रूर होत. एखादे वेळी भिक्षा आणली असता, ती कमी आणली म्हणून भूमीवर सांडून उपाशी राहत. तर एखादे वेळी भरपूर भोजन आणले असता मिष्टान्न नाही म्हणून क्लेश करून घेत. तर कधी पक्वान्न नाही म्हणून कोप करून घेत. कधी सर्व मागवलेले अन्न वाया घालून कोप करून घेत. कधी संदीपकावर क्रोधीत होऊन म्हणत – “तू माझी सेवा करत नाहीस, माझे मूत्र-विष्ठा साफ करत नाहीस, माझ्या भिक्षेचा नाश करतोस, माझ्या जखमांवरील माशांचे निवारण करत नाहीस.” खरोखर, जेथे महा पातक असते तेथे दैन्य, मत्सर, अशुभ निवास करते. महारोगामुळे वेदधर्माना अपार कष्ट होत असे. सर्व रोग व्याधी एकत्र केले तरी ते महारोगाच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकत नाही.
परंतु तरीही गुरूंचे आचरण मनाशी न लावता संदीपक गुरूंची मनोभावे सेवा करत होता. काशीक्षेत्री असूनही, तीर्थ यात्रा न करता आपल्याच गुरूंना विश्वनाथ स्वरूप मानून त्यांची मनोभावे भक्ती करत होता.

 

श्लोक ॥ न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा ।
अहर्निश ब्रह्म हरिः सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न हि सेव्यमन्यत्‍ ॥५॥
टीका ॥ आपुले देहसंरक्षण । कधी न करी शिष्य जाण ।
लय लावूनि श्रीगुरुचरण । कवणासवे न बोलेची ॥६॥
अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा शिव म्हणे हरी ।
गुरुचि होय निर्धारी । म्हणोनि सेवा करीतसे ॥७॥
गुरु बोले निष्ठुरेसी । आपण मनी संतोषी ।
जे जे त्याचे मानसी । पाहिजे तैसे वर्ततसे ॥८॥
वर्तता येनेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।
उभा येऊनि सन्मुख । वर माग म्हणतसे ॥९॥
अहो गुरुभक्त दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।
तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका । प्रसन्न झालो माग आता ॥२१०॥

संदीपकाच्या या गुरुसेवेची किर्ती देवांना समजली. अशा गुरूंची अहोरात्र सेवा करणारा भक्त पाहून ब्रह्म आणि शिव ही प्रसन्न झाले. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झालें. ते संदीपकाला म्हणाले,"मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग."

 

दीपक म्हणे ईश्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।
न पुसतां आम्ही गुरुसी । वर न घे सर्वथा ॥११॥
म्हणोनि गेला गुरुपासी । विनवीतसे तयासी ।
विश्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होवोनि आलासे ॥१२॥
निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशर्म व्याधीचा ।
वर होता सदाशिवाचा । बरवे होईल म्हणतसे ॥१३॥
ऐकोनिया शिष्याचे वचन । बोले गुरु कोपायमान ।
माझे व्याधिनिमित्त जाण । नको प्रार्थू ईश्वरासी ॥१४॥
भोगिल्यावाचोनि पातकासी । निवृत्ति नव्हे गा परियेसी ।
जन्मांतरी बाधिती निश्चयेसी । धर्मशास्त्री असे जाण ॥१५॥
मुक्ति अपेक्षा ज्याचे मनी । तेणे करावी पापधुणी ।
शेष राहतां निर्गुणी । विघ्न करितील मोक्षासी ॥१६॥
ऐशियापरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसी ।
निरोप मागोनि श्रीगुरुसी । गेला ईश्वरासन्मुख ॥१७॥
जाऊनि सांगे ईश्वरासी । नलगे वर आपणासी ।
नये गुरुचे मानसी । केवी घेऊ म्हणतसे ॥१८॥

परंतु संदीपकाने भगवान शंकरास सांगितले – “मी गुरुआज्ञा शिवाय कुठलाही वर मागू शकत नाही.” असे म्हणून संदीपकाने गुरूंना विनवणी केली – “विश्वनाथ मला प्रसन्न होऊन वर देत आहेत. मी आपल्या सर्व व्याधींचा, कष्टाच्या निवारणाचा वर मागू का?”
संदीपकाचे बोलणे ऐकून वेदधर्म क्रोधीत झाले, म्हणाले – “माझ्या व्याधीचे कारण जाणून माझ्यासाठी कुठलाही वर मागू नको. भोगल्याशिवाय पापक्षालन होत नाही, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष नाही,ज्याला मुक्ती हवी आहे त्याने सर्व पाप क्षालन करून निर्गुण होऊनच मोक्षचा मार्ग निर्विघ्न करावा, हेच धर्म शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे भगवान शंकरास सांग – मला कुठलाही वर नको.”

 

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंडपासी ।
बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तान्त विष्णूपुढे ॥१९॥
श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।
कोठे त्यांचा रहिवास । सांगावे मज निर्धारे ॥२२०॥
सांगे ईश्वर विष्णुसी । आश्चर्य देखिले परियेसी ।
दीपक शिष्य निश्चयेसी । गुरुभक्त असे जाणा ॥२१॥
गोदावरीतीरवासी । वेदधर्म म्हणिजे तापसी ।
त्याची सेवा अहर्निशी । करितो भावे एकचित्ते ॥२२॥
नाही त्रिलोकी देखिला कोणी । गुरुभक्ति करणार निर्गुणी ।
त्याते देखोनि माझे मनी । अतिप्रीति वर्ततसे ॥२३॥
वर देईन म्हणोनि आपण । गेलो होतो तयाजवळी जाण ।
गुरूचा निरोप नाही म्हणोन । न घे वर परियेसा ॥२४॥
अनेक दिव्यसहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।
वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनिया ॥२५॥
तैसा तापसी योगी यांसी । नव्हे मज वर द्यावयासी ।
बलात्कारे देता तयासी । वर न घे तो दीपक ॥२६॥
तनमन अर्पूनि श्रीगुरूसी । सेवा करितो संतोषी ।
त्रयमूर्ति म्हणोनि गुरूसी । निश्चये भजतसे ॥२७॥
समस्त देव मातापिता । गुरुचि असे तत्त्वतां ।
निश्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥२८॥
किती म्हणोनि वर्णू त्यासी । अविद्या-अंधकारासी ।
छेदिता दीपक परियेसी । कुलदीपक नाम सत्य ॥२९॥
धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे कुलदीपक ।
चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरूची भक्तीने ॥२३०॥

आश्चर्यचकित झालेले भगवान शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व वृत्तांत भगवान विष्णुंना सांगितला.
श्री विष्णू शंकरास विचारले – असा कसा गुरु? असा कसा शिष्य? मला त्यांची माहिती द्या.
भगवान शंकर म्हणाले – “गोदावरीतीरी वेदधर्म ऋषी राहतात. संदीपक नावाचा त्यांचा शिष्य अहोरात्र त्यांची मनोभावे सेवा भक्ती करतो. असा गुरुभक्त मी पूर्ण त्रिलोकांत अजून पाहिला नाही. मी वर देण्यासाठी गेलो असता, गुरु आज्ञा नाही म्हणून त्याने वर मागितला नाही. मी असे अनेक महर्षी तपस्वी पहिले, जे वर मिळवण्यासाठी अहोरात्र तप, साधना करतात. संदीपकास निश्चयाने वर देऊन ही केवळ गुरु आज्ञा नाही म्हणून त्याने वर स्वीकारला नाही. खरोखर त्याचे वर्णन किती करावे. कुलदीपक म्हणून त्याने आपले नाव सार्थ केले आहे.”

 

इतुके ऐकोनि शार्ङ्गधरू । पहावया गेला शिष्यगुरु ।
त्यांचा भक्तिप्रकारू । पाहे तये वेळी ॥३१॥
सांगितले विश्वनाथे । त्याहून दिसे आणिक तेथे ।
संतोषोनि दीपकाते । म्हणे विष्णु परियेसा ॥३२॥
दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी ।
वर देतोसी परियेसी । कवण कार्या सांग मज ॥३४॥
लक्ष कोटी सहस्त्र वरुषी । तप करिती अरण्यावासी ।
त्यांसी करितोसी उदासी । वर न देसी नारायण ॥३५॥
मी तरी तुज भजत नाही । तुझे नाम स्मरत नाही ।
बलात्कारे येवोनि पाही । केवी देशी वर मज ॥३६॥

इतके ऐकून भगवान विष्णू या गुरु भक्ताच्या भेटीला गेले. भगवान शंकरांनी वर्णन केल्यापेक्षा त्यांनी अधिक काही पहिले. प्रसन्न होऊन ते संदीपकास वर देऊ म्हणाले. ते ऐकून संदीपक म्हणाला – “अरण्यात सहस्त्र, लक्ष वर्षे तप साधना करूनही तुम्ही कित्येक महर्षी तपस्वी यांना प्रसन्न होत नाहीत. मी तर तुमचे नामस्मरण ही करत नाही, मग मला वर का देत आहात?”

 

ऐकोनि दीपकाचे वचन । संतोषला नारायण ।
सांगतसे विस्तारोन । तया दीपकाप्रती देखा ॥३७॥
गुरुभक्ति करिसी निर्वाणेसी । म्हणोनि आम्ही जाहलो संतोषी ।
जे भक्ति केली त्वां गुरूसी । तेचि आम्हांसी पावली ॥३८॥
जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा जीवप्राण ।
त्यासी वश्य झालो आपण । जे मागेल ते देतो तया ॥३९॥
सेवा करी माता पिता । ती पावे मज तत्त्वतां ।
पतिसेवा स्त्रिया करिता । तेही मज पावतसे ॥२४०॥
एखाद्या भल्या ब्राह्मणासी । यती योगेश्वर तापसी ।
करिती नमन भक्तीसी । तेचि मज पावे जाणा ॥४१॥

संदीपकाचे बोलणे ऐकून भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले – “खरे आहे. तुझ्या गुरु भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आणि तिचा आम्हाला पावली. जो मनुष्य खऱ्या अर्थाने गुरु भक्ती जाणतो, त्यावर आम्ही प्रसन्न होतो. जो कोणी माता-पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो.”

 

ऐसे ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक ।
विनवीतसे देख । म्हणे सिद्ध नामधारका ॥४२॥
ऐक विष्णु ह्रषीकेशी । निश्चय असो माझे मानसी ।
वेदशास्त्र मीमांसादिकांसी । गुरु आम्हांसी देणार ॥४३॥
गुरूपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां आधीन ।
आमुचा गुरुचि देव जाण । अन्यथा नाही जाण पा ॥४४॥
सर्व देव सर्व तीर्थ । गुरूचि आम्हा असे सत्य ।
गुरूवांचूनि आम्हां परमार्थ । काय दूर असे सांगा ॥४५॥
समस्त योगी सिद्धजन । गुरूवांचूनि न होती सज्ञान ।
ज्ञान होता ईश्वर आपण । केवी दूर असे सांगा ॥४६॥
जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज ।
याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥४७॥
संतोषोनि नारायण । म्हणे धन्य धन्य माझा प्राण ।
तू शिष्य-शिरोरत्‍न । बाळक तूचि आमुचा ॥४८॥
काही तरी माग आता । वर देईन तत्त्वतां ।
विश्वनाथ आला होता । दुसरेन वर द्यावयासी मी आलो ॥४९॥
आमचेनि मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी ।
तुज वश्य झालो निर्धारेसी । जे पाहिजे ते देईन आता ॥२५०॥

हे ऐकून संदीपक अधिकच विनम्र होऊन म्हणाला – “हे भगवान, वेदशास्त्रे , मीमांसा आदींचे ज्ञान तर आमचे गुरु आम्हाला देतीलच. गुरु हेच सर्व ज्ञानभंडार आहे, गुरूंशिवाय ज्ञान कोण देणार? आणि ज्ञान प्राप्ती झाली असता ईश्वर प्राप्ती तर होणारच.”
हे ऐकून भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले – “प्रथम भगवान शंकर तुला वर द्यायला आले होते, आता दुसऱ्यांदा मी आलो आहे. आम्ही तुझ्या गुरु भक्तीने प्रसन्न झालो आहोत. तुला हवा तो वर माग.”

 

दीपक म्हणे विष्णुसी । जरी वर आम्हां देसी ।
गुरुभक्ति होय अधिक मानसी । ऐसे मज ज्ञान द्यावे ॥५१॥
गुरूचे रूप आपण ओळखे । ऐसे ज्ञान देई सुखे ।
यापरते न मागे निके । म्हणोनि चरणी लागला ॥५२॥
दिधला वर शार्ङ्गपाणी । संतोषोनि बोले वाणी ।
अरे दीपका शिरोमणी । तू माझा प्राणसखा होशी ॥५३॥
तुवा ओळखिले गुरूसी । देखिले दृष्टी परब्रह्मासी ।
आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन एक एकचित्ते ॥५४॥
लौकिक सुबुद्धि होय जैशी । धर्माधर्मसुमने तैशी ।
उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसी । स्तुति करि गा अहर्निशी ॥५५॥
जे जे समयी श्रीगुरूसी । तू भक्तीने स्तुति करिसी । तेणे ।
होऊ आम्ही संतोषी । तेचि आमुची स्तुति जाण ॥५६॥
वेद वाचिती सांगेसी । वेदान्त भाष्य अहर्निषी ।
वाचिती जन उत्कृष्टेसी । आम्हा पावे निर्धारी ॥५७॥
बोलती वेद सिद्धान्त । गुरुचि ब्रह्म असे म्हणत ।
याचि कारणे गुरु भजता सत्य । सर्व देवता तुज वश्य ॥५८॥
गुरु म्हणजे अक्षर दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडता क्षण । केवी होय परियेसा ॥५९॥
जयाचे ह्रदयी गुरुस्मरण । तोचि त्रिलोकी पूज्य जाण ।
अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥२६०॥

संदीपक भगवान विष्णुंना म्हणाला – “वर द्यायचा असेल तर माझी गुरउभक्ती अधिक दृढ होईल असे वरदान द्या.”
प्रसन्न होऊन भगवान विष्णुंनी संदीपकास वरदान दिले आणि म्हणाले – “तुझ्यावर गुरूंची कृपादृष्टी आहे मग परमेश्वरची तर असणारच. तुझी गुरु भक्ती ही आम्ही आमचीच भक्ती समजतो. जो गुरु स्मरण करतो तो त्रिलोकांत पूजनीय होतो.”

 

श्लोक ॥ यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।
अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्‍गुरुस्तदा ॥६१॥
टीका ॥ आपण अथवा ईश्वरु । ब्रह्मा जरी देता वरु ।
तद्वत्‍ फलदाता गुरु । गुरु त्रैमूर्ति याचि कारणे ॥६२॥
ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूने परियेसी ।
ब्रह्मा सांगे कलीसी । एकचित्ते परियेसा ॥६३॥
वर लाधोनि दीपक । गेला गुरूचे सन्मुख ।
पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥६४॥
ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधले वैकुंठनायका ।
विस्तारोनि सांगे निका । माझे मन स्थिर होय ॥६५॥

असा वर प्राप्त होऊन संदीपक आपल्या गुरूंजवळ गेला असता, गुरूंनी “भगवान विष्णुनी कुठले वरदान दिले?” अशी विचारणा केली.

 

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला ह्रषीकेशी ।
म्या मागितले तयासी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनिया ॥६६॥
गुरुची सेवा तत्परेसी । अंतःकरण दृढेसी ।
वर दिधला संतोषी । दृढभक्ति माझी तुमचे चरणी ॥६७॥
संतोषोनि श्रीगुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारू ।
जीवित्वे होय तू स्थिरू । काशीपुरी वास करी ॥६८॥
तुझे वाक्य सर्वसिद्धि । तुझे घरी नवनिधि ।
विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषोनि ॥६९॥
तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती ।
श्रियायुक्त नांदती । तुझे स्मरणमात्रेसी ॥२७०॥
येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसी ।
दिव्यदेह झाला तत्क्षणेसी । झाला गुरु वेदधर्म ॥७१॥
शिष्याचा भाव पहावयास । कुष्ठी झाला महाक्लेश ।
तो तापसी अतिविशेष । त्यासी कैचे पाप राहे ॥७२॥
लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशी ।
काशीक्षेत्रमहिमा ऐसी । पाप जाय सहस्त्र जन्मीचे ॥७३॥
तया काशीनगरात । धर्म अथवा अधर्म-रत ।
वास करिती क्वचित । त्यांसि पुनर्जन्म नाही जाणा ॥७४॥
सूत म्हणे ऋषीश्वरासी । येणे प्रकारे कलीसी ।
सांगे ब्रह्मा परियेसी । शिष्यदीपक आख्यान ॥७५॥
सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावे याचि गुणी ।
तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे येणेविधी ॥७६॥
श्लोक ॥ यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः ।
तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥७७॥
टीका । जरी भक्ति असे दृढेसी । त्रिकरणसह मानसी ।
तोचि लाधे ईश्वरासी । ईश्वर होय तया वश्य ॥७८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥
॥ ओवीसंख्या ॥२७९॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

तेव्हा संदीपक म्हणाला, “मी भगवान विष्णुंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला!” संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले, “संदीपका, धन्य आहे तुझी गुरुभक्ती! तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्वप्रकारच्या वैभवाने संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत.” असे ते म्हणाले, तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, “बाळा, मी तुझी परीक्षा पहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. एकवीस वर्षे तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील.” सूत म्हणाले, “ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, “गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने, भक्तीभावाने सेवा केली तर भगवान श्रीशंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात.”
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'कलियुग वर्णन - गुरुमाहात्म्य संदीपक आख्यान' नावाचा अध्याय दुसरा समाप्त.
॥ ओवीसंख्या ॥२७९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🌹🙏

लेखन - श्रीरंग विभांडिक, ठाणे
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

श्री गुरुचरित्र – अध्याय ०२ Read More »

Scroll to Top
Scroll to Top
Enable Notifications OK No Thanks